Ad will apear here
Next
कविवर्य कुसुमाग्रजांची ‘विशाखा’
‘जीवनलहरी’ आणि ‘जाईचा कुंज’ यांनंतरचा ‘विशाखा’ हा कविवर्य कुसुमाग्रजांचा तिसरा काव्यसंग्रह. औचित्य, संयम, विलक्षण जीवन, निसर्ग, राष्ट्र यावरील प्रेम यांतून कुसुमाग्रजांच्या कवितेचा प्रवाह खळखळत, वेगाने वाहत राहतो, याचा प्रत्यय ‘विशाखा’तील कवितांमधून पुन:पुन्हा येतो. आज, २७ फेब्रुवारीला कुसुमाग्रजांच्या जयंतीदिनी मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो. त्या निमित्ताने, त्यांच्या ‘विशाखा’ या काव्यसंग्रहातील कवितांचा वेध घेणारा हा लेख...
............
कविता या वाङ्मयप्रकारावर कुसुमाग्रजांनी सर्वाधिक प्रेम केले. ‘जीवनलहरी’पासून कुसुमाग्रजांच्या कवितेचा प्रवास सुरू झाला. त्यांचे काव्यलेखन अनेकपदरी आहे. अनेक प्रकारीही आहे. त्यामुळेच रसिकांचे, अभ्यासकांचे व समीक्षकांचे लक्ष कुसुमाग्रजांच्या कवितेने वेधून घेतले.

१९३०च्या दरम्यानचा तो काळ. रविकिरण मंडळाच्या लोकप्रियतेचा काळ. या मंडळातले काही श्रेष्ठ कवी केवळ सहधर्मी म्हणून एकत्र येत व काव्यरचनेचे उद्योग करीत. कुसुमाग्रज म्हणतात, ‘संस्कारशील वयात आम्हीही काही मित्र या लाटेत सापडलो आणि ‘ध्रुवमंडळ’ नावाच्या एका छोट्या संस्थेची स्थापना केली.’ आणि मग त्यांचा काव्यप्रवास सुरू झाला तो अखंडपणे. 

‘जीवनलहरी’ हा पहिला काव्यसंग्रह. या संग्रहाच्या मृखपृष्ठावर कुसुमाग्रज हे नामाभिधान शिरवाडकरांनी पहिल्यांदा घेतले आहे. या काव्यसंग्रहातील अनुभूतीचे दर्शन पुढील ५० वर्षांच्या काव्यप्रवासात बदलले आहे, असे वाटत नाही. कारण सामाजिक, सांस्कृतिक परिवर्तनाचा ध्यास त्यांच्या काव्यलेखनातून निरंतर जाणवतो.

‘जीवनलहरी’नंतर ‘विशाखा’ काव्यसंग्रहापूर्वी प्रसिद्ध झालेला बालगीतांचा संग्रह म्हणजे ‘जाईचा कुंज.’ चिमुकल्यांकरिता चित्रांसहित छोटी-छोटी गाणी असे त्या संग्रहाचे स्वरूप होते. त्या  काव्यसंग्रहाच्या संदर्भात कुसुमाग्रज म्हणतात, ‘फुलांप्रमाणे कविताही उमलतात आणि कोमेजतात’ हे त्यांचे उद्गार या बालगीतांच्या संदर्भात यथार्थ ठरले. लहान मुलांच्या निरागस भवनांचे प्रतिबिंब या कवितांमध्ये उमटले आहे.

‘जाईचा कुंज’नंतर ‘विशाखा’ काव्यसंग्रह १९४२मध्ये प्रकाशित झाला. ‘विशाखा’ या काव्यसंग्रहाच्या १० पेक्षा जास्त आवृत्त्या प्रकाशित झाल्या. पहिली आवृत्ती स्वतःच्या प्रस्तावनेसाहित वि. स. खांडेकरांनी प्रकशित केली. १९३३पासून १९४०पर्यंतच्या कुसुमाग्रजांच्या कविता ‘विशाखा’मध्ये आलेल्या आहेत. या कवितांमध्ये नवतारुण्यातील उत्कट प्रणय आहे. त्याचबरोबर तिचे नाते बलिदानाच्या रक्तरंजित राजकीय व सामाजिक घटनांशी जुळलेले आहे. त्या काळात काव्य या साहित्यकृतीशी कुसुमाग्रजांचे नाव इतके निगडित झाले होते, की ‘विशाखा’इतकी लोकप्रियता व लोकमान्यता इतर कवींच्या कवितेला मिळाली नाही. या काव्यसंग्रहातील प्रेमाचे तत्त्वज्ञान, स्त्रीरूपाचा वेध, तारुण्यातील प्रीतीचा कोवळेपणा, त्याचबरोबर स्वातंत्र्याची दुर्दम्य ओढ, क्रांतीचा उद्दाम आवेश, आशावाद, मानवतावादी दृष्टिकोन, वैचारिक जोश ही सारी वैशिष्ट्ये ‘विशाखा’मध्ये अनुभवास येतात. त्यात एकूण ५७ कविता आहेत. ईश्वराचे अस्तित्व, समाज, राष्ट्र, प्रेमातील हळव्या भावना या संदर्भातील ‘जीवनलहरी’तील अमूर्त स्वरूपातील अनुभव ‘विशाखा’मध्ये अधिक टोकदार होऊन मूर्तरूप धारण करतात. त्यामुळेच या कवितांमध्ये भावनेची उत्कटता व कल्पनांची उत्तुंगता अधिक जाणवते . मानवाच्या अनंत समस्या, जीवन जगण्यात निर्माण झालेल्या अडचणी, त्यांचा उद्गार त्यांच्या कवितांमधून सातत्याने होत होता. सर्वसामान्य माणसाला हे उद्गार आपलेच आहेत याचा प्रत्यय येऊ लागला. त्यामुळे सामान्य माणूस त्या कवितांकडे अधिक आकर्षित झाला. ते आपलेच हृदयस्थ बोल आहेत, असे त्याला वाटू लागले परिणामी काळ व कवी यांचे नाते जुळून येण्यास मदत झाली. 

देशाविषयी, धर्माविषयी, समाजाविषयी तरुण मनात येणारे विचार, शास्त्यांविषयी असणारी आत्यंतिक चीड अशा भावनांचे प्रतिनिधित्व करणारी कुसुमाग्रजांनी ही ‘विशाखे’तील कविता तरुणांना आपली वाटू लागली.

‘क्रांतीचा जयजयकार’ ही ‘विशाखे’तील राष्ट्रीय वळणाची कविता. अन्नत्याग करून मृत्यूच्या दारात पाऊल टाकणाऱ्या राजबंद्याच्या ओठावरचे गाणे कुसुमाग्रजांनी या कवितेत शब्दबद्ध केले आहे. ‘पिचेल मनगट परी उरातिल अभंग आवेश’ अशा उन्मत्त इंग्रजी सत्तेला दिलेल्या कणखर आव्हानातून या कवितेची सुरुवात होते. वज्राच्या प्रखरतेपेक्षा क्रांतिकारकांच्या छातीची कणखरता आणि इच्छाशक्तीची प्रखरता अधिक आहे.

दुसऱ्या कडव्यात कैद्यांनी (राजबंदिवान) संहारक कालीलाच आव्हान दिले आहे. 

संहारक काली, तुज देती बळीच आव्हान 
बलशाली मरणाहुन आहे अमुचा अभिमान 
मृत्युंजय आम्ही! आम्हाला कसले कारागार? 

अशा ओळींतून वीररस उफाळून आलेला दिसतो. मृत्यूपेक्षा स्वदेशाभिमान बलशाली असल्यामुळे देहाच्या कारागृहात कुणीही आम्हाला बंदिवान करू शकणार नाही. कारण आम्ही मृत्यूवरही विजय मिळवला आहे. 

तिसऱ्या कडव्यात कवी अधिक अंतर्मुख झाला आहे. ‘पायतळी अंगार असतानासुद्धा स्वातंत्र्याच्या ध्येयाने प्रेरित झाल्यामुळे त्या जळत्या निखाऱ्यांना स्वीकारून आम्ही पुढे जात राहिलो. कीर्तीसाठी किंवा प्रीतीसाठी गुंतून न पडता मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही झिजत राहिलो.’ हे वर्णन वाचताना भगतसिंग, राजगुरू, वासुदेव बळवंत फडके, चापेकर बंधू असे तरुण राजबंदी डोळ्यासमोर येतात. शेवटच्या कडव्यात 

रक्तमांस लुटण्यास गिधाडे येऊ देत क्रूर 
पहा मोकळे केले आता त्यासाठी ऊर
शरीरांचा कर सुखेनैव या सुखेनैव संहार 

असे अनुभूतीचे एक वेगळेच वळण येते. फासावर जात असताना क्रांतिकारक मनाने निश्चिंत आहेत. ओंकारेश्वराने घास गिळण्यासाठी तांडव केले किंवा नाचत, गर्जत, तांडव करीत बळींच्या गळ्यावर त्याने फास टाकले, रक्तमांस लुटण्यासाठी स्मशानात गिधाडे जमली, असा शरीरांचा सुखेनैव संहार झाला, म्हणजेच या क्रांतिकारकांची शरीरे नष्ट पावली, तरी स्वातंत्र्याकांक्षा अमर राहील.

आजच्या समजजीवनातल्या असंतोष, चीड, त्वेष, दु:ख या साऱ्या गोष्टी कुसुमाग्रजांच्या कवितेत जाणवतात; पण हे केवळ वर्णन करून त्यांची प्रतिभा थांबत नाही. कारण त्या दु:खातून टपकणारे अश्रू दुबळे नाहीत. त्यातून दुर्दम्य आशावाद धबधब्यासारखा कोसळत येतो. ‘दूर मनोऱ्यात,’ ‘सात,’ ‘कोलंबसाचे गर्वगीत,’ ‘नेता,’ ‘पावनखिंडीत’ या बाह्यत: भिन्न अशा कविता पाहाव्यात. भीषण परिस्थिती समोर दिसत असूनही कुसुमाग्रज संभ्रमित होत नाहीत, हेच ह्या कवितांमधील आशयातून व्यक्त होईल.

चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती 
कथा या खुळ्या सागराला 
‘अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा 
किनारा तुला पामराला..!’

या कोलंबसाच्या गर्वगीतातल्या त्यांच्या ओळी पामराला आशेचा किनारा दाखवितात. कोलंबसाच्या या गर्वगीतात कोलंबसाला महत्त्व नाही, महत्त्व आहे ते दुर्दम्य आशावादाला. संघर्षशील महत्त्वाकांक्षा व अपराजित आशावादी मनोवृत्ती यांचा या गीतात कलापूर्ण संगम झाला आहे. 

‘विशाखे’त ‘क्रांतीचा जयजयकार’, ‘टिळकांच्या पुतळ्याजवळ,’ जालियनवाला बाग,’ ‘आव्हान,’ ‘नेता’ अशा राष्ट्रीय स्वरूपाच्या कविता दिसतात; पण ‘समिधा,’ ‘किनारा’मध्ये त्यांची संख्या भरपूर आहे. कारण १९४२ नंतर दृष्टिपथात आलेले स्वातंत्र्य हे त्याचे प्रमुख कारण आहे.

राजकीय विचाराबरोबरच ‘विशाखा’मध्ये सामाजिक असंतोषाच्या ज्वाला धगधगून पेटून उठतात. ब्राह्मण्यवादामुळे दुभंगलेला समाज, भांडवलशाही, साम्राज्यशाही, हुकुमशाही यांमुळे निर्माण झालेली दरी, खंदक, दु:खितांचे, शोषितांचे अश्रू, असंतोष, चीड, त्वेष.... ‘बळी,’ ‘लिलाव,’ ‘माळाचे मनोगत,’ ‘पाचोळा,’ ‘बंदी,’ ‘आगगाडी व जमीन’ या कवितांतून क्रमाक्रमाने व्यक्त होत गेला.

‘हिमलाट’ कवितेतील हिमलाट ही दारिद्र्याची आहे. मखमाली दुलया जिथे मधुर उबारा देतात, त्या श्रीमंतांच्या महालात या हिमालाटेला अजिबात थारा नाही. ही हिमलाट कडकडून पडते कुठे - तर कुडाच्या झोपड्यांवर आणि कांबळी अंगावर टाकून झोपी गेलेल्या कंगालांच्या अंगावर! परस्परविरोधी चित्रण व्यक्त करणारी ही कविता शेवटी त्या हिमलाटेला धुडकावून लावण्यासाठी यज्ञातल्या व सरणातल्या निखाऱ्यांना आवाहन करते.

‘लिलाव’ या कवितेत सावकाराच्या कर्जाखाली चिरडल्या गेलेल्या शेतकऱ्याचे दारुण आणि करुण चित्र वाचता-वाचता एकदम अंगावर येते. अंगावर सरसरून कारा येतो. कर्ज न फेडता आल्यामुळे त्या शेतकऱ्याच्या घराचा ‘लिलाव’ मांडला गेला आहे.

वस्तूवस्तूवर घालुनिया धाड 
करित घटकेतच झोपडे उजाड! 
स्तब्ध बाजूला बसे घरधनीण 
लाल डोळ्यांतील आटले उधाण

अशी असहाय झालेली ‘घरधनीण’ घटकेत उजाड झालेले झोपडे लाल डोळ्यातले उधाण आटल्यामुळे हताश होऊन बघण्याव्यतिरिक्त काहीही करू शकत नाही. आपल्या अर्भकाला पदराखाली घेणाऱ्या त्या शेतकऱ्याच्या बायकोचे उघडे ऊर पाहून आपल्या थोर थैलीतील नाणी वाजवीत सावकार प्रश्न करतो - ‘आणि ही रे!’ त्याच्या या प्रश्नावर ‘उडे हास्याचा चहुकडे विखार!’ आणि रसिक वाचकांच्या मनात संतापाचा विखार! ‘यत्र नार्यस्तु पूजन्ते, रमन्ते तत्र देवता।’ हा विचार धारण करणारी ही भारतीय संस्कृती असल्यामुळे ‘लिलाव’मधील स्त्रीच्या शीलाचाही लिलाव होताना पाहून वाचकांना मनात चीड उत्पन्न झाल्याशिवाय राहत नाही. 

‘अहि-नकुल’ आणि ‘आगगाडी व जमीन’ या कवितांतही वर्गसंघर्षांचे चित्रण आहे. यात अही व आगगाडी ही प्रतीके शोषकांचे प्रतिनिधित्व करतात, तर नकुल आणि जमीन शोषितांचे प्रतिनिधित्व करतात. यातील अही आणि आगगाडी यांच्या उद्दामपणाची परिणती त्यांच्या अंतामध्येच होणार आहे. या दोन्ही कवितांत कुसुमाग्रजांनी आपल्या उत्तुंग कल्पनाशक्तीचे वैभव पणास लावले आहे. ‘अहि-नकुल’ कवितेत नागाचे वर्णन करताना उत्प्रेक्षांचा वर्षाव आहे. उदा. ज्वालामुखीला आलेली जाग, प्रमदेचे मादक वस्त्र जणू सळसळते, अग्नीचा ओघळ ओघळतो जणू मंद, खड्गाचे लवलवणारे लवचिक पाते, यमाची कनकाची कट्यार, तांडवनृत्य करणाऱ्या कालीच्या हातातील कंकण, इ.

‘गुलाम’ या कवितेत - 
पाहिले सभोती फोडुनि अन् किंकाळी 
चक्रात घातले मनगट आवेशात!

चक्रात आपले मनगट आवेशात घालून किंकाळी फोडणारा गुलाम 

कक्षेत रवीच्या तुटून ये ग्रहखंड 
ओढला जाउनी तसा फिरे चक्रात

रवीच्या कक्षेत एखादा ग्रहखंड ओढला जाऊन गरगर फिरतो. तद्वत, या गुलामाचे मनगट चक्रात फिरते. वीतभर पोटाची खळगी भरण्यासाठी यंत्रावर राब राब राबणारा मजूर भांडवलदाराकडून होणारे शोषण असह्य होऊन अविवेकाने आत्मघात करून घेतो.

‘आगगाडी व जमीन’ यात सबळ-दुर्बळांचा संघर्ष व्यक्त होतो; पण या संघर्षात सबळांचा पराभव व दुर्बळांचा जय असे आश्वासक चित्र व्यक्त होते. असा सबळ-दुर्बळांचा संघर्ष ‘सहानुभूती’ या कवितेतही दिसून येतो. रस्त्याच्या बाजूला अभंग गात भीक मागणाऱ्या उपाशी अपंगाच्या घशाला कोरड पडते. नयन भिजलेले आहेत, हात थरथरतात; पण... 

कीव यावी पण तयाची कुणाला 
जात उपहासुनि पसरल्या कराला 
तोच येई कुणि परतुनि मजूर 
बघुनि दीना त्या उधाणून ऊर - 
म्हणे राहीन दिन एक मी उपाशी 
परी लाभू दे दोन घास यासी 

या वरील ओळींतून, श्रीमंत भांडवलदारांना गरिबांची सहानुभूती वाटत नाही; मात्र गरीबच गरिबांचे दु:ख जाणू शकतो, हा भाव अधोरेखित केला आहे. दीनबंधू मात्र या अपंग, असहाय माणसासाठी आपला खिसा मोकळा करतो आणि 

धनिकांची वाहने पथात 
जात होती ती आपुल्या मदात!

असे विरोधी चित्र कवी कवितेच्या शेवटी रेखाटतो. 

उमर खय्याम, बायरन, सैगल, बालकवी अशी विविध क्षेत्रांत उत्तुंग असणारी माणसेही कविमनाला भुरळ पाडतात. त्यामुळेच ती कुसुमाग्रजांच्या कवितेचा विषय बनतात. ‘नदीकिनारी,’ ‘मेघास,’ ‘वनराणी,’ ग्रीष्माची चाहूल’ या कवितांत निसर्गाशी एकरूप होण्याचा प्रयत्न कविमन करते. ईश्वरविषयक चिंतन असणाऱ्या ‘भावकणिका,’ ‘भक्तिभाव,’ ‘मूर्तिभंजक’ या कवितांतून अस्मिता व नास्तिकता यांच्या सीमारेषेवर रेंगाळणारे कविमन व्यक्त होते. ‘ऋण,’ ‘समिधाच सख्या या’ या कवितांतून काव्याविषयी चिंतन आढळते.

अशा प्रकारे ‘विशाखा’ या काव्यसंग्रहात कुसुमाग्रजांची कला परमोच्च पदाला पोहोचलेली दिसते. काळानुरूप कुसुमाग्रजांच्या अभिव्यक्तीवैशिष्ट्यात बदल झाला. प्रारंभीच्या त्यांच्या कवितांवर गोविंदाग्रज, बालकवी यांच्या काव्यवैशिष्ट्यांचा प्रभाव दिसतो; पण ‘विशाखा’पासून तो प्रभाव हळूहळू ओसरताना दिसतो. त्यानंतर ती स्वतंत्ररीत्या अवतरायला लागते.

औचित्य, संयम, विलक्षण जीवन, निसर्ग, राष्ट्र यावरील प्रेम यांतून कुसुमाग्रजांच्या कवितेचा प्रवाह खळखळत, वेगाने वाहत राहतो याचा प्रत्यय ‘विशाखा’तील कवितांमधून पुन:पुन्हा येतो.

- पूजा संजय कात्रे
ई-मेल : poojaskatre@gmail.com

(लेखिका कुवारबाव (रत्नागिरी) येथील श्रीमती राधाबाई गोपाळ जागुष्टे हायस्कूलमध्ये सहायक शिक्षिका म्हणून कार्यरत असून, मराठी विषयाचे अध्यापन करतात.) 

(कुसमाग्रजांच्या निवडक कविता अन् त्यांवरचे ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. कुसुमाग्रजांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी https://goo.gl/fp3o2p येथे क्लिक करा.)



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZOJBL
 Khoop chan
 Khup sundar.
 फारच छान आवडला.
अंबज्ञ नाथसंविध्
 खुप सुंदर लेख.
 अतिसुंदर मॅडम
 Khupach mast
 सुरेख👌🙏👍
 पूजा, खरोखर छान लेख लिहिला आहेस. उत्तम विवेचन केलेयस. असाच लिहिण्याचा सराव ठेव. तुझे अभिनंदन.
 कात्रे मॅडम कुसुमाग्रजांचा काव्यप्रपंचाची ओळख सोप्या भाषेत करुन दिल्याबद्यल धन्यवाद!
 खूप सुंदर " वि.वा. शिरवाडकर"2
 Khoop chan lekh awadla1
 Well written,poems are very nice1
 Excellent1
 फारच सुंदर लेख आणि कविता. उत्तम सादरीकरणा बद्दल अभिनंदन आणि आम्हाला वाचना साठी उपलब्ध करण्या बद्दल आभार .1
 Lekh ani lekhatil kavita atishay sundar.
 कविवर्य कुसुमाग्रजांच्या 'विशाखा'तील प्रसिद्ध कवितांवर श्रीम. कात्रे मॅडम यांनी लिहिलेला लेख अप्रतिम आहे. अभिनंदन.
Similar Posts
माझ्या मराठी मातीचा... आज २७ फेब्रुवारी, कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिन. अर्थात मराठी राजभाषा दिन. त्या निमित्ताने पाहू या, ‘माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा’ असं सांगणारी कुसुमाग्रजांची कविता...
निजलेल्या बालकवीस : अभिवाचन - अक्षय वाटवे बालकवी म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना झोपेतून उठविण्याच्या निमित्ताने त्यांचे गुणवर्णन करणारे गोविंदाग्रजांनी केलेले काव्य म्हणजे ‘निजलेल्या बालकवीस.’ ‘फारच थोड्या वेळात हे काव्य केलेले असल्यामुळे त्यात बालकवींचे यथार्थ गुणवर्णन आलेले नाही,’ असेही त्यांनी या गीताच्या प्रस्तावनेत म्हटले आहे. मंगेश
स्वातंत्र्यदेवीची विनवणी : कुसुमाग्रजांची कविता - अभिवाचन - डॉ. प्रतिमा जगताप ‘स्वातंत्र्यदेवीची विनवणी’ ही कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी देशाच्या स्वातंत्र्याला ५० वर्षे पूर्ण झाल्यावर लिहिलेली कविता. त्यांनी वर्णन केलेल्या परिस्थितीत आजही फारसा बदल झालेला नसल्याने या विनवणीची आजही खूप गरज आहे. मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या विशेष उपक्रमाचा एक भाग म्हणून ही कविता
लाभले अम्हांस भाग्य... गझलकार सुरेश भट यांचे जे शब्द मराठीचे अभिमानगीत बनले, ती गझल आज पाहू या...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language