Ad will apear here
Next
राजकारणापलीकडचे पर्रीकर


आज (१७ मार्च) मनोहर पर्रीकर यांचा स्मृतिदिन. मनस्विनी प्रभुणे-नायक यांनी अनुभवलेल्या ‘राजकारणापलीकडच्या पर्रीकरां’बद्दलचा लेख दोन वर्षांपूर्वी लिहिला होता. तो या निमित्ताने प्रसिद्ध करत आहोत.
...........
लोकसत्तामधील नोकरीचं अॅग्रीमेंट नुकतंच संपलं होतं. छोटासा ब्रेक घेऊन परत नव्याने नोकरी शोधावी असं मनात असतानाच बाबांचे मित्र यशवंत ठाकर यांनी ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट प्लॅनिंग अँड रिसर्च’ या त्यांच्या संस्थेत एका प्रोजेक्टवर काम करायला बोलावलं. त्याच काळात प्रोजेक्टच्या निमित्ताने पहिल्यांदा गोव्यात जाणं झालं. तोवर गोव्याबद्दल फारशी कधी उत्सुकता वाटली नव्हती. गोव्यातला पहिलाच प्रोजेक्ट आणि तोदेखील निवडणूकपूर्व चाचणीचा होता. मनोहर पर्रीकर हे नावदेखील याच वेळी पहिल्यांदा ऐकलं. तेव्हा माहीत नव्हतं, की पुढची पंधरा वर्षं या व्यक्तीसाठी काम करायला मिळणार आहे. त्यांच्याबद्दल तेव्हाही अनेक सुरस कथा ऐकायला मिळायच्या. ते कसे एकदम साधेसुधे आहेत, मुख्यमंत्री असून कसे दुचाकी वाहनावर फिरत असतात तर कधी सामान्य माणसासारखे रस्त्यावरून चालत जातानाही ते अनेकदा दिसतात अशा अनेक गोष्टी ऐकायला मिळायच्या. आमच्या टीममध्ये त्यांच्याबद्दल कमालीची उत्सुकता वाढली होती. महाराष्ट्रात आणि अन्य राज्यातही राजकारणी व्यक्ती म्हटलं, की एक विशेष प्रतिमाच डोळ्यासमोर उभी राहते. म्हणजे हातात – गळ्यात, बोटांमध्ये चमकणारे सोने, कडक स्टार्च केलेला पांढरा शुभ्र पेहराव, टोलेजंग बंगला, दारात अनेक महागड्या चारचाकी गाड्या आणि आजूबाजूला हांजी हांजी करणारे चमचे. दुर्दैवाने अशीच प्रतिमा नेतेगिरी करणाऱ्या व्यक्तीची सामान्य लोकांपुढे असते. त्यामुळे मनोहर पर्रीकरांना पहिल्यांदा बघितलं तर ते कुठल्याच बाजूने मुख्यमंत्री, राजकारणी व्यक्ती वाटले नाहीत. कॉटनचा साधासा शर्ट-पॅन्ट, पायात साधे सॅन्डल असं पंधरा वर्षांपूर्वी मनोहर पर्रीकर यांना पहिल्यांदा बघितलं होतं. आजही ते तसेच आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात किंचितही बदल झाला नाहीये. 

लेखिकेसह मनोहर पर्रीकर

गोवा शासनाची वेगवेगळी कामं आम्ही करत होतो त्यावेळी मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री होते. प्रोजेक्टच्या मिटींगच्या निमित्ताने त्यांची भेट होऊ लागली. हा माणूस राजकारणात अपवाद आहे हे हळूहळू लक्षात येऊ लागलं. आता त्यांना ओळखत नाही असं कोणीही नाही. पण पंधरा वर्षांपूर्वी त्यांच्याकडे बघून लोकांना वाटायचंच नाही की हे गोव्याचे मुख्यमंत्री आहेत. कामानिमित्ताने ते अनेकदा पुण्यात यायचे. मात्र पुण्यात आल्यावर त्यांनी कधी मुख्यमंत्री म्हणून सिक्युरिटी घेतली नाही. ते येणार आहेत हे पोलीस मुख्यालयाला कळलं तर विमानतळावर सिक्युरिटीचा ताफा पाठवायचे आणि पर्रीकर त्यांना विमानतळावरूनच परत पाठवून द्यायचे. सरंक्षणमंत्री झाल्यानंतर मात्र त्यांना यात बदल करावा लागला. काही वर्षांपूर्वी एकदा ते पुण्यात आले होते. गोव्यातील ओळखीतल्या कोणाचं तरी ‘श्रुती मंगल कार्यालयात’ लग्न होतं. आधी नारायण पेठेतील आमच्या ऑफिसमध्ये येऊन पुढे त्यांना लग्नाला जायचं होतं. नेहमीसारखी बरोबर कोणतीही सिक्युरिटी नव्हती. श्रुती मंगल कार्यालय कुठे आहे ते त्यांना माहीत नव्हतं. रस्ता नीट माहीत नसल्यामुळे मी त्यांच्याबरोबर जायचं ठरलं. गल्लीबोळातून जायचं असल्यामुळे रिक्षाने जाणं जास्त सोयीचं असं त्यांनी सुचवलं. आमच्या ऑफिसच्या खालून आम्ही रिक्षा केली. त्या वेळी पुण्यात जवळजवळ सगळ्याच रस्त्यांवर प्रचंड खड्डे झाले होते. त्या खड्ड्यांमधून वाट काढत, धक्के खात रिक्षा जात होती. पुण्यातल्या रस्त्यांची दुर्दशा बघून रस्त्यांच्या खराब डांबरीकरणावर, रस्ते दुरुस्त करताना फक्त डांबराचा भर घालून चालत नाही, कोणत्या दर्जाचा डांबर वापरावा लागतो इथंपर्यंत सगळ्या गोष्टीवर ते बोलत होते. आमच्या या गप्पा रिक्षाचालक ऐकत होता. कार्यालयाच्या इथे उतरल्यावर त्या चालकाने हळूच विचारलं ‘ हे साहेब कोण आहेत?’ गोव्याचे मुख्यमंत्री आहेत हे सांगितल्यावर त्याचा विश्वासच बसेना. ‘काय चेष्टा करताय!! मुख्यमंत्री आणि रिक्षात कशाला ओ बसायला लागलाय? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कधी आपल्या असल्या रस्त्यांवरून जात नाहीत तर हे का म्हणून जाऊ लागले?’ त्याला खरंच वाटेना; पण तिथे कार्यालयात दाराशी पर्रीकरांसाठी थांबलेल्या लोकांमुळे त्याला खरंच हे गोव्याचे मुख्यमंत्री आहेत हे समजून गेलं. पुढे किती तरी वेळ तो रिक्षावाला तिथेच थांबून राहिला. आपल्या वैयक्तिक कामासाठी त्यांनी कधीही सरकारी यंत्रणेचा वापर केला नाही. आजही त्यांना शासनाकडून मिळालेली कार ते रात्री घरी गेल्यावर जवळच्या पोलिस स्टेशनला पार्क करतात. सरकारी वाहन हे फक्त कार्यालयीन कामकाजासाठी वापरायचं आणि काम झाल्यावर ते आपल्या दारात पार्क करण्याचाही आपल्याला अधिकार नाही असं ते मानतात. गोव्यातील लोकांनी त्यांच्या पूर्वी जे जे मुख्यमंत्री बघितले होते ते सार्वजनिक जीवनात पारदर्शक नव्हते. पर्रीकर हे त्यांच्या अशाच कृतींमुळे सामान्य माणसाला जवळचे वाटू लागतात. 

‘दयानंद सामाजिक सुरक्षा योजना’ त्यांनी मुख्यमंत्री असताना २००२ साली सुरू केली. निराधार व्यक्तींसाठी खूप आधार देणारी ही योजना अल्पावधीतच लोकप्रिय झाली. या योजनेतील लाभधारकांच्या घरी जाऊन ते खरंच या योजनेसाठी पात्र आहेत की नाही हे तपासण्याचं काम आमच्या संस्थेकडे होतं. गोवा शासनाच्या समाज कल्याण खात्याकडे या योजनेची जबाबदारी होती. ही योजना सुरू करण्याआधीपासून ते ती लागू झाल्यानंतरही पर्रीकर वरचेवर योजनेबाबत जागरूक असायचे. सुरुवातीला दर महिन्याला पाचशे रुपये आणि आता दोन हजार रुपये या योजनेतून निराधार व्यक्तींना दिले जातात. या योजनेची मूळ कल्पना मनोहर पर्रीकर यांचीच. मुख्यमंत्री झाल्यावर एकदा सकाळी सकाळी त्यांच्या घरी एक वयोवृद्ध गृहस्थ त्यांना भेटायला आले. त्या गृहस्थांची मुलं चांगल्या हुद्द्यावर नोकरीला होती. मोठं प्रशस्त घर होतं. पण निवृत्तीनंतर छोट्या छोट्या गोष्टींसाठी मुलाकडे हात पसरावे लागायचे. याचंच त्यांना दुःख व्हायचं. वृद्ध व्यक्तींसाठी काही तरी करा अशी कळवळून विनंती त्या गृहस्थांनी पर्रीकरांकडे केली. आपल्या अडचणी सांगताना त्यांच्या डोळ्यात आलेलं पाणी बघून पर्रीकरांना गलबलायला झालं. मग फक्त वृद्ध व्यक्ती नाही तर निराधार, घटस्पोटीत, अविवाहित महिला, अपंग व्यक्ती यांनाही आर्थिक पाठबळ मिळेल अशी योजना करावी असं त्यांना वाटू लागलं आणि याच उद्देशाने दयानंद सामाजिक सुरक्षा योजना सुरू झाली. विरोधी पक्षाने या योजनेला अनेकदा टीकेचं लक्ष बनवलं होतं पण प्रत्यक्षात ते सत्तेत येऊनही ही योजना काही बंद करू शकले नाहीत. लोकांचाच इतका चांगला प्रतिसाद या योजनेला मिळाला की आता कोणतंही सरकार ही योजना कधीच बंद करू शकणार नाही. 



एका महत्त्वाच्या प्रोजेक्टवर चर्चा करण्यासाठी मनोहर पर्रीकर यांनी सर्वांना त्यांच्या घरी मिटींगला बोलावलं होतं. खूप व्यस्त असा दिनक्रम असल्यामुळे ते अनेकदा सकाळी सात वाजता घरीच मीटिंग ठेवत. म्हापशाच्या घरी जाण्याची माझी पहिलीच वेळ होती. मुख्यमंत्र्यांचं घर म्हणजे एखादी टोलेजंग वास्तू असणार असं वाटून गेलं; पण प्रत्यक्षात एका साध्याशा कौलारू घरासमोर उभं राहताना मनाची खात्री पटत नव्हती, की इथे गोव्याचे मुख्यमंत्री राहतात. घरात प्रवेश करताच तिथला साधेपणा ठळकपणे जाणवला. घरात अगदी साधी कोबा घातलेली जमीन होती. कुठल्याही उंची फरशा नव्हत्या. बैठकीच्या खोलीत समोरच्या भिंतीवरील एक फोटो लक्ष वेधून घेत होता. फोटो एका स्त्रीचा होता. मोठे टप्पोरे अतिशय बोलके डोळे, कपाळावर छानशी ठसठशीत चंद्रकोर आणि चेहऱ्यावर स्मित हास्य. त्या खोलीत अनेक गोष्टी होत्या पण या फोटोवरून नजर हटत नव्हती. ‘कोणाचा असेल हा फोटो?’ हा प्रश्न सतावू लागला. जवळच बसलेल्या आमच्या संस्थेचे संचालक यशवंत ठाकर यांना न राहवून त्या फोटोबद्दल विचारलं. ‘कदाचित पर्रीकरांच्या पत्नीचा असू शकतो’ असं ते म्हणून गेले. तोवर मला माहीत नव्हतं की मेधा पर्रीकर हयात नाहीयेत. पुढचे काही क्षण अस्वस्थेत गेले. डोळ्यासमोरून तो स्मितहास्य करणारा चेहरा जात नव्हता. दिवसातील वीस तास काम करणारे मुख्यमंत्री म्हणून त्या वेळी मनोहर पर्रीकर यांची ओळख झाली होती. यापूर्वी असं काम करताना गोव्यातील कोणत्याच मुख्यमंत्र्याला लोकांनी बघितलं नव्हतं. सकाळी सात वाजता कार्यालयीन कामकाज सुरू करणाऱ्या या माणसाच्या दिवसाचा शेवट रात्री बारा किंवा एक वाजता व्हायचा. यांना वैयक्तिक आयुष्यचं नाहीये का? असा अनेकदा प्रश्न पडायचा आणि या प्रश्नाचं उत्तर भिंतीवरच्या त्या फोटोमधून मिळालं. 

एवढ्या सकाळी त्यांचा सेक्रेटरी आलेला नव्हता. मीटिंगला सुरुवात करत असताना त्यांच्या लक्षात आलं, की एक महत्वा फची फाइल त्यांच्या खोलीत राहिलीय. मी ती फाइल आणायला गेले तर एक साधी कॉट, गोदरेजचं कपात, एक टेबल आणि डोक्यावर फॅन या पलीकडे त्यांच्या खोलीत काहीच नव्हतं. ही मुख्यमंत्र्यांची खोली आहे हे वाटतच नव्हतं. त्यांना सरकारी आलिशान बंगला मिळाला होता; पण तिथे न राहता ते म्हापश्याच्या या घरातच राहायचे. साधेपणा त्यांच्या पेहरावातच नव्हता तर त्याची सुरुवात त्यांच्या घरापासून होती. आयआयटीमध्ये त्यांच्याबरोबर शिकणारा एक मित्र जो परदेशात स्थायिक झाला होता तो मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री झालेत म्हणून त्यांना भेटायला आला. यापूर्वीही तो त्यांच्या म्हापश्याच्या घरी येऊन गेला होता. आता आपला मित्र मुख्यमंत्री झालाय तर त्याच्या घरात, त्याच्या पेहरावात बदल झाला असेल असं त्याला वाटलं. प्रत्यक्षात किंचितही बदल झाला नाहीये बघून त्यालाही आश्चर्य वाटलं. अनेकजण उच्चं पदावर गेल्यावर कसेबदलतात हे त्याने बघितलं होतं त्यामुळे त्याला असं आश्चर्य वाटणं साहजिकच होतं. 

आधी दयानंद सामाजिक सुरक्षा योजना, तिळारी धरणग्रस्त भागाचं सर्वेक्षण आणि मग बायणा येथील वेश्यांचं पुनर्वसन असे एकामागेएक प्रकल्प आमच्या संस्थेकडे येत गेले. या प्रकल्पांच्या निमित्ताने मनोहर पर्रीकर यांच्याशी भेट होत होती. पत्रकारितेतील मुख्य प्रवाहापासून मी दूर गेले असले तरी वृत्तपत्राच्या पुरवण्या आणि काही मासिकांसाठी माझं लेखन सुरू होतं. याच काळात सोलापूर तरुण भारतच्या दिवाळी अंकासाठी ‘कसोटीचे क्षण’ अशा विषयावर पर्रीकरांशी बोलून त्यांच्यावरचा लेख द्यायचा होता. त्यांना अशा मुलाखतीसाठी वेळ काढणं अवघड होतं. अखेरीस कळंगुटला भाजपच्या कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण शिबिरात त्यांना थोडा वेळ मिळाला. आयुष्यात आपली परीक्षा बघितली जाते अशा क्षणांबाबत त्यांच्याशी बोलायचं होतं. राजकीय परिस्थितीवर, गोव्यातल्या राजकीय अस्थिरतेबद्दल ते बोलतील असं मला वाटून गेलं. कारण ते आपल्या खासगी जीवनाबद्दल कधी फारसं बोलत नाहीत. पण त्या दिवशी आयुष्यातील सर्वांत अवघड – दुखऱ्या क्षणांबद्दल ते बोलून गेले. त्यांना शब्द आठवावे लागले नाहीत. काल परवाच घडून गेलंय की काय अशा पद्धतीने ते व्यक्त झाले. शब्दांमध्ये खूप संयम होता. कुठेही अतिरंजितपणा नव्हता. पण आवाजात हळवेपणा भरून आला. इतका वेळ कार्यकर्त्यांसमोर खड्या आवाजात बोलणारे पर्रीकर या विषयावर बोलताना थोडे हळवे झाले होते. आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर जी व्यक्ती सोबत असायला हवी नेमकी तीच नव्हती. आयुष्याच्या एका सुंदर वळणावर मनीध्यानी नसताना अचानक आपल्या जोडीदाराचं हे जग सोडून जाणं यासारखं दुःखदायक अजून काय असू शकतं. 

सुरुवातीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जबाबदाऱ्या पार पडणारे, काहीसे अचानकपणे राजकीय क्षेत्रात ओढले गेलेले मनोहर पर्रीकर आपल्या स्वतःच्या फॅक्टरीच्या कामात अतिशय व्यस्त होते. संघाच्या जबाबदारीच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमांमध्येही ते व्यग्र असत. राजकारणातील प्रवेशासंबंधी दुरूनही शक्यता नव्हती. वयाच्या पस्तिशी-चाळिशीला जराशी स्थिरता येते तशी त्यांच्या आयुष्याला स्थिरता येऊ लागली होती. राजकारणात त्यांचा काहीसा अचानक प्रवेश झाला आणि त्यात ते पूर्णपणे सक्रिय झाले. बाकी कोणत्याही गोष्टींसाठी त्यांच्याजवळ वेळ नव्हता. इतके दिवस फॅक्टरी आणि संघाच्या जबाबदारीमुळे त्यांच्याकडे अजिबात वेळ नसायचा आता राजकारणातील जबाबदारीमुळे त्यात अधिक भर पडली. त्यांची पत्नी, आई-वडील आणि कुटुंबातील अन्य लोक त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे होते. पूर्णपणे झोकून देऊन काम करण्याची वृत्ती सर्वांना परिचित होती. मोठा मुलगा उत्पल महाविद्यालयीन शिक्षणाच्या उंबरठ्यावर होता तर धाकटा मुलगा अभिजात शाळेत होता. १९९८ साली गोव्यातल्या राजकारणाने वेग घेतला. भाजप गोव्यात पहिल्यांदाच सत्तेत येण्याच्या मार्गावर होता. नेतृत्वाची धुरा मनोहर पर्रीकर यांच्याकडे होती. मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रीकर यांचंच नाव चर्चेत होतं. पक्षाची संघटनात्मक बाजू भक्कम करण्यासाठी भरपूर प्रवासही करावा लागत होता आणि याच काळात त्यांच्या पत्नी मेधा ब्लड कॅन्सरने गेल्या. मनोहर पर्रीकर आता चौथ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झालेत. आजही त्यांचा तसाच व्यस्त दिनक्रम असतो. आजही ते रात्री बारापर्यंत कार्यालयीन काम करत असतात. पर्रीकरांनी स्वतः विचार केला नव्हता इतके ते राजकारणात पुढे गेले. देशाचं संरक्षणमंत्रिपदही त्यांनी भूषवलं. पण हे सगळं बघायला, अनुभवायला त्यांच्या जोडीदारीण मेधा पर्रीकर आज त्यांच्यासोबत असायला हव्या होत्या असं मनापासून वाटत राहतं. 

अफाट वाचन असलेल्या या माणसाची स्मरणशक्तीही अफाट आहे. वाचलेल्या पुस्तकांमधले अनेक संदर्भ जसेच्या तसे त्यांच्या लक्षात राहतात. एवढेच काय तर रिपोर्टमधील आकडेवारी त्यांना तोंडपाठ असते. विधानसभेत कोणत्याही प्रश्नावर चर्चा करताना ते आकडेवारीसहित बोलतात त्यामुळे विरोधक गप्पगार होऊन जातात. कथा-कादंबरीपेक्षा चरित्रात्मक-आत्मचरित्र वाचायला अधिक आवडतं. प्रवासात भरपूर वाचन करतात. अगदी घरापासून ते विधानसभेपर्यंतच्या छोट्याशा अंतरातही ते वाचन करत असतात. आता त्यांचं एका बैठकीत पुस्तक वाचून होत नाही पण जसा वेळ मिळेल तसं ते पुस्तक वाचून पूर्ण करतात, त्याशिवाय ते पुस्तक शेल्फमध्ये ठेवलं जात नाही. प्रसिद्ध उद्योजिका डॉ. प्रभा नातू यांचं ‘झपाटलेला संसार’ हे पुस्तक काही वर्षांपूर्वी माझ्या प्रकाशन संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलं . प्रभा नातू यांच्या यजमानांनी सुरू केलेल्या ‘डीमेक’ या उद्योग समूहाबाबतच्या आठवणी त्यांनी त्यात लिहिल्या आहेत. पर्रीकर स्वतः एक यशस्वी उद्योजक आहेत म्हणून मी हे पुस्तक त्यांना भेट दिलं. पुस्तकात एके ठिकाणी अरविंद नातू यांनी परदेशात चुकून विना तिकीट कसा प्रवास केला होता आणि त्याची कशी त्यांना गंमत वाटली होती असा प्रसंग रंगवून लिहिला होता. शिवाय एक छोटीशी चूक याच पानावर राहिली होती. पर्रीकरांना पुस्तक दिल्यानंतर यानंतर अनेक महिन्यांनी त्यांची गाठ पडली. त्या वेळी पर्रीकरांनी पुस्तकातील ती चूक पान नंबरसहित लक्षात आणून दिली. त्यांच्या या स्मरणशक्तीची कमाल वाटली. 

यानंतर दोन वर्षांनी समदा प्रकाशनने प्रकाशित केलेल्या दोन पुस्तकांचं प्रकाशन मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते होतं. यावेळी ते संरक्षणमंत्री झाले होते. त्या कार्यक्रमात प्रभा नातू पहिल्या ओळीत बसल्या होत्या. कार्यक्रम संपल्यावर प्रभा नातू यांना भेटून तुमचं पुस्तक मला खूप आवडलं पण पुस्तकातील अमुक अमुक पान नंबरवरील श्री. नातू विना तिकीट प्रवास करतात तो प्रसंग काढून टाका. अशा कर्तृत्ववान माणसाचा चांगला आदर्श तरुणांपुढे राहिला पाहिजे, विनातिकीट प्रवास केलाय असा नको असंहीत्यांनी सांगितलं. पान नंबरसहित सांगितल्यामुळे प्रभा नातूही माझ्यासारख्याच आश्चर्यचकित झाल्या. एखाद्या स्कॅनरसारखी त्यांची स्मरणशक्ती आहे. एकदाच वाचलं की ते फिट्ट त्यांच्या लक्षात राहतं. त्यांच्या खासगी पुस्तकसंग्रहात अनेक महत्त्वाची पुस्तकं आहेत. 

गोव्यातल्या बायणा समुद्र किनारी काही वर्षांपूर्वी मोठी वेश्यावस्ती होती. आंध्र, कर्नाटक मधील महिला यात अधिक होत्या. मुरगाव पोर्ट ट्रस्टच्या मालकीच्या जागेवर ही वस्ती अनधिकृतपणे वाढली. जमिनीवरून अतिक्रमणं हटावी यासाठी पोर्ट ट्रस्टने कोर्टात धाव घेतली. त्या जागेवरील अतिक्रमणं हटवली तर इथल्या वेश्यावस्तीतील महिला बेघर होणार होत्या. या वस्तीतील महिलांशी चर्चा करून पुनर्वसनाचा आराखडा तयार करण्याचं काम आमच्या संस्थेकडे आलं. मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रीकर या प्रकल्पाला वेळ देत होतेच; पण प्रकल्प जसजसा पुढे जाऊ लागला तसं त्यांच्यातलं ‘माणूसपण’ उठून दिसू लागलं. खरंतर कोर्टाच्या आदेशात ज्या राज्यांमधून या महिला आल्या आहेत त्या राज्यांनी महिलांचं पुनर्वसन करावं असं स्पष्ट म्हणलं होतं पण तरीही या महिलांचं पुनर्वसन झालं नाही तर ही वस्ती पडल्यावर महिलांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागणार हे जाणून महिलांचं पुनर्वसन गोवा शासनाने करायचं ठरवलं. चार तज्ज्ञ व्यक्तींना बोलावून पुनर्वसन आराखडा तयार करता आला असता; पण ते पर्रीकरांना मान्य नव्हतं. ज्यांचं पुनर्वसन करायचंय आधी त्यांच्याशी बोलून त्यांना नक्की कशा पद्धतीचं जीवन हवंय? कशा पद्धतीचं पुनर्वसन या महिलांना अपेक्षित आहे हे जाणून घेणं त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं होतं. पुनर्वसनासाठी एक कोटी रुपयांची तरदूतही पर्रीकरांनी अर्थसंकल्पात करून ठेवली. 

कोर्टाच्या आदेशानुसार ही वस्ती तर त्यांना सोडावी लागणारच होती. पुनर्वसनाचा आराखडा तयार होईपर्यंत शासनाने या सर्व महिलांची – त्यांच्या मुलांची तात्पुरती निवासाची सोय करायचं ठरवलं होतं. वृत्तपत्रात यासंबंधी बातम्या येऊ लागल्या होत्या. विविध स्तरातून ही वस्ती उठवण्याचा विरोध होऊ लागला होता. जिथे या महिलांना स्थलांतरित करणार होते त्या भागातील काँग्रेसच्या आमदार महिलेनं त्यांना त्या गावात स्थलांतरित करण्यास विरोध केला होता. अतिशय संवेदनशील अशी परिस्थिती तयार होऊ लागली होती. या प्रकल्पात कोणत्याही पद्धतीने हयगय होऊ नये यासाठी मुख्यमंत्री पर्रीकर स्वतः लक्ष घालत होते. 

दुसरीकडे पुनर्वसनाबाबत या महिलांशी आमची वरचेवर चर्चा सुरू होती. जिल्हाधिकारी, राज्याचे सचिव आणि खुद्द मुखमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ज्या जागेत महिलांना ठेवलं जाणार होतं ती जागा आधी बघायचं ठरवलं. त्यात संस्थेकडून मी आणि आमचे संचालक दोघेही होतो. एक मोठ्या इमारतीमध्ये त्यांची तात्पुरती व्यवस्था केली जाणार होती. एका खोलीत पाच जणी राहतील असं तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगताच पर्रीकरांनी पाच नको तीन जणींची व्यवस्था करा. पाच जणी एका खोलीत त्यांना दाटीवाटीत राहावं लागेल. एक तर त्या त्यांची जागा सोडून या जागेत येणार आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारे डांबून ठेवल्यासारखं वाटलं नाही पाहिजे असं सांगितलं. मी या महिलांचा तिथला दिनक्रम तयार केला होता. मुंबईमध्ये याच विषयात काम करणारे कार्यकर्ते प्रवीण पाटकर यांना भेटून, त्यांच्याशी चर्चा करून या महिलांसाठी एक कार्यक्रम तयार केला होता. त्या वेळी तो ही पर्रीकरांनी विचारला. त्यात त्यांनी प्रत्येक खोलीत एक टीव्ही लावायला सांगितला जो आम्ही तयार केलेल्या दिनक्रमात नव्हता. या महिलांना व्यस्त ठेवणं मोठं अवघड काम होतं. प्रत्येक खोलीत एक टीव्ही आणि डिव्हिडी प्लेअरपण द्या. त्या सहजासहजी या वातावरणाशी जुळवून घेऊ शकणार नाहीत, किमान त्यांच्या मनोरंजनासाठी इथे प्रत्येक खोलीत टीव्ही असला पाहिजे हे त्यांनी निदर्शनास आणून दिलं. एवढ्या बारकाईनं प्रत्येक गोष्टीचा ते विचार करत होते. तशी कोर्टाने शासनावर या महिलांच्या पुनर्वसनाची जबाबदारी टाकली नव्हती; पण मानवतावादी दृष्टिकोनातून त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी पर्रीकरांनी स्वीकारली होती. अनेक पातळीवरून झालेला विरोध, ऐनवेळी वस्तीतील महिलांनी वस्ती न सोडण्याचा घेतलेला निर्णय अशा अनेक कारणांनी हा प्रकल्प वास्तवात उतरला नाही पण या प्रकल्पाच्या निमित्ताने पर्रीकरांमधील सामाजिक संवेदना बघायला मिळाली. 



गोव्यात नेत्रावळी नावाचं छोटंसं गाव आहे. वन्यजीवांसाठी संरक्षित असलेल्या जंगलात हे गाव वसलेलं आहे. शासनाने हे गाव दत्तक घेतल्यानंतर इथल्या महिलांसाठी काही छोट्या लघुउद्योगांची उभारणी करायची होती. मला वाटत होतं की बायकांना लोणची पापडाचे व्यवसाय सुरू करून देण्यापेक्षा काही वेगळे तिथल्याच उपलब्ध असलेल्या कच्चा माळावर आधारि काही उद्योग सुरू करावेत. या नेत्रावळी आदर्श ग्राम योजनेबद्दल चर्चा करताना एकदा मी हे मनोहर पर्रीकर याना बोलून दाखवलं. पण त्यांचं काही वेगळंच मत होतं. इथल्या महिलांना एकत्र ठेवण्यासाठी आणि सुरुवातीला त्यांना एकत्र कामाची सवय लागण्यासाठी पापड -लोणची यासारखा उत्तम व्यवसाय नाही. पापड लाटण्याच्या निमित्ताने अनेक महिला एकत्र येतात. पापड लाटण्याचं कामही होत आणि त्यांच्या पोटभर गप्पाही होतात शिवाय पापड लाटण्यासाठी त्यांना घर सोडून कुठे जावं लागत नाही. घरीच बसून ते हे करून पैसे कमवू शकतात. एकदा का त्या हे काम एकत्र येऊन करू लागल्या की मग तू नव्या उद्योगाचं प्रशिक्षण दे; पण आधी त्यांना एकत्र येण्याची सवय लागू दे. त्यांनी असं सांगून मला या सगळ्याकडे बघण्याची एक वेगळीच बाजू दाखवून दिली. गोमंतकीय समाज आणि इथल्या महिलांची मानसिकता कशी वेगळी आहे हे देखील यानिमित्ताने त्यांच्याकडून समजले. बचत गटातील महिलांसाठी नवनवीन कल्पना घेऊन गेले असता कधीही त्याला नकार दिला नाही. अगदी नेत्रावळीतील महिलांना पणजीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात खाद्यपदार्थांचा स्टॉल मिळावा यासाठी माझा आग्रह होता. अनेकांनी याला विरोध केला. ग्रामीण भागातील, जंगलात राहणाऱ्या बायका आहेत. त्यांच्या हातचे पदार्थ खाल्ले जातील का? स्वच्छतेची काळजी घ्यावी लागेल अशा अनेक गोष्टी सांगून त्यांना तिथे नेणं कसं चुकीचं आहे हे सांगितलं जात होतं; पण पर्रीकरांनाही ही कल्पना आवडली. खास गोमंतकीय पद्धतीचे पदार्थ नेत्रावळीच्या महिला तिथे येणाऱ्या सिनेरसिकांना खाऊ घालतील हे ठरलं. महिलांना चित्रपट महोत्सव काय असतो हे माहीत नव्हतं. त्यातल्या अनेकींनी पणजी शहरही बघितलं नव्हतं. त्या दहा दिवस आपला घरदार सोडून पणजीला आल्या आणि दहा दिवस इफ्फीमध्ये येणाऱ्या कलाकारांना, सिनेरसिकांना अनेक रुचकर पदार्थ खाऊ घातले. या काळात स्वतः पर्रीकर हेदेखील स्टॉलवर येऊन चौकशी करून गेले. नेत्रावळीसारख्या जंगल असलेल्या भागातील या महिलांनी कधी थिएटरही बघितलं नाही हे त्यांना समजलं तर त्यांना थिएटर दाखवायला घेऊन गेले. त्यांच्यात मला पहिल्यांदाच भरपूर आत्मविश्वास आणि एक वेगळाच आनंद दिसत होता. त्यांचं खूप कौतुकही झालं. 



माणूस कितीही जवळचा असला तरी जर त्याचं काही चुकलं असेल तर त्याच्यावर कठोरपणे कारवाई करणारे, त्याला खडे बोल ऐकवणारे पर्रीकर अनेकदा बघायला मिळाले आहेत. सलग दोन टर्म भाजप सत्तेपासून दूर राहिल्यानंतर २०१२ साली पर्रीकरांनी जीवाचं रान करून भाजपला सत्तेवर आणलं. पहिल्यांदाच भाजपच्या तिकिटवर पाच कॅथलिक आमदार निवडून आले. निवडणूकपूर्व चाचणी आमच्या संस्थेनं केली होती. निकालाच्या दिवशी आम्ही सर्व जण भाजपच्या कार्यालयात आमचे निष्कर्ष आणि हाती येणारे निकाल यांचा ताळमेळ लावत बसलो होतो. पर्रीकर त्यांच्या मतदारसंघातून निवडून आल्याचं घोषित झाल्यानंतर ते ही भाजपच्या कार्यालयात आले. त्यांच्याबरोबर अनेक कार्यकर्ते, हितचिंतकही होते. पणजीतील कार्यकर्त्यांनी त्यांची मिरवणूक काढायची असं ठरवलं. त्यासाठी ते बाहेर पडत होते तसे काही कार्येकर्ते आणि त्यांचे काही मित्रही त्यांच्याबरोबर बाहेर पडू लागले. त्यात त्यांचा एक जुना मित्र होता. जो मधल्या काळात पर्रीकर म्हणजेच भाजपा सत्तेवर नसताना विरोधी पक्षातील लोकांना जाऊन मिळाला होता. त्यांच्याकडून आपली कामं मार्गी लावून घ्यायचा. काही कार्यकर्त्यांनी ही गोष्ट पर्रीकरांच्या कानावर घातली होती. तोच मित्र त्यांच्याबरोबर पायऱ्या उतरताना दिसला. पुढच्या पायरीवर पर्रीकर तर मागील दोन पायऱ्या सोडून त्यांचा हा मित्र होता. पर्रीकरांच्या लक्षात आलं आणि त्यांनी लगेच मागे वळून त्या मित्राला माझ्याबरोबर येऊ नकोस असं सांगितलं. आपली मैत्री वेगळ्या पातळीवर राहील; पण आता जर तू माझ्याबरोबर आलास तर चुकीचा संदेश कार्यकर्त्यांमध्ये जाईल, ते तुझ्यावर नाराज आहेत. तू मित्र आहेस तसाच राहशील. तू आलास, अभिनंदन केलंस इथपर्यंत ठीक आहे; पण आता पूर्वीसारखा तू माझ्याबरोबर यायचं नाहीस असं कडक शब्दात सर्वांच्या समोर त्याला सांगून टाकलं. मी तिथेच कोपऱ्यात उभी होते. एवढं स्पष्ट बोलणं तसं सोपं नसतं; पण अशा निर्णयात ते कधी मागे राहत नाही. मित्र असला तरी त्याचं चुकलं तर ते त्याला स्पष्टपणे तोंडावर सांगून टाकतात. त्यामुळे अनेक जण त्यांना घाबरूनही असतात. 

मनोहर पर्रीकर संरक्षणमंत्री झाले तेव्हा त्यांच्या मतदारसंघातून त्यांच्या मुलाला उमेदवारी मिळावी असं काही कार्यकर्त्यांना वाटत होतं. तसा त्यांनी प्रयत्नही सुरू केला होता. पर्रीकरांच्या दोन्ही मुलांनी आपलं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व तयार केलंय. राजकारणात घराणेशाही नसावी तर व्यक्तीचं कर्तृत्व बघितलं गेलं पाहिजे असं पर्रीकर अनेकदा म्हणतात. आजवर गोव्यातल्या काँग्रेसच्या राजकारणात लोकांनी घराणेशाहीच बघितली होती. याच घराणेशाहीचा फटका त्यांना २०१२च्या निवडणुकांमध्ये बसला होता. या पार्श्वभूमीवर पर्रीकरांची मुलं मात्र कायम राजकारणापासून दूर राहिली. सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो; पण राजकीय मंचावर ते कधीच जात नाहीत. संरक्षणमंत्री झाल्यानंतर पणजी मतदारसंघातून कोणाला निवडणुकीला उभं करायचं असा प्रश्न उभा राहिला तेव्हा कार्यकर्त्यांच्या कोणत्याही दबावाला बळी न पाडता, आपल्या मुलाचे नाव पुढे न करता त्यांनी सिद्धार्थ कुंकळकर या पक्ष कार्यकर्त्यांचं नाव पुढे केलं. त्यांच्या स्वीय-सहायकाचं कामही त्याने केलं होतं. त्यामुळे पर्रीकरांच्या तालमीत तयार झालेल्या, पणजीतील कानाकोपरा माहीत असलेल्या, इथल्या समस्यांची जाण असलेल्या कार्यकर्त्याला त्यांनी न्याय दिला. इथे दुसरा कोणी असता तर त्वरित आपल्या मुलाचं नाव पुढे करून त्याला राजकारणात आणलं असतं. त्यांच्या या निर्णयानेही अनेकांना चकित केलं. मनोहर पर्रीकर यांनी अनेकदा राजकारणातून निवृत्त होण्याबद्दल आपलं मत व्यक्त केलंय. कधी तरी ते हा निर्णय घेतीलही. राजकारणातून निवृत्त होतील पण समाजकारणातून ते निवृत्त होऊ शकणार नाहीत. ती तळमळ त्यांना स्वस्थ बसू देणार नाही. त्यांचा व्यवसाय चांगला चालेला आहेच पण त्यांना शेती करायचीय. पुढचं आयुष्य शेती आणि निसर्गात घालवायचंय. कदाचित निवृत्तीनंतरच्या काळात पर्रीकरांच्या व्यक्तिमत्त्वाची न कळलेली बाजूही समोर येईल. 

- मनस्विनी प्रभुणे-नायक
(पूर्वप्रसिद्धी : साहित्य सूची दिवाळी अंक २०१७)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZRUCK
Similar Posts
असामान्य व्यक्तिमत्त्वाचा साधा माणूस! मनोहर पर्रीकर यांचं वागणं-बोलणं अगदी तुमच्या-आमच्यासारखं, म्हणजे सामान्य माणसासारखं असलं, तरी त्यांचं व्यक्तिमत्त्व असामान्य होतं. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘जीएस’च्या निवडणुकीला उभं राहता येत नाही. तरीही मनोहर पर्रीकरांच्या वेळी तो नियम बदलून त्यांना निवडणुकीला उभं करण्यात आलं आणि ते निवडूनही आले
गृहिणी-सखी-सचिव (उत्तरार्ध) परत ते फोटो पाहताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली. मी आश्चर्याने दंग झालो आणि सुनीताबाईंपुढे नतमस्तकही! मी त्यांचे ‘सोयरे-सकळ’च्या प्रकाशनात १९९८ साली फोटो टिपले होते. बरोबर दहा वर्षांनी पुरस्काराच्या वेळी त्यांनी परत तीच जांभळी फुले असलेली साडी नेसली होती. माणसाचा साधेपणा, व्यवस्थितपणा, किती असावा, त्याच्या
‘संतूर-नायक’ माझं मन तेहतीस वर्षं मागं गेलं. सवाई गंधर्व महोत्सव सुरू होता. मी अन् माझा कॅमेरा दोघेही ग्रीनरूममध्ये पोहोचलेलो. काहीच वेळात मी ज्यांना बघण्यासाठी तेथे आलो होतो ते पंडित शिवकुमार शर्मा तेथे पोहोचले. सहा फुटांच्या आसपास उंची. त्यांच्या काश्मिरी गोरेपणाला शोभून दिसणारा गर्द निळा झब्बा व पायजमा, लक्षात येतील इतके कुरळे केस आणि तलवार कट मिशी
मृतदेहाशी नाते जोडून माणुसकी जपणारे ‘चाचा’ उत्तर प्रदेशातील फैजाबादमधील सुमारे ८० वर्षांचे शरीफ चाचा अर्थात मोहम्मद शरीफ यांचा यंदाच्या पद्मश्री विजेत्यांमध्ये समावेश आहे. गेल्या २७ वर्षांत त्यांनी सुमारे साडेपाच हजार बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. मृत व्यक्तीच्या धर्मानुसार त्या पद्धतीने त्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले जातात. स्वतःच्या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language