Ad will apear here
Next
लोककल्याणकारी राजे सयाजीराव गायकवाड
बडोदा संस्थानाचे लोककल्याणकारी महाराज सयाजीराव गायकवाड यांचा सहा फेब्रुवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने...
......
सयाजी महाराजांचा जन्म १० मार्च १८६३ रोजी झाला. महाराज सयाजीराव गायकवाड हे १८७५ ते १९३९ दरम्यान बडोदा संस्थानचे राजे होते. बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्यामुळे त्यांना विशेषत्वाने ओळखले जाते. 

प्रजाहितदक्ष आदर्श सयाजी नरेश पूर्वाश्रमीचे गोपाळ काशीराम गायकवाड होत. ते अत्यंत हुशार व चुणचुणीत होते. दहा मार्च १८६३ रोजी नाशिक जिल्ह्यातील कवळाने येथे त्यांचा जन्म झाला. सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले गोपाळ पुढे बडोद्याचे महाराज खंडेराव गायकवाड यांच्या मृत्यूनंतर राजघराण्यात दत्तक म्हणून गेले आणि बडोद्याच्या राजगादीवर एक महाराजा म्हणून सिंहासनारूढ झाले. 

हिंदुस्थानातील एकमेव अशा सयाजीराव महाराजांनी आपल्या छोट्याशा संस्थानात अनेक सुधारणा घडवून आणल्या. न्यायव्यवस्था, ग्रामपंचायतीचे पुनरुज्जीवन, सक्तीचे प्राथमिक शिक्षण, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, औद्योगिक प्रशिक्षण, हरिजनांसाठी शाळा, अस्पृश्यता निवारण, संस्कृत ग्रंथ प्रकाशन, कला शिक्षणाची सोय, सर्वसामान्य माणसांसाठी अशा किती तरी सुधारणा त्यांनी प्रत्यक्षात आणल्या. त्या व्यतिरिक्त स्त्रियांच्या बाबतीतही पुढाकार घेऊन त्यांचे हक्क त्यांना मिळावेत म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. बालविवाहबंदी, स्त्रियांना वारसा हक्क, विधवा विवाह, कन्या विक्रय बंदी, पडदा पद्धत बंदी इत्यादी सुधारणा आपल्या संस्थानात करून त्यांनी स्त्रियांना आधुनिक युगाचे दालन उघडून दिले. 

अत्यंत पुरोगामी विचाराच्या सयाजी महाराजांनी राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अध्यक्षस्थान भूषविले. १८८६मध्ये मुंबई येथील एका समारंभात त्यांनी उत्स्फूर्तपणे ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी प्रदान केली. तसेच डॉक्टर आंबेडकरांना शिष्यवृत्ती आणि नोकरीही दिली. दादाभाई नौरोजी, नामदार गोखले, महात्मा गांधी, मदनमोहन मालवीय, स्वातंत्र्यवीर सावरकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, न्यायमूर्ती रानडे या समाजधुरिणांना नैतिक व आर्थिक मदत त्यांनी केली. अत्यंत चातुर्याने क्रांतिकारी स्वातंत्र्यवीरांना आणि कर्त्या समाजसुधारकांना महाराजांनी अप्रत्यक्षपणे सर्वतोपरी मदत केली. 

सयाजीराव महाराजांनी राजेशाहीचे लोकशाहीत रूपांतर करण्याचा धाडसी प्रयोग करून, भारताच्या जडणघडणीचा पाया रचला. जनतेला मतदानाचा अधिकार, ग्रामपंचायतीची स्थापना, सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा, वाचनालयाची स्थापना, अस्पृश्यता, वेठबिगारी-बालविवाह प्रतिबंधक कायदे, राज्यात समृद्धी आणण्यासाठी रस्ते, पाणीपुरवठा जमीन सुधारणा, आरोग्य सेवा, उद्योग व्यवसायासाठी कौशल्य, शिक्षण, कायद्याचे सामाजिकीकरण व पारदर्शी प्रशासनासाठी जनमाध्यमांचा प्रभावी वापर अशा अनेक मार्गांनी त्यांनी विधायक राजनीतीचा आदर्श निर्माण केला. 

नागरिकांमध्ये साहित्य व कलेची अभिरुची निर्माण करण्यासाठी आणि कलावंतांना राजाश्रय देण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. यशस्वी राज्यकर्ता, कुशल प्रशासक आणि द्रष्ट्या विचारवंतांची सर्व गुणवैशिष्ट्ये महाराजांकडे होतीच. परंतु अस्तित्वाची कोंडी करणाऱ्या घटना-प्रसंगांवर मात करण्यासाठी लागणारी प्रबुद्धताही त्यांनी संपादन केली होती. 

सयाजीराव गायकवाड यांना वाचनाची अत्यंत आवड होती. त्यांचे स्वतःचे मोठे ग्रंथसंग्रहालय होते. फिरते वाचनालय ही संकल्पना प्रथम सयाजीराव गायकवाड यांनीच राबवली. वाचनालयाच्या प्रसारासाठी व स्थापनेसाठी त्यांनी ग्रंथालयतज्ज्ञ बॉर्डन यांना भारतामध्ये आमंत्रित केले होते. ते दहा वर्षे बडोदा संस्थानांमध्ये ग्रंथालयात कार्यरत होते. सयाजीराजे यांनी संस्थानांमध्ये अनेक ग्रंथालये स्थापन केली. प्राचीन संस्कृत ग्रंथांचे प्रकाशन करण्यास त्यांनी उत्तेजन दिले. 

सयाजीराजांनी श्री सयाजी साहित्यमाला व श्री सयाजी बालक ज्ञानमाला या दोन मालांमधून उत्तम ग्रंथांची भाषांतरे प्रसिद्ध केली. होतकरू विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक प्रशिक्षण मिळावे म्हणून कलाभवन ही संस्था स्थापन केली. गरजू हुशार विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली. 

सयाजीराजांना अर्थकारणाची जाण असल्याने बँक ऑफ बडोदाची स्थापना हे त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचे कार्य होते. त्यांना बँकेची परवानगी मिळवण्यासाठी आठ वर्षे प्रयत्न करावे लागले. शेवटी बँक स्थापन झाल्यावर त्याच्या व्याजातून आपणच स्थापन केलेल्या विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे अशी व्यवस्था त्यांनी केली. 

ऑलिम्पिकची संधी साधून त्यांनी हिटलरची भेट घेतली होती. त्यांच्या सूचनेनुसार खेळाडूंनी बडोदे संस्थानचे प्रतिनिधी म्हणून बडोद्याचा भगवा ध्वज बर्लिन येथे वापरला. योगी अरविंद हे त्यांच्या सेवेत होते. त्यांनी त्यांना योगविद्या शिकवण्यासाठी उत्तेजन दिले. अनेक लेखक, प्रकाशक, रंगकर्मी, शिल्पकार, चित्रकार, तसेच उद्योजकांनाही त्यांनी अत्यंत मदत केली. जात, पात, धर्म असा भेद न करता, सर्वांना मदत हाच त्यांचा स्थायीभाव होता. 

महाराज सयाजीराव गायकवाड हे दातृत्वासाठी नेहमी तत्पर असत. सत्पात्री दान देण्यात ते नेहमीच अग्रेसर होते. हिंदुस्थानातील नव्हे, तर जगातील अनेक गरजवंतांना त्यांनी उदार हस्ते मदत केली होती. पुत्रवत प्रेम असलेली त्यांची प्रजा संकटात असेल त्या वेळी त्यांचे दातृत्व आणि कार्य खूपच मोलाचे ठरलेले दिसून येते. 

सयाजीराव गायकवाड हे प्रत्येक गोष्ट नियोजनपूर्वक करत. हे नियोजन करत असताना ते नेहमीच दूरदृष्टी ठेवत. त्यांचे नियोजन आणि व्यवस्थापन नेहमीच उत्कृष्ट असे. मदत करत असताना प्रजेला परावलंबी करण्यापेक्षा स्वावलंबी करण्याकडे त्यांचा मोठा कल असे. शंभर वर्षांपूर्वी महाराज सयाजीराव गायकवाड यांनी बडोदा आणि आजूबाजूच्या जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे उद्भवलेल्या गंभीर संकटाचे उत्तम व्यवस्थापन करून जनतेला दिलासा दिला. या संकटात महाराजांनी संस्थानातील सर्व यंत्रणा कार्यरत केली. लोकांना मदत पोहोचवली. ते प्रजाहितदक्ष राजे होते. ‘जनतेचे कल्याण हाच माझ्या जीवनाचा ध्यास आहे,’ असे ते म्हणत. या विचारांप्रमाणे त्यांनी संपूर्ण आयुष्य प्रजेसाठी व्यतीत केले. शिक्षणाचे महत्त्व या जाणत्या राजाने जाणले होते. अनेक सुधारणा करताना त्यांनी शिक्षणाला प्राधान्यक्रम दिला. शेतकरीवर्गाला त्यांनी दुष्काळ आणि अतिवृष्टी या काळात मदत केली

बडोद्यात १९२७च्या जुलै महिन्यात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली. त्या वेळी चार दिवसांमध्ये नेहमीपेक्षा जास्त पाऊस पडला. वाघोडियामध्ये ५५ इंच पावसाची नोंद झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे नदी-नाल्यांना महापूर आला. हे सर्व अचानक घडले. लोकांना आपला जीव वाचवण्यासाठी आपली घरेदारे, जनावरे व साधनसंपत्ती सोडून पलायन करावे लागले. पूर्वी अशा संकटांची पूर्वसूचना देण्यासाठी यंत्रणा नव्हती. त्यामुळे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. या काळात थोडीफार असणारी संपर्क यंत्रणा कोलमडली. कोणत्या भागात किती नुकसान झाले, याची माहिती समजायला थोडा वेळ लागला. परंतु पुराची भीषणता आणि झालेली जीवित आणि वित्तहानी पाहता बडोद्यातील प्रशासन ताबडतोब कामाला लागले. या महापुरातून सर्वप्रथम प्रशासनाने वेगवेगळ्या भागात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले आणि कमीत कमी हानी कशी होईल याकडे लक्ष पुरवले. त्यासाठी उपाययोजना केल्या. 

लोकांबरोबर शेतकऱ्यांच्या जनावरांनाही सुरक्षित स्थळी हलवले. अधिकारी आणि अधिकारी नसलेल्या लोकांनीही सर्व प्रकारच्या मदतकार्यात भाग घेतला. शहरात सर्वांनी मिळून काम केले. उपलब्ध असलेल्या सर्वच साधनांचा वापर करून स्थिती पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. निराधार आणि बेघर लोकांना तात्काळ मदत पुरवली. बडोदा शहर आणि इतर जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक इमारती आणि धर्मशाळा नागरिकांसाठी खुल्या करण्यात आल्या. लोकांना मदतीसाठी सरकारतर्फे तातडीने पन्नास हजार रुपये मंजूर करण्यात आले. प्रशासनाच्या या सहकार्यामुळे महाभयंकर पुराच्या काळातही लोकांना दिलासा मिळाला. 

अशा या थोर लोककल्याणकारी, कर्तव्यदक्ष समाजहितवादी राजा मुंबई येथे ६ फेब्रुवारी १९३९ रोजी निधन झाले. त्यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा. 

- डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर
(इतिहास अभ्यासक, पुणे)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GUSUCV
Similar Posts
शिवपत्नी महाराणी सईबाई पाच सप्टेंबर १६५९ रोजी आपल्या लाडक्या शंभूराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना व सर्व रयतेला सोडून सईबाई राणीसाहेब वयाच्या अवघ्या २६व्या वर्षी निजधामाला गेल्या. आज त्यांचा स्मृतिदिन.
शहाजीराजे भोसले शहाजीराजांचा जन्म १८ मार्च १५९४ रोजी मालोजीराजे व दीपाबाई ऊर्फ उमाबाईसाहेब यांच्या पोटी झाला. मालोजी व विठोजी हे दोन भोसले बंधू प्रथमतः फलटणच्या वणंगपाळ नाईक-निंबाळकर यांच्याबरोबर राहत होते. मालोजीराजे यांच्या पराक्रमामुळे वणंगपाळ नाईक-निंबाळकर यांनी आपली मुलगी दीपाबाई मालोजीराजे यांना दिली होती. नंतर त्यांचे नाव उमाबाई ठेवण्यात आले
मल्हारराव होळकर कटकेपासून अटकेपर्यंत मराठेशाहीचा दरारा निर्माण करणारे, १७व्या शतकात मराठेशाहीचा आधारस्तंभ असणारे महान सरदार सुभेदार राजे मल्हारराव होळकर यांना जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन.
रायाजीराव जाधवराव निजामाच्या सैन्याविरुद्ध लढताना रायाजीराव २५ फेब्रुवारी १७२८ रोजी पालखेड येथे लढाईत धारातीर्थी पडले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language