रत्नागिरी : ‘राज्याच्या अंतिम स्पर्धेत महाराष्ट्राची ट्रॉफी रत्नागिरी जिंकेल. या खेळाडूंची आर्थिक, प्रशिक्षण व अन्य सर्व जबाबदारी आमदार म्हणून मी घेतो. नैपुण्य दाखवणार्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पाठवू,’ अशी ग्वाही भारतीय जनता पक्षाचे (भाजप) उपाध्यक्ष तथा आमदार प्रसाद लाड यांनी दिली.
सीएम चषक क्रीडा स्पर्धेच्या जिल्हास्तरीय स्पर्धांचे उद्घाटन चार जानेवारी २०१९ रोजी सकाळी छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर लाड यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. सकाळी खो-खो व क्रिकेट स्पर्धांचा प्रारंभ झाला. या वेळी रत्नागिरीचे नाव उज्ज्वल करणारी खो-खो पटू ऐश्वर्या सावंत, खो-खो संघटनेचे प्रमुख आणि प्रशिक्षक संदीप तावडे यांचा सत्कार आमदार लाड यांच्या हस्ते करण्यात आला.
आमदार लाड म्हणाले, ‘१६ ते ३२ वयोगटांतील युवक संगणकावर खेळ खेळतात, मैदानी खेळ खेळत नाहीत. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्रीडा स्पर्धा व नृत्य, चित्रकला, रांगोळी स्पर्धांचे आयोजन केले. ग्रामीण भागातील खेळाडूंनी यात भाग घेतला. महाराष्ट्रात ५० लाखांपेक्षा जास्त खेळाडूंची नोंदणी झाली. रत्नागिरी जिल्ह्यात ६० हजार व सिंधुदुर्गात ७६ हजार खेळाडूंची नोंदणी झाली. याबदद्दल तालुकाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, युवा मोर्चा पदाधिकार्यांचे अभिनंदन करतो.’
‘तरुणांना वाव मिळावा, खेळाडूंना राज्य, आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी खेळावी या भावनेतून ही स्पर्धा यशस्वी होत आहे. देशाचे पंतप्रधान तरुण, महिलांसाठी उपक्रम, योजना राबवत आहेत. क्रीडा संघटनेत राजकारण आणू नये. अनेक खेळाडूंनी भारताचे नाव मोठे केले आहे. पूर्वी एशियाडमध्ये भारताचे रँकिंग शेवट असायचे. मात्र गेल्या चार वर्षांत खेळाडू असलेले क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनी खेळाला प्राधान्य दिले आहे,’ असे लाड यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला ‘भाजप’ प्रवक्ते अॅड. दीपक पटवर्धन, पदाधिकारी प्रा. नाना शिंदे, खो-खो संघटनेचे प्रमुख संदीप तावडे, दत्ता देसाई, सचिन वहाळकर, तालुकाध्यक्ष सतीश शेवडे, शहराध्यक्ष प्रशांत डिंगणकर, शहर सरचिटणीस बिपीन शिवलकर, माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, नगरसेवक उमेश कुळकर्णी, मुन्ना चवंडे, प्रणाली रायकर, सुप्रिया रसाळ, ऐश्वर्या जठार, अंजली साळवी, राजश्री शिवलकर, श्रीकांत मांडवकर, दादा दळी, नीलेश लाड, भाई जठार, संगीता कवितके, राजू भाटलेकर, मुकुंद जोशी, सुशांत पाटकर, अण्णा करमरकर, संकेत बापट, प्रवीण जोशी, विजय सालीम, अमित विलणकर, अविनाश साटम यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.