
उत्तम शिक्षक, बुद्धिमान शास्त्रज्ञ, मिसाइल मॅन, महान राष्ट्रपती अशी सर्व विशेषणे लागू होणारी एकमेव व्यक्ती म्हणजे डॉ. एपीजे अब्दुल कलाम. त्यांच्यासारखी महान व्यक्ती कशी घडत गेली हे ‘कलमांचे बालपण’मधून सांगताना सृजनपाल सिंग यांनी छोट्या कलामचे भावविश्व, उलगडले आहे. त्यांच्या लहानपणीच्या अनेक रंजक गोष्टी यात आहेत.
निधर्मी गावात प्रेमळ लोकांमध्ये छोटा कलाम वाढत होता. सहा वर्षांचा झाल्यावर मदरशात तो जात असे. वडिलांनी त्याला शाळेतही घातले. आयुष्याच्या सुरुवातीला त्याला ज्या चांगल्या सवयी लागल्या त्यात शिक्षकांचा मोठा वाटा आहे. छोटा कलाम चिकित्सक होता, नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी तो सतत प्रश्न विचारात असे.
बोट बांधणीच्या साहित्याचे महत्त्व त्याने जाणून घेतले. भविष्यातील उपग्रह व क्षेपणास्त्र बांधणीत या ज्ञानाचा त्याला कदाचित फायदा झाला असणार. अशा अनेक छोट्या-छोट्या प्रसंगातून रामेश्वर ते राष्ट्रपती भवन असा डॉ. कलाम यांचा प्रवास यात रेखाटला आहे. सोबत प्रसंगांना साजेशी सुबक चित्रेही आहेत. याचा मराठी अनुवाद प्रणव सखदेव यांनी केला आहे.
पुस्तक : कलामांचं बालपण
लेखक : सृजन पाल सिंग
अनुवादक : प्रणव सखदेव
प्रकाशक : रोहन प्रकाशन
पाने : ११२
किंमत : १०० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)