
कोची : करोनाचा संसर्ग झालेल्या दुर्गम भागांतील रुग्णांची उपचारांसाठी विमान किंवा हेलिकॉप्टरद्वारे वाहतूक करायची असेल, तर त्यासाठी नौदलाच्या कोची नेव्हल एअरक्राफ्ट यार्डमध्ये विशेष पेट्या तयार केल्या आहेत. एअर इव्हॅक्युएशन पॉड्स असे त्यांचे नाव असून, बेटांवर, जहाजांवर करोनाचे रुग्ण आढळल्यास त्यांची यातून सुरक्षितपणे वाहतूक करता येणार आहे. यातून वाहतूक केल्यास रुग्णांमुळे करोनाचा संसर्ग पायलट किंवा वाहतूक करणाऱ्या टीममधील अन्य कोणालाही होण्याची भीती नाही. तसेच, याद्वारे रुग्णांची वाहतूक केल्यानंतर विमान किंवा हेलिकॉप्टरचे निर्जंतुकीकरण करण्याचीही आवश्यकता नाही, इतके ते सुरक्षित आहे. याचा खर्चही परदेशी पेट्यांच्या तुलनेत केवळ एक टक्का एवढाच आहे.
नौदलाच्या दक्षिण कमांडचे कोची येथील मुख्यालय, तेथील आयएनएचएस संजीवनी या हॉस्पिटलमधील तज्ज्ञ आदींशी चर्चा करून आयएनएस गरुडा या नौदलाच्या हवाई तळावरील प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही पॉड्स तयार करण्यात आली आहेत. अॅल्युमिनियम, नायट्राइल रबर आणि पर्स्पेक्स यांचा वापर त्यासाठी करण्यात आला आहे. याचे वजन केवळ ३२ किलो असल्याने ते उचलून नेणे सोपे आहे. तसेच, एका पॉडच्या निर्मितीसाठी केवळ ५० हजार रुपये खर्च आला आहे. याच पद्धतीच्या परदेशी पॉड्सची किंमत सुमारे ५९ लाख रुपये एवढी आहे. त्यामुळे हे अत्यंत किफायतशीर आहे.
अत्याधुनिक हलकी हेलिकॉप्टर्स, तसेच भारतीय नौदलाची डॉर्निअर विमाने यांतून या पॉड्सद्वारे करोना रुग्णांची वाहतूक करण्याची चाचणी आठ एप्रिल रोजी यशस्वीरीत्या घेण्यात आली. अशा प्रकारची १२ पॉड्स नौदलाच्या दक्षिण, पश्चिम, पूर्व आणि अंदमान निकोबार कमांड्सना वितरित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.