Ad will apear here
Next
आठवण पावसाळी दिवाळीची!


यंदा राज्यात अनेक ठिकाणी दिवाळीच्या पहिल्या दोन दिवसांत प्रचंड पाऊस पडला. आता पाऊस ओसरला असला, तरी वातावरण पावसाळीच आहे. अशाच एका दिवाळीत अवचित आलेल्या पावसामुळे मुंबईतील चाळीत काय दाणादाण उडाली होती, याच्या आठवणी लिहिल्या आहेत अभय वैद्य यांनी..
.......... 
दिवाळी! दिवाळी! दिवाळी म्हटलं की डोळ्यांसमोर उभ्या राहतात त्या आठवणी. सुंदर, सुखद, आनंददायी अशा आठवणींची दिवाळी. देवाच्या कृपेने आजवर दुःखद आठवणींची दिवाळी कधीच आली नाही आणि येऊही नये, कोणाच्याही वाट्याला तशी दिवाळी येऊ नये हीच प्रार्थना.

माझ्या आठवणीतल्या दिवाळीपैकी एक दिवाळी कायम लक्षात राहिली, जिच्याबद्दल तुम्हालाही वाचावंसं वाटेल. साल नेमकं आठवत नाही; पण साधारण १९९६ किंवा १९९८ असेल. त्या दिवाळीची तयारी आम्ही वाडीतल्या मुलांनी साधारण महिनाभर आधीपासून सुरू केली होती. ध्येय होतं वाडीतल्या, चाळीतल्या सर्व घरांना एकसारखे कंदील लावायचे. थोडे-थोडके नाही, तब्बल दीडशे कंदील आणि त्याच्यासारखाच वाडीच्या पटांगणात एक भव्य मोठा कंदील लावायचं ध्येय ठरलं होतं; पण पैशांमुळे वाट वेडीवाकडी होती. मग सुरुवात झाली निधी जमवायला. वाडीत, चाळीत अडगळीचं, बेवारस पडलेलं सामान, भंगारात सत्कर्मी लावलं. सत्कर्मी अशासाठी, की त्या निमित्ताने वाडीची थोडी सफाई झाली, माळीमामांच्या कामाला थोडा हातभार लागला. तसंच वेगवेगळ्या धातूचे भाव, त्यांचं महत्त्व त्या निमित्ताने थोडे दिवस पाठ राहिलं. आमचा हुरूप बघून तर रहिवासी आपापले भंगार, रद्दी आम्हाला देऊ लागले. काही स्वार्थी अपेक्षेने, तर काही उदार मनाने; पण आमचा हेतू स्वच्छ होता, म्हणून आम्हाला पाठिंबा होता. 

... तर असं उभं राहिलं कंदिलांचं भांडवल. आता करायची होती मेहनत. मग पुढचे सर्व दिवस ज्याला जेव्हा जमेल, जसं जमेल तसे कंदिलांसाठी दिले. रात्रीची जागरणं, कामं करताना चालणारी मजा-मस्ती या सार्वजनिक सुखाला तोड नाही. टिळकांनी सार्वजनिक दिवाळीचा घाट का नाही घातला कोणास ठाऊक. दिवस-रात्र एक करणारे आम्ही आणि आमच्या मागे वाडीतले सर्व रहिवासी. प्रत्येक जण जमेल तशी मदत करत होता. कसली म्हणजे कसली कमी राहिली नव्हती. आमच्या आनंदाचे रंग कंदिलात उतरत होते. 

शेवटी एकदाचा तो दिवस आला. चाळीतल्या सर्व दीडशे घरांना एकाच रंगाचे कंदील लागले. संपूर्ण वाडी एकाच रंगात न्हाऊन निघाली... आणि मध्यभागी त्याच रंगाचा भव्य कंदील २०० वॅटच्या तीन बल्बच्या प्रकाशाने उजळला. ती संपूर्ण रात्र कंदील बघण्यातच गेली. खऱ्या अर्थाने दिवाळीला सुरुवात झाली. 

ती लक्ष्मीपूजनाची रात्र होती, दिवाळीचा साधारण तिसरा दिवस. संध्याकाळच्या मुहूर्ताची पूजा आटपून साधारण रात्री आठ वाजता एक एक जण पटांगणात जमत होता. बाहेर जेवणाचा बेत होता. तेवढ्यात डोक्यावर, हातावर काही थेंब पडल्याचं जाणवलं. आधी वाटलं, की एखादा निशाचर वरून गेला असेल; पण काही क्षणातच मुसळधार आणि एकदम धो धो पाऊस पडायला सुरुवात झाली. भर दिवाळीत तेही नोव्हेंबर महिन्यात हे अनुभवायची पहिलीच वेळ होती. काय करावं सुचेच ना! पाऊस बघताना डोळ्यांत अश्रू येऊ लागले. कारण एवढ्या दिवसांच्या अथक मेहनतीने बनवलेला आमचा भव्य सार्वजनिक कंदील एक एक करून आपली वस्त्रे सोडत होता. त्याला भिजताना, चिंध्या होताना बघण्याशिवाय काही पर्याय नव्हता. त्या रात्री पहिल्यांदाच पाऊस नकोसा झाला होता. त्याच्या निखळणाऱ्या प्रत्येक पट्टीबरोबर हळहळ आणि निराशा व्यक्त होत होती. दर दोन मिनिटांना कोणी ना कोणी म्हणत होतं, ‘आता थांबला तरी चालेल, होईल परत तयार सकाळपर्यंत!’ पण कसलं काय, तो पुढचे काही तास बरसून आमच्या कंदिलाची दाणादाण उडवून गेला. आता राहिला होता तो सांगाडा आणि त्यावर लटकणाऱ्या आमच्या मेहनतीच्या चिंधड्या.

त्या रात्री झोप अशी लागलीच नाही; पण सकाळ झाली ती पुढच्या वर्षीच्या संकल्पाने. सकाळी सांगाडा उतरवताना सर्वांनी पण केला, की पुढच्या वर्षी कापडी कंदील बनवायचा. धन्य ती वाडी आणि धन्य ती चाळ, पॉझिटिव्हिटी शिकवायची. असो! अशी आहे माझ्या आठवणीतली दिवाळी. आणि हो साल आठवलं तर नक्की कळवा.

- अभय वैद्य
इंडियन एअरलाइन्स कॉलनी, कलिना, सांताक्रूझ इस्ट, मुंबई-२९
ई-मेल : abhayvaidya75@gmail.com

(आठवणीतली दिवाळी या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZSFCF
Similar Posts
आठवणी दिवाळीचा फराळ बनवण्याच्या... दिवाळीच्या आधी घरी फराळाचे पदार्थ तयार करण्याचा साग्रसंगीत सोहळा आता चाळिशीच्या आसपास असलेल्या मंडळींनी त्यांच्या बालपणी अनुभवला आहे. त्याबद्दलचे स्मरणरंजन केले आहे मुंबईतील सीए केदार साखरदांडे यांनी.... आठवणीतली दिवाळी या लेखमालेत...
बालपणीची रम्य दिवाळी! आपल्या ‘आठवणीतील दिवाळी’ किंवा ‘वेगळी दिवाळी’ याबद्दल लिहून पाठवण्याचे आवाहन ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने वाचकांना केले होते. त्यातील निवडक लेख आजपासून प्रसिद्ध करत आहोत. पहिला लेख आहे कळवा येथील सीमा मराठे यांचा. डोंबिवलीत बालपणी साजऱ्या केलेल्या दिवाळीच्या आठवणी त्यांनी लिहिल्या आहेत.
पोरबंदरमधल्या दिवाळीची आठवण काही कामानिमित्त पोरबंदरला गेलेल्या मनोहर जोगळेकर यांना दिवाळीच्या कालावधीतही तिथेच राहावे लागले होते. त्या वेळच्या आठवणी जागवणारा हा त्यांचा लेख...
आयुष्याचा ‘टर्निंग पॉइंट’ ठरलेली दिवाळी... दिवाळीत केलेला व्यवसाय हा आयुष्याचा ‘टर्निंग पॉइंट’ कसा ठरला, याबद्दल लिहीत आहेत बोरीवलीचे नितीन जोगळेकर...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language