
रत्नागिरी : संस्कृतला गीर्वाणवाणी म्हणजे देवांची भाषा असे म्हटले जाते; पण साध्या-सोप्या नियमांचा अभ्यास केला, तर ती कोणीही बोलू शकते. ती रोजच्या संवादाचीही भाषा होऊ शकते, हे रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय संस्कृत दिनी दाखवून दिले.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागातर्फे शनिवारी (२५ ऑगस्ट २०१८) राष्ट्रीय संस्कृत दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात विद्यार्थ्यांनी संस्कृतमधून गीत, पथनाट्य, बातमीपत्रे आणि संवादात्मक कार्यक्रम सादर केले. प्रभू श्रीरामाच्या जीवनावरील नृत्याविष्कार आणि वीस विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या नृत्याने वाहवा मिळवली. प्लास्टिकबंदीवरील नाट्यही छान रंगले. एका विद्यार्थ्याने सुरेख कथा सांगितली. सुमारे तासभर रंगलेल्या या कार्यक्रमातून वातावरण संस्कृतमय झाले होते.


सध्या मुंबईत संस्कृतचे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी नीरज दांडेकर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते म्हणाले, ‘संस्कृतमधून संभाषण ही पहिली पायरी. लेखन ही प्रगती व संस्कृत चिंतन हे आपले उद्दिष्ट हवे. शेजाऱ्यांना बोलावून संस्कृतबद्दल माहिती सांगा. आपले जीवन संस्कृतनेच व्यापले आहे. अनेकदा विद्यार्थ्यांना संस्कृतमधील अनेक संधींची माहिती नसते. संस्कृत, योग, आयुर्वेद शिकवणाऱ्यांना परराष्ट्र मंत्रालयातही नोकरीच्या संधी आहेत. जगात सर्वत्र संस्कृतला मागणी आहे.’

‘माजी विद्यार्थी असल्याने आज कॉलेजमध्ये आल्यावर खूप आनंद झाला. डॉ. आठल्ये यांच्याकडून संस्कृतची प्रेरणा मिळाली. राष्ट्रीय विश्व विद्यालयामध्ये इतिहास, राज्यशास्त्र विषय संस्कृतमधून शिकवणाऱ्या शिक्षकांची गरज आहे. संगणकीय प्रणालीवर संस्कृत भाषेचा प्रभाव आहे. १९८०मध्ये हेन्री फोर्ड शाश्वत सुखासाठी गंगाकिनारी आला होता. तसेच स्टॅलिनची कन्या स्वेतलानाही गंगापूजनासाठी झोपडीत राहिली होती. पैसा आपला नसून श्रीकृष्णाचा आहे, असे ती सांगायची. ही महती संस्कृतमुळेच त्यांना कळली,’ असेही दांडेकर यांनी सांगितले.

‘सध्याच्या शिक्षण पद्धतीत आकलन आहे; पण धारणा नाही. पाठांतर करायचे व परीक्षेत लिहायचे एवढेच होते. आठवीत शिकलेले दहावीत आठवत नाही. अशा शिक्षणपद्धतीत आपण परिवर्तन केले पाहिजे. आपल्या पाठ्यक्रमात नसलेली पुस्तकेही वाचा. स्वाध्यायातून तुम्हाला संस्कृत तज्ज्ञ होता येईल,’ असा गुरुमंत्रही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

संस्कृत दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांमधील विजेत्यांना या वेळी गौरवण्यात आले. उपप्राचार्य व संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य प्रा. विवेक भिडे, प्रा. जयंत अभ्यंकर या वेळी उपस्थित होते. प्रा. स्नेहा शिवलकर यांनी आभार मानले.
स्पर्धांचा निकाल असा :
पाठांतर स्पर्धा : प्रथम वर्ष - वरदा पटवर्धन, स्वरूप काणे, ओंकार ओक, मुग्धा पुरोहित, तन्वी दाते, सुखदा ताटके, जागृती देशमुख. द्वितीय वर्ष - नारायणी शहाणे, स्नेहल हर्डीकर, अमृता नायक, ऐश्वर्या आचार्य, तृतीय वर्ष - पूर्वा चुनेकर, शीतल पाध्ये, रेश्मा मालशे, भार्गव वळंजू, जान्हवी घुडे, कोमल खुर्द, हर्षदा मुसळे.
नाट्यवाचन स्पर्धा : पर्णिका भडसावळे, सुरभी वायंगणकर, अक्षय नवरे, सिमंतिनी जोशी, धनश्री पाटील, वेदिका चव्हाण.
प्रश्नमंजूषा : सुरभी वायंगणकर, स्वरूप काणे, सुश्रुत चितळे, अमृता नायक, प्राजक्ता साळगावकर.
गीतगायन : पूर्वा चुनेकर, निधी कशाळीकर.
(संस्कृत दिन कार्यक्रमाची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)