‘करू या देशाटन’ सदराच्या आजच्या भागात आपण माहिती घेऊ या दक्षिण मुंबईतील विविध बाजारांची. त्यात मनीष मार्केटपासून बुक स्ट्रीटपर्यंत आणि चोरबाजारापासून जव्हेरी बाजारापर्यंतच्या विविध बाजारांचा आणि परिसरातील मंदिरांचा समावेश आहे. ..........
खरेदी हा पर्यटनातील भाग असतो. बऱ्याचदा अशी खरेदी प्रवासाची आठवण म्हणून केली जाते. मुंबईमध्ये गेल्यावर अशी खरेदी होतेच. अशी खरेदी करण्याची ठिकाणे कोणती आहेत, याची माहिती घेऊ या. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. येथून देश-विदेशात व्यापार चालतो. मुंबई व उपनगरांत अनेक कारखाने आहेत. रेल्वे, जलमार्गामुळे देश-विदेशातून हरतऱ्हेच्या मालाची आयात व निर्यात सतत चालू असते. त्यामुळे सहाजिकच येथे घाऊक व किरकोळ विक्रीचे बाजार उभे राहिले. भाविक धनिक व्यापाऱ्यांनी या परिसरात काही मंदिरेही उभी केली. कापड कारखानदारीमुळे कापडाच्या बाजारपेठा भरपूर आहेत. दागदागिन्यांचे बाजारही आहेत. धान्य बाजार, मासळी बाजार, हार्डवेअर, नॉव्हेल्टी मिळण्याची ठिकाणेही आहेत. चोर बाजारही आहे.
बुक स्ट्रीट : फोर्ट भागामध्ये फ्लोरा फाउंटन आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस (व्हिक्टोरिया टर्मिनस) रेल्वे स्टेशन यादरम्यान फुटपाथवर पुस्तकविक्रेते दिसतील. एखाद्या चांगल्या दुकानात मिळाणार नाहीत अशी पुस्तके येथे मिळतात. हे विक्रेते खूप जाणकार आहेत आणि माहितीदेखील देतात. घरात अनेक वर्षे धूळ खात पडलेली पुस्तके रद्दीतून हे गोळा करतात. तसेच दुकानातून विकली न गेलेली पण, जागा अडवून ठेवलेली पुस्तके हे विक्रेते कमी किमतीत विकत घेतात आणि येथे विकतात. तुमच्या मनात असलेले पण दुकानात न मिळणारे पुस्तकही येथे मिळून जाते. नानाविध विषयांची पुस्तके येथे मिळतात.
मनीष मार्केट : मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसजवळील मनीष मार्केटमध्ये कमी दरात इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळतात. या बाजारात जुन्या सेकंडहँड मोबाइलपासून ते नवीन आयफोनपर्यंत सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू विकल्या जातात. पूर्वी तस्करीच्या वस्तू येथे मिळत असत. त्याची जागा आता चायना मेड वस्तूंनी घेतली आहे. पूर्वीच्या टेपरेकॉर्डर, ट्रान्झिस्टर या गोष्टींची जागा आता इलेक्ट्रॉनिक वस्तूंनी घेतली आहे. आता पेनड्राइव्ह, कम्प्युटर्सही विक्रीला ठेवलेले दिसतात; मात्र खरेदी करताना सावधानता बाळगावी. वस्तूंची मांडणी इतक्या सुंदर तऱ्हेने केलेली असते, की बघणारा एकदम मोहित होतो.
भेंडी बाजार : क्रॉफर्ड मार्केटला लागून असलेल्या एका रस्त्याचा उल्लेख इंग्रजांच्या काळात ‘बीहाइंड द बाजार’ असा होत असे. त्याचाच अपभ्रंश भेंडी बाजार असा झाला असावा, असे म्हणतात. हा बाजार साधारण १५० ते २०० वर्षे जुना आहे. काहींच्या मते, या भागात इंग्रजांनी किल्ला बांधायच्या अगोदर पूर्वीच्या काळी भेंडीची शेती होती. म्हणून याला भेंडी बाजार हे नाव पडले असावे. मुंबईमध्ये व्यापार व उद्योग सुरू झाल्यावर सुरुवातीला या भागात खोजा व बोहरा समाजाच्या लोकांची वस्ती वाढली. त्या वेळी तांदूळ, गहू या धान्यांचा घाऊक बाजार होता. धान्याच्या व्यापाराबरोबर या ठिकाणी कपड्यांचाही व्यापार सुरू झाला. सध्या या भागात पुनर्विकासाचे काम सुरू झाले असून, क्लस्टर विकासाअंतर्गत १७ एकर भागातील ३०० इमारती पाडून त्या जागी हाउसिंग कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार आहे. मॉल आणि डिपार्टमेंटल स्टोअरच्या जमान्यातही येथील बाजार आपले अस्तित्व टिकवून आहे.
मंगलदास मार्केट : साधारण दीडशे वर्षांपासून ‘कपड्यांचे होलसेल मार्केट’ म्हणून मंगलदास मार्केट प्रसिद्ध आहे. पूर्वी मुंबईची ओळख कापड गिरण्यांचे गाव म्हणून होती. अर्थात त्यामुळे कापडाचा मोठा घाऊक व्यापार सुरू झाला. मुंबईतील कापड गिरण्या (मिल) बंद झाल्यानंतर सिल्क, पॉलिस्टर अशा कापडांची व तयार कपड्यांची विक्री वाढली. उल्हासनगर व उपनगरात सिंधी लोकांमुळे रेडिमेड व्यवसायात वृद्धी झाली. येथून संपूर्ण भारतात तयार कपडे व कापड निर्यात होते. आता शिंप्याकडे कपडे शिवायला देण्याची प्रथा बंद होत चाललेली आहे. जीन्ससारखे कापड व त्याचे काम करणारे कारागीर सर्वत्र उपलब्ध नाहीत. त्यामुळे तरुणाईला आकर्षित करणारे जीन्सचे कपडे येथे होलसेल आणि किरकोळ विक्रेत्याकडेही उपलब्ध होतात. सुटीच्या दिवशी येथे स्थानिक ग्राहक व बाहेरील व्यापाऱ्यांची गर्दी होते. श्यामलदास गांधी मार्गावर हे मार्केट आहे. क्रॉफर्ड मार्केटपासून मेमन स्ट्रीटवरून येथे जाता येते.
श्री सूर्यनारायण मंदिर : सीपी टँकच्या अगदी जवळच पांजरपोळ लेनच्या शेवटी हे सुंदर मंदिर आहे. सुमारे ११७ वर्षांपूर्वी हे मंदिर बांधण्यात आले. दक्षिण मुंबईतील भुलेश्वरच्या मध्यभागी लपलेल्या शहराच्या सर्वांत गर्दीच्या परिसरातील हे मंदिर फारसे परिचित नाही. सन १८९९मध्ये मुंबईचे दानशूर हरजीवन वासनजी मणियार यांना झालेला त्वचेचा आजार सूर्याची आराधना केल्यावर बरा झाला. म्हणुन त्यांनी हे सूर्यमंदिर बांधण्यास सुरुवात केली. त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नीने ते पूर्ण केले. या मंदिरात अनेक पौराणिक प्रसंगांची चित्रे ठेवली आहेत. तसेच ऋषीमुनींचे पुतळेही आहेत. आवर्जून बघावे असे हे मंदिर आहे.
श्री स्वामीनारायण मंदिर, भुलेश्वर : हे मंदिर स्वामीनारायण संप्रदायाचा एक भाग आहे. हे स्वामीनारायण मंदिर मुंबईच्या भुलेश्वर भागात आहे. सध्याच्या मंदिरात तिरंगी रचना आहे आणि लक्ष्मीनारायण देव, घन:श्याम महाराज, हरि कृष्ण महाराज, गौलोकविहारी आणि राधा यांच्या मूर्ती स्थापित केल्या आहेत. हे शिखरबंद मंदिर असून, लक्ष्मीनारायण देव गादी (वडताल) अंतर्गत येते. या मंदिरांमध्ये फुलांची जास्त मागणी असल्यामुळे फुले गल्ली (किंवा फुलांचा बाजार) येथे सुरू झाला.
हार्डवेअर बाजार : नळ बाजारासमोर, मटण स्ट्रीट, चिमणा बुचर स्ट्रीट व सैफी ज्युबिल स्ट्रीट या गल्ल्यांच्या तोंडावर हार्डवेअर बाजार आहे. तेथे सर्व प्रकारचे व आकाराचे खिळे, स्क्रू, हातोड्या, स्क्रू ड्रायव्हर्स, पाने (स्पॅनर), सुतार-लोहारांना लागणाऱ्या कात्र्या, करवती, छिन्नी, तराजू, साखळ्या (चेन्स), वजने, मापे, डंबेल्स, व्यायामशाळेतील लोखंडी सामान, रोलर स्केटिंग, सर्व प्रकारची छोटी छोटी चाके, नट-बोल्ट्स, रंगांचे ब्रश, विविध प्रकारच्या स्प्रिंग्ज, बाथरूम फिटिंग्ज आदी सामान मिळते.
चोर बाजार : मुंबईतील कामठीपुरा येथील भेंडीबाजाराजवळ भारतातील सर्वांत मोठा कबाडी बाजार आहे. खरे तर येथील व्यापारी आपल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी ग्राहकांना ओरडून बोलावत, तसेच वस्तूची जाहिरातही करत असत. एकदा व्हाइसरॉय सँडहर्स्ट रस्त्यावरून जात होते. त्या वेळी ‘रास्ते का माल सस्ते में,’ असे तार स्वरात ओरडत माल विकणाऱ्या फेरीवाल्यांचा (काबाडी लोकांचा) आवाज त्यांच्या कानी पडला. तेव्हा व्हाइसरॉयनी फेरीवाल्यांच्या आवाजाला त्रासिकपणे ‘क्या शोर बाजार है’ असे म्हणून नाक मुरडले होते. त्यावरून त्या जुन्या बाजाराचे नाव ‘शोर बाजार’ पडले. लोकांनी त्याचा ‘चोर बाजार’ असा अपभ्रंश केला. बाजाराच्या नावाच्या संबंधी आणखी एक कथा प्रचलित आहे. त्यानुसार, एक व्हायोलिन आणि राणी व्हिक्टोरियाचे अन्य काही सामान तिच्या मुंबईच्या भेटीदरम्यान तिच्या जहाजातून उतरून जात असताना बेपत्ता झाले होते आणि नंतर त्यांना ‘चोर’बाजारात विक्रीसाठी ठेवलेले सापडले होते.
हा परिसर मुंबईच्या पर्यटकांच्या आकर्षणांपैकी एक आहे. मुंबईतील लोक गमतीने म्हणतात, ‘तुमच्याकडे चोरी झाली का? मग चोर बाजारात जा. कदाचित तुम्हाला तेथे सापडेल.’ येथे गाड्यांचे स्पेअर पार्टस्, व्हिक्टोरियन फर्निचर, जुन्या-पुराण्या मूर्ती, अँटिक वस्तू, नक्षीकाम केलेली दारे, इलेट्रॉनिक वस्तू, बाजरभावापेक्षा कमी दरात मिळतात.
भुलेश्वर मंदिर : हे मंदिर सुमारे ६५० वर्षांपूर्वीचे आहे. बाहेरून अत्यंत साधे दिसणारे मंदिर खूपच छान आहे. प्रचलित कथेनुसार, असे सांगितले जाते, की शिव भोला नावाच्या मच्छिमाराच्या स्वप्नात शिवशंकर आले आणि त्यांनी शिवलिंगाचा शोध घेण्यास सांगितले. त्यानुसार त्याने शोध घेतला व लिंग सापडले; पण प्रयत्न करूनही ते पूर्ण बाहेर काढता आले नाही. अखेर तेथेच पूजा-अर्चा सुरू करण्यात आली व त्या जागेवर मंदिर बांधण्यात आले. शिवभक्त भोलाच्या नावावरूनच भुलेश्वर असे नाव पडले. मंदिराच्या मुख्य दरवाजाच्या वर नगारखाना बांधला असून, तेथे सकाळी नगारा व शहनाईचे वादन सुरू असते. मंदिर परिसरात भगवान गणेश, जलाराम, हनुमान, काळभैरव आणि जुने वटवृक्ष अशी मंदिरे आहेत.
जव्हेरी बाजार : भुलेश्वर भागात मंगलदास मार्केटजवळ श्यामलदास गांधी रोडच्या उत्तरेला हा बाजार आहे. हा सुवर्णबाजार भारतात प्रसिद्ध आहे. साधारण १८६४च्या सुमारास हे सोने व्यापाराचे ठिकाण झाले. या वेळी अनेक पेढ्या येथे आल्या. सर्व प्रकारची रत्ने व मौल्यवान दगड या बाजारात उपलब्ध आहेत. रत्न आणि मौल्यवान धातूपासून बनवलेल्या आधुनिक डिझाइनचे, पारंपरिक भारतीय डिझाइनचे दागिने खरेदीसाठी जव्हेरी बाजार सुरक्षित असल्याचे मानले जाते. महागड्या धातूंनी बनवलेल्या फोटो फ्रेम, क्लिप्स, चहाचे सेट्स, डिनरवेअर, खेळणी आणि इतर लक्झरी जीवनशैलीच्या वस्तूंसाठीदेखील प्रसिद्ध आहे. येथून हिरे-रत्ने यांची निर्यातही होते.
जमादार बापू लक्ष्मण स्मारक : ज्यांचे नाव ऐकले, की मुंबईच्या स्मगलर्सना धडकी भरायची, असे जमादार बापू लामखडे यांचे स्मारक बॅलार्ड पियर भागात आहे. त्यांनी एका चिनी प्रवाशाच्या गुप्तांगातून दडवून आणलेले सोने पकडून मोठी खळबळ उडवून दिली. स्मगलिंगच्या जगातील ही पहिलीच अनोखी घटना होती. बापूंनी कुठल्याही खबरीशीवाय केवळ आपल्या तीक्ष्ण निरीक्षणाच्या व दीर्घ अनुभवाच्या जोरावर तस्करीची अनेक प्रकरणे उघडकीस आणली होती. त्यांच्या कामगिरीबद्दल सरकारतर्फे त्यांचे स्मारक उभे करण्यात आले आहे.
कसे जाल भुलेश्वर परिसरात?
हा परिसर छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून जवळ आहे. मुंबईमध्ये खरेदी करण्यासाठी भरपूर ठिकाणे आहेत; पण पूर्वपार चालत असलेले बाजार या भागात एकवटले आहेत. त्यामुळे येथे निवडीला संधी आहे. किमतीमध्ये घासाघीस करता येते.