
रत्नागिरी : ‘संस्कृत ही अत्यंत समृद्ध भाषा आहे. विज्ञानातील अत्याधुनिक पारिभाषिक, तांत्रिक संज्ञांनाही प्रतिशब्द तयार करण्याची क्षमता संस्कृतमध्ये आहे. कारण या भाषेत २२ उपसर्ग, दोन हजार धातू आणि दोनशे प्रत्यय आहेत. त्यांच्या योग्य वापराने इंग्रजी भाषेतील वैज्ञानिक संज्ञांनाही अर्थपूर्ण प्रतिशब्द तयार करता येतात,’ असे प्रतिपादन संस्कृत भाषेतील ज्येष्ठ पत्रकार डॉ. बलदेवानंद सागर यांनी रत्नागिरीत केले.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात कालिदास स्मृती व्याख्यानमालेसाठी आलेले डॉ. सागर पत्रकार परिषदेत बोलत होते. या व्याख्यानमालेत एक मार्च २०१९ रोजी ‘संस्कृत पत्रकारिता’ या विषयावर त्यांचे व्याख्यान आहे. डॉ. बलदेवानंद सागर हे १९७४ला दिल्ली आकाशवाणी केंद्रात संस्कृत विभाग सुरू झाल्यापासून तेथे कार्यरत आहेत. ‘प्रवाचकः बलदेवानंद सागर:’ अशा शब्दांनी सुरू होणाऱ्या त्यांच्या आवाजातील संस्कृत बातम्यांची देशभरातील श्रोत्यांना सवय झाली आहे. यंदा त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने गौरवण्यात आले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’चा संस्कृत अनुवादही ते करतात. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी रत्नागिरीतील पत्रकारांशी संवाद साधला.
‘पुरातन काळातील म्हणजे वैदिक संस्कृत भाषा आणि आजची आधुनिक संस्कृत भाषा वेगळी आहे. आजची भाषा अधिक सोपी, सुलभ आहे. या भाषेत २२ उपसर्ग, दोन हजार धातू (मूळ क्रियापदे) आणि दोनशे प्रत्यय असल्यामुळे लाखो शब्द तयार करता येऊ शकतात. एखाद्या इंग्रजी संज्ञेला प्रतिशब्द तयार करायचा असेल, तर त्या संज्ञेचा अर्थ लक्षात घेऊन त्यातून नेमके काय सांगायचे आहे हे ठरवले, तर योग्य धातूची निवड करून त्यापासून अर्थवाही आणि सहज कळण्याजोगा आणि सहज बोलता येण्यासारखा संस्कृत शब्द तयार करता येतो,’ असे डॉ. सागर यांनी सांगितले. हे समजावून सांगण्यासाठी त्यांनी दोन-तीन उदाहरणेही दिली. ‘इंग्रजीमध्ये स्मार्ट-कार्ड हा शब्द आहे. स्मार्ट-कार्डमध्ये विविध प्रकारची माहिती साठवलेली असते. त्यामुळे स्मरणाची क्रिया त्याच्याकडून घडते. ‘स्मृते इति स्मार्तम्’ या धातूपासून ‘स्मार्तपत्रम्’ किंवा ‘स्मृतिपत्रम्’ असा प्रतिशब्द स्मार्ट-कार्डसाठी तयार करण्यात आला. ‘डबल-डेकर रेल्वे’साठी ‘द्वितलीय रेलयानम्’, ‘मिसाइल’साठी ‘प्रक्षेपास्त्र’ असे शब्द तयार केले जातात,’ असे अनुभवाचे बोल डॉ. सागर यांनी सांगितले.
‘संस्कृत ही परिपूर्ण भाषा असून, अनेक भाषांची जननी आहे. संस्कृतचे व्याकरण गणितासारखे आहे. पूर्वीच्या संस्कृत भाषेमधील एकूण वाङ्मयापैकी केवळ सात टक्के वाङ्मय कर्मकांडाबद्दलचे किंवा धार्मिक असून, उर्वरित ९३ टक्के वाङ्मय वैज्ञानिक आहे. त्यामुळे ही कोण्या एका संप्रदायाची भाषा असल्याचा आक्षेप चुकीचा आहे. संप्रदाय म्हणजे केवळ एका विचाराकडे जाणारे वेगवेगळे रस्ते असतात,’ असे डॉ. सागर यांनी सांगितले.

‘प्रत्येक प्रदेशातील भाषा वेगवेगळी असल्याने आज एका प्रदेशातील कोणी व्यक्ती दुसऱ्या प्रदेशात गेली, तर हिंदी किंवा इंग्रजी भाषेचा आधार घेतला जातो. पूर्वीच्या काळीही प्रादेशिक भाषा वेगळ्याच होत्या; मात्र संस्कृत ही सर्वांना येणारी आणि त्यामुळेच देशाला जोडणारी भाषा होती. पुरातन काळी केरळमधील शंकराचार्य, तमिळनाडूतील मध्वाचार्य, रामानुजाचार्य, वल्लभाचार्य या चार प्रमुख आचार्यांनी त्यांच्या प्रदेशाची भाषा वेगळी असूनही संस्कृतमध्ये लेखन केले. उपनिषदे, ब्रह्मसूत्र, टीका, भाष्य, स्तोत्रे आदींचे लेखन संस्कृतमध्येच झाले. त्यामुळे या भाषेचा प्रसार झाला. संस्कृत ही ब्रह्मांडाची भाषा आहे,’ असे डॉ. सागर म्हणाले.
‘कोणतीही भाषा जेव्हा व्यवहारात असते, तेव्हा ती लुप्त होण्याची अजिबात भीती नसते. त्यामुळे संस्कृतसह प्रत्येक भाषा जपण्यासाठी त्यांचा व्यवहारातील वापर वाढवण्याची गरज आहे. काळानुसार संस्कृत भाषा थोडी मागे पडली असली, तरी नव्या पिढीतील अनेक जण ही भाषा शिकत आहेत. पत्रकारितेतील वेगवेगळे प्रयोग या भाषेत होत आहेत. त्यामुळे ही भाषा लोप पावण्याची भीती नाही. संस्कृत पत्रकारितेला सुमारे १५० वर्षांची परंपरा असून, सद्यस्थितीत भारतात ११०हून अधिक संस्कृत नियतकालिके सुरू आहेत. असे प्रतिपादन डॉ. बलदेवानंद सागर यांनी केले.
‘पौरोहित्य करणाऱ्यांनीही संस्कृत श्लोकांचा अर्थ स्वतः समजावून घेतला पाहिजे, तसेच यजमानालाही त्याचा अर्थ सांगितला पाहिजे. संस्कृतच्या संवर्धनाला त्यामुळे हातभार लागू शकतो. काळानुसार बदलणाऱ्या, प्रवाही असलेल्या परंपरा चांगल्या. तशा नसलेल्या परंपरा सोडून दिल्या पाहिजेत,’ असे ते म्हणाले.
लोकमान्यांच्या भूमीत आल्याबद्दल आनंद
लोकमान्य टिळकांनी केसरी हे वृत्तपत्र सुरू केले, तेव्हा त्यावर जगन्नाथ पंडिताच्या ‘भामिनीविलास’मधील पुढील संस्कृत श्लोक असल्याचे डॉ. बलदेवानंद सागर यांनी सांगितले.
स्थितिं नो रे दध्या: क्षणमपि मदान्धेक्षण सखे।
गजश्रेणीनाथ त्वमिह जटिलायां वनभुवि।
असौ कुम्भिभ्रान्त्या खरनखरनिर्दारितमहा-
गुरुग्रावग्राम: स्वपिति गिरिगर्भे हरिपति:॥
राष्ट्रासाठी आणि पत्रकारितेमध्येही महान कार्य करणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या भूमीत प्रथमच आल्याचा मोठा आनंद असल्याचे डॉ. सागर यांनी सांगितले. डॉ. सागर हे मूळचे गुजरातमधील काठियावाडचे पटेल असून, सगळे बंधू इंजिनीअर असूनही आपण संस्कृत शिकायचे, असे त्यांनी सातवीत असतानाच ठरवले होते. त्यानंतर त्यांनी काशीला जाऊन १९६५ ते १९७१ या कालावधीत संस्कृत शिक्षण घेतले. १९७४मध्ये एमए करत असताना दिल्ली आकाशवाणीमध्ये संस्कृत विभाग सुरू होणार होता. त्यासाठी भरती सुरू होती. अनुवाद, स्वरचाचणी आणि मुलाखतीद्वारे १०० जणांमधून त्यांची निवड झाली. तेव्हापासून ते संस्कृत प्रचार, प्रसाराचे काम करत आहेत. ‘सुरुवातीला बातम्या वाचताना खूप ताण येई; मात्र नंतर सवय झाल्यावर अगदी ऐन वेळी, बातम्यांचे प्रसारण सुरू असताना हातात आलेला इंग्रजी मजकूरही, निवडणूक निकाल थेट संस्कृतमध्ये अनुवादित करून वाचणे सहज शक्य होऊ लागले,’ असा अनुभव त्यांनी सांगितला.
संस्कृत विभागाच्या प्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन केले. डॉ. सागर यांच्या पत्नी शालिनी याही या वेळी उपस्थित होत्या. आकाशवाणीच्या परराष्ट्र सेवा विभागात सिंधी भाषा विभागात त्या कार्यरत आहेत.
हेही जरूर वाचा : ‘संस्कृत ही सर्वसामान्यांची भाषा व्हावी’(इंग्रजी पारिभाषिक संज्ञांना संस्कृत प्रतिशब्द कसे तयार करतात, हे सांगताहेत डॉ. बलदेवानंद सागर... पाहा सोबतच्या व्हिडिओत...)