मराठी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री आसावरी जोशी, संगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षा आणि आणि भरतनाट्यम नर्तिका लीला सॅमसन यांचा सहा मे हा जन्मदिन. तसेच, लेखिका रागिणी पुंडलिक आणि प्रसिद्ध इटालियन शिक्षणतज्ज्ञ व माँटेसरी शिक्षणपद्धतीच्या जनक मारिया माँटेसरी यांचा सहा मे हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय... ......
आसावरी जोशी
सहा मे १९६५ रोजी मुंबईत आसावरी जोशी यांचा जन्म झाला. आसावरी जोशी हे नाव नाट्य-चित्र रसिकांना काही अनोळखी नाही. सिनेमा, नाटक, हिंदी-मराठी मालिका, जाहिरात या सर्व माध्यमांत त्यांनी काम केले आहे. १९८९पासून त्या या सर्व माध्यमांत सहजतेने वावरत आहेत. ‘दाग! ढूंढते रह जाओगे’ म्हणणाऱ्या आसावरी जोशी घराघरांत पोहोचल्या.
आसावरी जोशी यांनी १९८९मध्ये ‘एक रात्र मंतरलेली’ या सिनेमातून आपल्या करिअरला सुरुवात केली. यानंतर गोडीगुलाबी, सुखी संसाराची १२ सूत्रे यांसारख्या अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलें. मराठीसोबतच त्यांनी अक्षयकुमार, अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांच्याबरोबर हिंदी सिनेमांमध्येही काम केलं. ‘ओम शांती ओम’, ‘तांदळा’, ‘हॅलो डार्लिंग’, ‘चला मुसद्दी ऑफिस ऑफिस’ हे त्यांनी काम केलेले हिंदी सिनेमे.
आसावरी जोशी यांना खरी ओळख डीडी मेट्रोच्या ‘जबान संभालके’ आणि सब टीव्हीवरील ‘ऑफिस- ऑफिस’ या मालिकांमधून मिळाली. झी मराठीवरील ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ मालिकेतील त्यांची उल्का ही व्यक्तिरेखाही फार गाजली होती. त्यांनी कलर्स टीव्हीवरील ‘इंटरनेटवाला लव्ह’ मालिकेत सुषमा कुमार ही व्यक्तिरेखा साकारली. ‘६६ सदाशिव’ चित्रपटातही आसावरी जोशी यांनी काम केले आहे. अनेक पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत. आसावरी जोशी यांनी २०१९मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
............
लीला सॅमसनसहा मे १९५१ रोजी लीला सॅमसन यांचा जन्म झाला. सॅमसन या निष्णात भरतनाट्यम नर्तिका, नृत्यनाटिका संरचनाकार, नृत्यशिक्षिका व लेखिका म्हणून जागतिक स्तरावर ओळखल्या जातात. त्या बेने इस्रायली आहेत. पुण्याचे व्हाइस अॅडमिरल बेंजामिन सॅमसन आणि लैला सॅमसन या दाम्पत्याच्या त्या कन्या. वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी रुक्मिणीदेवी अरुंडेल यांच्या ‘कलाक्षेत्र’ या संस्थेत नृत्य शिक्षण घेणे सुरू केले.
मुंबईच्या सोफिया कॉलेजमधून बीए झाल्यावर त्यांनी भरतनाट्यम हेच आपले कार्यक्षेत्र ठरवून दिल्लीच्या गांधर्व महाविद्यालय व श्रीराम भारतीय कलाकेंद्रात अध्यापनाचे काम केले. १९९५ साली त्यांनी स्वत:चा ‘स्पंद’ हा नृत्यवृंद स्थापन करून पुढे भारत, युरोप, अमेरिका व आफ्रिकेत अनेक वेळा नृत्याचे कार्यक्रम सादर केले. लंडन येथील रॉयल ऑपेरा हाउसमध्येही भरतनाट्यमचे शिक्षण देण्याची व्यवस्था केली. २०१५ साली प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक मणिरत्नम यांच्या ‘ओके कनमणी’ या चित्रपटात नृत्यसंरचना आणि नृत्य दिग्दर्शनाचे काम त्यांनी केले.
लीला सॅमसन यांनी लिहिलेल्या पुस्तकांपैकी ‘ऱ्हिदम इन जॉय’, ‘रुक्मिणीदेवी - ए लाइफ’, ‘द जॉय ऑफ क्लासिकल डान्स’ ही पुस्तके विख्यात आहेत. लीला सॅमसन यांना १९९० साली पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्कारात संस्कृत चूडामणी, संगीत नाटक अकादमी पुरस्कार हे महत्त्वाचे होत. त्यांनी २०१०मध्ये संगीत नाटक अकादमीचे अध्यक्षपद, तसेच २०११ साली भारतीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्षपद भूषविले आहे. परंतु या दोन्ही पदांवर असताना अनुपम खेर आणि इतर कलाकारांनी आक्षेप घेतल्यामुळे लीला सॅमसननी या पदांचा राजीनामा दिला होता.
.................
रागिणी पुंडलिक१५ ऑक्टोबर १९३३ रोजी रागिणी पुंडलिक यांचा जन्म झाला. मराठीतील ख्यातनाम साहित्यिक विद्याधर पुंडलिक यांच्या त्या पत्नी. त्या स्वतःही स्वतंत्र प्रतिभेच्या लेखिका म्हणून प्रसिद्ध होत्या. रागिणी पुंडलिक यांचे शालेय शिक्षण पुण्यातील अहल्यादेवी प्रशाला आणि महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले होते. लेखिका मोनिका गजेंद्रगडकर यांच्या त्या मातु:श्री होत. अनेक मासिके आणि नावाजलेल्या दिवाळी अंकांतून त्यांनी लेखन केले होते. पती विद्याधर पुंडलिक यांच्यासोबतच्या सहजीवनावर आधारित असणारे आत्मचरित्रपर पुस्तक ‘साथसंगत’, आपल्या मुलाच्या अकाली निधनानंतर त्यांनी लिहिलेले ‘अश्विन : एक विलापिका’ हे पुस्तक यांसह अक्षरममैत्री, महाभारत कथा ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांना राज्य सरकारचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार, गदिमा प्रतिष्ठानचा गृहिणी सखी सचिव पुरस्कार, प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समिती उत्तम श्रोता सन्मान, असे अनेक पुरस्कार मिळाले होते. रागिणी पुंडलिक यांचे निधन सहा मे २०१९ रोजी झाले.
............
मारिया माँटेसरी३१ ऑगस्ट १८७० रोजी मारिया माँटेसरी यांचा जन्म झाला. मूल साडेतीन वर्षांचे झाले, की ‘आता माँटेसरीत घालणार’ असे म्हटले जाते; पण ते माँटेसरी हे नाव एका महान व्यक्तीचे आहे हे खूप कमी जणांना माहिती असेल. शाळाप्रवेशाच्या आधीच्या या शिक्षणाची पद्धती शोधून तिची मांडणी करणाऱ्या व त्याचेही विज्ञान बनवणाऱ्या बालमानसतज्ज्ञ म्हणजे मारिया माँटेसरी.
माँटेसरी यांचे कार्य इतके महान आहे, की लहान मुलांच्या शाळेला आता जगभर सर्वत्र ‘माँटेसरी’ असेच म्हटले जाते. माँटेसरी यांचा जन्म इटलीत शेअरवेल या गावात झाला. वडिलांच्या वारंवार वेगवेगळ्या शहरांमध्ये बदल्या होत राहिल्याने मारियाचे शिक्षणसुद्धा वेगवेगळ्या शहरांत होत राहिले. कधी फ्लॉरेन्स, तर कधी रोम अशी त्यांची भटकंती चालू होती. त्यांना गणिताची विशेष गोडी व गतीही होती. त्यामुळे सुरुवातीला मारियाने इंजिनीअर होण्याचे ठरवले; पण पुढे त्यांना वनस्पतिशास्त्रात गोडी वाटू लागली. नंतर त्यांना वैद्यकशास्त्राचे आकर्षण वाटले व त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला.
मतिमंद मुलांच्या मानसशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी संशोधन करतानाच त्यांचे तिथल्याच एका वैज्ञानिकाबरोबर प्रेमसंबंध जुळले व विवाहबाह्य संबंधांतूनच त्यांना मुलगा झाला; पण त्याला सोबत ठेवणे अशक्य होते. त्यातच त्यांच्या प्रियकरानेही दगा दिला. या साऱ्याचा बालमनावर कसा व किती परिणाम होतो, हे मारियांनी स्वत:च्या घरातच पाहिले व त्यातूनच बालकांसाठी शिक्षणपद्धती कशी असावी, याचे संशोधन त्यांनी सुरू केले.
बालमानसशास्त्र व त्यांचे शिक्षण, विशेषत: बौद्धिकदृष्ट्या भिन्न असलेल्या मुलांसाठी विशेष शिक्षण पद्धती या विषयात माँटेसरी विविध विद्यापीठे व संस्था यामध्ये भाषणे देऊ लागल्या. विसावे शतक सुरू होत असताना त्यांच्या नावाचा दबदबा निर्माण झाला होता. शिशुशिक्षणाच्या त्या पुरस्कर्त्या होत्या. त्यासाठी त्यांनी नवीन तंत्रे व उद्योग शोधून काढले. मुलांचे खेळ व छंद यांवर त्यांचे मानसशास्त्र अवलंबून होते. अभ्यासाने मुलांना शीण न येता त्यांचा मानसिक विकास साधला जातो, असे त्यांचे म्हणणे होते. बालमनावर चांगले संस्कार करण्यासाठी त्यांना शिकवताना काय पद्धती अवलंबावी व कोणती पथ्ये पाळावीत, याबद्दल माँटेसरींनी काही सूत्रे तयार केली. आजही ती वापरली जात आहेत.
माँटेसरी शिक्षण पद्धतीच्या शिक्षण-प्रशिक्षणाचा पहिला वर्ग माँटेसरींनी १९०९ साली उघडला. माँटेसरीची शिक्षणविषयक कल्पना वस्तुनिष्ठतेवर उभारली होती. तीमध्ये जीवनशक्तीचा आविष्कार हे प्रमुख तत्त्व होते. पहिल्या जागतिक महायुद्धानंतर माँटेसरी यांनी स्थापन केलेली इटलीतील संस्था बंद पडली. नंतर माँटेसरी अमेरिकेत गेल्या. त्यांनी न्यूयॉर्क येथे माँटेसरी शिक्षक–प्रशिक्षण महाविद्यालय स्थापन केले व त्याची जबाबदारी एलिनार पार्कहर्स्ट यांच्यावर सोपविली.
शाळेत जाण्याचे वय होण्यापूर्वी बालकांना केवळ आपल्या वयोगटातील मुलांमध्ये मिसळता यावे व त्यांना सामूहिक सहजीवनाचा सराव व्हावा, म्हणून माँटेसरींनी अनेक खेळ, गीते, नृत्य प्रकार तयार केले. तीच बालगीते आजही वापरली जात आहेत. माँटेसरी १९४० मध्ये भारतातही आल्या होत्या. त्यांनी मद्रासमध्ये चर्चासत्रे घेतली होती.
उतरत्या वयातही झपाटल्यासारख्या त्या जगभर फिरत राहिल्या. नोबेल शांतता पुरस्कारासाठी तीन वेळा त्यांचे नामांकन झाले; मात्र अखेरपर्यंत त्यांना ते मिळाले नाहीच. माँटेसरी यांची काही उल्लेखनीय पुस्तके पुढीलप्रमाणे - द ॲबसॉर्बन्ट माइंड, द डिस्कव्हरी ऑफ द चाइल्ड, माँटेसरी मेथड, डॉ. माँटेसरीज ओन हँडबुक, द अॅडव्हान्स्ड माँटेसरी मेथड. माँटेसरी यांचे निधन सहा मे १९५२ रोजी झाले.
माहिती संकलन : संजीव वेलणकर
६ मे जन्मदिन :
जगातील पहिल्या महिला तबलावादक डॉ. अबन मिस्त्री (यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते मोतीलाल गंगाधर नेहरू (६ मे १८६१ - ६ फेब्रुवारी १९३१)
स्वीडनचा सुपरस्टार टेनिसपटू बियाँ बोर्ग (६ मे १९५६)
इंग्लडचे माजी पंतप्रधान अँथनी चार्ल्स लिंटन ब्लेअर उर्फ टोनी ब्लेअर (६ मे १९५३)
६ मे स्मृतिदिन :
राजर्षी शाहू महाराज (यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
रॅँग्लर परांजपे (यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
प्रसिद्ध भावगीत गायक
अरुण दाते (यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
कायदेपंडित भुलाभाई जीवनजी देसाई (१३ ऑक्टोबर १८७७ - ६ मे १९४६)
बालसाहित्यकार
सुमती हरिश्चंद्र पायगावकर (७ जून १९१० - ६ मे १९९५)
(यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)