कवयित्री शांता शेळके यांचा जन्मदिन १२ ऑक्टोबर. तसेच ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा जन्मदिन २६ ऑक्टोबर असतो. त्या निमित्ताने ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज पाहू या शांताबाईंनी लिहिलेली आणि हृदयनाथ यांनी संगीतबद्ध केलेली ‘ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा...’ ही कविता... ............
दिवाळी जवळ आलीय. अंतरीचा दिवा विझू न देणाऱ्या गोड आठवणी वर्षानुवर्षे आपण जपत असतो. बालपण, तारुण्य आणि प्रापंचिक जबाबदारीतून मुक्त होऊ पाहणारं प्रौढत्व, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरची दिवाळी असते अगदी निराळी! पण एक धागा मात्र तोच असतो, उत्साहाचा... आनंदाचा... रसिकतेनं आयुष्य भरभरून जगण्याचा! ही रसिकता व्यक्तिपरत्वे निराळी असू शकते. ती जपण्याचा आणि जोपासण्याचा प्रयत्नही निराळा असू शकतो. फराळाचा खमंग वास, करंजीच्या काठावरची नाजूक महिरप, चकलीच्या अंगावर सरसरून फुललेले काटे, गडद चॉकलेटी अनारशांवरची खसखस म्हणजे दिवाळी असं काहींना वाटतं, तर अंगणातल्या तेजाळणाऱ्या पणत्या आणि प्रत्येक ठिपक्यांना मनापासून जोडून विविध रंगांत रंगलेली रांगोळी म्हणजे दिवाळी असं काही जणांना वाटतं. दिवाळीनिमित्त जमलेल्या नातलगांचा, स्नेहीजनांचा अगत्यानं केलेला पाहुणचार म्हणजे दिवाळी असंही वाटतं आणि खरं सांगू, या सगळ्या गोष्टींबरोबर गाण्याची, काव्यवाचनाची मैफल जमवता आली तर ती खरीखुरी दिवाळी असं मला वाटतं.
दिवाळीच्या सुट्टीत एक दिवस तरी दूरवर निसर्गाच्या सान्निध्यात जायचं असा आमचा बेत असतोच... हिरव्यागार दाट झाडीतून जाणारी वाट, वाटेवरची फुलं, भिरभिरणारी फुलपाखरं न्याहाळताना संध्याकाळ कधी झाली ते कळलंच नाही. दूर क्षितिजापाशी लाल केशरी सूर्याचा गोळा पाहिला आणि शांताबाईंच्या कवितेची आठवण झाली.
ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा...
एखाद्या कवितेशी घट्ट नातं का जुळतं, याचं उत्तर प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकेल; पण माझं नातं मात्र जन्मोजन्मीचं, युगायुगांचं आहे असं वाटतं. बासरीचे अलवार सूर, त्या सुरांचं भारलेपण अधिकच मोहित करणारा आशाताईंचा मधुर स्वर आणि शांताबाईंचे स्वप्नाळू, हळुवार शब्द... व्हायोलिनचा गज (बो) आपल्या काळजावरूनच फिरतोय असा भास व्हावा, असं हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत. त्यांच्या गुरुस्थानी असलेल्या सलील चौधरी यांच्या संगीतरचनेचीही आठवण करून देणारं संगीत लाभलेली ही कविता.
ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा
माझ्या मनातला का तेथे असेल रावा...
१२ ऑक्टोबरला शांताबाईंचा जन्मदिन. काव्यरसिकांना अक्षर दिवाळी साजरी झाल्यासारखी वाटते. शांताबाईंचं हे भावगीत गाणाऱ्या आशाताईंचा आवाज आणि दिवसभर कानामनात हेच शब्द गुंजारव करत राहिले.
जेथे मिळे धरेला आभाळ वाकलेले
अस्ताचलास जेथे रविबिंब टेकलेले
जेथे खुळ्या ढगांनी रंगीन साज ल्यावा
माझ्या मनातला का तेथे असेल रावा?...
धरती आणि आकाश जिथं भेटल्यासारखं वाटतं ते क्षितिज आणि क्षितिजावर टेकलेलं मावळतीचं सूर्यबिंब... खुळ्या ढगांनी लाल कुसुंबी रंगाचा ल्यालेला साज... अशा सांजवेळी भेटेल का माझ्या स्वप्नातला रावा? व्वा! नयनमनोहर दृश्यात्मकता आणि अनामिक हुरहुर व्यक्त करणारी ही कविता... किती वेळा ऐकावी? खरं म्हणजे हा प्रश्न कवितेतल्या प्रश्नासारखाच कितीही वेळा ऐकला तरी ताजा टवटवीत आशाताईंच्या स्वरासारखा... माझ्या मनातला का तेथे असेल रावा ? शांताबाईंनी त्यांच्या अशा कवितांबद्दल म्हटलंय, ‘माझ्या खऱ्या भावभावना, तारुण्यसुलभ कोवळी हुरहुर आणि अनोखी स्वप्ने, निसर्गाची ओढ माझ्या कवितेतून प्रकट होण्याची धडपड करीत होती. या कवितांत भाबडेपणा होता तसा एक निर्मळ ताजेपणाही होता.’
पुणे आकाशवाणीवरून ‘मैफल शब्दसुरांची’ या कार्यक्रमात ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे यांच्याबरोबर शांताबाईंच्या अनेक स्मृती, त्यांच्या कविता आणि गाण्यासह जागवल्या, तेव्हा अरुणाताईंबरोबर मीही त्या मैफलीत हरवून गेले होते. अरुणाताईंच्या गप्पांचा निर्मळ झरा जरासा थांबवून अधूनमधून आम्ही शांताबाईंनी लिहिलेली गाणीही ऐकत होतो. त्यात भक्तिगीते, चित्रपटगीते, नाट्यगीते आणि भावगीतेही ऐकत होतो. तेव्हा आशाताईंच्या स्वरवाटेवरून शांताबाईंच्या ‘स्वप्नातला गाव’ श्रोत्यांबरोबर आम्ही दोघींनीही मनमुक्त अनुभवला.
स्वप्नामधील गावा स्वप्नामधून जावे
स्वप्नातल्या प्रियाला मनमुक्त गीत गावे
स्वप्नातल्या सुखाचा स्वप्नीच वेध घ्यावा
माझ्या मनातला का तेथे असेल रावा...
स्वप्न शब्दाच्या पुनरुक्तीनं कवयित्री आपल्याला घेऊन जाते अशा एका स्वप्नमय जगात, की वाटतं त्या स्वप्नातून जागं होऊच नये. प्रत्येक संवेदनशील व्यक्तीनं आयुष्यात अनुभवलेलं असतं असं एक स्वप्नमय जग... आणि माझ्यासारख्या एखाद्या भाग्यशाली व्यक्तीला भेटलेला असतो तो स्वप्नातला रावा! आणि मग हे सत्य म्हणू की स्वप्न, असं म्हणता म्हणता अवघं आयुष्य सुंदर होऊन जातं... अर्थात या सुंदर आयुष्यात सोबत असते स्वरांनी मोहरलेल्या कवितांची, शब्द-स्वरांचं वैभव मुक्त हस्ताने आपल्याला बहाल करून टाकणाऱ्या गीतकारांची, संगीतकारांची आणि गायक कलाकारांची!
शांताबाईंची ही तीन कडव्यांची मूळ कविता; पण ध्वनिमुद्रिकेत पहिल्या आणि तिसऱ्या कडव्याचा समावेश आहे. जे कडवं वगळलं त्यातील शब्द बघा,
घे साऊली उन्हाला कवळून बाहुपाशी
लागून ओढ वेडी, खग येती कोटरासी
एकेक चांदणीने नभदीप पाजळावा
माझ्या मनातला का तेथे असेल रावा...
उन्हाला कवळणारी सावली, घरट्याच्या ओढीनं परतणारे पक्षी, एकेका चांदणीनं पाजळणारा नभदीप या सर्व प्रतिमा म्हणजे कवयित्री शांता शेळके यांच्या काव्यप्रतिभेची उत्तुंग झेप! हे गीत ऐकताना मनाचं आभाळ भरून येतं... हो आभाळच... त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे भरून येणारं ते आभाळ असतं आणि निरभ्र ते आकाश असतं... शांताबाई, खरंच तुम्ही आम्हाला खूप आनंद दिला. तो भरभरून घेता यावा म्हणून आमची ओंजळ अधिकाधिक मोठी कशी करता येईल याचा आम्ही विचार करतोय... तुमचेच शब्द आठवतात...
प्रत्येक शब्दावरी माझा ठसा, माझा ठसा
हे शब्द माझा चेहरा, हे शब्द माझा आरसा
शब्दासवे मी जन्मले, शब्दासवे मी वाढले
हा शाप हे वरदान, हा दैवे दिलेला वारसा...
प्रत्येक शब्दावरी माझा ठसा, माझा ठसा...
शांताबाई तुमच्या शब्दांचा ठसा मराठी काव्यरसिकांच्या काळजावर उमटलेला आहे. हा ठसा मिरवण्यातच आम्ही हरवून जातो... आशाताईंच्या स्वरांनी तुमच्या शब्दांचं बोट धरलं आणि त्या निघाल्या स्वप्नातल्या वाटेवरून स्वप्नातल्या गावाकडं... भारल्यासारखे आम्हीही त्यांच्यामागून चालत राहतो आणि ऐकतच राहतो ती स्वरांनी मोहरलेली कविता, नभदीप पाजळणाऱ्या चांदणीची कविता... स्वप्नातल्या गावाकडं घेऊन जाणारी कविता...
ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा...
- डॉ. प्रतिमा जगताप
संपर्क : ९४२२२ ९२३८४
(लेखिका पुणे आकाशवाणी केंद्रातून वरिष्ठ उद्घोषिका म्हणून निवृत्त झाल्या आहेत.)
(कविता... स्वरांनी मोहरलेल्या या सदरातील लेखांचे पुस्तक आणि ई-बुक प्रसिद्ध करण्यात आले असून, ते बुकगंगा डॉट कॉमवर उपलब्ध आहे.)