Ad will apear here
Next
हमारी ही मुठ्ठी में आकाश सारा...


यजुर्वेंद्र महाजनजळगावच्या यजुर्वेंद्र महाजन या तरुणाने ग्रामीण भागातल्या मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार करण्याचं ध्येय ठेवून दीपस्तंभ ही संस्था सुरू केली आणि मोठं काम उभं केलं. पुढे अंध-अपंग मुला-मुलींसाठी ‘मनोबल’, ग्रामीण आदिवासी मुला-मुलींसाठी ‘गुरुकुल’ आणि निराधार वंचित मुला-मुलींसाठी ‘संजीवन’ अशा तीन संस्थाही त्याच्या कार्यातून उभ्या राहिल्या. त्याच्या या कार्यामुळे या मुलांमधून समाजासाठीचे अनेक दीपस्तंभ घडत आहेत. ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदरात आज पाहू या यजुर्वेंद्रच्या अनोख्या कार्याबद्दल...
..........
नाना पाटेकर दिग्दर्शित ‘प्रहार’ या चित्रपटातलं ‘हमारी ही मुठ्ठी में आकाश सारा, जब भी खुलेगी चमकेगा तारा....’ हे गाणं मंदार कुलकर्णी या कवीनं लिहिलं असून, लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी ते संगीतबद्ध केलं आहे. या गाण्याला आवाज दिलाय मन्ना डे आणि कविता कृष्णमूर्ती यांनी! मन्ना डेंच्या आवाजातलं गाणं ऐकताना जीव उचंबळून येतो. या गाण्याच्या वेळी, या प्रार्थनेच्या वेळी ग्रामीण भागातल्या शाळेतली गरीब मुलं समोर दिसत राहतात... आज हे गाणं, ही प्रार्थना आठवण्याचं कारण म्हणजे हे गाणं मी पुन्हा नव्यानं ऐकलं... पुन्हा मनात अनेकविध भावनांनी गर्दी केली. डोळे भरून आले. गाणं गात होती जळगावमधल्या ‘मनोबल’मधली मुलं-मुली! त्यांनी हात जोडलेले होते, डोळे मिटलेले होते, चेहऱ्यांवर एक प्रकारचा विश्वास, आशा, तेज दिसत होतं. या मुलांचं मनोबल वाढवणाऱ्या व्यक्तीकडे मी बघितलं... तो तरुण होता यजुर्वेंद्र महाजन!

ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले यांच्यासह

यजुर्वेंद्र महाजन या उत्साही तरुणाला मी भेटले काही वर्षांपूर्वी मुंबईत अच्युत गोडबोले यांच्या घरी! स्पर्धा परीक्षांसाठी ग्रामीण भागातल्या तरुण-तरुणींना तयार करणारा हा धडपडणारा तरुण मला तेव्हा बघायला मिळाला. त्यानं जळगावमध्ये ‘दीपस्तंभ’ नावाची संस्था स्थापन केली होती. पुण्यात शिक्षण घेतलेल्या यजुर्वेंद्रला आपलं गाव खुणावत होतं. फक्त काही निवडक शहरातल्या मुलांनीच स्पर्धा परीक्षेत यश मिळवावं आणि अधिकारी व्हावं ही मक्तेदारी त्याला मोडून काढायची होती. त्यामुळे जळगावला येऊन त्यानं ‘दीपस्तंभ’ ही संस्था उभारून ग्रामीण भागातल्या तरुण-तरुणींसाठी स्पर्धा परीक्षेच्या तयारीचं एक मोठं दालन खुलं करून दिलं. त्या वेळी त्याला अच्युत गोडबोलेंकडून युवांना प्रेरित करण्याविषयीचं लिखाण हवं होतं. ते पुढे त्यानं ‘दीपस्तंभ’ या पुस्तकाद्वारे प्रसिद्धही केलं. अधूनमधून ई-मेल, फोन आणि मेसेजेस यातून आमचा संपर्क होत होता; मात्र गेल्या पाच वर्षांत हा संपर्क, हा संवाद आपापल्या व्यग्रतेमुळे कमी कमी होत गेला होता. 

लेखिका दीपा देशमुख यांनी दीपस्तंभ आणि मनोबल या उपक्रमांना भेट दिली.अलीकडेच नोबेल फाउंडेशनच्या वतीनं जयदीप पाटील या तरुणानं मला व्याख्यानासाठी जळगावला निमंत्रित केलं आणि त्याच वेळी यजुर्वेंद्र महाजनचा मला जळगावमध्ये स्वागत करणारा फोन आला. त्याच्या ‘मनोबल’ या उपक्रमाला भेट देण्याविषयी तो बोलला. अर्थातच मी होकार दिला. व्याख्यानाचा कार्यक्रम आटोपल्यावर आम्ही ‘मनोबल’ उपक्रम जाणून घेण्यासाठी पोहोचलो. एक सुबकशी इमारत... आत गेल्यावर समोरच सगळ्यांनी एकत्रित येऊन गप्पा-गोष्टी कराव्यात अशी मोकळी जागा, त्यानंतर कम्प्युटर लॅब आणि त्यानंतर एकेका खोलीत आम्ही जात राहिलो. प्रत्येक खोलीत चार व्यक्ती राहत होत्या. या व्यक्ती अपंग होत्या, तर काही अंध होत्या. वयानं अगदीच तरुण असलेल्या या मुला-मुलींकडे बघताना मन कासावीस झालं. कारण कोणाला दोन्ही पाय नाहीत, तर कोणाला हात-पाय दोन्हीही नाहीत, कोणी हे जगच बघू शकत नाही, तर कोणाला ऐकता-बोलताही येत नाही. सगळे जण आपापली ओळख करून देत होते. अनेकांच्या डोक्यावरचं पालकत्वाचं छत्रही उडून गेलेलं होतं. आता यजुर्वेंद्रचं गुरुकुल हेच त्यांचं घर होतं. अंध-अपंग मुला-मुलींसाठी ‘मनोबल’, ग्रामीण आदिवासी मुला-मुलींसाठी ‘गुरुकुल’ आणि निराधार वंचित मुला-मुलींसाठी ‘संजीवन’ अशा तीन संस्थांचा जन्म यातून झाला. या मुला-मुलींसाठी आज १४ इमारती उभ्या आहेत. या सगळ्या तरुणाईला शिक्षणानं झपाटून टाकलं होतं. कोणी बीए करत होतं, तर कोणी एमए... कोणी कम्प्युटरचा कोर्स करत होतं, तर कोणी ‘सीए’ची तयारी! कोणाला स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हायचं होतं. सगळं बघून, सगळं ऐकून मी फक्त चकित झाले नाही, तर मनात अनेक विचारांनी गर्दी केली होती. आपलं शरीर अव्यंग असतानाही आपण वेळेचा किती अपव्यय करतो, आपल्या वाट्याला संघर्ष कमी किंवा जवळजवळ नसताना आपण क्षुल्लकशा अडचणींचा किती मोठा बाऊ करतो....या सगळ्या विचारांनी स्वतःच्या खुजेपणाची जाणीव तीव्रतेनं झाली. त्यांच्यात नाही, तर फार मोठं व्यंग आपल्यात आहे असं वाटायला लागलं. यजुर्वेंद्र या सगळ्या मुलांशी बोलत होता, त्यांची चौकशी करत होता. या मुलांच्या दृष्टीनं तोच त्यांचा पालक आणि सर्व काही होता. यजुर्वेंद्रमुळे आज आपलं जगणं सुसह्य झालंय, असं त्या मुला-मुलींना वाटत असल्याचं त्यांच्या बोलण्यातून कळत होतं. ‘मनोबल’च्या काही उपक्रमांच्या क्लिप्स तिथे बघितल्या. या मुलांच्या मनातला न्यूनगंड काढायचं फार मोठं काम यजुर्वेंद्रनं सगळ्यात आधी हाती घेतलं. दया, सहानुभूती नको, तर निखळ, निरपेक्ष, निर्मळ प्रेम हवं या विचारांतून त्यानं या मुला-मुलींना ‘आपल्यातली उणीव, आपलं अपंगत्व आपण स्वीकारू या आणि पुढे जाऊ या’ हा विचार दिला. वेळ लागला; मात्र मुलांनी हा विचार स्वीकारला. त्यानंतर अशा मुलांना समाजच नव्हे, तर त्यांच्या स्वतःच्या घरातलेही किती कंटाळतात, त्यांचा वावर त्यांना नकोसा असतो, हेही यजुर्वेंद्रनं बघितलं होतं.या मुलांना सगळ्या गोष्टींचा आनंद मिळावा यासाठी यजुर्वेंद्रनं इथं सगळे सण साजरे करायचं ठरवलं. या सणांद्वारे मुलं निर्भेळ आनंद लुटतील ही त्यामागची भावना होती. तिथली होळीची चित्रफीत बघताना मलाच इतका आनंद मिळाला, की दर वर्षी होळीचा सण इथंच येऊन साजरा करायचा असं मी ठरवलं. आपापल्या उणिवांना बरोबर घेऊन जमेल तसं ही मुलं नाचत होती, गात होती, एकमेकांना रंग लावत होती आणि होळीचा आनंद घेत होती. इथं होणाऱ्या रक्षाबंधनाच्या सणानं माझ्या डोळ्यात पाणी आणलं. इथं राहणारी एक मुलगी तिच्या पावलांनीच थोडी-फार कामं करू शकणारी अशी! तिच्याकडून यजुर्वेंद्र जेव्हा राखी बांधून घेण्यासाठी समोर बसला, तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद शब्दातीत होता. तिनं आपल्या पायाच्या अंगठ्यानं यजुर्वेंद्रच्या कपाळावर कुंकू लावलं. अक्षता टाकल्या, त्याला ओवाळलं आणि त्याच पावलांमध्ये राखी पकडून ती यजुर्वेंद्रच्या हातावर बांधलीदेखील. या कामात तिनं कोणाचंही साह्य घेतलं नाही. ते साह्य तिला नकोही होतं. त्यानंतर त्या औक्षणाच्या थाळीत ठेवलेला पेढा खाण्याची इच्छा यजुर्वेंद्रनं दर्शवली, तेव्हा त्या मुलीनं आपल्या पावलांमध्येच तो पेढा पकडला आणि पाय उचलून तो यजुर्वेंद्रला भरवला. तिच्या डोळ्यांमधून आसवांचा पूर वाहत होता. पाय लागला की तो पदार्थ आपण फेकून देतो किंवा त्याज्य समजतो; पण इथं त्या मुलीचे पायच तिचे हात होते आणि ते हात मानणारा, ती माणुसकी जपणारा एक प्रेमळ भाऊ तिच्यासमोर बसला होता. सगळीकडून तुच्छतेचे उपेक्षेचे हुंकार मिळालेल्या त्या मुलीसाठी हा क्षण अत्युच्च होता!

अशा अनेक कथा, अनेक गोष्टी....सगळ्यांशी बोलत बोलत आम्ही पुन्हा त्या गप्पा-गोष्टींच्या मोकळ्या ठिकाणी आलो. यजुर्वेंद्रनं माझी ओळख करून दिली. मी मुलांशी हलकंफुलकं बोलत संवाद साधला. त्यांच्या-माझ्यात स्नेहाचं एक नातं तयार व्हावं इतकाच त्या वेळी हेतू होता. मुलांनी प्रार्थना गायली. तिचेच बोल होते – ‘हमारी ही मुठ्ठी में आकाश सारा, जब भी खुलेगी चमकेगा तारा.’ आपल्या हातातल्या रेषांवर विसंबून राहायचं नाहीये, तर आपल्या प्रयत्नांनी आपला रस्ता आपल्यालाच तयार करायचाय, हा विश्वास या मुलांच्या चेहऱ्यावर मला दिसत होता. 

आपलं घर असो, वा जमीन, सगळं सगळं यजुर्वेंद्रनं पणाला लावलं आहे. या मुलांना खऱ्या अर्थानं उभं करण्याचं स्वप्न त्याच्यासमोर आहे आणि त्याकरिता त्याच्या स्वतःच्या गरजा, त्याची स्वप्नं, त्याचं जगणं हे सगळं या मुलांच्या सुखासाठी लागलेलं आहे. असा झपाटलेला यजुर्वेंद्र महाजन बघणं ही खूप अनोखी गोष्ट आहे. कारण आजवर स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेताना यजुर्वेंद्रनं अनेक पुस्तकं प्रकाशित केली, अनेक तरुणांना स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी दीपस्तंभ संस्थेद्वारे साह्य केलं, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर शेकडो व्याख्यानं दिली, त्यातून मानधनाची रक्कमही मिळवली; पण कोण्या एका क्षणी ही मुलं-मुली त्याच्या आयुष्यात आली आणि त्याचं सगळं आयुष्य बदलून गेलं. ‘या मुलांसाठी आपण उभं राहिलो नाही, तर आपला जन्म फुका’ असं त्याचं मन त्याला सांगू लागलं आणि त्याच क्षणी ‘मी’ आणि ‘माझं’ हे त्याच्या आयुष्यातले दोन शब्द नाहीसे झाले. आता जे काही होतं ते याच मुला-मुलींसाठी, त्यांच्या उन्नतीसाठी, त्यांना आयुष्यात यशस्वी करण्यासाठी! 

स्पर्धा परीक्षांसाठी अशा मुलांकडून तयारी करून घेणारं ‘मनोबल’ हे भारतातलं पहिलं आणि एकमेव असं निवासी अभ्यास केंद्र आहे हे विशेष! वाचन संस्कृती वाढवण्यासाठीचे प्रयत्न असोत वा अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रयत्न असोत, ही मुलं यजुर्वेंद्रचा विश्वास सार्थ ठरवून आपल्या जीवनात यशस्वी होताहेत. अनेक मुलं-मुली आज चांगल्या पदावर अधिकारी म्हणून कार्यरत झालेली बघायला मिळताहेत. तसंच या मुला-मुलींच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देऊ यजुर्वेंद्रनं त्यांचा एक ऑर्केस्ट्रा तयार केला आहे. त्याचे सर्व प्रयोग हाउसफुल तर होत आहेतच; पण त्या निमित्ताने या मुलांचं पर्फेक्शनही जगासमोर आलं आहे.

यजुर्वेंद्रचं काम वाढत आहे. खरं तर हे काम सरकारी पातळीवर खूप मोठ्या, व्यापक प्रमाणावर व्हायला हवंय. केवळ काही शिबिरं भरवून, काही साधनं पुरवून, तात्पुरती मलमपट्टी करून, इव्हेंट करून हा प्रश्न सुटणारा नाही. अपंगांसाठी, अंधांसाठी आज अनेक प्रकारच्या सुविधांची आवश्यकता आहे. कायद्यांच्या चोख अंमलबजावणीची गरज आहे; मात्र त्या सरकारी मदतीकडे डोळे लावून न बसता यजुर्वेंद्रसारखा तरुण जेव्हा पुढे येतो आणि पालकत्व स्वीकारून या तरुण-तरुणींच्या डोक्यावर मायेचा हात ठेवतो, तेव्हा ती गोष्ट अजिबात सहज-साधी नाही. त्यासाठी मनामध्ये ऋजुता लागते, समोरच्याप्रति सहवेदनेची वृत्ती लागते आणि ‘भारत माझा देश आहे...सारे भारतीय माझे बांधव आहेत...’ ही प्रतिज्ञा जगण्यासाठीची आस लागते. हे काम करण्यासाठी धाडस लागतं, हिंमत लागते. आपलं आयुष्य पणाला लावावं लागतं. यजुर्वेंद्र खूप सकारात्मक विचारांचा तरुण आहे. त्याच्यासमोर विवेकानंदांचा फार मोठा आदर्श आहे. आपलं काम करत असताना मदतीचे अनेक हात येऊन मिळतील, हा विश्वास त्याला आहे. यजुर्वेंद्रला त्याच्या कामासाठी आजवर अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत आणि मिळत आहेत. यजुर्वेंद्रचं अनोखं गुरुकुल आणि मनोबल उपक्रम भेटीसाठी जळगावला अवश्य जायला हवं, आपल्या या भावंडांना भेटायला हवं आणि यजुर्वेंद्रचं कार्य बघायला हवं. 

संपर्क : यजुर्वेंद्र महाजन 
मोबाइल : ९८२२४ ७६५४५
ई-मेल : yajurvendra79@gmail.com, deepstambhngo@gmail.com 
वेबसाइट : http://www.deepstambh.org/

- दीपा देशमुख
मोबाइल : ९५४५५ ५५५४०
ई-मेल : deepadeshmukh7@gmail.com

(दीपा देशमुख या प्रसिद्ध लेखिका असून, त्या वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. दर १५ दिवसांनी, गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या त्यांच्या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/M3NCtW या लिंकवर उपलब्ध आहेत.)

(दीपस्तंभ या संस्थेच्या कार्याबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. यजुर्वेंद्र महाजन यांची पुस्तके बुकगंगा डॉट कॉम या वेबसाइटवरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.) 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZPDBW
 सुंदर मांडणी, सुंदर लिखाण, जे आहे ते मनापासून लिहिल्यामुळे वाचताना श्री यजुर्वेन्द्र जी यांच्या कामाची कार्याची खोली समजून येते,अशा उत्तुंग व्यक्तिमत्वाला आमचा सलाम !!👍 आपल्या सुंदर लिखाणाचे करावे तेवढे कौतुक कमीच !! धन्यवाद
 अतिशय सुंदर उपक्रम
 खरच अनवट. एका धेय प्रेरीत अनोख्या व्यक्तिमत्वाची ओळख या लेखातून झाली. लेख खुपच भारी,श्री.महाजन यांचे कार्यास सँल्यूट व पुढील वाटचालीस शुभेच्छा.
 दिपाताई आपण लिहिलेला लेख हा यजुर्वेंद्रच्या कामाला बोलका करणारा आहे. स्वतः रसरशीत जिवन जगणे व दुसऱ्यांनाही ते मिळवून देण्यासाठी धडपडणाऱ्या या जादूगाराला उदंड सहकार्य लाभेल जर आपल्या सारख्यानी त्याना प्रसिद्धी दिली.
 Yajurvendra sir ....Tumachya Karyala Shir Sashtang Pranam....
Dev ya jagaat aahe.....
Saranchya rupaat...1
 अंपगाचे दैवत..यजुवेंद्र महाजन
 Great ..Mahajan sir
 खुप महान कार्य
Similar Posts
तो एक ‘राजहंस!’ सेरेब्रल पाल्सीमुळे ज्याचं अवघं आयुष्यच पणाला लागलं होतं, लहानपणी जो पाण्याला घाबरत होता, तो हंसराज पाटील आज आंतरराष्ट्रीय पातळीवरचा जलतरणपटू आहे. स्पर्धा परीक्षेमध्येही उत्तम यश मिळवून तो आज नाशिकचा नायब तहसीलदार म्हणून कार्यरत आहे. तो आणि त्याच्या आई-वडिलांनी जिद्दीने अडचणींवर मात करत केलेल्या प्रयत्नांमुळे
अंधांच्या आयुष्यात रंग भरणारा डॉ. सुमीत पाटील अंध आणि गतिमंद मुलांना चित्रकला शिकवून त्यांच्या आयुष्यात रंग भरणारा तरुण म्हणजे डॉ. सुमीत पाटील. त्याशिवाय तो आर्ट डिरेक्टर म्हणूनही कार्यरत आहे. ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदरात आज डॉ. सुमीत पाटीलची प्रेरक गोष्ट...
आम्ही प्रकाशबीजे रुजवीत चाललो... वैज्ञानिक दृष्टिकोन हे मूलभूत तत्त्व असलं, तरी ते रुजविण्यासाठी गावपातळीवर मुद्दामहून केले जाणारे प्रयत्न अगदी अल्प असतात. या पार्श्वभूमीवर, एमएस्सी झालेल्या एका युवकानं आपलं गावच विज्ञानगाव म्हणून नावारूपाला यावं, गावातल्या प्रत्येकाला वैज्ञानिक दृष्टिकोन मिळावा, यासाठी मित्रमंडळींसह धडपड केली आणि
अंध-अपंगांसाठीचा ‘दीपस्तंभ’ अंध, अपंग आणि अनाथ मुलांसाठी रोजचे जीवन जगणे हेच एक मोठे आव्हान असते. त्यांना थोडे प्रोत्साहन आणि पाठिंबा मिळाला, तर त्यांच्या जीवनातील अंधःकार दूर होऊ शकतो. हीच गोष्ट लक्षात घेऊन जळगाव येथील यजुर्वेंद्र महाजन यांनी स्थापन केली आहे दीपस्तंभ ही बहुउद्देशीय संस्था. आज तीन डिसेंबर अर्थात जागतिक दिव्यांग दिन

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language