राजापूर : राजापूर नगर परिषद आणि रत्नागिरी हँडिकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनतर्फे दिव्यांग व्यक्तींसाठी राजापूरमध्ये नुकताच मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी मान्यवरांनी विविध शासकीय योजनांसंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच विविध योजनांसाठीचे फॉर्मही भरून घेण्यात आले.
या वेळी राजापूरचे नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे, नगरसेवक गोविंद चव्हाण, सुभाष बाकाळकर, पाली हायस्कूलचे प्रा. ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी नायब तहसीलदार रसाळ उपस्थित होते. ‘दिव्यांगांनी जास्तीत जास्त योजनांचा लाभ घ्यावा. ज्यांचा जन्म डिसेंबर २०००पूर्वी झाला आहे व एक जानेवारी २०१९ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण होणार आहेत, अशा दिव्यांग व्यक्तींनी मतदार नावनोंदणी करावी,’ असे आवाहन करण्यात आले. या वेळी ३० जणांना नमुना फॉर्मचे वितरण करून फॉर्म भरून घेण्यात आले. निवडणूक नायब तहसीलदार श्री. राठोड या वेळी उपस्थित होते. पंचायत समितीचे कर्मचारी राम ठाकूर यांनी जिल्हा परिषद योजनांची माहिती दिली. दिव्यांग बांधवांचे मतदान नोंदणीचे फॉर्म भरून घेतले.
मेळाव्याला राजापूर तालुक्यातील १२५ दिव्यांग बांधव उपस्थित होते. नगर परिषदेने दिव्यांग बांधवांच्या तीन टक्के निधीमधून या वर्षी लाभार्थींना घरघंटी, झेरॉक्स मशिन, व्हीलचेअर, कम्प्युटर इलेक्ट्रिक साहित्य, दुकानासाठी अनुदान मंजूर केल्याचे नगराध्यक्षांनी जाहीर केले. काही अडचणी आल्यास सहकार्य करण्याची ग्वाही नगराध्यक्षांनी दिली. आहे. रत्नागिरी हँडिकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे यांनी नगर परिषद व नगराध्यक्षांचे आभार मानले. कार्यक्रमाला पालिकेचे मुख्य लिपिक किशोर जाधव, विनायक पवार उपस्थित होते. सूत्रसंचालन विनायक पवार यांनी केले.