Ad will apear here
Next
‘आदिवासी कथा हे पुनर्कथनाचा अवकाश देणारे अभिजात साहित्य’
अतुल पेठे यांचे प्रतिपादन
‘जंगलाच्या सान्निध्यात उमललेले ज्ञान, आदिवासी बोधकथा - एक पुनर्कथन’ या पुस्तकाचे प्रकाशन  अतुल पेठे यांच्या हस्ते झाले. या वेळी (डावीकडून) सुहास परांजपे, प्रदीप प्रभू, अतुल पेठे, वाहरू सोनावणे व अरविंद पाटकर उपस्थित होते.

पुणे : ‘आदिवासींच्या कथा हे वेगळा अवकाश देणारे अभिजात साहित्य असून, त्या आपल्या जीवनात उर्जामय जादू निर्माण करतात;तसेच त्यांच्यामध्ये पुनर्कथन करण्याचा अवकाश आहे’, असे मत नाट्यकर्मी अतुल पेठे यांनी व्यक्त केले.

मनोविकास प्रकाशनातर्फे तयार केलेल्या, आदिवासी कथा, आदिवासींची चित्रे यांचे संकलन असलेल्या ‘जंगलाच्या सान्निध्यात उमललेले ज्ञान, आदिवासी बोधकथा - एक पुनर्कथन’, या पुस्तकाचे अतुल पेठे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्या वेळी ते बोलत होते. कवी वाहरू सोनावणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मनोविकास प्रकाशनाचे अरविंद पाटकर, आशिष पाटकर, लेखक प्रदीप प्रभू, सुहास परांजपे या वेळी उपस्थित होते.

आदिवासी पाड्यांवर पिढ्यानपिढ्या सांगण्यात येत असलेल्या आणि वारली चित्रांच्या माध्यमातून सांगितल्या जाणाऱ्या कथा संकलीत करून, प्रदीप प्रभू आणि शिराझ बलसारा यांनी ‘विस्डम फ्रॉम द वाईल्डरनेस’, या इंग्रजी पुस्तकाची निर्मिती केली होती. त्या पुस्तकाचे सुहास परांजपे व स्वातीजा मनोरमा यांनी पुनर्कथन केले असून, ‘जंगलाच्या सान्निध्यात उमललेले ज्ञान, आदिवासी बोधकथा - एक पुनर्कथन’, या नावाने ते मनोविकास प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आले.

पेठे म्हणाले, ‘आपल्या जगण्यातील उर्जामय जादू हरवली असल्याने, आपल्या साहित्यामधूनही ती हरवली आहे;मात्र आदिवासींच्या या कथा अद्भुत असून, त्यामुळे मराठी साहित्यामध्ये मोलाची भर पडली आहे. वृत्ती, वागणे आणि जगणे यांचा संगम असणाऱ्या या कथा सहआनंद देतात.’

‘जगण्याचा दृष्टीकोन बदलणाऱ्या, या कथा वनवासी नव्हे, तर आदिवासी आहेत. या कथांमध्ये पुनर्कथन करण्याचा अवकाश असून, आज हीच बहुपेडी संस्कृती गरजेची आहे’,असे पेठे म्हणाले.

या कथांवर लवकरच सुदर्शन रंगमंच येथे तीन दिवसांचा वाचन महोत्सव करणार असल्याचेही पेठे यांनी जाहीर केले.

वाहरू सोनावणे म्हणाले, ‘माणसासहित, प्राणी, पक्षी आणि अचेतन गोष्टी, या आदिवासी जीवनाचा भाग असून, त्या कथांमधून जगण्याचे एक मूल्य म्हणून पुढे येतात. एका बाजूला आदिवासींना माणूसपण नाकारले जाते आणि दुसऱ्या बाजूला आदिवासींच्या कथांना, प्रस्थापित सांस्कृतिक संदर्भ देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यापासून सावध राहिले पाहिजे.’

पाटकर यांनी चळवळी आणि कार्यकर्ते यांचा आढावा घेऊन, कार्यकर्त्यांना लिहिण्याचे आवाहन केले.

प्रभू म्हणाले, ‘आदिवासी संस्कृती, ही सहनिवास संकल्पनेवर आधारीत असून, त्याच प्रवाहात बोलल्या जाणाऱ्या कथा एकत्र करण्यात आल्या आहेत. पुढारलेल्या आदिवासींना मागास ठरविण्याचा प्रयत्न होत असून, आदिवासींनी ब्रिटीशांविरोधात लढाई केल्याच्या १०० घटना आहेत; मात्र त्याचे दस्तऐवजीकरण झाले नसल्याचेही प्रभू यांनी सांगितले.  

परांजपे म्हणाले, ‘आदिवासींचे जीवन, मूल्य, प्रेम आणि त्यांच्यावरील अत्याचार, याचे दर्शन म्हणजे या कथा आहेत. त्यांचा आशय भाषांतर करून ताकदीने उभा रहात नसल्यानेच, त्याचे पुनर्कथन केले आहे. त्यामुळे मराठी साहित्यात नवे दालन खुले झाले आहे.’ ‘या पुस्तकाची निर्मिती हे आव्हान होते’, असे परांजपे यांनी सांगितले.

मोहन देस यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZVABV
Similar Posts
मनोविकास प्रकाशनच्या वतीने ‘आटपाट देशातल्या गोष्टी’ पुस्तकाचे प्रकाशन पुणे : आयकर विभागाच्या धाडी आणि त्याच्याशी निगडीत किस्से आपण सर्वांनीच ऐकले आहेत आणि हे किस्से कायमच कुतूहलाचा विषय बनलेले आहेत. याविषयी आयकर विभागातील एक वरिष्ठ अधिकारी संग्राम गायकवाड यांनी लिहिलेल्या ‘आटपाट देशातल्या गोष्टी’ या कादंबरीचे प्रकाशन मनोविकास प्रकाशनच्या वतीने करण्यात येणार आहे.
‘माणसे हाच सकारात्मक ऊर्जेचा स्रोत’ आनंदी आणि उत्साही आयुष्य जगण्यासाठी सकारात्मक विचारांची ऊर्जा खूप गरजेची असते. म्हणूनच ‘बी पॉझिटिव्ह’ हे ब्रीदवाक्य घेऊन BytesofIndia.com हे पोर्टल सुरू करण्यात आले. जी माणसे यशस्वी झालेली असतात, ज्यांनी मोठे, वेगळे आणि चांगले काम करून दाखवलेले असते, त्यांच्यामध्ये सकारात्मकता हा समान धागा असतो. या
र. धों. कर्वे यांच्यावरील ‘समाजस्वास्थ’ नाटक ‘यू-ट्यूब’वर पुणे : तब्बल शतकभरापूर्वी देशात ज्या विषयाची चर्चादेखील वर्ज्य होती, अशा संततिनियमनासारख्या विषयावर जनजागृती करण्याचे महत्त्वाचे कार्य करणारे समाजसुधारक रघुनाथ धोंडो तथा र. धों. कर्वे यांच्यावरील ‘समाजस्वास्थ्य’ हे गाजलेले नाटक जुलै २०१८मध्ये ‘यू-ट्यूब’वर उपलब्ध करून देण्यात आले. त्या नाटकाला आतापर्यंत ११ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत
‘‘बालगंधर्व’शी माझं भावनिक नातं’ ‘रंगमंदिराच्या बोटाला धरूनच कलावंत मोठा होत असतो. तसंच माझं आहे. मी ‘बालगंधर्व’मध्ये भरपूर नाटकं बघितली. मी केलेल्या बहुतांश नाटकांचे प्रयोगही ‘बालगंधर्व’मध्ये झाले आहेत. ‘बालगंधर्व’मध्ये प्रयोग झाल्याशिवाय नाटक केल्यासारखंच वाटत नाही....’ ही भावना आहे ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे यांची... बालगंधर्व रंगमंदिराबद्दल

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language