वेलिंग्टन : सध्या जगभरात करोना कुठे किती वाढला, याच्याच बातम्या आहेत. त्यामुळे त्या बातम्यांकडे कितीही दुर्लक्ष करायचे म्हटले, तरी नकारात्मक वातावरणाची निर्मिती झाली आहे. या पार्श्वभूमीवर, न्यूझीलंडमधून एक अत्यंत सकारात्मक बातमी आली आहे. आजच्या घडीला न्यूझीलंडमध्ये एकही करोनाबाधित रुग्ण नसल्याचे न्यूझीलंडच्या तरुण पंतप्रधान जसिंडा अर्डर्न यांनी जाहीर केले आहे. करोनामुळे देशात लागू करण्यात आलेले निर्बंध मंगळवारपासून (नऊ जून) उठवण्यात येणार आहेत. त्यानंतर या देशात आनंदाची लहर पसरली आहे. करोनामुक्ती खरेच साध्य होऊ शकते, यावर विश्वास बसण्यासारखी स्थिती दिसत नसताना तशी स्थिती येणे शक्य आहे, असा दिलासा या बातमीने दिला आहे.
२८ फेब्रुवारीला न्यूझीलंडमध्ये करोनाचा पहिला रुग्ण सापडला. सुमारे ५० लाख लोकसंख्या असलेल्या या देशात ११५४ जणांना करोनाची लागण झाली होती, तर २२ जणांचे बळी करोनामुळे गेले. ‘देशात करोनाचा एकही रुग्ण नसल्याची स्थिती २८ फेब्रुवारीनंतर आज (आठ जून) प्रथमच आली आहे,’ असे सरकारच्या पत्रकात म्हटले आहे. आरोग्य विभागाचे महासंचालक डॉ. अॅश्ले ब्लूमफिल्ड यांनी दिलेल्या माहितीनुसार, करोना विषाणूच्या संसर्गाची लक्षणे असलेल्या शेवटच्या रुग्णालाही आता विलगीकरण कक्षातून बाहेर सोडण्यात आले आहे. कारण त्याच्यात आता कोणतीही लक्षणे दिसत नसून, तो बरा झाला आहे.
‘आणि ७५ दिवसांनी आपण पुन्हा सज्ज आहोत...’ अशी घोषणा पंतप्रधान जसिंडा अर्डर्न यांनी केली. तेथे सध्या राष्ट्रीय पातळीवर दक्षतेचा दुसऱ्या क्रमांकाचा इशारा लागू होता. तो बदलून आता पहिल्या क्रमांकाचा इशारा लागू करण्यात आला असून, आज (आठ जून) मध्यरात्रीपासून सोशल डिस्टन्सिंगचे निकष रद्द केले जाणार आहेत. अर्थात, बाहेरच्या देशातून न्यूझीलंडमध्ये येणाऱ्या प्रत्येकावर लक्ष ठेवण्यात येणार असून, त्यांच्या चाचण्या घेतल्या जाणार आहेत.
‘याचा अर्थ ही लढाई जिंकली, असा नाही; मात्र त्या लढाईतील हा निश्चितच एक मैलाचा दगड आहे, अशी भावना पंतप्रधान अर्डर्न यांनी व्यक्त केली. ‘आम्ही न्यूझीलंडमध्ये करोनाचा प्रसार थांबवला आहे, हे मी आत्मविश्वासाने सांगू इच्छिते; मात्र या विषाणूचा नायनाट करणे ही एका खेपेत होणारी गोष्ट नसून, त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज आहे,’ असे त्या म्हणाल्या.
न्यूझीलंडमध्ये करोनामुळे लागू करण्यात आलेले निर्बंध आता उठवण्यात येणार असून, खासगी, तसेच सार्वजनिक कार्यक्रम, हॉटेल उद्योग, सार्वजनिक वाहतूक आदी सर्व सेवा पूर्वीप्रमाणे सुरू केल्या जाणार आहेत. करोनाचा प्रसार आटोक्यात न आल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे निकष जगभरातील बहुतांश देशांमध्ये आजही लागू ठेवावे लागत आहेत. या पार्श्वभूमीवर न्यूझीलंडचे चित्र दिलासादायक आहे.
करोनामुळे पसरलेल्या जागतिक महामारीशी ब्राझील, ब्रिटन, अमेरिका, भारत आदी मोठ्या अर्थव्यवस्था अजूनही झुंजत असून, बहुतांश देशांत करोनाचा प्रसार थांबलेला नाही. या पार्श्वभूमीवर, न्यूझीलंड यातून बाहेर पडत असल्याचे चित्र उठून दिसत आहे.
अत्यंत कडक टाळेबंदी यशस्वी
न्यूझीलंडने ७५ दिवस लादलेल्या निर्बंधांचा या यशात मोठा वाटा आहे. त्यात सात आठवडे अत्यंत कडक टाळेबंदीची (लॉकडाउन) अंमलबजावणी करण्यात आली होती. त्या कालावधीत बहुतांश उद्योगधंदे बंद करण्यात आले होते आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त सर्वांनाच घरी थांबणे बंधनकारक करण्यात आले होते, असे रॉयटर्सच्या बातमीत म्हटले आहे.
करोनाचा प्रसार थांबवण्यात यश आले असले, तरी त्याचा नायनाट करण्याची प्रतिज्ञा या देशाने केली आहे. म्हणजेच एकही नवा रुग्ण न सापडण्याचा कालावधी जास्तीत जास्त दीर्घ करण्यासाठी हा देश सज्ज आहे. तरीही कोणाला या विषाणूची लागण झाली असल्यास तातडीने त्याचे निदन करणे आणि परदेशातून कोणी आले असल्यास त्यांचे विलगीकरण करण्यासाठीची सिद्धता आणि सज्जता राखण्यात आली आहे.
देश करोनामुक्त झाल्याच्या बातमीनंतर न्यूझीलंडच्या नागरिकांनी जल्लोष केला आणि त्याचा ट्विटरवर लगेच ट्रेंडही झाला. रग्बीच्या चाहत्यांना तर रग्बीचे सामने होण्याचे वेध लागले आहेत.
पंतप्रधान नाचल्या
अर्डर्न म्हणाल्या, ‘न्यूझीलंडमध्ये करोनाचा एकही रुग्ण नसल्याची बातमी मला कळली, तेव्हा मी थोडी नाचलेच. माझी दोन वर्षांची मुलगी नेवे हिच्यासाठी ते एक सरप्राइजच होते. मी का नाचतेय, याची तिला कल्पना नव्हती. पण तीही नाचू लागली आणि तिनेही त्या क्षणाचा आनंद घेतला.’
अर्डर्न यांची लोकप्रियता वाढली
३९ वर्षांच्या अर्डर्न यांनी करोनाच्या काळात ज्या पद्धतीने देशाचे नेतृत्व केले, त्याचे जगभर कौतुक होत आहे. गेल्या काही महिन्यांत त्यांची लोकप्रियता आणखी वाढली आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात तेथे निवडणुका असून, त्या पुन्हा एकदा पंतप्रधान होतील, असा अंदाज ओपिनियन पोल्समधून व्यक्त करण्यात आला आहे. ऑक्टोबर २०१७मध्ये जसिंडा पहिल्यांदा न्यूझीलंडच्या पंतप्रधान झाल्या होत्या. न्यूझीलंडच्या इतिहासातील सर्वांत तरुण पंतप्रधान बनण्याचा विक्रम त्यांनी केला होता. शपथविधीच्या अवघ्या सहा दिवस आधी त्यांना आपण गर्भवती असल्याची बातमी समजली होती. ही गोष्ट जाहीर केल्यावर त्यांच्यावर टीकाही झाली होती. मुलीच्या जन्मानंतर त्यांनी काही आठवड्यांची रजा घेऊन मातृत्वाची जबाबदारीही सांभाळली. पंतप्रधानपदी असताना बाळाला जन्म देणाऱ्या त्या जगातील दुसऱ्या महिला ठरल्या. याआधी १९८८मध्ये बेनझीर भुत्तो यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी असताना मुलाला जन्म दिला होता.
मंदीचे संकट
करोनाचा प्रसार थांबवण्यात मिळालेले यश वाखाणण्यासारखे असले, तरीही संभाव्य मंदीच्या स्थितीतून अर्थव्यवस्थेला सांभाळण्याची मोठी जबाबदारी जसिंडा यांच्या सरकारवर आहे. दोन आठवड्यांपेक्षाही जास्त काळ एकही नवा रुग्ण आढळला नसूनही, कडक टाळेबंदी न उठवल्याबद्दल विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
‘काळजीपूर्वक पावले उचलणार’
ऑस्ट्रेलियासोबत प्रवासाचे निर्बंध कधी उठवणार, हे त्यांनी अद्याप जाहीर केलेले नाही. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही देशांतील पर्यटन क्षेत्रातील कंपन्यांनी मात्र त्यासाठी पाठपुरावा केला आहे. आता आपल्याला काळजीपूर्वक पावले उचलावी लागणार असून, न्यूझीलंडने केलेल्या कामगिरीवर पाणी फिरवण्याची कोणाचीही इच्छा नाही, असे त्यांनी सांगितले.