Ad will apear here
Next
निजलेल्या बालकवीस : अभिवाचन - अक्षय वाटवे


बालकवी म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना झोपेतून उठविण्याच्या निमित्ताने त्यांचे गुणवर्णन करणारे गोविंदाग्रजांनी केलेले काव्य म्हणजे ‘निजलेल्या बालकवीस.’ ‘फारच थोड्या वेळात हे काव्य केलेले असल्यामुळे त्यात बालकवींचे यथार्थ गुणवर्णन आलेले नाही,’ असेही त्यांनी या गीताच्या प्रस्तावनेत म्हटले आहे. मंगेश पाडगांवकर यांनी लिहिलेली ‘सलाम’ ही कविता म्हणजे समाजस्थिती आणि मानवी वृत्तींचे उपरोधिक शैलीत केलेले आणि मनाला भिडणारे वर्णन आहे. मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या विशेष उपक्रमाचा एक भाग म्हणून या कविता आपल्यापुढे सादर केल्या आहेत अक्षय वाटवे यांनी. कोकणातील पार्श्वभूमीवर घडणारी ‘कुकारा’ ही त्यांची स्वतःची लघुकथाही त्यांनी सादर केली आहे. पाहा सोबतचा व्हिडिओ...
..........
गोविंदाग्रजनिजलेल्या बालकवीस

जगद्गायका बालकवे! चल, ऊठ ऊठ आतां॥
तूंच निजसि तरि कोण सांग मग जागवील जगता?॥धृ.॥

हा तुझा अरुण बघ उगवे पूर्वेकडे॥
वद कोण तयाचें गाणें गाइल गडे? ॥
हा देवद्वारीं चौघडाहि धडधडे॥
करि कोण तुझ्याविण बोल तयाचे खडे ?॥
तव कवनाची वाट पाहतीं पहा उगवतीं किरणें ॥
गाउनि गाणीं प्रेमळ त्या उल्हास तूंच रे देणें॥

बघ सृष्टीचे कवि कसे भरारति गगनीं॥
गातात कोणत्या स्वैर सुरांची गाणीं?॥
चल एकजीव हो लौकर त्यांच्या गानीं॥
स्वर्गांत सांग मग तेंच आमुच्या कानीं ॥
सौदर्यांची द्वाहि फिरविण्या बा तव अवतार ॥
मग ऊठ निजसि कां असा गड्या रे झोंप झालि फार॥

बघ फुलें उमललीं आतां सारीं नवीं ॥
तव रसवंतीचीं फुलेंहि आम्हां हवीं ॥
तव रसाळ रसना-रससांगरिं जग झुलवी॥
रस उधळुनि गगनीं लपल्या मुकुला खुलवीं॥
नव्या सृष्टीच्या नव्या यशाचा तूंच शिलेदार॥
नव कवितेच्या जरिपटक्याचा तुलाच अधिकार॥

तव गान खळाला नेइल पुण्याकडे॥
शिकवील यमाला, सदयत्वाचे धडे॥
फत्तरांत वाजविल प्रेमाचे चौघडे॥
नेईल सज्जना आनंदापलिकडे॥
सूर खडा धर लावुनि गगनापलिकडे नक्की॥ 
करि पुढें खडा जगदीश देउनी प्रेमगांठ पक्की॥

भ्रमभरें विश्व हें सर्व जयांमधिं बुडें ॥
चल फोडुनि टाकूं ते फसवे बुडबुडे ॥
मग बस् जाउनी काळाच्याही पुढें ॥
तव सुराबरोबर कोण न यापरि उडे?॥
'गोविंदाग्रज' कविसि तुजसवें ने देउनि हांता॥
जगद्गायका बालकवे! चल, ऊठ ऊठ आतां॥

- गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी)
(गोविंदाग्रजांचं साहित्य ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी https://goo.gl/vUizrY येथे क्लिक करा.)
............
मंगेश पाडगावकरसलाम

सबको सलाम
ज्याच्या हातात दंडा
त्याला सलाम,
लाथेच्या भयाने
डावा हात गांडीवर ठेवून
उजव्या हाताने सलाम,
बघणाऱ्याला सलाम,
न बघणाऱ्याला सलाम,
विकत घेणाऱ्याला सलाम,
विकत घेण्याचा इशारा करणाऱ्याला सलाम,
सलाम, भाई,
सबको सलाम.

वटारलेल्या प्रत्येक डोळ्याला सलाम,
शेंदूर फासलेल्या दगडाला सलाम,
लाखो खर्चून बांधलेल्या देवळांना सलाम,
देवळातल्या देवांच्या धाकाला सलाम,
देवांचे आणि धर्माचे कंत्राट घेणाऱ्यांना सलाम,
रिकाम्या हातातून ऊद काढणाऱ्या बडेबुवाला सलाम,
शनीला सलाम,
मंगळाला सलाम,
भितीच्या प्रत्येक ठेकेदाराला सलाम,
आईवर आयुष्यभर गुरगुरणाऱ्या बापाला सलाम,
बापावर गुरगुरणाऱ्या साहेबाला सलाम,
साहेबाची टरकवणाऱ्या
त्याच्या साहेबाला सलाम,
सलाम, प्यारे भाईयों और बहनों,
सबको सलाम.

ज्याच्या हातात वृत्तपत्र
त्याला सलाम,
भाषणांचे, सभांचे
फोटो सकट रिपोर्ट छापतो त्याला सलाम,
वृत्तपत्रांच्या मालकांना सलाम,
त्यांची वेसण धरणाऱ्या
राज्यकर्त्यांना सलाम,
ज्याच्या समोर माइक्रोफोन
त्याला सलाम,
त्यातून न थांबता बोलतो
त्याला सलाम,
लाखोंच्या गर्दीला सलाम,
गर्दी झुलवणाऱ्या
जादुगारांना सलाम,
भाईयों और बहनों, सबको सलाम.

नाक्यावरच्या दादाला सलाम,
हातभट्टीवाल्याला सलाम,
स्मग्लरला सलाम,
मटकेवाल्याला सलाम,
त्यांनी पेरलेल्या हफ्त्यांना सलाम,
लोकशाहीलाबी सलाम,
ठोकशाहीलाबी सलाम,
सत्तेचा ट्रक चालविणाऱ्यांना सलाम,
ट्रकखाली चिरडलेल्या,
गांडुळांना, कुत्र्यांना सलाम,
ज्याच्या हातात चाकू त्याला सलाम,
विमानातून बाँम्ब फेकणार्यांसना सलाम,
शस्त्रास्त्रांच्या प्रचंड व्यापाऱ्यांना सलाम,
काळा बाजारवाल्यांना सलाम,
त्यांना फाशी देण्याची घोषणा करणाऱ्यांना  सलाम,
गटारातल्या पाण्याने इंजेक्शन भरणाऱ्यांना सलाम,
तिरडीचे सामान विकणाऱ्यांना सलाम,
तिरडी उचलणाऱ्या खांद्यांना सलाम,
मौत सस्ती करणाऱ्या सर्वांना सलाम,
सलाम, प्यारे दोस्तों, सबको सलाम.

बिळांना सलाम,
बिळातल्या उंदरांना सलाम,
घरातल्या झुरळांना सलाम,
खाटेतल्या ढेकणांना सलाम,
पिचलेल्या बायकोला सलाम,
दीड खोलीतल्या पोरड्याला सलाम,
गाडीत चेंगरणाऱ्या गर्दीला सलाम,
किडक्या धान्याला सलाम,
भोके पडलेल्या पिवळ्या गन्जिफ्रॉकला सलाम,
धंद्याच्या मालकाला सलाम,
युनियनच्या लीडरला सलाम,
संपाला सलाम,
उपासमारीला सलाम,
सर्व रंगांच्या सर्व झेंड्यांना सलाम,
चाळीचाळीतून तुंबलेल्या
संडासातल्या लेंड्यांना सलाम,
मानगूट पकडणाऱ्या
प्रत्येक हाताला सलाम,
सलाम, भाईयों और बहनों, सबको सलाम.

या माझ्या परमपवित्र इत्यादी देशाला सलाम,
या देशाच्या सुउदात्त सुमंगल सुपरंपरेला सलाम,
सर्व बिलंदर घोषणांना सलाम,
जातिभेदाच्या उकिरड्यांना सलाम,
या उकिरड्यातून सत्तेचं पीक काढणाऱ्यांना सलाम,
उपनिषदे आणि वेदांना सलाम,
साखर कारखान्यांच्या दादांना सलाम,
त्यांच्या शेकडो लॉऱ्यांना सलाम,
निवडणुकींना सलाम,
निवडणूक फंडाला सलाम,
अदृश्य बुक्क्यांना सलाम,
मतांच्या आंधळ्या शिक्क्यांना सलाम,
ससा हाती असलेल्या पारध्यांना सलाम,
त्यांच्या तैनातीतल्या गारद्यांना सलाम,
दलितांवर अत्याचार करणाऱ्यांना सलाम,
या बातम्या वाचणाऱ्या सर्व षंढांना सलाम,
सलाम, भाईयों और बहनों, सबको सलाम.

सत्ता, संपत्तीच्या भडव्यांचा देश म्हटले
तर डोके फोडतील,
हलकट लाचारांचा देश म्हटले
तर रस्त्यावर झोडतील,
खरीदले जाणाऱ्यांचा देश म्हटले
तर वाटा रोखतील,
देवधर्माविषयी, नेत्यांविषयी वाईट बोललो
तर नाक्यावर गाठून ठोकतील,
शोषण करणाऱ्यांचा देश म्हटले
तर नोकरीवरून काढतील, 
म्हणून आधी माझ्या नपुंसकत्वाला सलाम,
आणि त्यानंतर अर्थातच
या माझ्या
परमपवित्र सुउदात्त सुमंगल देशाला सलाम,
या महान देशाच्या महान परंपरेला सलाम.

सलाम प्यारे भाईयों और बहनों, सबको सलाम,
अनेक हात असते
तर अनेक हातांनी केला असता सलाम,
लेकिन माफ करना भाईयों,
हात तर दोनच
आणि त्यातला डावा
लाथेच्या भयाने
ठेवलेला गांडीवर
म्हणून फक्त उजव्या हाताने सलाम,
सलाम, सबको सलाम,
भाईयों और बहनों,सबको सलाम.

- मंगेश पाडगांवकर

(मंगेश पाडगांवकर यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी https://goo.gl/wtck5N येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZOACJ
Similar Posts
बालकवींची औदुंबर कविता : अभिवाचन - स्वाती महाळंक त्र्यंबक बापूजी ठोंबरे अर्थात बालकवी यांना निसर्गकवी असे म्हटले जाते. त्यांच्या बहुतांश रचना त्याची साक्ष देतात. अवघ्या आठ ओळींत आपल्यापुढे एक मनोहर निसर्गचित्र उभी करणारी आणि आपल्याला एका वेगळ्याच भावविश्वात घेऊन जाणारी कविता म्हणजे ‘औदुंबर.’ मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या विशेष उपक्रमाचा
‘फुलराणी’ आणि ‘पैठणी’ कवितांचे अभिवाचन : मधुराणी प्रभुलकर निसर्गाचं अत्यंत सुंदर वर्णन आपल्या कवितांमधून करणारे कवी म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे ऊर्फ बालकवी. अत्यंत प्रसन्न आणि टवटवीत लेखन करणाऱ्या लेखिका-कवयित्री म्हणजे शांता शेळके. बालकवींची ‘फुलराणी’ ही कविता आणि शांताबाईंची ‘पैठणी’ ही कविता म्हणजे एक वेगळीच अनुभूती देणाऱ्या साहित्यकृती. मराठी राजभाषा दिनानिमित्त
कविवर्य कुसुमाग्रजांची ‘विशाखा’ ‘जीवनलहरी’ आणि ‘जाईचा कुंज’ यांनंतरचा ‘विशाखा’ हा कुसुमाग्रजांचा तिसरा काव्यसंग्रह. औचित्य, संयम, विलक्षण जीवन, निसर्ग, राष्ट्र यावरील प्रेम यांतून कुसुमाग्रजांच्या कवितेचा प्रवाह खळखळत, वेगाने वाहत राहतो, याचा प्रत्यय ‘विशाखा’तील कवितांमधून पुन:पुन्हा येतो. आज, २७ फेब्रुवारीला कुसुमाग्रजांच्या जयंतीदिनी मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो
गोविंदाग्रजांची काव्यसृष्टी - मराठीचे अलौकिक शब्दलेणे! शब्दशक्तीचं सामर्थ्य, त्यातल्या अर्थच्छटांची सूक्ष्म जाण, बुद्धिमत्ता आणि तरल कल्पनाशक्ती या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे गोविंदाग्रजांची काव्यसृष्टी. गोविंदाग्रजांनी मराठी वाङ्मयाला, समृद्ध, श्रीमंत केलं आहे आणि हे आपणा सर्व रसिकांसाठी अमूल्य असं शब्दलेणं आहे. २६ मे हा गोविंदाग्रज अर्थात राम गणेश गडकरी यांचा जन्मदिन

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language