वृक्षांची बियांपासून केलेली रोपे झरझर वाढतात. खालील एका फोटोत आमच्या बागेत लावलेले फणसाचे एक रोप आहे जे १ वर्षात ९ फूट उंच वाढले आहे. अशा उंच रोपांना आधार देण्याची गरज असते अन्यथा मोठ्या वाऱ्यात अशी झाडे वाकडी होतात किंवा मोडतात देखील आणि अशा वाकड्या झाडांकडे दुर्लक्ष केल्यास ती तशीच वाकडी होऊन वाढू लागतात. नंतर त्यांना सरळ करणं कठीण होतं.
आधार देताना बऱ्याचदा एकच काठी लावली जाते. मात्र हे योग्य नाही. पावसाळ्यात असे रोप वाऱ्याबरोबर कोणत्याही दिशेत आडवे होते कारण दोरा हलका असतो. काहीवेळा आधार दिलेल्या काठीच्या मुळात पाणी साचले आणि आधाराची काठीच कुजते. अशी काठी वाकडी झाल्यास काठीचे स्वतःचे वजन आणि रोपांचे वजन दोन्हीमुळे रोप वाकडे होते. एक काठी आधारास लावताना एकदम मुळातच पाहारीने होल मारला जातो. हे देखील योग्य नव्हे. झाडांच्या मुळांना अशावेळी इजा होते.
उंच रोपांना आधार देताना झाडाच्या खोडापासून किमान एक ते दीड फूट दूर, वाऱ्याची दिशा आणि झाडाच्या वाढीची दिशा लक्षात घेत, विरुद्ध बाजुस दोन बांबू पुरावेत. आधाराच्या बांबू काठ्या २ वर्ष वयाच्या असल्यास उत्तम. अशा आधार-काठ्या अती पावसात कुजत नाहीत किंवा यांना वाळवी देखील चटकन लागत नाही. झाडाच्या वाढीचा वेग लक्षात घेत काठीची उंची लक्षात घ्यावी. एकदा दिलेला आधार किमान २ वर्षे राहणे आवश्यक आहे. त्यानंतर या दोन काठ्यांच्या आधाराने आडव्या एक किंवा दोन काठ्या मुख्य रोपाच्या खोडासोबत आवश्यक त्या उंचीवर बांधल्यास रोप सरळ राहते.
जिथे रोप आडव्या काठीस स्पर्श करते तिथे निसरडी गाठ मारून कडेच्या एका उभ्या काठीस तोच दोर पिळ मारल्यास झाड आडवे देखील हलू शकत नाही. ईथे झाडाचा तोल कोणत्या दिशेस आहे ते पाहून त्या दिशेच्या विरुद्ध बाजूस असलेल्या काठीस ही गाठ मारावी. दोर निवडताना देखील काळजी घेणे आवश्यक आहे, नाहीतर वाऱ्यावर झाड हलून दोऱ्यामुळे झाडाची साल निघू शकते.
कालच्या वादळात आमच्या बागेतील एकही उंच रोप मोडले नाही कारण सगळी उंच रोपे अगोदरच दोन दोन बांबूच्या आधाराने बांधली होती.
करून पहा आणि आपले अनुभव देखील सांगा!
😊👍
- मिलिंद जोशी