Ad will apear here
Next
हत्तींशी संवाद साधणारा आनंद


आनंद शिंदे हे अशा व्यक्तीचं नाव आहे, की जी व्यक्ती हत्तींशी संवाद साधू शकते. ‘प्राण्यांना काय बोलायचंय हे पहिल्यांदा त्यांच्या डोळ्यांत दिसतं. मी हत्तींकडून माणुसकी शिकलो,’ असं आनंद आवर्जून सांगतो. ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’मध्ये आज जाणून घेऊ या आनंद शिंदेच्या या वेगळ्या प्रवासाबद्दल...
.............. 
काही माणसं ‘स्व’च्या पलीकडे जाऊन झपाटलेल्या अवस्थेत प्रवास करतात. अनेकदा या लोकांना वेडं ठरवलं जातं. त्या वेडाची किंमत देऊन ते काय साध्य करतात हे सगळं त्यांच्या अनवट वाटेवरच्या प्रवासाची गोष्ट ऐकली की कळतं. त्यांच्यासारख्या वेड्यांमुळे आपल्यालाही एक नवी दृष्टी मिळते, नवी जाणीव तयार होते आणि जगण्याचं नवं भानही येतं. अशीच ही गोष्ट आहे हत्तींशी संवाद साधणाऱ्या आनंद शिंदे नावाच्या तरुणाची!



आनंदकडे बघताना मला लहानपणी बघितलेला राजेश खन्ना आणि तनुजा यांच्या भूमिका असलेला ‘हाथी मेरे साथी’ हा चित्रपट आठवला. त्यातलं ‘चल चल चल मेरे हाथी, ओ मेरे साथी’ हे गाणं खूपच लोकप्रिय झालं हेातं. राजेश खन्ना आणि हत्तीची दोस्ती, त्यांचं एकमेकांवरचं प्रेम आणि अस्वस्थ करणारा तो करुण शेवट यानं कित्येक दिवस मन हळवं झालं होतं. आज हा आनंद नावाचा तरुण त्या राजेश खन्नाची आठवण मला करून देत होता.



राजेश खन्नानं चित्रपटात हत्तीच्या मित्राची भूमिका साकारली होती; मात्र आनंद शिंदे हा हत्तींशी संवाद साधणारा, हत्तींचा खरोखरचा मित्र माझ्यासमोर उभा होता. ‘बीए’ची पदवी मिळवलेल्या आनंदनं राष्ट्रीय पुरस्कारांसह अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. खरं तर हा मुळात फोटोग्राफीची आवड असणारा छायाचित्र-पत्रकार! अनेक वर्तमानपत्रांत त्याची छायाचित्रं प्रसिद्ध झाली आहेत. संपूर्ण भारतभर त्याची भ्रमंती सुरू असते. असाच एकदा तो केरळमध्ये मार्शल आर्ट आणि कथकलीवर फोटो फीचर करण्यासाठी गेला असताना तिथे हत्तींशी त्याची गाठ पडली आणि या हत्तींनी त्यांचं अख्खं जगणंच व्यापून टाकलं.



आनंदच्या लहानपणी त्याच्या घरात कुठलाच प्राणी नव्हता. एकदा त्यानं वडिलांना कुत्रा पाळण्याविषयी विचारलं, तेव्हा त्याच्यावरचा खर्च सांगून त्याचे वडील त्याला म्हणाले होते, ‘एकतर तू तरी शिकशील किंवा कुत्रा.’ त्यांचं उत्तर ऐकून आनंदनं पुन्हा प्राणी पाळण्याविषयी त्यांच्याकडे चकार शब्द काढला नाही.



पुढे शिक्षण झाल्यानंतर आपल्या एका कामासंदर्भात आनंद केरळला गेला, तेव्हा त्याला तिथली मल्याळी भाषा कळत नव्हती. केरळमधला त्रिशूल नावाचा प्रसिद्ध फेस्टिव्हल आनंदनं ‘शूट’ केलं. त्या फेस्टिव्हलमध्ये असलेल्या हत्तींचं त्यानं पहिल्यांदा शूटिंग केलं आणि रांगेत असलेले ते हत्ती तो बघतच राहिला. हत्ती ताकदवान प्राणी म्हणून त्याला माहीत होता; पण त्याचं हृदय किती मऊ असतं, हे त्याला एका दृश्यानं दाखवलं. एका हत्तीचा माहूत त्याच्या पायाला सारखं टोचून पुढे चालायला भाग पाडत होता. त्यामुळे त्या हत्तीच्या पायाला खूप जखमा झाल्या होत्या. एवढं होऊनही, तीव्र उन्हाचे चटके माहुताला बसायला लागले, तेव्हा त्या हत्तीनं आपल्या चार पायांच्या मधल्या जागेत बसायला माहुताला जागा दिली. ते दृश्य पाहून आपण हत्तीला घाबरण्याची गरज नाही, हे आनंदला कळलं.



कृष्णा नावाच्या हत्तीच्या पिल्लाचा पाय मोडला होता. ते बघून आनंदला वाईट वाटत होतं. कृष्णा आपल्या आईशिवाय राहू शकत नव्हता. तो सारखा एका विशिष्ट पद्धतीनं आवाज काढायचा. एक हत्ती दुसऱ्या हत्तीशी संवाद साधण्यासाठी ऱ्हमलिंगची भाषा वापरतो. सात किलोमीटरपर्यंतच्या अंतरावरील दुसऱ्या हत्तीशी हत्ती संवाद साधू शकतो, ही माहिती विशेष आणि चकित करणारी होती! आनंदनं हत्तींशी संवाद साधण्यासाठी त्याच प्रकारे आवाज काढण्याचा सराव केला. हळूहळू त्याला ते जमायला लागलं. हत्तीच्या पोटातून धुमारायुक्त आवाज ऐकायला येतो. आनंदला मात्र घशातून तसा आवाज काढता आला. आनंदच्या कृष्णाशी संवाद साधण्याच्या अथक प्रयत्नांनंतर कृष्णानं कान हलवून आनंदच्या येण्याचा आनंद व्यक्त केला. 

कृष्णा आणि आनंद यांच्यात जवळीक निर्माण व्हायला दीड महिना गेला. सकाळी सातपासून रात्रीपर्यंत आनंद कृष्णाच्या पिंजऱ्याजवळ बसून राहायचा. त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्याशी बोलत राहायचा. तिथले लोक त्याचं तिथलं १२-१२ तास बसून राहणं बघायचे. दुसऱ्या दिवशी आनंद कृष्णाच्या पिंजऱ्याजवळ येताना दिसला, की म्हणायचे, ‘आला वेडा!’ एके दिवशी काही कारणांमुळे आनंदला मुंबईला परतावं लागलं. आनंदनं कृष्णाचा निरोप घेतला. आपण मुंबईहून लवकर परत येऊ, असं त्याला सांगितलं. तेव्हा कृष्णा काही केल्या आनंदला सोडेना. त्याला काय सांगायचं आहे हे आनंदला कळत नव्हतं. आनंद मुंबईला परतल्यानंतर दोनच दिवसांत कृष्णा वारला. त्याला कदाचित आपला मृत्यू कळला होता. म्हणूनच तो आनंदला सोडू इच्छित नव्हता.

आनंदला हत्तींनी झपाटून टाकलं होतं. त्याला हत्तींच्या संदर्भात अनेक गोष्टी कळत होत्या. वय वाढतं तसा हत्तीमध्येही पोक्तपणा येतो. तसंच ते एकमेकांची थट्टा, चेष्टा करत असतात. इतकंच काय माणसाला मित्र मानल्यावर त्याचीही ते चेष्टा करतात. चेष्टा केल्यावरचा हत्तींचा आवाज वेगळा असतो. एक हत्ती आनंदला सोंडेनं जवळही बोलवायचा. डोक्यावर सोंड ठेवून कुरवाळायचा. हत्ती असो वा माणूस, बायकाच जास्त बोलतात हेही आनंदला कळलं. नर हत्ती आपल्या प्रतिक्रिया पाय आपटून व्यक्त करतात, तर हत्तीच्या माद्या मात्र अखंडपणे बोलत राहतात. ओळख झाली, की हत्ती माणसाचं स्वागतच करतो. हत्तीचं अंतःकरण खूपच विशाल असतं. हत्तींच्या काही बाळांना आनंदजवळ खायला काहीतरी मिळणार, हे ठाऊक असायचं. तो आला की ते त्याची बॅग खेचायचे किंवा त्याचा पाय ओढायचे. आपला हत्तीबरोबर संवाद होतोय, हे जेव्हा आनंदनं आपल्या बायकोला-श्रेयाला सांगितलं, तेव्हा त्याच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झालाय असंच तिला वाटलं.

पत्नी श्रेयासह आनंद शिंदेश्रेया जेव्हा आनंदला फोन करायची, तेव्हा गंगा नावाची हत्तीण जोरात ओरडायची. ती आनंदच्या बाबतीत ‘पझेसिव्ह’ झाली होती. तिचा आवाज ऐकताच श्रेया घाबरून फोन ठेवून द्यायची. हे असं होणं काही बरोबर नाही, हे आनंदला उमगलं. गंगाला श्रेया आणि आपल्यामधलं नातं कळलं पाहिजे या भावनेतून मग आनंदनं गंगाला मराठीतून समजावून सांगितलं आणि तिनं ते गंभीरपणे ऐकलं. हत्ती जेव्हा गंभीरपणे ऐकतो, तेव्हा त्याचे कान त्याच्या शरीराला चिकटलेले असतात. त्यानंतर श्रेयाचा फोन आल्यावर गंगा कधीच ओरडली नाही. हे सगळं अविश्वसनीय असलं तरी खरं आहे.



आपल्या आईपासून वेगळं राहणं हत्तीच्या पिल्लांना खूप जड जातं. आईपासून वेगळं झालेल्या हत्तींच्या बाळांना कसं सांभाळायचं, याचा अभ्यास आनंदनं केला. आनंदच्या बायकोनं-श्रेयानं त्याचं मन ओळखून, तो हत्तीशिवाय जगू शकत नाही हे कळल्यामुळे त्याचा नोकरीचा राजीनामा पाठवून दिला आणि आनंदला ‘मी आर्थिक बाजू सांभाळीन. तू हे काम निर्धास्तपणे कर,’ असं सांगून ती खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी राहिली.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना...

‘ट्रंक कॉल वाइल्डलाइफ फाउंडेशन’ ही विनय सहस्रबुद्धे यांच्या पुढाकाराने स्थापन झालेली संस्था! हत्तींची कमी होणारी संस्था, हत्तींचं जतन, हत्तींशी संवाद, हत्तींचं नैराश्य यांच्यावर तिथं काम केलं जातं. हत्तींसाठीचे अनेक खेळ आनंदनं तयार केले. आनंदनं वेगवेगळ्या हत्ती-हत्तिणींबरोबरचे अनेक गमतीदार, पण विलक्षण असे अनुभव घेतले. हत्तींचा आहार प्रचंडच असतो; मात्र त्यांना तेलकट पदार्थ देऊ नयेत. एक मनुष्य आपल्या मालकीच्या हत्तिणीला खाण्यासाठी वडा-पाव देत असे. त्याचा परिणाम असा झाला, की तिचं वजन हजार किलो वाढलं. त्यांची खाण्याची एक विशिष्ट पद्धत असते. ती लक्षात घ्यावी लागते.

वेध या कार्यक्रमात...

२००८मध्ये मुंबईवर अतिरेक्यांचा हल्ला झाला होता. मलबार हिलवरून येताना एका मोटारगाडीनं पोलिस अधिकाऱ्याला उडवलं होतं. आतली माणसं भारतीय वाटत नव्हती. आनंदनं त्यांचा पाठलाग सुरू केला आणि त्यांना थांबवलं. त्यांनी स्टँडर्ड चार्टर्ड बँक लुटली होती. आणि ते लूट घेऊन पळत होते. त्यांनी आनंदवरदेखील हल्ला केला; मात्र आनंदनं त्या अतिरेक्यांना पळू दिलं नाही. त्याच्या साहसाबद्दल आनंदला गॉडफ्रे पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं.



डॉ. जेकब अॅलेक्झांडर त्रिवेंद्रम झोनचे व्हेटर्नरी डॉक्टर आहेत. त्यांनी आनंदला हत्तींबाबत खूप मदत केली. कुठली पुस्तकं वाचली पाहिजेत हे सांगितलं. मार्गदर्शन केलं. आनंद आता वाघ, बिबट्या, सिंह यांचाही अभ्यास करतो आहे. हत्तींप्रमाणेच त्यांच्याशी संवाद साधणंही आनंदला जमायला लागलं आहे. जेकब अॅलेक्झांडर यांनी दिलेल्या संधीमुळेच त्याला अशा अनेक गोष्टी करता आल्या. लॉरेन्स अँथनी हा हत्तीतज्ज्ञ गेल्यानंतर आफ्रिकेत राहणाऱ्या त्यांच्या बायकोला आनंद हत्तींबरोबर संवाद साधतो हे कळल्यावर खूप समाधान वाटलं.

अभिनेते अमोल पालेकर यांच्यासमवेत

हत्तींनी एकदा तुम्हाला आपलंसं केलं, की ते किती करतात, याची एक विलक्षण गोष्ट! लॉरेन्स अँथनी हा जगातला पहिला ‘एलिफंट व्हिस्परर.’ आफ्रिकेत त्याच्याकडे २० हजार एकरांचं जंगल होतं. तिथल्या फॉरेस्ट ऑफिसरनं नऊ हत्ती लॉरेन्स अँथनीला देऊ केले. त्यानं ते स्वीकारले नाही, तर ते त्यांना मारणार होते. लॉरेन्स अँथनीनं ते हत्ती घेतले आणि त्यांना आपल्या जंगलात नेलं; मात्र त्या हत्तींना या नव्या जगात राहायचं नव्हतं. रोज रात्री तीन वाजून ४५ मिनिटांनी ते एकत्र जमायचे आणि पळून जायची तयारी करायचे. लॉरेन्स अँथनीला ते समजायचं. तो त्या ठरावीक वेळी, त्या विशिष्ट ठिकाणी बसून राहायचा आणि त्या हत्तींना पुन्हा पुन्हा सांगायचा, की ‘तुम्ही इथून पळून गेलात तर तुम्हाला धोका आहे. तुम्ही मारले जाल. आता हेच तुमचं घर आहे. इथे तुम्ही सुरक्षित आहात.’ सततच्या सांगण्यानं अखेर हत्तींनी लॉरेन्सचं म्हणणं ऐकलं. लॉरेन्स जेव्हा वारला, तेव्हा ते सगळे हत्ती कित्येक मैल अंतर चालून येऊन त्याच्या घरासमोर येऊन उभे राहिले होते. ते तिथं कसे आले ते कोणालाच कळलं नाही. त्याच्या बायकोनं जेव्हा त्यांच्या सोंडेला हात लावून जायला सांगितलं तेव्हाच ते गेले. त्याच्या पहिल्या स्मृतिदिनी ते पुन्हा आले होते. ही त्या वेळची ‘बीबीसी’ची सर्वांत मोठी बातमी होती.

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासह...

हत्तींशी संवाद साधणं आनंदला आता चांगलं जमायला लागलं आहे. खरं तर आनंदचं जीवन आता पूर्ण हत्तीमय झालंय. ‘प्राण्यांना काय बोलायचंय हे त्यांच्या डोळ्यात पहिल्यांदा दिसतं. मी हत्तींकडून माणुसकी शिकलो,’ असं तो आवर्जून सांगतो.

अभिषेक बच्चनसह..

हत्ती जर माणसाशी बोलायला लागला, तर पहिल्यांदा हे सांगेल, की ‘तुम्ही माणसासारखं वागा. आम्ही पुस्तक वाचून शिकलो असतो आणि ‘सात-बारा’ शिकलो असतो तर तुम्हा माणसांना सुईच्या टोकावर असेल इतकी जागाही शिल्लक राहिली नसती.’ 



वन्यजीव क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टर मे यांचा रिपोर्ट आहे, की या जगात दहा दशलक्ष जीव आहेत. आपण फक्त २.८ दशलक्ष जीव शोधू शकलो आहोत. त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्राण्यावर काम करायचं असेल, तर त्याचा आधी अभ्यास करायला हवा. कारण काही दुर्घटना घडली, तर माणसं त्या प्राण्याला बदनाम करतात. आपल्या अभ्यासाला संशोधनाची जोड देणं तितकंच महत्त्वाचं.



आनंदच्या जगण्यातून ‘अवघे विश्व एकच’ ही गोष्ट कळते. माणूसच नव्हे, तर प्राण्यांविषयीदेखील आस्था, सहवेदना असायला हवी. निसर्गानं माणसाला शिकवलेलं मूल्य म्हणजे परस्परावलंबनाचं आहे. आपण आज माणसा-माणसांमधलं परस्परावलंबन विसरायला लागलो आहोत. आज या मूल्याचं महत्त्व किती आहे ते आनंदच्या हत्तीवेडातून कळत. पसायदानामध्ये ‘भूतां परस्परे जडो मैत्र जिवांचे’ म्हटलंय. या भूतांमध्ये सर्व प्राणिमात्र आहेत, निसर्ग आहे. परस्परांमधलं प्रेम जगलं, तर या जगामधली दूरभावना आपोआप जाईल. जसं की ‘दुरितांचे तिमिर जावो....’ जे लोक वाईट पद्धतीनं विचार करताहेत, त्यांच्यावरच्या अज्ञानाचा अंधार दूर होऊ दे. आनंद सगळ्यांकडे डोळे उघडून बघायला सांगतो आहे. दुसऱ्याच्या डोळ्यांनी बघायला सांगताहेत.



आनंद शिंदेनं हत्तींकडे बघण्याची एक नवी दृष्टी दिली. आपल्या प्रवासातल्या अडथळ्यांचा बाऊ न करता त्यानं आपला मार्ग आनंददायी तर बनवलाच; पण इतरांनाही तो खुला करून दिलाय. त्याच्या झपाटलेपणातून जाणतेपणापर्यंतचा झालेला प्रवास रोमांचित करणारा आहे आणि जगण्याचं एक नवं भानही देणारा आहे.

संपर्क : आनंद शिंदे 
ई-मेल : shindeanand79@gmail.com
मोबाइल : ९९६७४ २८६४१

- दीपा देशमुख
मोबाइल : ९५४५५ ५५५४०
ई-मेल : deepadeshmukh7@gmail.com

(दीपा देशमुख या प्रसिद्ध लेखिका असून, त्या वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. दर १५ दिवसांनी, गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या त्यांच्या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/M3NCtW या लिंकवर उपलब्ध आहेत.)

(सोबतचे व्हिडिओ जरूर पाहा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZLTBT
Similar Posts
अंधांच्या आयुष्यात रंग भरणारा डॉ. सुमीत पाटील अंध आणि गतिमंद मुलांना चित्रकला शिकवून त्यांच्या आयुष्यात रंग भरणारा तरुण म्हणजे डॉ. सुमीत पाटील. त्याशिवाय तो आर्ट डिरेक्टर म्हणूनही कार्यरत आहे. ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदरात आज डॉ. सुमीत पाटीलची प्रेरक गोष्ट...
रुक जाना नहीं, तू कहीं हार के... बीए, एलएलबी झालेल्या, लग्न होऊन संसारात रुळलेल्या शारदा बापट नावाच्या एका स्त्रीनं आपल्या आईच्या सततच्या आजारपणाचं कारण शोधण्यासाठी चक्क वयाच्या पस्तिशीत डॉक्टर व्हायचं ठरवलं. रीतसर कॉलेज करून, असंख्य अडचणींना तोंड देत त्या डॉक्टर झाल्याही. त्याच दरम्यान त्या वैमानिकही झाल्या, कम्प्युटर्स-इलेक्ट्रॉनिक्स यांवरही त्यांनी प्रभुत्व मिळवलं
किताबें कुछ कहना चाहती हैं.... ‘मेक इंडिया रीड’ अर्थात अख्ख्या भारताला वाचनाची गोडी लावण्याचं स्वप्न घेऊन अमृत देशमुख नावाचा एक तरुण कार्यरत आहे. वाचलेल्या पुस्तकांचे सारांश तो ‘बुकलेट’ या अॅपद्वारे लाखो लोकांपर्यंत तो मोफत पोहोचवतो. हे सारांश ऑडिओ स्वरूपातही दिले जातात. वाचनामृताची गोडी लावणाऱ्या अमृतची गोष्ट पाहू या ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदराच्या आजच्या भागात
डॉ. जगन्नाथ वाणी आणि स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन (सा) स्वतःच्या पत्नीला स्किझोफ्रेनिया हा विकार झाल्यानंतर आपल्या दुःखाचा बाऊ न करता, त्यातून मार्ग काढत ‘ते’ पुढे जात राहिले. या विकाराची भीषणता समजल्यानंतर त्यांनी ‘स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन (सा)’ या संस्थेची स्थापना करण्यात पुढाकार घेतला. त्याबद्दल जनजागृतीसाठी पुस्तकं लिहिली, ‘देवराई’ नावाचा सिनेमा काढला आणि बरंच काही केलं

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language