Ad will apear here
Next
फ्लॉरेन्स नाइटिंगेल, नंदू नाटेकर, विजय भट, सुधीर


आधुनिक रुग्णपरिचर्याशास्त्राच्या जनक फ्लॉरेन्स नाइटिंगेल, भारतीय बॅडमिंटनमधले ‘पहिले सुपरस्टार’ नंदू नाटेकर आणि जुन्या काळातील चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक विजयशंकर जग्नेश्वर तथा विजय भट यांचा १२ मे हा जन्मदिन. तसेच, ७० आणि ८०च्या दशकात चित्रपटांतून खलनायकाच्या भूमिका साकारणारे अभिनेते सुधीर यांचा १२ मे हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
........
फ्लॉरेन्स नाइटिंगेल
१२ मे १८२० रोजी इटली येथे फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जन्म झाला. त्यांनी केलेल्या कार्याच्या स्मृती सदैव तेवत राहाव्यात, म्हणून त्यांचा जन्मदिवस ‘जागतिक परिचारिका दिन’ म्हणून संपूर्ण जगभर साजरा करण्यात येतो. फ्लॉरेन्स नाइटिंगेल सेवाभाव, समर्पण आणि प्रेम यांचे प्रतीक होत्या. आरोग्य सेवा क्षेत्रात त्यांनी कर्तृत्वाचा अमीट ठसा उमटवला होता. 

परिचारिका होण्यास कुटुंबाचा तीव्र विरोध असतानाही फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांनी सारे आयुष्य रुग्णांची सुश्रुषा-सेवा, सर्वोत्कृष्ट आरोग्यसेवांची उपलब्धता आणि स्वच्छतेच्या प्रचार-प्रसारासाठी समर्पित केले. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी जखमी सैनिकांची अहोरात्र सेवा केली आणि संपूर्ण जगाला आदर्श घालून दिला. त्यांच्या सेवेला प्रणाम म्हणून ‘लेडी विथ द लॅम्प’ ही उपाधी त्यांना प्रदान करण्यात आली. 

त्यांच्या खडतर तपश्चर्येमुळे परिचर्या क्षेत्राचा उगम झाला. महायुद्धाच्या काळात त्यांनी हजारो परिचारिकांच्या साह्याने युद्धात जखमी झालेल्या हजारो सैनिकांची काळजी घेण्याचे काम केले. मानवता आणि माणुसकीने ओतप्रोत भरलेल्या नाइटिंगेलच्या संपूर्ण आयुष्याने जगाला रुग्णांकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली.

फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचे १३ ऑगस्ट १९१० रोजी निधन झाले.
.........


नंदू नाटेकर
१२ मे १९३३ रोजी नंदू नाटेकर यांचा जन्म झाला. १९५० ते ७० या काळात भारतीय बॅडमिंटनच्या क्षितिजावर एकच नाव तळपत होते, ते म्हणजे.. नंदू नाटेकर! त्या काळी आपल्या शैलीदार खेळाने नाटेकरांनी बॅडमिंटनमध्ये भारताची ओळख निर्माण केली. देशाबाहेरील स्पर्धेत अजिंक्यपद मिळविणारे ते पहिले भारतीय बॅडमिंटनपटू. राष्ट्रीय स्पर्धांत पुरुष दुहेरीत व एकेरीत मिळून १२ वेळा, तर मिश्र दुहेरीत पाच वेळा त्यांनी अजिंक्यपद मिळवले. आज बॅडमिंटनमधील यशामुळे खेळाडूंना अफाट लोकप्रियता मिळू लागली असली तरी नाटेकर हे भारतीय बॅडमिंटनमधले ‘पहिले सुपरस्टार’ होते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 

आताचे खेळाडू एकेरी किंवा दुहेरी असा एकच पर्याय निवडतात; मात्र नंदू नाटेकर एकाच वेळी पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरी अशा तीन प्रकारांत खेळत असत. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्यांची जेतेपदे त्यांच्या अद्भुत प्रतिभेची साक्ष आहेत. प्रतिस्पर्ध्याला उद्देशून वाचाळपणा करण्यापेक्षा रॅकेटने प्रत्युत्तर देणे हे त्यांचे तत्त्व होते. भारतात नंदू नाटेकर यांनी बॅडमिंटन खेळाची पहिली दखल घ्यायला लावली होती. खेळभावनेचा त्यांनी नेहमीच आदर केला. थॉमस चषकातली त्यांची कामगिरी संस्मरणीय अशी होती. 

नंदू नाटेकर यांनी आपल्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत १००हून अधिक टायटल्स जिंकली होती. १९६१ ते १९९२ या काळात हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये त्यांनी नोकरीही केली. त्यामुळे आंतर-पेट्रोलियम कंपन्यांच्या स्पर्धामध्येही ते खेळत. नंदू नाटेकर एका आठवण सांगताना म्हणतात, ‘स्पर्धेच्या निमित्ताने वर्धा येथे गेलो होतो. वर्ध्याजवळ असणाऱ्या पवनार येथील आश्रमात विनोबा भावे यांना भेटण्याची इच्छा होती. त्या वेळी विनोबाजी पवनारमध्ये होते. निर्मलाताई देशपांडे यांना तशी विनंती केली. आम्ही आश्रमात पोहोचलो; मात्र विनोबाजींचे मौनव्रत असल्याचे समजले. त्यांच्याशी बोलता येणार नसल्याने निराश झालो. त्या वेळी निर्मलाताईंनी विनोबाजींच्या कानात काहीतरी सांगितले. पुढच्या क्षणाला विनोबाजींनी ‘जय बॅडमिंटन’ असे म्हणत आशीर्वाद दिला. निर्मलाताईंनी त्यांच्या कानात नंदू नाटेकर आल्याचे सांगितले होते.’

कारकीर्दीत जपलेल्या अफलातून सातत्यासाठी त्यांना ‘गोल्डन बॉय ऑफ इंडियन बॅडमिंटन’ अशी उपाधी देण्यात आली होती. बॅडमिंटनमध्ये उत्तम करिअर सुरू असतानाच नाटेकरांना संगीत क्षेत्र खुणावत होते. साहजिकच बॅडमिंटनच्या सरावातील काही वेळ शास्त्रीय संगीत ऐकण्यासाठी द्यायचा असे त्यांनी ठरवले आणि एकेरीतून स्पर्धात्मक निवृत्ती स्वीकारली. सध्या पुण्यातील बाणेर परिसरातील त्यांच्या घरी ते वयाच्या ८५व्या वर्षीही ते एकाग्रतेने शास्त्रीय संगीताचा सराव करताना दिसतात. आज शास्त्रीय संगीत शिकतानाही त्यांना बॅडमिंटनइतकाच आनंद मिळतो. आग्रा घराण्याच्या शिक्षिका संध्या काथवटे यांच्याकडे आठवड्यातून दोन दिवस ते संगीत शिकतात. प्रत्यक्ष शिकवणी जरी दोन दिवसच असली तरी त्याचा नियमित सराव करण्यासाठी इतर दिवस ते भरपूर वेळ देत असतात. त्यांचा मुलगा गौरव व सून आरती हे दोघेही आंतरराष्ट्रीय दर्जाचे टेनिसपटू होते. आता दोघेही प्रशिक्षक झाले आहेत.
 .........
विजय भट
१२ मे १९०७ रोजी विजय भट यांचा जन्म झाला. विजय भट यांची प्रकाश पिक्चर्स व एव्हरग्रीन पिक्चर्स नावाची सिनेवितरण कंपनी होती. त्यांचे रामराज्य (१९४३), बैजू बावरा (१९५२), गूंज उठी शहनाई (१९५९), हिमालय की गोद में (१९६५) हे चित्रपट खूप गाजले. गिरगाव, ग्रँट रोड येथील सुपर टॉकीजमध्ये १९४३ साली विजय भट यांच्या एव्हरग्रीन पिक्चर्स या कंपनीने सुपर थिएटर चालविण्यास घेतले आणि हे थिएटर नावलौकिकास आणले. विजय भट यांच्या प्रकाश पिक्चर्सचा ‘रामराज्य’ इथे सलग १०२ आठवडे चालला. हा हिंदी व मराठी या दोन्ही भाषांत काढला होता. रोज मराठीत एक आणि हिंदीत असे दोन खेळ इथे होत असत. 

विजय भट महात्मा गांधी यांना ‘रामराज्य’ दाखवायला सुपरला घेऊन आले होते; पण राम रामासारखा दिसत नाही आणि सीता ही सीतेसारखी वाटत नाही असे म्हणत एक-दोन रिळे पाहून गांधीजी निघून गेले. महात्मा गांधींनी आयुष्यात पाहिलेला हा एकमेव चित्रपट म्हणून ‘रामराज्य’ची खूप पब्लिसिटी झाली. सीतेच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या धोबिणीची भूमिका पार्श्वगायिका आमीरबाई कर्नाटकी यांनी केली होती. विजय भट हे ‘फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडिया’ या संस्थेचे संस्थापक सदस्य होते. विजय भट यांचे निधन १७ ऑक्टोबर १९९३ रोजी झाले. 
............


सुधीर 
२८ जून १९४४ रोजी सुधीर यांचा जन्म झाला. आपल्या करिअरमध्ये दीर्घ काळपर्यंत काम करत राहणाऱ्या काही मोजक्या अभिनेत्यांमध्ये सुधीर यांच्या नावाचाही उल्लेख होतो. अभिनेते सुधीर यांचे खरे नाव भगवानदास मुलचंद लुथरिया. भागू या नावानंही ते चित्रपटसृष्टीत ओळखले जात. १९६५ साली सुधीर यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. देखण्या व्यक्तिमत्त्वामुळे सुरुवातीला कृष्णधवल चित्रपटांत त्यांना नायक व सहनायकाच्या भूमिका मिळाल्या. 

काळाप्रमाणे नायकाच्या भूमिका कमी झाल्यावर सुधीर यांनी ७० आणि ८०च्या दशकात अनेक चित्रपटांमधून नकारात्मक भूमिका साकारल्या होत्या. सुधीर यांनी सत्ते पे सत्ता, दीवार या चित्रपटांत अमिताभ यांच्याबरोबर काम केले; पण ते लक्षात राहिले ते ‘दीवार’मुळे. ‘धर्मात्मा’ या फिरोज खानच्या चित्रपटात रणजित यांच्या सोबतीनं ते सहखलनायक होते. त्यांनी हास्य अभिनेता म्हणूनही स्वत:ला सिद्ध केलं होतं. त्यांना लिखाणाचीही आवड होती. २०१२ साली सुधीर यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं. देव आनंद यांच्यासोबत ‘हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटात काम करणाऱ्या सुधीर यांनी ‘बादशाह’ या चित्रपटात शाहरुख खानसोबतही काम केले होते. 

सुधीर यांनी लग्न केले नव्हते. सुधीर हे चित्रपट निर्माते मिलन लुथरिया यांचे काका होते. सुधीर यांचे १२ मे २०१४ रोजी निधन झाले.

माहिती संकलन : संजीव वेलणकर





 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZUQCM
Similar Posts
अब्दुल हलीम जाफर खान, पं. उल्हास बापट, सर आयझॅक पिटमॅन ज्येष्ठ सतारवादक अब्दुल हलीम जाफर खान, ख्यातनाम संतूरवादक पं. उल्हास बापट आणि लघुलिपीचे (शॉर्टहँड) जनक सर आयझॅक पिटमॅन यांचा चार जानेवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने त्यांचा हा अल्प परिचय...
रामदास पाध्ये, हंसा वाडकर, सुभाष घई, जे. ओमप्रकाश बोलक्या बाहुल्यांचे खेळ प्रसिद्ध करणारे शब्दभ्रमकार रामदास पाध्ये, मराठी अभिनेत्री-नृत्यांगना रतन साळगावकर ऊर्फ हंसा वाडकर, राज कपूरनंतर ‘शोमॅन’ या पदावर आरूढ झालेले एकमेव निर्माते-दिग्दर्शक सुभाष घई, प्रख्यात दिग्दर्शक, निर्माते जे. ओमप्रकाश यांचा २४ जानेवारी हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय
डॉ. सतीश धवन, अरविंद देशपांडे, जॉय अॅडम्सन नामवंत अंतराळशास्त्रज्ञ डॉ. सतीश धवन, ख्यातनाम अभिनेते अरविंद देशपांडे आणि वन्यजीवनाबद्दल लेखन करणाऱ्या लेखिका जॉय अॅडम्सन यांचा तीन जानेवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने त्यांचा हा अल्प परिचय...
प्रा. मधू दंडवते, शांताराम आठवले समाजवादी नेते, अर्थतज्ज्ञ व समाजसेवक प्रा. मधू दंडवते आणि नामवंत साहित्यिक व गीतकार शांताराम आठवले यांचा २१ जानेवारी हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language