करोना विषाणूचा फैलाव झाल्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे; पण घाबरून न जाता प्रतिबंधात्मक काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. जगभरात या विषाणूची लागण झालेल्यापैकी ५०.७ टक्के रुग्ण यातून बरे झाले आहेत, असे जॉन हॉपकिन्स विद्यापीठाची आकडेवारी सांगते. तसेच, जगभरात या विषाणूची लागण झालेल्यापैकी ८०.९ टक्के रुग्णांची लक्षणे सौम्य आहेत. अशीच काही अधिकृत आकडेवारी ग्राफिक्सच्या माध्यमातून येथे देत आहोत...
- अन्य कोणताही आजार नसलेल्या आणि करोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण केवळ ०.९ टक्के आहे.
- लागण झालेल्या रुग्णांमध्ये ६० वर्षांवरील रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. तसेच, या ग्राफिकमध्ये दाखवलेली माहिती चीनच्या वूहान प्रांतातील असून, तेथे धूम्रपानाचे प्रमाण प्रचंड असल्याने तेथील नागरिकांच्या फुफ्फुसांचे आरोग्य चांगले नाही. करोना विषाणूचा संसर्ग फुफ्फुसामध्ये होत असल्याने तेथील मृत्यूंचे प्रमाण अधिक आहे.
- करोना विषाणूसंसर्ग झालेल्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण ०.७ टक्के ते ३.४ टक्के आहे. टीबी, एबोला, बर्ड फ्लू आदी आजारांमध्ये मृत्यूचे प्रमाण १० ते ६० टक्क्यांपर्यंत आहे.
- करोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण देशांनुसार वेगळे आहे. तेथील लोकसंख्येचे सरासरी वय, आरोग्य सुविधांचा दर्जा आदींवर ते अवलंबून आहे. चीनमध्ये मृत्युदर चार टक्के, तर इटलीत तो ७.३ टक्के आहे. ऑस्ट्रेलियात तो १.३ टक्के, तर नॉर्वेत ०.३ टक्के आहे.
- सुरुवातीला या रोगाच्या फैलावाचा वेग जास्त होता; मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यास सुरुवात केल्यावर फैलावाचा वेग आणि मृत्युदरही कमी झाला आहे.
- टीबीमुळे दररोज जगभरात सरासरी ३०१४ मृत्यू होतात, तर हिपॅटायटिस बीमुळे दररोज होणाऱ्या सरासरी मृत्यूंचे प्रमाण २४३० एवढे आहे. करोना विषाणूवर लस नसल्यामुळे अजूनही त्याचा प्रसार वाढू शकतो; पण यामुळे जगभरात दररोज होणाऱ्या सरासरी मृत्यूंचे प्रमाण सध्या ८८ एवढे आहे.
(अधिक माहिती आणि ग्राफिक्ससाठी येथे क्लिक करा.)