मुंबई : दी तैवान एक्सटर्नल ट्रेड डेव्हलपमेंट काउन्सिल आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्या वतीने मुंबईत प्रथमच ‘स्मार्ट आशिया-एक्स्पो अँड समीट २०१९’चे आयोजन करण्यात आले आहे. १७ ते १९ ऑक्टोबरदरम्यान बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे हे प्रदर्शन भरणार आहे.
या प्रदर्शनात अर्बन सिटी प्लॅनिंग, आयओटी सोल्यूशन्स, स्मार्ट वाहतूक, जल व्यवस्थापन, शाश्वत पर्यावरण आणि स्मार्ट सिटी हे विषय हाताळले जातील. यामध्ये शाश्वत शहर नियोजन या विषयावर विशेष भर राहणार आहे.
या प्रदर्शनाबाबत अधिक माहिती देताना दी तैवान एक्सटर्नल ट्रेड डेव्हलपमेंट काउन्सिलचे अध्यक्ष जेम्स हुअंग म्हणाले, ‘भारतातील रिअल इस्टेट, पायाभूत सुविधा आणि वाहतूक यासारख्या शहर नियोजनाला हातभार लावणाऱ्या घटकांच्या साथीने आम्ही आमची आर्टीफिशियल इंटेलिजंट अर्बन सिटी सोल्युशन्स उपलब्ध करून देण्यासाठी उत्सुक आहोत, ज्यामुळे उत्पादकतेला चालना मिळेल.’
या प्रदर्शनाला डेल्टा इलेक्ट्रॉनिक्सचे आर. टी. त्साई, अॅडव्हान्स पब्लिक ट्रान्सपोर्ट रिसर्च सेंटरचे प्रोफेसर आणि डायरेक्टर एस. के. चांग, तसेच एशियन डेव्हलपमेंट बँकेचे प्रोजेक्ट ऑफिसर नरेश प्रधान उपस्थित राहणार आहेत.