Ad will apear here
Next
‘रुबी’तर्फे वर्षभरात १३ हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी


पुणे :
रक्तसंचयामुळे हृदय निकामी होण्यातून (कन्जेस्टिव्ह हार्ट फेल्युअर) अनेकांचे आयुष्य बाधित होते. शस्त्रक्रियात्मक आणि जीवनशैली उपचारांतील आधुनिक औषधांमुळे त्यांना आनंदी आयुष्य जगता येते; पण काही लोकांबाबत मात्र परिस्थिती तीव्र खालावते. त्यावेळी ते अशा टप्प्यावर पोचतात जेथे हृदय प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय उरतो. अशाच तेरा व्यक्तींवर गेल्या वर्षभरात रुबी हॉल क्लिनिकमध्ये यशस्वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

हृदयरोगतज्ज्ञ आणि रुबी हॉल क्लिनिकच्या कॅथ लॅबचे संचालक डॉ. जगदीश हिरेमठ म्हणाले, ‘आम्ही गेल्या वर्षी हा कार्यक्रम सुरू केला तेव्हा आमचे उद्दिष्ट वर्षभरात दहा हृदय प्रत्यारोपणे पूर्ण करण्याचे होते; पण त्यापेक्षा अधिक म्हणजे १३ हृदय प्रत्यारोपणे पूर्ण होणे ही प्रशंसनीय बाब आहे. संस्थेत हा नवा कार्यक्रम सुरू करताना आमच्यासमोर पहिल्या वर्षी अगदी व्यवहार्यता मुद्दयांपासून ते संघ सुस्थिर करेपर्यंत असंख्य आव्हाने आली. आमचे सर्व रुग्ण हृदय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेनंतर अत्यंत उत्तम स्थितीत आहेत, हे बघून आम्हाला अभिमान वाटतो. यांपैकी कोणत्याच प्रकरणात रुग्णाच्या शरीराने नवे हृदय नाकारण्याची (रिजेक्शन) किंवा रुग्णाला पुन्हा दाखल करण्याची वेळ आली नाही. पुण्यातील हृदय प्रत्यारोपण करणारी आमची एकमेव संस्था असल्याचा आम्हाला अभिमान आहे.’

हृदय प्रत्यारोपणासाठी मागणी भक्कम व सातत्याने वाढती आहे; पण त्यासाठीची प्रतीक्षा यादी मात्र थोड्याच रुग्णसंख्येचे प्रतिनिधीत्व करते, ज्यांना या प्रक्रियेतून लाभ मिळेल. आज ५० हजार लोकांना हृदय प्रत्यारोपणाची तीव्र गरज असताना सध्याची आकडेवारी दर्शविते की भारतात गेल्या चार वर्षांत २०० हून अधिक हृदय प्रत्यारोपणे पार पडली आहेत. पाश्चिमात्य देशांप्रमाणेच आपल्याकडे प्रत्यारोपणे यशस्वी होण्याचे प्रमाण अधिक आहे. भारतात हृदय प्रत्यारोपणाशी प्रक्रियेशी संबंधित एकूण मृत्यूदर केवळ दहा टक्के असल्याचा अंदाज आहे. संपूर्ण जगभरात हे प्रमाण कमी असलेल्या देशांपैकी भारत एक आहे. अशा रीतीने हृदय प्रत्यारोपणाची प्रक्रिया प्रत्येक दहापैकी नऊ रुग्णांबाबत यशस्वी होते. ‘रुबी’मध्ये रुग्ण जीवित राहण्याचे प्रमाण ९० टक्के आहे.

‘रुबी’चे वैद्यकीय सेवांचे संचालक डॉ. संजय पठारे म्हणाले, ‘हृदय निकामी होणे ही जगभरातील सर्वांत प्रचलित अवस्थांपैकी एक आहे. दरवर्षी केवळ भारतात अशी २० लाख नवीन प्रकरणे येतात व त्यांपैकी किमान एक तृतीयांश रुग्णांना वाचण्यासाठी आधुनिक उपचारांची आवश्यकता असते. धक्कादायकरीत्या, त्यांपैकी ३० ते ४० टक्के रुग्णांना निदान झाल्यानंतर वर्षभराच्या आत योग्य वेळी योग्य देखभाल उपलब्ध न झाल्याने त्यांचा मृत्यू ओढवतो. हृदय निकामी झालेल्या रुग्णांना हाताळण्याचा विपुल आणि विस्तृत अनुभव आमच्याकडे असून, आम्ही सातत्याने अधिकाधिक नवीन मार्ग शोधत आहोत व हृदयोपचाराच्या मर्यादा वाढवत आहोत. या कार्यक्रमाच्या यशाचे श्रेय आमच्या अनुभवी व उच्च कुशल प्रत्यारोपण संघाला जाते, ज्यामध्ये शल्यविशारद, हृदयरोगतज्ज्ञ, परिचारिका, शस्त्रक्रिया दालन कर्मचारीवर्ग, सामाजिक कार्यकर्ते, मानसोपचारतज्ज्ञ, आहारतज्ज्ञ, पुनर्वसन तज्ज्ञ आणि इतर अनेक व्यावसायिकांचा समावेश आहे. आमचा संघ हृदय प्रत्यारोपणाची गरज असलेल्या रुग्णाच्या भावनिक, कौटुंबिक आणि आर्थिक अशा गरजांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करते.’

‘रुबी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी बोमी भोट म्हणाले, ‘हा खरोखरच एक महान टप्पा आहे. आमच्या अत्यंत कुशल डॉक्टरांच्या संघाने या क्षेत्रात एकप्रकारे प्रवर्तक काम केले असून, हृदयाच्या जटील आजारांवर उपचार करण्याच्या प्रयत्नांमध्ये नैपुण्य मिळवले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आज रुबी हॉल क्लिनिकला हृदय सुरक्षेसाठीची नामांकित संस्था म्हणून भारतासोबतच भारताबाहेरही आदराने ओळखले जाते. या संपूर्ण संघाची समर्पितता व आकांक्षा यासाठी मी त्यांची स्तुती करतो आणि भविष्यात ते याहूनही अधिक उंची गाठतील, अशी आशा करतो. अत्युच्च दर्जाच्या रुग्णकेंद्रित सेवेची तरतूद करण्याचे उद्दिष्ट्य आम्ही कायम राखतो, ज्यातून आमच्या संघातील आंतरशाखीय दृष्टीकोन, प्रचंड बुद्धिमत्ता व बहु-कौशल्यात्मक साधनसंपत्तीचा फायदा आणखी अनेक रुग्णांना होऊ शकेल.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZLYBN
Similar Posts
‘रुबी’तर्फे जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त जनजागृती पुणे : ‘जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त (वर्ल्ड नो टोबॅको डे) ३१ मे रोजी रूबी हॉल क्लिनिकतर्फे जनजागृतीसाठी विशेष उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत,’ अशी माहिती रुबी हॉल क्लिनिकचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय पठारे, कर्करोग तज्ञ डॉ. भूषण झाडे आणि वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती ठाणेकर यांनी दिली.
‘रुबी’च्या रक्तदान मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद पुणे : रुबी हॉल क्लिनिकतर्फे वर्ल्ड ब्लड डोनर मंथनिमित्त महि​​नाभर रक्तदान मोहिम राबविण्यात आली. निरोगी भविष्याला आकार देण्यासाठी राबविण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान ५११ युनिट्स रक्त संकलित करण्यात आले.
‘रुबी’तर्फे मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर पुणे : रुबी हॉल क्लिनिक व एसीई ५१२ एस वर्कर​ ​युनियन यांच्यातर्फे मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अ‍ॅम्युनेशन फॅक्टरीजवळील ५१२ आर्मी बेस वर्कशॉप खडकीला या शिबिराचे आयोजन करण्यात आले.
‘रुबी’तर्फे एनडीएमध्ये व्हर्च्युअल क्लिनिक सुरू पुणे : रुबी हॉल क्लिनिकतर्फे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) कॅंपसमधील बिगर लष्करी अधिकारी, कर्मचारी आणि कुटुंबियांसाठी व्हर्च्युअल क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. या क्लिनिकच्या माध्यमातून या परिसरातील दहा हजारांहून अधिक रहिवाशांना सामान्य, सर्वसाधारण आजारांचे निदान तसेच, हॉस्पिटलच्या वैद्यकीय तज्ञांद्वारे सल्ला देण्यात येणार आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language