Ad will apear here
Next
डॉ. ह. वि. सरदेसाई : ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व
पुण्यातील नामवंत वैद्यकीय तज्ज्ञ आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व डॉ. ह. वि. सरदेसाई यांचे आज (१५ मार्च २०२०) निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. ‘घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती’सारख्या त्यांच्या अनेक पुस्तकांनी संपूर्ण महाराष्ट्रातच, नव्हे तर जगभरातील मराठी माणसांना सोप्या भाषेत वैद्यकीय ज्ञान देण्याचे मोठे काम केले. त्यांच्या कार्याचा, विचारांचा वेध घेणारा आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलून लिहिलेला हा १० वर्षांपूर्वीचा लेख येथे प्रसिद्ध करत आहोत. 
........
काही व्यक्तिमत्त्वांचा जन्म हा समाजाच्या उत्थानाकरिताच झालेला असतो. आपल्या ज्ञानातून, व्यवसायातून सामाजिक प्रगती साध्य करणे या एकाच उद्दिष्टासाठी ते आयुष्यभर झटत असतात. आजच्या काळात अशी व्यक्तिमत्त्वं दुर्मिळ झाली असली, तरी अजूनही असे काही पथदीप आपल्या जीवनज्योतीने अनेकांचे आयुष्य प्रकाशमय करत आहेत. त्यातलंच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे पुण्यातील डॉ. ह. वि. तथा हणमंत विद्याधर सरदेसाई.

काही कारणानिमित्तानं अलीकडेच मला या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाशी एक तासभर बोलण्याची, त्यांचे विचार जाणून घेण्याची सुवर्णसंधी मिळाली. बरेच दिवस मी त्यांची, त्यांच्या पुस्तकांची कीर्ती ऐकून होतो. त्यांचे लेख वाचत होतो. पण त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा हा पहिलाच योग होता. त्यांचे विचार केवळ वैद्यकीय क्षेत्राशी निगडित असलेल्यांनाच नव्हे तर सर्वांसाठी नक्कीच मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरू शकतात, असं मला वाटलं. त्या विचारांचा वाहक होण्याची संधी मिळाली, हे माझं सद्-भाग्य!

‘कोणत्याही डॉक्टरसाठी, आपल्या औषधानं बरा होणारा रुग्ण पाहणं हेच सर्वांत मोठं समाधान आहे. दुसऱ्याचं मानसिक, शारीरिक किंवा दोन्हीही प्रकारचं दुःख निवारण करण्याची दैवी संधी डॉक्टरला लाभलेली असते. धनदौलत मिळविण्यासाठी डॉक्टर होण्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे.’ डॉ. सरदेसाई यांच्या या विचारांतूनच त्यांचं व्यक्तिमत्त्व आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. १० एप्रिल १९३३चा डॉक्टरांचा जन्म. म्हणजे आजचं त्याचं वय आहे ७८ वर्षं. पण या वयातही समाजासाठी जगण्याची त्यांची तळमळ जराही कमी झालेली नाही, हे त्यांच्या वाक्यावाक्यातून जाणवतं.

मुंबईत १९५५ साली एमबीबीएस आणि १९५८मध्ये एमडी (मेडिसिन) झाल्यावर उच्च शिक्षणासाठी ते लंडनला गेले. एमबीबीएसला त्यांना प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन आणि फॉरेन्सिक मेडिसिन या विषयांत डिस्टिंक्शन तर स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र विषयात सुवर्णपदक मिळालं होतं. मेंदू, मज्जासंस्था आदींशी निगडित न्यूरॉलॉजी या विषयात एमडी करून १९६० ला ते भारतात परतले. पुण्यात त्यांचे आई-वडील होते. वडिलांना मधुमेह तर आईला ब्लड प्रेशरचा त्रास होता. ते चौघे भाऊ. प्रत्येक जण आपापल्या कामानिमित्ताने बाहेरगावी असल्याने आई-वडिलांची सेवा करण्याच्या उद्देशाने डॉक्टरांनी पुण्यातच स्थायिक व्हायचं ठरवलं.



पुण्यात आल्यानंतरच्या वाटचालीबद्दल त्यांना विचारलं. ते सांगू लागले, ‘‘मी इथं आलो तेव्हा पुणं खूप छोटं होतं. लोकसंख्या केवळ तीन लाख होती. मला पुणेकरांची फारशी माहिती नव्हती. कारण शिक्षणानिमित्ताने मी बाहेरच होतो. हळूहळू इथे व्यवसायाला सुरूवात केली. माझ्या असं लक्षात आलं, की औषधांव्यतिरिक्त रुग्णांना जी आहार, जीवनशैली आदींबाबतची माहिती द्यावी लागते, ती बहुतांशी सारखीच असते. मग ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी व्याख्यानं आणि लेखनाचा आधार घ्यायचं मी ठरवलं. व्याख्यानं सुरू झाली. माझं शिक्षण इंग्रजीतून झालेलं असल्यानं बोलण्यात इंग्रजी शब्द फार यायचे. एकदा वि. श्री. मोडक नावाचे गृहस्थ माझ्याकडे आले. ते प्रभात दैनिकाचे उपसंपादक होते. माझ्या व्याख्यानात येणाऱ्या इंग्रजी शब्दांकडे त्यांनी लक्ष वेधलं आणि मराठी शब्द वापरण्याचा सल्ला दिला. त्यांनी माझी भाषा सुधारण्यासाठी शिकवायचीही तयारी दर्शविली. माझा दवाखाना तेव्हा कुंटे चौकात होता. जवळच प्रभातचं कार्यालय होतं. मग सहा महिने दररोज अर्धा तास मी त्यांच्याकडे जात असते. आमच्या चर्चा चालत. या उपक्रमातून सहा महिन्यांत माझी भाषा सुधारली. त्यामुळे माझी व्याख्यानं लोकांना अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत झाली. १९८५पर्यंत सुमारे २५ वर्षं मी पुण्यातल्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापनाचं कामही केलं. तिथे शिकवताना पूर्ण इंग्रजी भाषा वापरावी लागत असली तरीही लोकांना व्याख्यान देताना पूर्णपणे मराठी भाषेचाच वापर करू लागलो. त्यानंतर मी सूचनापत्रं म्हणजेच प्रिस्क्रिप्शन्सही मराठीत लिहायला सुरुवात केली. आपल्याकडे येणाऱ्या १०० टक्के माणसांना मराठी कळतं. इंग्रजी कळणारी माणसं दोन ते तीन टक्केच असतात. औषधाचं नाव इंग्रजीत लिहिणं साहजिक आहे. पण औषध कसं घ्यावं, याच्या सूचना इंग्रजीत द्यायचा अट्टाहास कशाला ? या विचारानंच मी मराठीत सूचनापत्रं लिहू लागलो. ’’

डॉक्टर सांगत होते, “प्रकृती चांगली राखायची असते हे लोकांना माहिती असतं. पण ती कशी चांगली राखायची, याचं मात्र ज्ञान त्यांना नसतं. गैरसमजातून बराच त्रास होतो. त्यामुळे समाजाला ज्ञानवंत करण्याची गरज आहे, हाच विचार माझा मनात होता. प्रकृती चांगली राखायची असेल तर सकस आणि संतुलित आहार, व्यायाम आणि मनाचं आरोग्य ही तीन सूत्रं फार महत्त्वाची आहेत. समाजाचं प्रबोधन व्हावं, संपूर्ण समाजच निरामय व्हावा, यासाठी हाच संदेश मी गेली पन्नास वर्षं सातत्यानं समाजाला देत आलो आहे. हातात पैसा आला की मद्यपान, धूम्रपान यांसारख्या गोष्टींकडे वळण्याची माणसांची प्रवृत्ती दिसते. अगदी काही डॉक्टरांच्या संमेलनातही त्याचा वापर होताना दिसतो. हे नक्कीच वाईट आहे. त्याचं समर्थन करणंही चुकीचं. मद्याचा पहिला थेंबच वाईट आहे, ही गोष्ट लोकांच्या मनावर बिंबवली गेली पाहिजे.’’

या वयातही डॉक्टर कार्यरत आहेत, हे मला माहिती होतं. त्यामुळे त्यांच्या दिनचर्येबाबत मला कुतूहल होतं. त्यांची दिनचर्या ऐकल्यावर मी थक्कच झालो. ते म्हणाले, “ मी दररोज पहाटे साडे-तीन वाजता उठतो. त्यानंतर एक तास योगासने, व्यायाम करतो. नंतर आवरून पहाटे पाच वाजताच दवाखान्यात जातो. अडीच वाजेपर्यंत दवाखान्यात काम केल्यावर घरी येतो. त्यानंतरचा वेळ हा मी वाचन, लेखन, व्याख्याने आदींसाठी राखून ठेवतो. सगळं आटोपल्यावर रात्री साडे आठ वाजताच मी झोपतो. गेली कित्येक वर्षे माझी ही दिनचर्या अशीच आहे. गेल्या वर्षी मला एक आजारपण आल्यामुळे माझ्यावर एक शस्त्रक्रिया झाली. मला नीट उभं राहता येत नव्हतं. त्यामुळे तेव्हापासून या दिनचर्येवर साहजिकच परिणाम झाला. आता हळूहळू तब्येत सुधारत आहे. त्यामुळे पुन्हा योगासनं वगैरे सुरू केली आहेत. माणसानं क्षमता ओळखून लक्ष्मणरेषा पाळल्या पाहिजेत.’’

आपण योगासनं करायला कधी सुरुवात केली, याची आठवणही त्यांनी सांगितली. “ समाजाला आरोग्यविषयक ज्ञान मिळण्यासाठी मी व्याख्यानांसारखे उपक्रम राबवत होतो. १९६७ सालातल्या एका दिवशी एकजण माझ्या दवाखान्यात आले. स्वामी चक्रजित त्यांचं नाव. त्यांनी मला सांगितलं, की डॉक्टर, तुम्ही जर योगशास्त्र शिकलात तर त्याचा समाजाला उपयोग होईल. त्यासाठी मी स्वतः तुम्हाला योगशास्त्र शिकवायला तयार आहे. ती लोकांपर्यंत पोचवायची, ही अट. मला ती कल्पना आवडली. मी तयारी दर्शवल्यावर १९६७ ते १९७३ या कालावधीत दररोज पहाटे पाच वाजता स्वामी चक्रजित मला योगासनं शिकवायला माझ्याकडे येत होते. त्यात मी प्रत्याहारपासून ध्यानधारणेपर्यंतचे सगळे प्रकार शिकलो. तेव्हापासून आजपर्यंत मी स्वतः नियमितपणे योगासनं करतो. लोकांना शिकवतो. प्रत्येक डॉक्टरनं योगासनं शिकायला आणि करायला काय हरकत आहे ? ’’ डॉक्टर सांगत होते.

आजच्या युगातील किंवा विशेषतः नव्याने डॉक्टर होणाऱ्या मुलांकडून काय अपेक्षा आहेत, असं विचारल्यावर डॉक्टरनी अनेक चांगल्या कल्पना सुचविल्या. ते म्हणाले, “आज अनेकांना एमबीबीएस झाल्यावर समाजाला नेमकं काय हवं, हेच माहिती नसतं. मॉडर्न मेडिसिन हे पर्फेक्ट सायन्स नाही. त्यालाही काही मर्यादा आहेत. अनेक गोष्टींना साइड इफेक्टस् असतात. ते माहिती हवेत, ते झालेच तर काय करायचं हेदेखील माहिती पाहिजे. या विषयात अधिक संशोधन व्हायची गरज आहे. शिवाय हे शास्त्र परदेशात जसं वापरलं जातं, तसंच्या तसं इथे वापरून उपयोग नाही. परदेशात होणारे आजार हे प्रामुख्याने वार्धक्य आणि समृद्धीमुळे होतात, तर आपल्याकडे अज्ञान, दारिद्र्य आणि अस्वच्छता ही आजारांची प्रमुख कारणं आहेत. आजारांच्या कारणांत फरक असल्यामुळे साहजिकच त्याच्या उपचारपद्धतींतही गरजेनुसार बदल हवाच. एमबीबीएसच्या अभ्यासक्रमातही बदल करणं गरजेचं आहे. हा कोर्स डिझाइन करण्यापूर्वी समाजाचं एक सर्वेक्षण घेऊन तुम्हाला कसा डॉक्टर हवा, हे लोकांनाच विचारायला हवं, असं मला वाटतं. आपल्याकडे आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी अशा अनेक उपचारपद्धती आहेत. प्रत्येकात काही ना काही तरी चांगलं आहेच. त्यामुळे एमबीबीएसच्या पहिल्या वर्षी विद्यार्थ्यांना या प्रत्येक पॅथीचं किमान प्राथमिक तरी ज्ञान द्यायला हवं. तसं झालं तर डॉक्टर त्याच्याकडे येणाऱ्या रुग्णाच्या आजारानुसार योग्य त्या पॅथीने उपचार करू शकेल किंवा संबंधित पॅथीच्या तज्ज्ञाकडे रुग्णाला पाठवू शकेल. उदाहरणार्थ, पचनाचे काही आजार असतील तर आयुर्वेद आणि त्वचेचे आजार होमिओपॅथीच्या उपचाराने बरे होतात, असा अनुभव आहे. मग दरवेळी एकच पॅथी वापरण्याचा आग्रह धरून उपयोग नाही. मी कोणत्याही एका पॅथीच्या बाजूचा किंवा विरोधी नाही. शेवटी रुग्णाला बरं वाटणं, हाच हेतू महत्त्वाचा असतो ना ! डॉक्टर होणाऱ्या विद्यार्थ्यांना भाषा, बोलण्या-वागण्याची पद्धत, पेहराव यांसारख्या गोष्टीही आवर्जून शिकवायला हव्यात, असंही मला वाटतं. ’’

मनःशांती हे व्यक्तिच्या निरोगी आरोग्यासाठीचं महत्त्वाचं सूत्र आहे, असं डॉक्टर सांगतात. ते म्हणतात, अंधश्रद्धा सोडली, तर श्रद्धा ही फार मोठी शक्ती आहे. या श्रद्धेतून काय मिळणार आहे, हा विचार फार महत्त्वाचा आहे. त्यातूनच ती श्रद्धा की अंधश्रद्धा ते ठरतं. उदाहरणार्थ, एखादा चांगला शिंपी आहे तर तो कपडे चांगले शिवून देईल असा विश्वास असणं ही श्रद्धा. पण म्हणून तो चांगलं टेबल तयार करून देईल अशी अपेक्षा बाळगली, तर ती अंधश्रद्धा. माणसाची विचारसरणी सुसूत्र हवी. भौतिक प्रगती हवी असेल, तर शास्त्रावर श्रद्धा हवी आणि मनःशांतीसाठी धर्मावर श्रद्धा हवी. हा फरक समजून घेतला नाही, तर मनःशांती मिळत नाही. उदाहरणच घ्यायचं झालं तर युद्धाचं घेता येईल. युद्ध जिंकायचं असेल तर सगळ्या सामग्री आणि शक्तीनिशी लढायलाच हवं. त्यासाठी यज्ञ करून उपयोग नाही.

वैद्यकीय विषयांशी निगडित पुण्यातील अनेक संस्थांचं अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्यपद डॉक्टरांनी भूषवलेलं आहे. त्यांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. वैद्यकीय सुविधा सुधारण्यासाठी मोठ्या इमारती नव्हे तर जास्त चांगल्या सेवेची गरज आहे. परदेशात तीन रुग्णांमागे एक नर्स असते. आपल्याकडे हे प्रमाण १२ रुग्णांमागे एक नर्स असं आहे. हे सुधारायला हवं. त्यासाठी त्यांचे, वॉर्डबॉइजचे पगार वाढायला हवेत, असं त्यांचं मत आहे.

डॉक्टरांनी व्याख्यानांसोबत विपुल लेखनही केलेलं आहे. त्यांची २२ पुस्तकं आणि २७ संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले आहेत. ‘घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती’ हे त्यांचं पुस्तक हिंदी आणि इंग्रजी भाषेतही अनुवादित झालं. मराठीत त्याच्या सोळा आवृत्त्या निघाल्या. अजूनही ते वृत्तपत्रांतून लेखन करतच असतात. ‘निरामय जीवनाचे पथदर्शक : डॉ. ह. वि. सरदेसाई’ हे डॉक्टरांच्या जीवनकार्याचा वेध घेणारं पुस्तकही प्रकाशित झालं आहे.

तर असे आहेत डॉ. ह. वि. सरदेसाई यांच्या व्यक्तिमत्त्वाचे मला कळलेले काही पैलू. ते पाहिल्यावर निरामय समाजाकरिता प्रयत्नांचा द्रोणागिरी समर्थपणे पेललेला ‘हणमंत’ अशी उपमा त्यांना द्यावीशी वाटते. 

- अनिकेत कोनकर

(लेख स्रोत : http://manspandane.blogspot.com
प्रथम प्रसिद्धी दिनांक : १८ डिसेंबर २०१०)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZSLCK
Similar Posts
हाडाच्या कार्यकर्त्या, संवेदनशील लेखिका – दीपा देशमुख प्रसिद्ध लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या दीपा देशमुख यांचा २८ ऑक्टोबर हा जन्मदिन. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमाच्या औचित्याने दीपाताईंची जिवाभावाची मैत्रीण डॉ. सुवर्णसंध्या धुमाळ यांनी लिहिलेला, दीपाताईंची वाटचाल उलगडणारा लेख त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध करत आहोत. कार्यक्रमाचा व्हिडिओही शेवटी दिला आहे
स्वर-शब्द-प्रभू माझ्या मनात त्यांच्या अशा अनेक प्रतिमा आहेत. एक बासरीवादक, प्राध्यापक, कॉपी रायटर, संहिता लेखक, संगीत दिग्दर्शक, कलाशिक्षक अशा विविध रूपांचा चालता बोलता ज्ञानकोश म्हणजे प्रा. अजित सोमण. कुठल्याही विषयात शंका विचारा, पुढच्या क्षणाला उत्तर मिळणार म्हणजे मिळणार! परत कुठे त्यात अहंभावाचा मागमूसही नाही. कमालीचा साधेपणा
दि. बा. मोकाशी, गणेश मावळणकर, बप्पी लाहिरी ज्येष्ठ लेखक दि. बा. मोकाशी, पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष गणेश मावळणकर आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांचा २७ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त त्यांचा हा अल्प परिचय
मनोहर पर्रीकर, प्रतिभाताई पवार, पांडुरंग नाईक गोव्याचे मुख्यमंत्रिपद भूषविलेले नेते आणि माजी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचा, तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार आणि चित्रपट छायालेखक पांडुरंग सातू नाईक यांचा १३ डिसेंबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language