पुणे : अंध कबड्डी खेळाडूंचे सक्षमीकरण करण्यासाठी प्रो कबड्डी लीग मधील एक प्रमुख संघ पुणेरी पलटणने पुढाकार घेतला आहे. यानिमित्त अखिल भारतीय अंध स्त्री-हित असोसिएशन (एआयएएसएचए) या सामाजिक संस्थेच्या अंध खेळाडूंसाठी नुकतेच फिनिक्स मॉलमध्ये एका कबड्डीच्या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. १८ खेळाडूंनी हा कबड्डीचा सामना खेळला. पुणेरी पलटण संघामधील प्रमुख खेळाडू धर्मराज चेलारथन आणि गिरीश एर्नाक आणि आयएएसएचएच्या संस्थापक व सचिव नेहा पावसकर यावेळी उपस्थित होते.
या वेळी धर्मराज चेलारथन म्हणाला, ‘मी गेली १५ वर्षांपासून कबड्डी खेळत आहे पण अशा प्रकारचा कबड्डीचा सामना मी आयुष्यात पहिल्यांदाच बघितला. कबड्डी हा खूप अवघड असा खेळ आहे आणि त्यासाठी खूप कौशल्ये आत्मसात करावी लागतात पण दिसत नसताना देखील या खेळाडूंनी ज्याप्रकारचे कौशल्य दाखवले आणि पायांचा वापर केला ते बघून मी खूप प्रभावित झालो. या सर्व खेळाडूंनी दाखवलेली जिद्द खूप कौतुकास्पद आहे आणि माझ्या या सर्व खेळाडूंच्या भविष्यातील वाटचालीस माझ्या शुभेच्छा.’

पुणेरी पलटणचे सीईओ कैलाश कांडपाल म्हणाले, ‘या खेळाडूंना दिसत नसले तरी या खेळाडूंना दृष्टीकोन आहे. या खेळाडूंनी दाखवलेले कौशल्य अतिशय वाखाणण्याजोगे आहे. एआयएएसएचए सोबत केलेली ही भागीदारी म्हणजे समाजातील सर्व घटकांमधील लोकांपर्यंत कबड्डीचा प्रसार करण्याच्या दृष्टीने उचललेले एक पाउल आहे.’
नेहा पावसकर म्हणाल्या, ‘पुणेरी पलटणची मी खूप आभारी आहे. त्यांनी या प्रतिभावान खेळाडूंना व्यासपीठ दिले. एआयएएसएचएचे सर्व खेळाडू कबड्डी या खेळाबद्दल खूप गंभीर आहेत आणि खेळामध्ये सुधारणा करण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. मिळालेल्या या पाठींब्यामुळे आमचे खेळाडू चांगलेच प्रोत्साहित झाले आहेत’.
नेहा पावसकर आणि नलीन पावसकर यांनी एआयएएसएचएच्या सर्व खेळाडूंना प्रशिक्षण दिले आहे. अंध लोकांच्या सेवेसाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठी एआयएएसएचएची २००३ ला स्थापना झाली. या संस्थेमार्फत अंध खेळाडूंसाठी विविध खेळांचे सामने भरवले जातात. पुणेरी पलटण १३ ते २० ऑक्टोबर दरम्यान बालेवाडीच्या छत्रपती शिवाजी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सामने खेळणार आहे.