Ad will apear here
Next
‘आकांत शांतीचा’... सामाजिक क्रांतीचा!
प्रशासकीय अधिकारी डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी लिहिलेल्या कवितांचा ‘आकांत शांतीचा’ हा कवितासंग्रह अलीकडेच आदित्य प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. डॉ. भापकरांच्या या काव्यसंग्रहातून सौंदर्यपूर्ण काव्याने ओतप्रोत असलेल्या शब्दांची शृंखला उलगडत जाते. या काव्यसंग्रहाबद्दल...
..............                                
महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या प्रशासनातील अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी मराठी साहित्यात रुची दाखविली आहे. ही परंपरा सेतुमाधवराव पगडी यांच्यापासून आहे. विश्वास पाटील, भारत सासणे, लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. पुरुषोत्तम भापकर, दिलीप पांढरपट्टे यांच्यापर्यंत ही परंपरा आजही पुढे चाललेली आहे; ललित साहित्यातील कविता हा प्रकार ज्याला अवगत झाला त्यावर ईश्वराचे वरदान असते. डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना हेच वरदान लाभलेले आहे. कवितेने त्यांना आपल्या बाहुपाशात जखडून घेतलेले आहे. त्यामुळे प्रशासकीय कामाचा कितीही ताणतणाव असला, तरी तो सकारात्मकपणे घेऊन त्या तणावासोबत सहजतेने खंबीरपणे आणि विचलित न होता जगण्याची कला कविता शिकविते. 

अलीकडेच डॉ. पुरुषोत्तम भापकर यांचा ‘आकांत शांतीचा’ हा काव्यसंग्रह आदित्य प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. माणसाच्या मनात सतत घोंघावत असलेले भावनांचे वादळ, जगताना आलेले बरे-वाईट अनुभव, अंतर्मनातली शांती, सुखं-दुःखाची अनुभूती प्रत्येकाला येतच असते. यामुळे मनाची घालमेल सातत्याने भोगावी लागणारी बेचैनी प्रत्येकाला अधीर करत असते. शब्दांची ही शृंखला जी कविता म्हटली जाते, ती कोणत्याही सौंदर्यपूर्ण सुवर्णशृंखलेपेक्षा अत्यंत सुंदर असते. पुरुषोत्तम भापकरांच्या या काव्यसंग्रहातून अशाच सौंदर्यपूर्ण काव्याने ओतप्रोत असलेल्या शब्दांची शृंखला उलगडत जाते. 

‘आकांत शांतीचा’ या काव्यसंग्रहात ६७ कवितांचा आलेख आहे. पुरुषोत्तम भापकर हे शेतकरी कुटुंबातील आहेत. ग्रामीण जीवनाशी, तिथल्या अडीअडचणींशी आणि तिथल्या संस्कृतीशी त्यांची नाळ घट्ट जोडली गेलेली आहे. शेती, माती, शिवार, राने, बांध, विहीर, पाणी, पिके याचबरोबर दुष्काळ, टंचाई, मेहनत, मजुरी, कष्ट यांच्याशी त्यांचा आत्यंतिक संबंध आहे. प्रशासनातील उच्चपदी आरूढ झालेले असले, तरी त्यांचे पाय मातीवर असल्याच्या खुणा त्यांच्या कवितेतून पावलोपावली जाणवतात -
 
कसा लहरी लहरी पाऊस
झाला शहरी शहरी पाऊस
 
अशा शब्दांत ते पावसाच्या लहरीपणाबद्धल लिहिताना दिसतात. शेतकरी कुटुंबातील असल्याने पाऊस आणि पाणी हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. ‘पाणी पेटत आहे, पाणी पेटत आहे,’ या कवितेत ते लिहितात -
 
पाणी कसं पेटलं, मरण भेटलं
रात्र वैऱ्याची नाना, राशन कसं आटलं
 
उन्ह तापत आहे. आग ओकत आहे 
पुनवेच्या चंद्रालाही, ग्रहण भेटत आहे
 
प्रत्येकावर या मातीचे, या धरणीचे ऋण आहेत. बळीराजा आणि धरणीचे नाते यावर वेगळे बोलण्याची गरजच नसते. शेतकरी नेहमीच या धरणीला समृद्ध आणि तृप्त करण्यासाठी सातत्याने झटत असतो. काळ्या आईची सेवा करण्यात तो धन्यता मानत असतो. धरणीच्या सर्जनशीलतेचे गुण अंगीकारताना कवी म्हणतो -
 
जे जे हवे तुज, ते ते माझ्याकडून घे 
तृषार्त या धरतीला, अर्घ्य पावसाचे दे 
मी तुला कर्म देतो, तू मला धर्म दे 
तुझे वर्म तुलाच बहाल, मला मात्र मर्म दे
 
माणूस कोणत्याही जागतिक स्तरावरील मोठ्या आणि देखण्या महानगरात स्थलांतरित झाला, तरी त्याचे स्वत:चे गाव, त्यातली माती नेहमीच साद देत असते. मग त्यात तो ग्रामीण भाग असेल, तर मग विचारायलाच नको. खेड्यातील वेस, शिवार, लहान लहान घरे, कच्चे-पक्के रस्ते, नाले, ओढे, नद्या, विहिरी, पाण्याचे खळखळत वाहणारे पाट, चिंच, आंमबा, बोरी, बाभळीची झाडे, सूरपारंब्या, ओढ्यातले पोहणे, दगडाने टिपलेल्या चिंचा आणि कैऱ्या हे कायमच ग्रामीण भागात वाढलेल्या प्रत्येकाला आठवत असतात. तो या साऱ्यांच्या सान्निध्यात आला, की आईच्या कुशीत आल्याची अनुभूती होते. या साऱ्या गोष्टी त्याच्या मनाच्या विशेष कप्प्यात कायमस्वरूपी ठाण मांडून बसलेल्या असतात. या गोष्टीच्या सान्निध्यात तो मोकळा श्वास घेतो, प्रफुल्लित होतो. या घटनेचा स्पर्श अनुभवायला तो आसुसलेला असतो. 
 
कवी पुरुषोत्तम भापकरांनाही अशीच नैसर्गिक ओढ आहे, आपल्या गावाची, तिथल्या राना-माळाची आणि डोंगर-दऱ्यांचीही.. ‘जलश्री’ या कवितेतून व्यक्त होताना ते म्हणतात -
 
आहेत मोठी मोठी झाडं 
भासे जणू काही पहाड 
गोड माझे त्यात घर 
गावकुसाच्या पल्याड
 
प्रकाशाने उघडले दार
घातला मुकुट डोईवर 
भार मोहराचा आसमंती 
नव्हता कधीही उजाड
 
माणसाच्या जीवनात खूप चढ-उतार येतात. यातून कुणीही सुटलेला नाही. प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावाच लागतो. खरे तर जीवनातील सामान्य आयुष्य जगताना प्रत्येक जण भविष्यात येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्याची तयारीच करीत असतो. ज्याप्रमाणे वर्षभर आपण अभ्यास करून, वार्षिक परीक्षेची तयारी करीत असतो, त्याचप्रमाणे जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटाचा मुकाबला करण्यासाठी, आपण तयारीच करीत असतो. न डगमगता, न बावचळता, खंबीरपणे विपरीत स्थिती हाताळणे आणि यश किंवा अपयश काहीही मिळाले, तरी ते स्वीकारणे, हेच यशस्वी जीवनाचे गमक आहे. फक्त कोणतेही वादळ आले, तरी आपला धीर सुटता कामा नये हे महत्त्वाचे. जीवनातील याच विविध वादळांवर भाष्य करताना कवी म्हणतो -
 
उठतात ही वादळे 
बसतात ही वादळे 
शेवटी मात्र स्तब्ध, शांत 
होतात ही वादळे
 
काही असतात पेल्यातली 
काही मात्र काळजातली 
कशीही असली तरी 
जीव घेतात ही वादळे
 
डॉ. पुरुषोत्तम भापकर हे शेतीनिष्ठ असल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यात मानला आणि पुजला जाणारा विठ्ठल त्यांना आत्मिक बळ देतो, अशी त्यांची धारणा आहे. वारी, वारकरी, टाळ, मृदंग, दिंडी, पालखी यांचं गारूड त्यांच्या मनावर आहे. आपल्या साऱ्या कष्टाचं मोल विठोबाच देणार आहे आणि संकटावर मातही विठोबाच्या कृपेनेच होते हे ते मानतात. तुकोबा, ज्ञानोबा, जनाईचे विचार त्यांनी आत्मसात केले आहेत. विठ्ठलाबरोबरच आई जगदंबेवर त्यांची श्रद्धा आहे. जिजाऊ, अहिल्या, लक्ष्मीबाई, तारामती, शिवबा सावित्री, यांचे त्यांच्यावर संस्कार आहेत, तर संत तुकडोजी महाराज, महात्मा गांधींच्या विचारांची शिदोरी त्यांच्यासोबत सतत आहे. याच भावना व्यक्त करताना ते म्हणतात -
 
लागुनि गेली पहा तुकयाची आस 
मऊ मेणाहुनि आम्ही विष्णुदास 
म्हणे कठीण वज्रास भेटू या खास
 
जिजाऊ आणि अहिल्या 
राणी लक्ष्मीच्या तलवारीस 
रणथोर तारामती, वंदू सावित्रीस 
आणि महिषासुरमर्दिनीस
 
महाराष्ट्रातील बहुतांश कास्तकऱ्यांची कुलस्वामिनी, कुलदैवत आई भवानी आहे, त्याच आई भवानीचा जोगवा मागताना कवी म्हणतो – 

आई भिडली आकाशाला, रंग केला त्याचा भगवा 
जोगवा जोगवा मागतो आईचा जोगवा 
 
त्वेषाने उपसली तलवार, केले पाठोपाठ वार
जुलमाला काळे पाणी, कुणी तहान त्याची भागवा
 
जेव्हा लढली माय, असुराची नाही गय
भक्तांना कसले भय, उर्मी त्यांची जागवा
 
सश्रद्ध असलेला हा कवी हीच प्रेरणा घेऊन समाजातील अनिष्ट रूढी-परंपरा, दोष, विषमता नष्ट करण्यासाठी सज्ज होतो. समाजातील बेबंदशाही, झोटिंगशाही आणि बजबजपुरीवर ते आपल्या कवितेच्या माध्यमातून आणि वैयक्तिक जीवनशैलीतून प्रहार करताना दिसतात. या व्यवस्थेशी मुकाबला करताना ते स्वत:ला झोकून देताना म्हणतात -
 
छिन्न -विछिन्न झालो तरी 
दिले शिर उखळात 
झेलतो मी आव्हानास 
श्वापदांच्या कळपात

त्यांची ही लढाई स्वत:साठी नाही, तर समाजात सुव्यस्था राहावी, शांती नांदावी यासाठी आहे, भ्रष्ट समाजव्यस्थेवर वार करताना ते म्हणतात -

राखणदाराची भरली तिजोरी
केली त्यानेच पहिली चोरी 
माहीत कुणालाच नव्हते जरी 
कुणाच्या जाई कोण खांद्यावरी
नाग काही पुढे डोलत होते 
जहरीले काही बिळात होते 
खेळून झाले पुंगीच्या पुढे 
माया सारी गिळत होते
 
परंतु हे इतके सोपे नाही. पावलो-पावली संघर्ष आहे, अवहेलना आणि बदनामी आहे. चोहीकडे जणू वणवाच पेटलेला आहे, भयाचे वातावरण आहे. तरीही अशा विपरीत परिस्थितीला सामोरे जावयाचे बळ कवीला कवितेने दिले आहे, त्याच्या श्रद्धेने दिले आहे, त्याच्यावरील संस्कारांनी दिले आहे, त्याच्या विचारांनी दिले आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्याच्या आचरणाने त्याचे पाय अधिक मजबूत केले आहेत. तो अतिशय निर्भीडपणे साऱ्यांना तोंड देतो. प्रसंगी छातीवर वार झेलतो, पण हत्यार टाकत नाही. आपला धीर सांडू देत नाही, आपला दृढनिश्चय तो ढळू देत नाही. तो अविरत आणि अखंडपणे मुकाबला करतो आणि यशापयशाची तमा न बाळगता आपले पाय रोखून खंबीरपणे उभा ठाकतो,आपल्यातला आत्मविश्वास, आपली जिद्ध, आपल्यातला कणखरपणा तो पणास लावतो. खरे तर हे सारे अत्यंत कठीण आहे. सामान्य माणूस एखाद्या लहानशा वादळानेही भेदरतो. आपले सामर्थ्य हरवून गलितगात्र होतो; पण कवीची जिद्ध, त्याचा निर्धार वाखाणण्याजोगा आहे. तो म्हणतो -
 
रेंगाळलो तिथं मी 
रेंगाळलो इथं मी 
कसला हिशेब घेता 
रक्ताळळो इथं मी

दया, फटका, हरामखोरी 
नाकाम व्यभिचारी मुजोरी 
संगतीत श्वापदांच्या 
माणसाळलो इथं मी

कवीचा हा आत्मविश्वास पाहा -
 
विश्वास मला या विश्वाला मी तारी
आज मी घेतो नवी भरारी 
माझ्या रक्तास मातीचा गंध 
शरीरात दाटले बंध 
राष्ट्रप्रेमाने झालो मी धुंद 
कामात शोधतो राम 
घामास मानिला धर्म 
घडवितो बाणा असा करारी
 
माणसाच्या लिहिण्यात, बोलण्यात आणि वागण्यात सुसूत्रता आणि एकसारखेपणा असला, की त्याच्या कर्तृत्वाला वेगळीच झळाळी लाभते. माणसाचे ध्येय, त्याचे उद्दिष्ट, त्याचे धोरण, त्याचा हेतू त्याच्या डोळ्यापुढे स्पष्ट असले, की त्याचा मार्ग सहज होतो. मग त्यात कितीही अडचणी किंवा संकटे आली, तरी रस्ता म्हटला की खाच-खळगे येणारच. आडवळणे, चढ-उतार येणारच. कोणताही रस्ता केवळ सपाट आणि सरळ रेषेतच जाणारा कधीच नसतो; पण आपले उद्दिष्ट स्पष्ट असल्यास त्यावर मार्गक्रमण करणे सोपे जाते. कवीने आपल्या जीवनाचा मार्ग ठरविलेला आहे आणि तो त्यावर यशस्वीपणे वाटचाल करताना दिसतो. इतकेच नव्हे, तर या मार्गावर आपल्या पाऊलखुणा उमटवताना कवी इतरांना या मार्गावर चालताना पथदर्शी खाणा-खुणा ठेवत यशाचा मार्ग अधोरेखित करत जातो. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सज्ज होताना कवी म्हणतो -
 
भेदुनिया गगनाला
रणशिंग फुंकले मी 
वर्षाव उल्कापाताचे 
भालेच फेकले मी
 छेदुनिया लक्ष्याला 
चक्रव्यूह भेदले मी 
अन्याय अत्याचार 
हेच भक्ष्य शोधले मी
 
ही लढाई सतत चालणारी आहे. रावणाच्या शिराप्रमाणे एक धड वेगळे केले, तर त्या ठिकाणी दुसरे येते, अशा प्रकारे समाजातले अन्याय-अत्याचार वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या प्रकारे आपली डोकी वर काढीत असतात. त्यांना दाबण्यासाठी, ठेचण्यासाठी भापकरसाहेबांसारखा प्रशासकच लागतो. असा हा प्रशासक कविमनाचा असल्याने त्याच्या हातून काहीतरी विधायकच घडतं. कवी जसा जगतो, जे अनुभवतो आणि जी अनुभूती त्याला येते, ती बऱ्याचदा त्याच्या कवितेतून प्रकट होते. डॉ. पुरुषोत्तम भापकर या कवीच्या शब्दकळा अत्यंत भावपूर्ण, चेतनाबद्ध, निर्मळ आणि सौंदर्यपूर्ण आहेत.  ते आपल्या कवितेतून जितक्या गंभीरपणे समाजाची काळी बाजू मांडतात, तितक्याच नाजूकपणे ते प्रेम, प्रीती, सौंदर्याबाबत, निसर्गाबाबत, पशु -पक्ष्यांबाबत, पाऊस -पाण्याबाबत सजगतेने शब्द इमले बांधतात. माणसाच्या आयुष्यात प्रेमाइतकी शुद्ध, देखणी आणि अमूल्य गोष्टच नाही. प्रेमाशिवाय माणूस म्हणजे आत्म्याशिवाय शरीर. प्रेम, श्रृंगार, तक्रार, रुसवा, दुरावा, प्रणय, जवळीकता, विरह आणि आपलेपणाने नटलेल्या प्रेमाच्या विविध छटा प्रेमभावनेला अधिक सुंदर आणि मोहक बनवितात. या काव्यसंग्रहातून प्रेमाची विविध रूपे अनुभवायला मिळतात. ते प्रेम, प्रेयसी, प्रणय, लावण्य, सौंदर्य, मीलन आणि दुराव्याबाबत संवेदनशीलतेने शब्द उतरवत जातात. ते जितक्या सहजतेने निसर्गकविता लिहितात, तितक्याच तत्परतेने ठसकेबाज लावणी लिहितात, जी महाराष्ट्राच्या लोककलेची परंपरा आहे. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपताना ते एकीकडे लावणी, गवळण, तर दुसरीकडे अभंग, भक्तिगीत, दिंडीगीत आणि महाराष्ट्रगीत लिहितात. त्यांच्या लेखनात महाराष्ट्राबद्धलचे प्रेम, राष्ट्रभक्ती ओसंडून वाहताना दिसते. अनेक महापुरुषांकडून, राष्ट्रपिता आणि राष्ट्रसंताकडून त्यांनी तो वारसा घेतलेला आहे, असं त्यांच्या कवितेतून अधोरेखित होत जातं. प्रेम या हळुवार आणि सर्वोच्चसुंदर भावनेबद्दल बोलताना ते लिहितात -

भेट तुझी माझी झाली 
अशा निवांत वेळी 
सात जन्माची माझी पुण्याई 
फळाला आली
 
कवीच्या मनातली प्रिया प्रत्येकाच्या प्रियेचे रूप आहे. कवीच्या प्रेमाची भाषा प्रत्येक वाचकाला आपली भाषा, आपली भावना आणि आपली प्रीत वाटते. कवीच्या अशा कवितेतून वाचक आपल्या प्रेमाचा, आपल्या प्रेयसीचा शोध घेताना दिसतो -

सोसाट्याचा आला वारा, सुरू पावसाच्या धारा 
आठवणीने तुझ्या सखे, तन-मनाचा कोंडमारा 
पाहिले मी राणी तुला, डोळ्यामध्ये झाकाताना 
मिटलेल्या पापण्यात, पाझरल्या ग्रीष्मधारा 
 
किंवा 

निळ्या निळ्या डोळ्यांत, काळ्या काळ्या केसांत 
गोड गोड गालात गं, उंच उंच भालात
गोऱ्या गोऱ्या रंगात, नाजूक स्पर्शात गं
 
मंद मंद श्वासात, धुंद धुंद वासात
मोगऱ्याच्या गंधात गं तुला मी पाहिले
 
कवी म्हणतो -

असे कसे वेड तू लावलेस राजा 
हात काळजाला घातलास माझ्या 
अशी कशी वेळ तू सख्या साधलीस 
दिवा अंतरीचा जाळलास माझ्या
 
किंवा 

सखे तुझ्या सुगंधाचा गंध मी प्यालो 
दुभंगून जाता जाता अभंग मी झालो
 
हलके तू आवाज दिला, अंग मोहरून गेले 
गंध तुझे वेचताना, श्वास माझे फुलून गेले

श्रृंगाराची लावणी आपल्या ठसकेबाज शब्दात लिहिताना कवी म्हणतो -
 
चढविला लावण्याचा साज 
लाडक्या लावणीने आज 
गावभर झाली कुजबुज 
ज्याला त्याला घातली मोहिनी 
मला लावणी म्हणत्यात, कुणी मेहुणी

किंवा 

भुकेस माझ्या दिली सवड 
जिवाची जरी झाली परवड 
पूजिला होता पारंब्याचा वड
थोडं तरी लक्ष तुम्ही पुरवा ना 
सख्या, तुम्हा बरोबर फिरवा ना 
गोष्ट जुनी मज सांगा ना

एका लावणीत कवी म्हणतो -

केव्हाच झाली पहाट
फुटलं होतं तांबडं 
आरवलं नाही कसं
आज झोपलं होतं कोंबंड
थंडी गुलाबी बोचत होती 
सरकलं होतं घोंगडं 
हातात धरला, नाही सोडला 
सोडता सोडता अंगाखाली आला 
पदर माझा गं चुरगळला
 
यांसारख्या अनेक रचना या काव्यसंग्रहात विपुल प्रमाणात आढळतात. एकीकडे प्रेम आणि दुसरीकडे अध्यात्म. एखाद्या माणसावर आध्यात्मिक संस्कार असल्यास साहजिकच त्याच्या मनात कणव, माणुसकी, दया, सहनशीलता आणि प्रेमभाव ठासून भरलेला असतो. संवेदनशील माणसाला आध्यात्माची जोड असल्यास, त्याच्या प्रत्येक शब्दात विश्वास आणि मायेचा पाझर फुटताना दिसतो. 

कवीला विठ्ठलाचे वेड आहे, पालखी आणि दिंडीचे वेड आहे. अवघ्या महाराष्ट्राचे दैवत ज्याला समजले जाते, तो दीनदुबळ्यांचा, कास्तकऱ्यांचा, पीडितांचा विठ्ठल... विठोबा... पांडुरंग कवीच्या मनात अढळपद राखून आहे. कवीची त्याच्यावर असलेली खोल श्रद्धा कवीच्या कवितेतून, शब्दातून प्रकट होताना दिसते. त्यांना विठ्ठलाचा लळा आहे -

गंध लावी कपाळी
गळा तुळशीमाळा
राही रुक्मिणीशी साधा भोळा
पण साऱ्या भक्तांना लावला लळा

टाळ-मृदंगाच्या गजरात ते रमतात. वारकरी संप्रदायाशी त्यांची बांधिलकी आहे. विठ्ठल विठ्ठल करताना ते लिहितात -

विठ्ठल हरी, भवसागर तारी
माझा विठ्ठल मुरारी, भवसागर तारी
विठ्ठल हरी माझा रामकृष्ण हरी 
रामकृष्ण हरी, माझा रामकृष्ण हरी
 
वारीवर दिंडीभाष्य करताना ते म्हणतात -
 
‘दिंडी चाललीऽऽ दिंडी चाललीऽऽ
दिंडी चालली, वीणा बोलली 
टाळ मृदुंगाच्या संगे, चिपळी खेळली 
पावलाच्या तालावर, पताका डोलली 
राया विठोबाची माझ्या, कुंडलं हलली 
विठ्ठलाऽऽ विठ्ठलाऽऽ
विठ्ठलाऽऽ विठ्ठलाऽऽ
 
अध्यात्माची कास धरत भक्तिभावाने चिंब झालेला कवी विठ्ठलमय झाला आहे. तो म्हणतो –

अलंकापुरीचा घनःश्याम, शोधला राऊळी राम 
विठ्ठल त्याचे नाम, विठ्ठल त्याचे नाम 
ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानबा तुकाराम 
विठ्ठल विठ्ठल बोला, केशव माधव 
केशव माधव बोला, विठ्ठल राघव 
ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानबा तुकाराम
 
डॉ. पुरुषोत्तम भापकरांच्या काव्यसंग्रहातील शब्दकळा संयत, समतोल आहे, अन्यायाविरुद्ध त्यांना चीड आहे; पण त्यांच्या शब्दात आक्रस्ताळेपणा नाही. त्यांच्या बहुतेक साऱ्या कविता छंदात आहेत. नवखेपणाच्या काही खुणा त्यांच्या काव्यलेखनात असल्या तरी कविता आशयगर्भ आहे. प्रचंड कामाच्या राहाटगाडग्यातूनही ते कवितेसाठी वेळ काढतात, यावरूनच कवितेच्या बाबतीत ते किती गंभीर आहेत याची प्रचिती येते. छंदाचा, छंदोबद्ध कविता लेखनाचा थोडासा अभ्यास आणि सराव त्यांनी केल्यास भविष्यात त्यांच्या हातून अत्यंत चांगले सकस आणि आशयप्रचुर कवितांचे लेखन होईल, याची खात्री वाटते. कवितेत रमणारा हा उच्चपदस्थ अधिकारी कवितेचे ऋण मानतो. कामातून उद्भवत जाणारा ताणतणाव पराकोटीचा असला, तरी त्याचे विरेचन करताना ते कवितेचा आधार घेताना दिसता. मनातली घुसमट, मनातली आंदोलने स्तब्ध करण्यासाठी ते कवितेतून अभिव्यक्त होतात आणि मनातले चढउतार कवितेच्या शब्दांतून कागदावर उमटवतात. धकाधकीच्या जीवनात कवीला एकमेव अशा कवितेचा आधार असतो. डॉ. भापकरसाहेबांवर कामाचा जेवढा दबाव येतो, तेवढी त्यांची प्रतिभा, त्याची कविता फुलताना दिसते. अनेक भावगर्भ, मोहक आणि हृदयस्पर्शी कवितांचे लेखन त्यांच्या हातून भविष्यातही सातत्याने घडो, अशा सदिच्छा. 
 
कवितासंग्रह : आकांत शांतीचा
कवी : डॉ. पुरुषोत्तम भापकर
प्रकाशन : आदित्य प्रकाशन, औरंगाबाद
पृष्ठे : १०४
मूल्य : १०० ₹ 
संपर्क : (०२४०) २३५४५४२, ८०८७७ ३१८९८

(‘आकांत शांतीचा’ हा कवितासंग्रह ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. पुरुषोत्तम भापकर यांच्या काव्यसंग्रहांबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZZBBL
Similar Posts
वास्तवाला भिडणारी कविता सनदी अधिकारी असलेल्या डॉ. पुरुषोत्तम भापकर यांचे ‘चांदणं उन्हातलं’ आणि ‘आकांत शांतीचा’ हे दोन काव्यसंग्रह अलीकडेच आदित्य प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आले आहेत. या काव्यसंग्रहांची ही ओळख...
यशवंत संस्कृती : यशवंतराव चव्हाणांच्या व्यक्तित्वाचा बहुआयामी वेध ‘हिमालयाच्या मदतीला धावलेला सह्याद्री’ असे ज्यांचे यथार्थ वर्णन केले जाते, ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा आज (१२ मार्च) जन्मदिन. यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय करून देणारा ‘यशवंत संस्कृती : नेतृत्व आणि कर्तृत्व’ हा ग्रंथ विलास फुटाणे यांनी आदित्य प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित केला आहे
अर्थनीती आताच्या यांत्रिक युगात शिक्षणात विशेष प्रावीण्य असणे आवश्यक असते, तसेच कौशल्यानुसार काम करण्याची तयारीही ठेवावी लागते, असे सांगत भौतिक सुविधांच्या वापरासाठी अर्थप्राप्तीशिवाय पर्याय नसतो. यासाठी मिळकत, बचत व खर्च यांचे गणित कसे जुळवावे, याबद्दल डॉ. डी. एस. काटे यांनी ‘अर्थनीती’मधून मार्गदर्शन केले आहे
मौनाची गुपिते उलगडणारी आत्मकथा महानुभाव पंथाच्या बा. भो. शास्त्री यांचे ‘मार्गस्थ’ हे आत्मचरित्र औरंगाबादच्या आदित्य प्रकाशनाने दोन भागांत प्रकाशित केले आहे. ‘मार्गस्थ’ हा केवळ ‘स्व’चा शोध नाही, तो माणूसपणाचाही शोध ठरतो. महानुभावांनी अनुसरलेल्या ज्ञानमार्गाच्या वाटचालीची सद्यस्थिती त्यातून ध्यानात येते. एक उपदेशी, एक साधक, एक महंत कसा घडतो हे या आत्मकथेतून डोकावत राहते

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language