रत्नागिरी : ‘गुरू आणि शिष्याचे नाते कसे असावे, तर श्रीकृष्ण आणि अर्जुनासारखे असावे. या नात्यात काही आमिषे नसावीत, खोटेपणा नसावा. गुरू-शिष्याचे आदर्श नाते असे निखळ असावे. आजच्या काळात त्याची विशेष गरज आहे,’ असे प्रतिपादन सेवानिवृत्त वकील पुरुषोत्तम लक्ष्मण महाजनी यांनी केले. रत्नागिरीचा संकल्प कला मंच आणि मुंबईची भारतीय नाविक सेना युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमेनिमित्त (१६ जुलै) आयोजित केलेल्या गुणगौरव समारंभात ते बोलत होते.
समाजातील विविध क्षेत्रांतील गुणवंतांना शोधून त्यांचा गुरुपौर्णिमेच्या दिवशी सत्कार करण्याचे कार्य संकल्प कला मंचाकडून गेली २३ वर्षे केले जात आहे. यंदा, २४व्या वर्षी या उपक्रमात १९ व्यक्ती आणि तीन संस्थांचा सत्कार करण्यात आला. (सर्व व्यक्ती आणि संस्थांची नावे बातमीच्या शेवटी दिली आहेत. )
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ वकील पु. ल. महाजनी (वय वर्षे ८९), तसेच प्रकाशिका सुलभा धामापूरकर हे मान्यवर उपस्थित होते. या वेळी संस्थेचे सल्लागार डॉ. दिलीप पाखरे, सचिव रवींद्र साळुंखे, अध्यक्ष विनोद वायंगणकर, उपाध्यक्ष गजानन गुरव आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
‘संकल्प कला मंच या संस्थेने गेली २३ वर्षे नाट्यक्षेत्राबरोबर सामाजिक बांधिलकी जपली आहे. गुरुपौर्णिमेला सगळेच जण आपल्या गुरूंची पूजा करत असतात. परंतु संकल्प कला मंच समाजाच्या खऱ्या गुरूंना समाजापुढे आणण्याचे काम या दिवसाचे औचित्य साधून करत आहे. समाजातील गुणवंत हेच समाजासाठी खरे गुरू आहेत, असा आमचा त्यामागचा विचार आहे. सामाजिक, शैक्षणिक, नाट्य, सांस्कृतिक, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत बहुमूल्य कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा आढावा समाजापुढे मांडून त्यांचा गुणगौरव हीच आमच्यासाठी गुरुपौर्णिमेची व्याख्या आहे. परिस्थितीवर मात करून मोलाचे आणि एखाद्या क्षेत्रात उच्च पातळीवरील यश मिळवणारे, पण समाजापुढे न येणारे अर्थात पडद्यामागचे कलाकार गुणवंत शोधण्याचे काम हेच या उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे. गेल्या वर्षीपर्यंत आमच्या संस्थेने ६७० जणांचा सत्कार या उपक्रमाच्या माध्यमातून केला आहे,’ असे साळुंखे यांनी प्रास्ताविकात सांगितले. डॉ. दिलीप पाखरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा का म्हणतात, यामागची कथा सुलभा धामापूरकर यांनी सांगितली. अॅड. महाजनी यांनी महाभारत, हिंदू धर्म, स्वामी विवेकानंदांचे विचार आदी भारतीय वैशिष्ट्यांचा परदेशी व्यक्तींना किती आणि कसा आदर वाटतो, याचे दाखले दिले. महाभारत आणि १८ आकड्याचा संबंध कसा होता, हेही त्यांनी सांगितले. ‘शकुनीमामामुळे महाभारताचे युद्ध घडले. तसेच आजच्या काळातही अनेक शकुनीमामा आहेत. त्यामुळे आवश्यक ती काळजी बाळगायला हवी,’ असे ते म्हणाले. ‘त्या काळातील युद्ध धर्मयुद्ध होते, म्हणजे युद्धालाही नियम होते आणि ते पाळले जायचे. आजच्या काळातील परिस्थिती खालच्या पातळीवर आली आहे, ’ असे ते म्हणाले. या पार्श्वभूमीवर, आजच्या काळात गुरू-शिष्याचे नाते कृष्णार्जुनासारखे निखळ असण्याची गरज अॅड. महाजनी यांनी व्यक्त केली.
संस्थेचे ज्येष्ठ सभासद आणि जादूगार विनयराज उपरकर यांनी कार्यक्रमात जादूचे प्रयोग सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले. अध्यक्ष विनोद वायंगणकर यांनी आभारप्रदर्शन केले. ज्येष्ठ रंगकर्मी गणेश गुळवणी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. संकल्प कला मंच ही संस्था यंदा २५व्या वर्षात पदार्पण करणार असल्याने वर्षभरात २५ वेगवेगळे कार्यक्रम करण्याचा मानस असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले.
या कार्यक्रमात सत्कार करण्यात आलेले गुणवंत :
- मैत्रेयी गोगटे (बुद्धिबळ), ऐश्वर्या सावंत (खो-खो) - शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडू.
- आकांक्षा कदम - राष्ट्रीय कॅरमपटू.
- डॉ. निशिगंधा पोंक्षे - ५५ ते ६० वयोगटातून आंतरराष्ट्रीय बॅथले (धावणे-पोहणे-धावणे) स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व, राष्ट्रीय पातळीवर विविध खेळांत अनेक पदके.
- सु. द. भडभडे - सेवानिवृत्त शिक्षक. साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व, गीता धर्म मंडळ, जनसेवा ग्रंथालय, कोमसाप अशा विविध संस्थांमधून कार्य. नुकतेच पुस्तकाचे प्रकाशन.
- अमित सामंत - शासकीय योजना मित्र पुस्तकाचे लेखन, अन्य सामाजिक कार्य.
- कमल बावडेकर – सेवानिवृत्त शिक्षिका. वय वर्षे ८५. ‘कमलकुंज’ पुस्तकाचे लेखन, सामाजिक कार्य.
- राजेंद्र घाग – कथासंग्रह, ‘रात्रीस खेळ चाले - भाग २’ मालिकेचे लेखन.
- स्वप्नील सावंतदेसाई – पीएसआय परीक्षेत १०३वा क्रमांक, व्हॉलिबॉलमध्ये प्रावीण्य.
- हृषीकेश शिंदे - नाट्य क्षेत्रातील विनोदी अभिनेता म्हणून झी मानांकन प्राप्त.
- राजेश गोसावी - क्रियाशील नाट्यकर्मी.
- नूपुर कुर्टे – ग्रामीण भागात राहूनही शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश.
- गंधार व स्वरेश भारती - एसएससी परीक्षेतील गुणवंत
- आकाश मणचेकर – प्रतिकूल परिस्थितीत दहावीत यश
- श्रद्धा रेमणे – विविध हिंदी मालिका, मराठी चित्रपट, मराठी नाटके यांसाठी ड्रेस डिझायनिंग
- राधाकृष्ण कला मंच - राज्य संगीत नाटक स्पर्धेत प्रथम
- कृष्णकांत साळवी, चंद्रकांत कांबळे, रवींद्र साळुंखे, पूजा जोशी, प्रकाश ठीक व नंदकुमार भारती – राज्य नाट्य व औद्योगिक कामगार स्पर्धेत उत्कृष्ट अभिनय व उत्कृष्ट नेपथ्याचा पुरस्कार
- आधार फाउंडेशन – महिला, बाल, युवक, अनाथ, अपंग, मतिमंद, वयोवृद्ध, यांच्यासाठी उपक्रम. आरोग्य, पर्यावरण, शेती, स्वयंरोजगार, प्रशिक्षण आदी उपक्रम
- शिवप्रसाद महाजनी फाउंडेशन – वैद्यकीय उपकरणे एक रुपयात उपलब्ध करून देणे, जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी १० रुपयांत तीन पोळ्या आणि भाजी, कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आदी उपक्रम.
-
डॉ. श्रीविजय फडके – न्यूरोसर्जरीत सुवर्णपदक मिळवून मायभूमी रत्नागिरीत येऊन २०१९मध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयात न्यूरोसर्जन म्हणून रुजू. एका दिवसाच्या बाळावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी. त्याशिवाय अनेक शस्त्रक्रिया यशस्वी. विविध भाषांवर प्रभुत्व.
-
अनिकेत कोनकर – पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य. ‘बाइट्स ऑफ इंडिया’ या पॉझिटिव्ह मीडिया पोर्टलचे संपादक.
(संकल्प कला मंचाच्या २०१८च्या कार्यक्रमाची बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)