Ad will apear here
Next
‘मराठीच्या समृद्धीसाठी व्हावीत छोटी साहित्य संमेलने’


रत्नागिरी :
‘दर वर्षी मोठी साहित्य संमेलन वेगवेगळ्या ठिकाणी भरवली जातात; मात्र एक ठराविक वर्ग वगळता अन्य कोणीही या साहित्य संमेलनांत सहभागी होत नाहीत. यासाठी प्रत्येक गावात छोटी-छोटी साहित्य संमेलने आयोजित केली आणि त्यात सर्वांना सहभागी होण्याची संधी दिली, तर नक्कीच त्याचा उपयोग साहित्य क्षेत्रासाठी आणि पर्यायाने मराठी भाषेच्या वृद्धीसाठी होऊ शकतो,’ असे मत रत्नागिरीतील अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी मांडले आहे.

डॉ. श्रीकृष्ण जोशीमराठी राजभाषा दिनानिमित्ताने डॉ. जोशी यांच्याशी साधलेल्या संवादात त्यांनी अनेक गोष्टींचा ऊहापोह केला. छोट्या साहित्य संमेलनांचे महत्त्व विशद करताना डॉ. जोशी म्हणाले, ‘मराठी भाषेच्या वृद्धीसाठी वेगवेगळे उपक्रम आपल्याला राबवता येऊ शकतात आणि ते राबवणे मराठी भाषा वाचक, रसिक आणि सांस्कृतिक कार्यकर्ते यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ - साहित्य संमेलने; पण मोठमोठी साहित्य संमेलने विशिष्ट वर्गापुरती, विशिष्ट काळापुरती आणि विशिष्ट प्रदेशापुरती मर्यादित राहतात. महाराष्ट्रातल्या सगळ्याच भागातल्या किंवा ज्यांना साहित्याची आवड आहे अशा लोकांना तिथे जाता येत नाही. अशा वेळी मला एक चांगला उपाय वाटतो, जो आता काही ठिकाणी चालू आहे आणि तो अधिकाधिक रूढ व्हावा असे वाटते, तो म्हणजे छोट्या-छोट्या साहित्य संमेलनांचा. आता ही संमेलने प्रादेशिक असे म्हणून त्यांना टाळून उपयोग नाही. प्रत्येक गावामध्ये अशी छोटी-छोटी साहित्य संमेलने व्हावीत. त्या गावातले नवोदित आणि बुजुर्ग, ज्यांनी यापूर्वी कधी काही लिहिलेले होते किंवा जे मार्गदर्शन करू शकतात, अशा सगळ्यांनी एकत्रित येणे आणि लिहिणाऱ्यांना एक व्यासपीठ याची जाणीव होणे हे या छोट्या साहित्य संमेलनातूनच होऊ शकते.’

‘सीमावर्ती भागात किंवा गोव्यासारख्या ठिकाणी गेलो, तर तिथे अशा प्रकारची छोटी-छोटी साहित्य संमेलने भरवलेली पाहायला मिळतात. ही त्या त्या गावाची संमेलने असतात. तिथले शासन त्यांना मदत करत असते. ते बाहेरूनही वक्ते आणतात किंवा त्या गावातले वक्ते, कवी एकत्र येऊन दोन-तीन दिवस एकत्र येऊन ही संमेलने आयोजित करतात. अशा छोट्या साहित्य संमेलनांतून छान वातावरण निर्माण होऊ शकते, तसेच लिहिणाऱ्या स्थानिकांना उत्तेजन मिळणे, हा महत्त्वाचा फायदा होऊ शकतो. एक उत्तम प्रकारचा साहित्य व्यवहार होऊ शकतो. साहित्य संमेलनाच्या ठिकाणी पुस्तक विक्री, आयोजकांच्या पुढाकाराने एखादे छोटेसे वाचनालय तेथे आणता आले, तर हे वातावरण वाचन संस्कृतीसाठी पोषक ठरेल यात शंका नाही,’ असे डॉ. जोशी यांनी नमूद केले.

‘मोठ्या संमेलनांपेक्षा छोटी संमेलने आयोजित करावीत. त्यांना खर्च फार येत नाही आणि प्रत्येकाची वाचनाची, साहित्याची भूक तिथे पूर्ण होऊ शकते. गावे एकत्र येऊन खूप मोठा साहित्य व्यवहार होऊ शकतो आणि मराठी भाषेचा दर्जा आहे कसा वाढेल याचा विचारही या पद्धतीने पुढे येऊ शकतो. वैचारिक आदानप्रदानही या माध्यमातून वाढेल,’ असे डॉ. जोशी यांनी सांगितले.

डॉ. जोशी हे १९८५पासून साहित्य क्षेत्रात कार्यरत आहेत. १८ कादंबऱ्या, दोन दीर्घकथासंग्रह, सात संगीत नाटकं, तीन गद्य नाटकं, दोन काव्यसंग्रह, ‘अपूर्वा’ आणि ‘गोष्टीरूप चाणक्य’ हे बालवाङ्मय असे त्यांचे साहित्य प्रकाशित झाले असून, एक कादंबरी, तीन ललित लेख, दोन कथासंग्रह आदी साहित्य प्रकाशनाच्या वाटेवर आहे.

(डॉ. श्रीकृष्ण जोशी यांची पुस्तके ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी https://goo.gl/VREXrm येथे क्लिक करा. मराठी राजभाषा दिनानिमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध झालेले सर्व लेख, कविता आणि व्हिडिओ https://goo.gl/qgDdWU या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध असतील.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZYVBM
Similar Posts
भविष्य घडवण्यासाठी ‘ती’ मुलं वाचतायत... मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या विशेष उपक्रमांतर्गत डॉ. निधी पटवर्धन या झोपडपट्टीतील मुलांसाठी ‘उघड्यावरचे ग्रंथालय’ चालवत आहेत. त्यांच्या या उपक्रमाविषयी त्यांच्याशी साधलेली संवाद...
गोविंदाग्रजांची काव्यसृष्टी - मराठीचे अलौकिक शब्दलेणे! शब्दशक्तीचं सामर्थ्य, त्यातल्या अर्थच्छटांची सूक्ष्म जाण, बुद्धिमत्ता आणि तरल कल्पनाशक्ती या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे गोविंदाग्रजांची काव्यसृष्टी. गोविंदाग्रजांनी मराठी वाङ्मयाला, समृद्ध, श्रीमंत केलं आहे आणि हे आपणा सर्व रसिकांसाठी अमूल्य असं शब्दलेणं आहे. २६ मे हा गोविंदाग्रज अर्थात राम गणेश गडकरी यांचा जन्मदिन
निजलेल्या बालकवीस : अभिवाचन - अक्षय वाटवे बालकवी म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना झोपेतून उठविण्याच्या निमित्ताने त्यांचे गुणवर्णन करणारे गोविंदाग्रजांनी केलेले काव्य म्हणजे ‘निजलेल्या बालकवीस.’ ‘फारच थोड्या वेळात हे काव्य केलेले असल्यामुळे त्यात बालकवींचे यथार्थ गुणवर्णन आलेले नाही,’ असेही त्यांनी या गीताच्या प्रस्तावनेत म्हटले आहे. मंगेश
बालकवींची औदुंबर कविता : अभिवाचन - स्वाती महाळंक त्र्यंबक बापूजी ठोंबरे अर्थात बालकवी यांना निसर्गकवी असे म्हटले जाते. त्यांच्या बहुतांश रचना त्याची साक्ष देतात. अवघ्या आठ ओळींत आपल्यापुढे एक मनोहर निसर्गचित्र उभी करणारी आणि आपल्याला एका वेगळ्याच भावविश्वात घेऊन जाणारी कविता म्हणजे ‘औदुंबर.’ मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या विशेष उपक्रमाचा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language