अलीकडे बरेच आर्थिक घोटाळे होत आहेत, ते उघडकीस येण्याचं प्रमाणही वाढलेलं आहे; मात्र तपासासाठी ‘फॉरेन्सिक अकाउंटंट्स’ मात्र खूप कमी आहेत. या पार्श्वभूमीवर, मूळची सोलापूरची आणि सध्या पुण्यात असलेली डॉ. अपूर्वा प्रदीप जोशी ही तरुणी गेल्या दशकभराहून अधिक काळ फॉरेन्सिक अकाउंटिंग या क्षेत्रात उल्लेखनीय काम करते आहे. शिक्षणापासून जनजागृतीपर्यंत आणि तपासापासून व्यवस्थापनापर्यंत अशा विविध पातळ्यांवर तिच्या कार्याची व्याप्ती आहे. आज महिला दिन आहे. त्या निमित्ताने डॉ. अपूर्वाबद्दलचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संग्रहातील लेख पुन्हा एकदा प्रसिद्ध करत आहोत.
......
सोलापूरसारख्या छोट्या शहरातून एक मुलगी वेगळ्या संधीच्या शोधात पुण्यात येते; तशी संधी तिला मिळते किंवा खरं तर ती स्वतःच संधी शोधते; ‘संधीचं सोनं करणं’ हा वाक्प्रचार पुरेपूर अंमलात आणते; मौजमजा वगैरे सगळं बाजूला ठेवून भरपूर अभ्यास, कष्ट, संशोधन करते आणि वेगळ्या क्षेत्रात अनेक वेगवेगळ्या पराक्रमांची नोंद करते; पराक्रमांनी हुरळून न जाता पुढेही त्याच ध्यासाने काम करत राहते.... ‘कोणत्याही क्षेत्रात गेलीस, तरी सर्वोत्तम कामगिरी कर’ या आपल्या आई-वडिलांनी दाखविलेल्या मार्गावरून वाटचाल करते आणि यशस्वी होते...

या मुलीचं नाव डॉ. अपूर्वा प्रदीप जोशी... पुण्यातल्या रिस्कप्रो या कंपनीची संचालक ही तिची एक ओळख सांगता येईल. फॉरेन्सिक अकाउंटिंग या तुम्ही-आम्ही फारशा न ऐकलेल्या, पण आता प्रचंड काम असलेल्या क्षेत्रात ती कार्यरत आहे. सर्वांत कमी वयात (२१व्या वर्षी) सर्टिफाइड फ्रॉड एक्झामिनर होणारी ती भारतातली पहिली मुलगी आहे. या क्षेत्रातल्या तिच्या करिअरला अलीकडेच दहा वर्षं पूर्ण झाली आहेत. या कालावधीत दोन परदेशी विद्यापीठांच्या डॉक्टरेट तिला मिळाल्या आहेत. त्याव्यतिरिक्त ‘आयआयएम, बेंगळुरू’सह विविध नामवंत संस्थांमधून इतर अनेक पदव्या तिनं मिळवल्या आहेत. तिच्या अनुभवामुळे अनेक ख्यातकीर्त कंपन्यांच्या संचालक मंडळांवर तिची निवड झाली आहे. तिच्या विषयाशी संबंधित काही अभ्यासक्रम तिनं तयार केले आहेत, त्यांना विद्यापीठाची मान्यता मिळाली आहे. त्याच्याशी संबंधित संदर्भ पुस्तकंही तिनं लिहिली आहेत. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या अॅकॅडमीनेही नुकताच तिच्या रिस्कप्रो या कंपनीसोबत चार प्रकारच्या कोर्ससाठी करार केला आहे. तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये तिने एकंदर जवळपास ३० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचा तपास केला आहे.
‘अराइज, अवेक’ या रश्मी बन्सल यांनी लिहिलेल्या ‘बेस्ट सेलर’ पुस्तकात तिची यशोगाथा प्रसिद्ध झाली आहे.
कदाचित हे सारं एका दमात वाचूनही दम लागू शकतो. एवढा अभ्यास करून दहा वर्षांत या टप्प्यावर येण्यासाठी तिनं किती कष्ट घेतले असतील आणि किती कसून, जिद्दीनं काम केलं असेल, याचा अंदाज या एवढ्यावरून येऊ शकतो. अर्थात, ‘उठा, जागे व्हा आणि ध्येयप्राप्ती होईपर्यंत थांबू नका’ हा स्वामी विवेकानंदांचा विचार तिचा आदर्श आहे. अनेकांच्या ‘फेसबुक प्रोफाइल’मधील ‘फेव्हरिट कोट’मध्ये हा विचार दिसू शकेल. अपूर्वाच्याही प्रोफाइलमध्येही तो दिसतो; पण तो केवळ तिथे लिहिण्याएवढाच मर्यादित ठेवलेला नसून, तिच्या नसानसांत तो भिनलेला आहे, हे तिच्या कामगिरीवरून सहज कळतं. अपूर्वाशी बोलणं आणि तिच्या तोंडून तिचा हा सगळा प्रवास ऐकणं हा खरोखरच एक प्रेरणादायी अनुभव होता. तो प्रवास जाणून घ्यायला तुम्हालाही नक्की आवडेल. एखादी व्यक्ती किती प्रचंड काम करू शकते, त्यातून ती स्वतः विकसित होत जाऊन समाजाला उपयुक्त काम कसं करू शकते हे कळावं, यासाठी ही यशोगाथा प्रदीर्घ लिहिली आहे.
सोलापूरच्या ज्ञानप्रबोधिनी प्रशालेतून अपूर्वाचं शिक्षण झालं. कुटुंबाची पार्श्वभूमी वैद्यकीय व्यवसायाची. तिची आई डॉक्टर होती. वडील डॉक्टर आहेत. बहीण आणि तिचे पती डॉक्टर. लहान भाऊ भाभा अणुसंशोधन केंद्रात शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. अपूर्वा लहानपणापासूनच हुशार विद्यार्थिनी. दहावीत ८९ टक्के, तर बारावीत ८६ टक्के गुण तिला मिळाले होते. घरच्यांपेक्षा वेगळ्या म्हणजे कॉमर्स क्षेत्रात जाण्यात आणि पुढे जाऊन सीए होण्यात तिला रस होता. तिच्या आई-वडिलांनीही तिला क्षेत्र निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं; पण जे करशील, जे क्षेत्र निवडशील, त्यातली सर्वोच्च पदवी मिळव, सर्वोत्तम काम करून दाखव, असंही तिला सांगितलं. तिच्या मनात होतंच आणि आई-वडिलांचा पाठिंबा मिळाल्यानं तिला हुरूपही आला. ती बी. कॉम. झाली. सोलापुरात असतानाच पहिल्याच प्रयत्नात सीए फर्स्ट इयरही तिनं पूर्ण केलं. त्यापुढे शिकण्यात मात्र सोलापुरात काही मर्यादा असल्यानं ती आर्टिकलशिपसाठी २००७मध्ये पुण्यात आली. घरात कॉमर्सचं कोणी नसल्यानं मार्गदर्शन मिळणं कठीण होतं; पण त्याच दरम्यान आपल्याकडे इंटरनेटचा विस्तार हळूहळू वाढत होता. त्याचा चांगला उपयोग करून अपूर्वानं ‘ऑनलाइन प्रेझेन्स’ प्रस्थापित केला. ऑर्कुट, फेसबुकबरोबरच वेगवेगळ्या साइट्सवरूनही ती माहितीच्या शोधात असायची. दरम्यान, मनीकंट्रोल या वेबसाइटवर सीए मयूर जोशी यांचा घोटाळ्यांच्या शोधासंदर्भातला एक लेख तिच्या वाचनात आला.
ती म्हणाली, ‘मयूर जोशींचा तो लेख वाचेपर्यंत फॉरेन्सिक अकाउंटिंगमधला ‘एफ’ही मला माहिती नव्हता; पण मला इंटरेस्ट वाटला आणि मी त्यांच्याकडे जायचं ठरवलं. जानेवारी २००८मध्ये मी त्यांना भेटले. तेही ज्ञानप्रबोधिनीचे होते. त्यामुळे आमची वेव्हलेंग्थ जुळली. त्यांनी माझा धावता इंटरव्ह्यू घेतला आणि मला ‘आर्टिकलशिप’ची ऑफर दिली. त्यांचे वडीलही सीए असल्यानं त्यांच्याकडे आर्टिकलशिप करण्याची संधी होती; मात्र त्याच वेळी ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’ (आयसीएआय) या संस्थेनं प्रथमच एक संशोधन प्रकल्प आउटसोर्स केला होता. ‘अर्ली वॉर्निंग सिग्नल्स ऑफ कॉर्पोरेट फ्रॉड्स’ असं त्या प्रकल्पाचं नाव होतं. म्हणजे कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये काही घोटाळे होऊ घातले असतील, तर त्याची पूर्वकल्पना देणारे काही निकष शोधून काढणं, असं त्या प्रकल्पाचं स्वरूप होतं. त्यातून काही क्लास-वन अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा सरकारचा मानस होता. मग मयूर जोशींकडे (रिस्कप्रो कंपनी) आलेल्या या प्रकल्पासोबत मला आर्टिकलशिप करायची संधी मिळत होती आणि अर्थातच ती मी निवडली.’
फॉरेन्सिक अकाउंटिंग हे क्षेत्र आर्थिक घोटाळ्यांचा तपास करतं आणि तसे घोटाळे होऊ नयेत, म्हणूनही या क्षेत्राचं काम महत्त्वाचं असतं. या क्षेत्रात अजूनही मुली फारशा नाहीत. कारण फॉरेन्सिक म्हटलं की डोळ्यांसमोर येणारं चित्र भीतिदायक असतं. त्यामुळे मुलींना घरातून विरोध होतो; पण अपूर्वा आई-वडिलांशी बोलली आणि तिला त्यांनी परवानगी दिली आणि या आव्हानात्मक क्षेत्रात अपूर्वाचा प्रवेश झाला.
प्रकल्पातल्या कामाचा अनुभव
त्या प्रकल्पातल्या कामाचा अनुभव अपूर्वाचं आयुष्य बदलणारा ठरला. तिनं त्याबद्दल भरभरून सांगितलं. ‘आम्ही ११ वेगवेगळी क्षेत्रं निवडली. त्यात सर्वसाधारणपणे होणारे घोटाळे कोणते आणि त्यातले सर्वाधिक होणारे घोटाळे कोणते, असा ‘फ्रॉड ट्रँगल’ भारतात पहिल्यांदा प्रस्थापित केला गेला. १२००हून अधिक लिस्टेड कंपन्या शेअर प्राइस वाढविण्यासाठी फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये घोटाळा करत असल्याचं संवेदनशील निदान आम्ही केलं आणि आम्ही अचानक चर्चेत आलो. हिंदुस्तान टाइम्स, मिंट, इकॉनॉमिक टाइम्स वगैरे वृत्तपत्रांत या निदानाबद्दल छापून आलं. आम्हाला सेबी, शेअर बाजार अशा ठिकाणांहून कॉल्स येऊ लागले. ही गोष्ट सप्टेंबर २००८ची. तोच माझ्या आयुष्यातला ‘टर्निंग पॉइंट’ होता. आपण नेमकं काय करतोय, हे मला तेव्हा लक्षात आलं. भारताला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अभ्यासाची गरज आहे, हे तिथून कळायला लागलं. या निदानानंतर अवघ्या तीन महिन्यांत ‘सत्यम’चा घोटाळा उघडकीस आला,’ असं अपूर्वा जेव्हा सांगत होती, तेव्हा या महत्त्वपूर्ण कामाचा आपण एक भाग असल्याचं समाधान तिच्या आवाजातून डोकावत होतं.
‘सत्यम घोटाळ्याच्या तपासात सरकारी यंत्रणेनं माझ्या कंपनीला सहभागी करून घेतलं होतं. यामुळे मला ‘प्रोफेशनल ब्रेक’ मिळाला. विविध मल्टिनॅशनल कंपन्या, रिटेल चेन यांच्या फॉरेन्सिक ऑडिटमध्ये मयूर जोशींनी मला सहभागी करून घेतलं. तिथून माझा शिकण्याचा प्रवास सुरू झाला,’ असं अपूर्वानं सांगितलं.
वेगवेगळी सर्टिफिकेशन्स आणि विक्रम
२००९-१०मध्ये भारतातली ‘फॉरेन्सिक अकाउंटिंग’मधली वेगवेगळी सर्टिफिकेशन्स अपूर्वानं मिळवली. सर्टिफाइड फॉरेन्सिक अकाउंटिंग प्रोफेशनल, सर्टिफाइड अँटी मनी लाँडरिंग एक्स्पर्ट, सर्टिफाइड बँकिंग फॉरेन्सिक अकाउंटंट ही सर्टिफिकेशन्स तिनं प्रशिक्षणादरम्यान दीड वर्षात मिळवली. त्याचदरम्यान अमेरिकेतल्या ‘असोसिएशन ऑफ सर्टिफाइड फ्रॉड एक्झामिनर’ या संस्थेच्या सीएफई अर्थात सर्टिफाइड फ्रॉड एक्झामिनर या सर्टिफिकेशनबद्दलही तिला कळलं होतं. घोटाळ्यांचा अधिकृत तपास करण्यासाठी हे प्रमाणपत्र असणं आवश्यक असतं. कॉर्पोरेट क्षेत्रात त्याला खूप महत्त्व असल्यानं त्यासाठी तिनं प्रयत्न करायचं ठरवलं. त्यासाठी ऑडिटिंग, फॉरेन्सिक वगैरे क्षेत्रातला पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक होतं. तसा तिच्याकडे नव्हता; पण आर्टिकलशिपमध्ये तिनं मोठ्या प्रकल्पावर काम केलेलं असल्यानं उपयोग झाला आणि तो अनुभव त्यासाठी ग्राह्य धरला गेला. तांत्रिक अडचण दूर झाल्यावर बाकी कसली अडचण नव्हतीच. कारण अभ्यास तर ती झटून करायचीच. त्यासाठीचे चार पेपर ती प्रत्येकी ७० टक्क्यांहून अधिक गुणांनी उत्तीर्ण झाली आणि एक विक्रम तिच्या नावे नोंदला गेला. ऑक्टोबर २०१०मध्ये वयाच्या २१व्या वर्षी ती सर्टिफाइड फ्रॉड एक्झामिनर झाली. हे प्रमाणपत्र मिळविणारी ती देशातली सर्वांत कमी वयाची व्यक्ती ठरली. आजही तो विक्रम अबाधित आहे. जानेवारी २०११मध्ये तिची आर्टिकलशिप संपली. त्याच दरम्यान, ती सीए फायनल आणि सीएस फायनल्सपर्यंत आली. एम. कॉम ही पदवीही तिने मिळवली.
‘फ्रॉडएक्स्प्रेस’
आपण ज्या क्षेत्रात काम करतो, त्या क्षेत्राबद्दल लोकांना कळावं, त्या क्षेत्रातल्या समाजोपयोगी गोष्टींबद्दल जनजागृती करावी, असं किती जणांना वाटतं? अपूर्वाला मात्र तसं वाटत होतं. म्हणूनच तिनं २०११मध्ये
‘फ्रॉडएक्स्प्रेस’ हे स्टार्टअप सुरू केलं. ‘डिजिटल अँटी फ्रॉड मीडिया’ म्हणजेच आर्थिक घोटाळ्यांची माहिती देणारी, त्या क्षेत्रातल्या तपासाचं काम कसं चालतं, वगैरे सांगणारी इंग्रजी वेबसाइट तिनं सुरू केली. परदेशातल्या महिला फ्रॉड एक्झामिनर्सच्या मुलाखती वगैरे ती घेऊ लागली. तिनं आपली टीम तयार केली होती. त्यांच्याकडून काम करून घेऊन ती त्यांना मानधन द्यायची. ही वेगळी संकल्पना हिट झाली. अमेरिका, युरोपसारख्या ठिकाणांहून हिट्स येऊ लागल्या. तिला जाहिरातीही मिळू लागल्या, तिला तिच्या क्षेत्रातल्या कामांच्या असाइनमेंट्सही येऊ लागल्या होत्या. त्यामुळे पैसे मिळू लागले आणि व्यवसायाला आकार येऊ लागला.
‘स्टडी मटेरियल’ची निर्मिती
२०१२मध्ये अपूर्वाच्या आईचं निधन झालं. त्या वेळी ती जवळपास वर्षभर सोलापुरात आपल्या घरी, वडिलांसोबत होती. अर्थात तेव्हाही ती स्वस्थ बसली नव्हती. आईनं सांगितल्यानुसार आपल्या क्षेत्रातला सर्वोत्तमतेचा ध्यास तिनं घेतला होता. त्या काळात ‘स्टुडंट्स हँडबुक ऑन फॉरेन्सिक अकाउंटिंग’ असं पुस्तक तिनं लिहिलं. या विषयातलं भारतीय संदर्भातलं साहित्य उपलब्ध नव्हतं आणि शिकण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाला ते अमेरिकेतून मागवणं शक्य नव्हतं. म्हणून तिनं हे पुस्तक लिहिलं आणि ते फ्लिपकार्ट, अमेझॉनवर हिट झालं. ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’ने पहिल्या काही बॅचेसच्या विद्यार्थ्यांनाही ते पुस्तक दिलं. त्यातून तिला एक वेगळाच आत्मविश्वास आला.
आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा आपल्या घरच्या विद्यापीठालाही उपयोग व्हावा, या हेतूने अपूर्वा २०१३मध्ये सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूंना भेटली. फ्रॉड रिस्क मॅनेजमेंट, फॉरेन्सिक अकाउंटिंग वगैरे विषयांचे कोर्सेस सुरू करण्यासंदर्भात तिनं कुलगुरूंकडे विचारणा केली आणि तिला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. मग तिने डिप्लोमा आणि सर्टिफिकेशन या पातळ्यांवरचे चार अभ्यासक्रम तयार केले आणि ते विषय सोलापूर विद्यापीठात शिकविले जाऊ लागले.
पुढचा टप्पा
ऑक्टोबर २०१३पर्यंत ‘फ्रॉडएक्स्प्रेस’ चांगलं प्रस्थापित झालं होतं, तरीही ते ‘स्टार्टअप’च होतं. कार्यविस्तारासाठी ते अडचणीचं ठरत होतं. दरम्यान, पुन्हा एकदा मयूर जोशींशी अपूर्वाची गाठ पडली. त्यांच्या रिस्कप्रो कंपनीनं ऑक्टोबर २०१३मध्ये ‘फ्रॉडएक्स्प्रेस’ विकत घेतलं आणि अपूर्वा त्या कंपनीची डायरेक्टर अर्थात संचालक झाली. तिथे तिनं ड्यू-डिलिजन्स आणि कम्प्युटर फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन अशी नवी शाखा सुरू केली.
दरम्यान, डिसेंबर २०१३मध्ये तिनं ‘आयआयएम, बेंगळुरू’चं एक सर्टिफिकेशन मिळवलं. क्विक हील या देशातल्या नामवंत कंपनीची असाइनमेंट मिळाली होती. त्याच वेळी त्या कंपनीला स्वतंत्र महिला संचालक हवा होता. अपूर्वाच्या कामाच्या पद्धतीचा प्रभाव त्यांच्यावर पडला. २०१५मध्ये त्यांच्याकडून तिची या पदावर निवड झाली. (या पदावरचीही ती सर्वांत कमी वयाची व्यक्ती होती.) त्या कंपनीच्या विविध प्रकारच्या समित्यांचा ती भाग झाली आणि तिच्या अनुभवाचं खातं अधिकाधिक समृद्ध होत होतं.
२०१४-१५मध्येच आर्थिक तपासासाठी, तसंच हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातल्या तपासासाठी दुबईत जाण्याची संधी तिला मिळाली. आधीचा चांगला अनुभव गाठीशी असल्यानं अत्यंत कठीण परिस्थितीतही हे काम चांगल्या पद्धतीनं करता आलं. आंतरराष्ट्रीय पातळीवरचा हा कामाचा अनुभवही खूप शिकवून गेल्याचं अपूर्वा म्हणाली. २०१७च्या सुरुवातीला रिंडर या मूळच्या स्पॅनिश कंपनीच्या आणि भारतात गुरुग्राममध्ये मुख्यालय असलेल्या कंपनीच्या संचालक मंडळावरही तिची निवड झाली.
फॉरेन्सिक अकाउंटंट संचालक मंडळावर नेमकं काय करतो? तर, कंपनीनं विविध प्रकारच्या परवानग्या (कम्प्लायन्सेस) व्यवस्थित घेतलेल्या आहेत ना, कंपनीवर कोणते खटले चालू आहेत का, त्यामध्ये कंपनीनं बाजू योग्य प्रकारे कशी मांडली पाहिजे, वगैरे गोष्टींत या फॉरेन्सिक अकाउंटंटचं मार्गदर्शन महत्त्वाचं असतं.
अपूर्वाच्या कामाचं स्वरूप
रिस्कप्रो कंपनीत अपूर्वा ‘ड्यू डिलिजन्स’ या विभागाची प्रमुख आहे. एखादा घोटाळा किंवा एखादा अपराध होण्याआधीच त्याची पावलं ओळखून तो होऊ नये, म्हणून जी काळजी घेतली जाते, त्याला ड्यू डिलिजन्स असं म्हणतात. या कामाबद्दल अपूर्वानं अधिक माहिती दिली.
‘अनेक बँका, इन्व्हेस्टर फर्म्स आमच्या क्लायंट आहेत. सध्या एनपीए अर्थात अनार्जित म्हणजेच वसूल न होणारी कर्जं ही मोठी समस्या झालेली आहे. मग तशी वेळ येऊ नये, यासाठी आम्ही आमच्या क्लायंटकडून कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांची माहिती काढतो. यालाच ‘प्रमोटर ड्यू डिलिजन्स’ असं म्हणतात. कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांची पार्श्वभूमी कशी आहे, ते पाहतो. बॅलन्स शीट अगदी ‘पर्फेक्ट’ असेल याची काळजी घेतलेली असते; पण त्यातच कुठेतरी गोम असू शकते. अभ्यासातून ते लक्षात येतं. ‘ऑडिटर ड्यू डिलिजन्स’ हेही आम्ही भारतात सुरू केलंय. बॅलन्सशीट योग्य आहे, असं सांगणाऱ्या व्यक्तीवर (म्हणजेच सीए/ऑडिटर) सरकारचा विश्वास असतो; पण ती व्यक्ती खरंच पात्र आहे का, त्याची पार्श्वभूमी काय आहे, तो माणूस पैसे बाहेर काढून द्यायला मदत करतोय का, वगैरे गोष्टी तपासाव्या लागतात. ते तपासल्यानंतर योग्य माणसांना/संस्थांनाच कर्जं देता येऊ शकतात आणि ती कर्जं अनार्जित होणार नाहीत, याची खात्री असते,’ असं अपूर्वानं सांगितलं.
‘कम्प्युटर फॉरेन्सिक’चं कामही अपूर्वा पाहते. एखाद्या कर्मचाऱ्यानं कंपनीची गुप्त माहिती बाहेर कोणाला पाठवली आहे का किंवा कोणता डेटा बाहेरून मागवला आहे का, वगैरे माहिती लॅपटॉप किंवा कम्प्युटरच्या हार्डडिस्कच्या ‘इमेज’द्वारे मिळविता येते आणि छडा लावता येतो. हे काम ‘कम्प्युटर फॉरेन्सिक’मध्ये मोडतं.
ऑगस्ट २०१८मध्ये नॅशनल स्टॉक एक्स्चेंज अॅकॅडमीनेही अपूर्वाच्या संस्थेसोबत प्रशिक्षण देणारे कोर्सेस सुरू केले आहेत. विद्यार्थी, ब्रोकर्स, गुंतवणूकदारांना त्याद्वारे प्रशिक्षण दिलं जातं. कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर हे कोर्सेस करू शकतात आणि या विषयातलं आपलं ज्ञान वाढवू शकतात.
घोटाळ्यांचं स्वरूप आणि तज्ज्ञांची आवश्यकता
घोटाळे नेमके कसे केले जातात, याबद्दलही अपूर्वानं थोडं सांगितलं. ‘कंपनीचं व्यवस्थापन किंवा कर्मचारी/बाह्य घटक अशा दोनच घटकांकडून घोटाळे होऊ शकतात. व्यवस्थापनाकडून होणाऱ्या घोटाळ्यांमध्ये शेअर प्राइस वाढण्यासाठी काही खोट्या अनाउन्समेंट करणं किंवा कंपनीच्या झालेल्या चुका दडपणं/बाहेर येऊ न देणं, कोणत्याही परिस्थितीत बॅलन्सशीट चांगली कशी राहील, याची काळजी घेणं, आदी बाबींचा समावेश असतो. कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या घोटाळ्यांमध्ये कंपनीची गुपितं बाहेर विकणं, वगैरे गोष्टींचा समावेश असतो. २००८मध्ये केलेल्या अभ्यासात यातल्या अनेक गोष्टी लक्षात आल्या होत्या. भारत हा काही घोटाळे करणारा एकमेव देश नाही; पण हे नावीन्यपूर्ण घोटाळ्यांचं केंद्र आहे. त्यामुळे त्या तपासासाठी अधिकाधिक तज्ज्ञांची गरज आहे. आज देशात या क्षेत्रात काम करणारे केवळ चार ते पाच हजार जण आहेत. किमान तेवढ्याच आणखी तज्ज्ञांची गरज आपल्याला आहे. सायबर गुन्ह्यांचंही प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे त्यातला पैसा कुठे गेलाय, कसा गेला, हल्ला कुठून झाला, कोणी केला, या सगळ्यासाठी सायबर फॉरेन्सिक एक्स्पर्टची आवश्यकता आहे,’ असं अपूर्वा सांगत होती, तेव्हा या क्षेत्राबद्दलची आणि समाजाबद्दलची तिची कळकळ समजत होती.
डबल डॉक्टरेट...‘युनिव्हर्सिटी ऑफ साउथ अमेरिका’ने वेगळ्या प्रकारच्या शिक्षणात योगदान देणाऱ्या व्यक्तींची निवड करून त्यांच्याकडून शोधनिबंध मागवले होते. डिसेंबर २०१७मध्ये अपूर्वानं त्यासाठी शोधनिबंध सादर केला आणि विद्यापीठाकडून तो संमत झाल्यामुळे तिला ‘डॉक्टर ऑफ लेटर्स’ ही पदवी मिळाली. नेपाळमधील ‘युनिव्हर्सिटी ऑफ एशिया’कडूनही तिला ऑक्टोबर २०१८मध्ये मानद डी. लिट. पदवी मिळाली. (या विद्यापीठाची ही पदवी मिळविणारीही ती सर्वांत कमी वयाची व्यक्ती आहे.) त्यामुळे वयाच्या २८व्या आणि २९व्या अशा सलग दोन वर्षी तिला डॉक्टरेट मिळाल्या. तिचं कुटुंब (वैद्यकीय क्षेत्रातल्या) डॉक्टर्सचं आहे. वेगळ्या क्षेत्रात येऊन तिनंही डबल डॉक्टरेट मिळविली आणि ती ‘डॉ. अपूर्वा’ झाली, याचा तिला आनंद आहे.
‘आईनं सांगितल्यानुसार, या क्षेत्रातली डॉक्टरेट ही सर्वोच्च पदवी तर मिळवलीच; पण त्याहीपुढे जाऊन अनेक विक्रम मोडून विविध प्रकारचं उच्च शिक्षण घेऊ शकल्यामुळे मी स्वतःलाच स्वतःच्या नजरेत आदर्श म्हणून पाहू शकले,’ असं अपूर्वानं सांगितलं. ‘तोच आदर्श मला समाजातल्या मुलींपर्यंत पोहोचवायचा आहे. अधिकाधिक मुली या क्षेत्रात यायला हव्यात,’ असंही ती आवर्जून म्हणाली.
‘या क्षेत्रात आव्हानं खूप आहेत आणि त्यामुळे समाधानही खूप मिळतं. समाजासाठी, देशासाठी मी काही तरी करू शकते, यातून वाटणारं समाधान मोठं आहे,’ असं अपूर्वा म्हणाली.
नव्या पिढीसाठी...
आत्ताच्या पिढीबद्दल विचारलं असता तिनं तिची निरीक्षणं नोंदवली. ‘आधीच्या पिढीमध्ये मध्यमवर्गीयांचं प्रमाण जास्त असल्यानं काही तरी साध्य करण्याची ऊर्मी अधिक होती. आताच्या पिढीच्या सुदैवानं त्यांच्या हातात बऱ्याच गोष्टी, सुविधा आहेत; मात्र पुढची ‘व्हिजन’ थोडी कमी वाटते. ती विकसित होण्यासाठी शिकता-शिकताच काम करण्याची संधी त्यांना द्यायला हवी आणि त्यांनी तसं करायला हवं. मी माझं ‘कॉलेज लाइफ’ इतर मुलांप्रमाणे नाही घालवलं; पण मला त्याचा चांगला उपयोग झाला,’ असं तिनं नमूद केलं. टॅलेंट बाहेरच्या देशात जाण्यापासून थांबवायचं असेल, तर तुमच्या-आमच्यासारख्या प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तींनी त्यांचं ‘मेंटॉरिंग’ (मार्गदर्शन) करायला हवं, असंही तिला वाटतं.
विचारांची सकारात्मकता
‘या वाटचालीत सकारात्मकतेचा कसा उपयोग झाला,’ असं विचारल्यावर अपूर्वाचं उत्तर विचार करायला लावणारं होतं. ‘दुबईच्या महाराष्ट्र मंडळात मला असा प्रश्न विचारण्यात आला होता, की फ्रॉड, फॉरेन्सिक या सगळ्या नकारात्मक गोष्टी असताना तू एवढी सकारात्मक कशी राहिलीस? त्यावर मी सांगितलं होतं, की मी माझ्या कामाच्या माध्यमातून कोणा व्यक्तीला किंवा संस्थेला मदत करतेय, ही भावना असते. शिवाय, घोटाळा किंवा अन्य गोष्ष्टी मी स्वतः करत नसल्याने त्याचं मी का वाईट वाटून घेऊ? आपण अधिक काय करू शकतो, पुढची उद्दिष्टं कशी ठरवतो आणि गाठतो, हे पाहिल्यावर सकारात्मकता वाढत जाते आणि प्रेरणा मिळते. आपल्या मानसिकतेवर सकारात्मकता अवलंबून असते. आपण काय ध्येय ठेवतोय आणि ते साध्य करण्यासाठी किती सातत्याने आणि गांभीर्याने प्रयत्न करतोय, यावर ते अवलंबून असतं. ‘करू या, बघू या’ अशा मानसिकतेतून काही होत नाही. आपल्या कामातून, त्यावरच्या निष्ठेतून सकारात्मकता दिसते. येत्या काळात समाजाच्या विकासासाठी मी अधिक चांगल्या पद्धतीनं मी कसं काम करू शकेन, याचाच विचार मी करत असते.’
फसवणूक न होण्यासाठी...
घोटाळे टाळण्यासाठी किंवा फसवणूक न होण्यासाठी सामान्य माणसं काय करू शकतात, असं तिला विचारलं असता तिने अगदी साध्याच, पण महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या. ‘एखाद्या पतसंस्थेकडून, बँकेकडून कर्ज घेताना किंवा कोणत्या स्कीममध्ये पैसे गुंतवताना सामान्य जनतेनं कान-डोळे उघडे ठेवून व्यवहार केला पाहिजे. संस्थेची माहिती घेतली पाहिजे. अव्वाच्या सव्वा पैसे मिळण्याचं आमिष कोणी दाखवत असेल, तर त्याला न भुलता ‘कॉमन सेन्स’चा वापर करून निर्णय घेतला पाहिजे. इंटरनेटवरही माहिती मिळू शकते. ज्ञानवंतांनी त्यासाठीची जनजागृती केली पाहिजे,’ अशी अपेक्षा तिनं व्यक्त केली.
‘मला आई-वडिलांनी क्षेत्र निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं, त्याचा चांगला उपयोग करू शकले असं मला आज वाटतं. सगळ्या आई-वडिलांनी तसं स्वातंत्र्य द्यायला हवं आणि मुलींनीही त्याचा चांगला उपयोग करायला हवा, असं मला वाटतं. कॉमर्सला आल्यावर सीए, सीएस, एलएलबी याव्यतिरिक्त काही नाही असं अजिबात नाही. हा जुना विचार झाला. आता फॉरेन्सिक क्षेत्राची दारं उघडली आहेत. त्यात चांगल्या माणसांची आवश्यकता आहे. तेव्हा यात जरूर या,’ असं अपूर्वानं आवर्जून सांगितलं.
अपूर्वाई वाटण्यासारखं आणि अपूर्व म्हणजेच पूर्वी फारसं कोणी न केलेलं काम करून अपूर्वा हे आपलं नाव सार्थ करणाऱ्या डॉ. अपूर्वाला अनेक शुभेच्छा!
डॉ. अपूर्वाचा ई-मेल : apurvapj@gmail.com
- अनिकेत कोनकर(अराइज, अवेक या पुस्तकाची मराठी अनुवादित आवृत्ती बुकगंगा डॉट कॉमवरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)