Ad will apear here
Next
डी. एस. खटावकर, पं. दिनकर कैकिणी

ख्यातनाम शिल्पकार, चित्रकार, मूर्तिकार दत्तात्रेय श्रीधर खटावकर आणि आग्रा घराण्याचे गायक पं. दिनकर कैकिणी यांचा २३ जानेवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
.......
डी. एस. खटावकर
चार एप्रिल १९२९ रोजी डी. एस. खटावकर यांचा जन्म झाला. आकर्षक सजावटीच्या माध्यमातून सहा दशकांहून अधिक काळ पुण्याच्या गणेशोत्सवाला वैभव प्राप्त करून देणारे कलाकार, गणेश मंडळांची सजावट करणाऱ्यांपासून ते नामवंत चित्रकार अशी कलाकारांची मांदियाळी घडविणारे महागुरू, पुण्यातील पहिली देखणी अशी फायबर ग्लासमधील महागणेश मूर्ती घडविणारे कसबी मूर्तिकार-शिल्पकार, मध्यंतरीच्या काळामध्ये हिडीसतेकडे झुकणाऱ्या उत्सवाला श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या राष्ट्रीय सजावट स्पर्धेच्या माध्यमातून विधायकतेच्या मार्गावर आणणारे ज्येष्ठ मार्गदर्शक दत्तात्रय श्रीधर ऊर्फ डी. एस. खटावकर हे बहुआयामी व्यक्तिमत्व होते.

शालेय शिक्षण घेत असताना खटावकर यांचे हात हे मातीमध्येच गुंतलेले असायचे. नाना वाडा शाळेमध्ये असताना बालवयातील दत्तात्रयाने १९४२च्या ‘चले जाव’ लढ्यातही खारीचा वाटा उचलला होता. त्यामुळेच राष्ट्रभक्तीचे झालेले संस्कार हे पुढे देवभक्ती आणि समाजभक्तीमध्ये प्रतिबिंबित झाले. कला शिक्षक म्हणून दोन ठिकाणी काम केल्यानंतर ते १९६३मध्ये अभिनव कला महाविद्यालयामध्ये रुजू झाले. ड्रॉइंग आणि पेंटिंग, उपयोजित कला, आर्ट टीचर्स डिप्लोमा, विविध छंद वर्ग अशा वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करताना खटावकर हे स्वत:ही समृद्ध होत गेले आणि त्यांच्या ज्ञानाने सलग २५ वर्षे सध्या कला क्षेत्रात नावाजलेले कलाकार विद्यार्थीही घडले गेले. पदरमोड करून त्यांनी अनेक गरीब आणि गरजू मुलांना कलाशिक्षण दिले. 

ज्या तुळशीबागेमध्ये बालपणापासून वास्तव्य होते त्या गणरायाची मूर्ती खटावकर यांच्या कसबी हातांनीच घडली आहे. अनेक वर्षे ते त्या मंडळाचे अध्यक्ष होते. एवढेच नव्हे तर, शताब्दी पार केलेल्या पुण्यातील अनेक गणेश मंडळांसाठी त्यांनी सजावट आणि विसर्जन मिरवणुकीचे चित्ररथ करण्यामध्ये दिलेले योगदान अजूनही गणेशभक्तांच्या स्मरणात आहे. साधी राहणी आणि ज्ञानदान यामध्येच जीवन व्यतीत केलेल्या खटावकर सरांनी आपल्या करड्या शिस्तीने अभिनव कला महाविद्यालयातील नाठाळ मुलांनाही सरळ केले. पुण्यामध्ये गाजलेल्या जोशी-अभ्यंकर खून खटल्यातील आरोपींना केवळ खटावकर यांनी न्यायालयात दिलेल्या साक्षीमुळेच फाशीची शिक्षा झाली होती. 

लौकिकार्थाने ते मार्च १९८९ मध्ये सेवानिवृत्त झाले तरी जीवनाच्या अखेपर्यंत कार्यरतच राहिले. दत्तात्रेय श्रीधर खटावकर यांचे निधन २३ जानेवारी २०१६ रोजी झाले.

(डी. एस. खटावकर यांचे पुत्र विवेक खटावकर यांनी आपल्या वडिलांबद्दल सांगितलेल्या आठवणी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
...........
पं. दिनकर कैकिणी
दोन ऑक्टोबर १९२७ रोजी पं. दिनकर कैकिणी यांचा जन्म झाला. वयाच्या सातव्या वर्षी दिनकर कैकिणी यांनी एका संगीत सोहळ्यात उस्ताद अल्लादिया खान, उस्ताद फैयाज खान व उस्ताद अब्दुल करीम खाँ या तीन संगीत दिग्गजांचे गाणे ऐकले. उस्ताद फैयाज खानांचे गाणे ऐकल्यावर ते इतके प्रभावित झाले, की त्यांनी तिथेच संगीत कलेची साधना करण्याचा व फैयाज खानांच्या गायनशैलीला आत्मसात करण्याचा निश्चय केला.

त्यांचे प्रथम संगीत गुरू पतियाळा घराण्याचे पं. के. नागेश राव हे होते. त्यानंतर त्यांनी दोन वर्षे ग्वाल्हेर घराण्याच्या पं. ओंकारनाथ ठाकूर यांच्याकडे संगीत शिक्षण घेतले. वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी लखनौच्या मॉरिस कॉलेजात (भातखंडे संगीत संस्थान विश्व विद्यालयात) प्रवेश घेतला. तिथे त्यांना पं. विष्णू नारायण भातखंडे व उस्ताद फैयाज खान यांचे शिष्य पं. श्रीकृष्ण नारायण रातंजनकर यांच्याकडून संगीताची तालीम मिळाली. ह्या अतिशय कठीण प्रशिक्षणात एस. सी. आर. भट्ट, चिदानंद नगरकर, के. जी. गिंडे यांसारख्या आपल्या अन्य सहाध्यायांबरोबर कैकिणींनी संगीताचा कसून अभ्यास केला. त्याचा परिणाम म्हणूनच की काय, इ. स. १९४३मध्ये त्यांना संगीतातील पदवीसोबत ख्याल गायनासाठी मानाचे समजले जाणारे भातखंडे सुवर्णपदक प्राप्त झाले.

त्यांनी १९४६ साली आपले संगीत कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. एक गायक व संगीत प्रशिक्षक म्हणून त्यांनी देशोदेशींचे दौरे केले. संगीत क्षेत्रात त्यांनी अनेक मानाची पदे भूषविली. १९५४ सालापासून त्यांनी आकाशवाणीवर सुरुवातीस रचनाकार व नंतर निर्माता म्हणून काम पाहिले. ते भारताच्या सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या प्रबंध विभागाचे सहायक संचालक होते. त्यानंतर ते दीर्घ काळासाठी मुंबई येथील भारतीय विद्या भवनच्या संगीत व नृत्य शिक्षापीठाचे प्राचार्य होते. अनेक वेगवेगळ्या समित्यांमध्ये त्यांचा समावेश होता. तसेच विविध परीक्षा मंडळांतही त्यांचा सहभाग होता. 

१९७४ साली भारत सरकारतर्फे त्यांना युगोस्लाव्हिया आणि पूर्व जर्मनी येथे पारंपरिक भारतीय संगीत या विषयाचे अभ्यासक म्हणून पाठवण्यात आले होते. तेथील विद्यापीठांमध्ये तसेच सांस्कृतिक केंद्रांमध्ये त्यांनी आपली कला सादर करण्याबरोबरच व्याख्यानेही दिली होती.

कैकिणींनी ख्याल, ध्रुपद, धमार, ठुमरी व भजन शैलीत शेकडो नवीन रचना केल्या व अनेक नवे राग बांधले. त्यांनी समूह गायनासाठीही विविध रचना बांधल्या. ‘मीरा’ (१९७९) या चित्रपटात पार्श्वगायन केले. तसेच पंडित रविशंकर यांच्या सहयोगाने ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ ह्या बॅले नृत्यनाटिकेला संगीत दिले.

त्यांनी बंदिशींवर ‘रागरंग’ नावाचे पुस्तकही लिहिले आहे. स्वरचित राग आणि बंदिशींवरील त्यांच्या ध्वनिमुद्रिकाही प्रकाशित झाल्या आहेत. संजीवनी भेलांडे, आरती अंकलीकर-टिकेकर, उदित नारायण, निषाद बाक्रे, सुधींद्र भौमिक यांसारखे शिष्य त्यांनी घडवले आहेत. गायक, संगीतकार आणि गुरू अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी पार पाडल्या. 

कैकिणींचे सर्व कुटुंब संगीत साधनेत आहे. त्यांच्या पत्नी शशिकला ह्या नभोवाणी गायिका होत्या व भवन्स संगीत व नृत्य महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका पदावरून निवृत्त झाल्या. त्यांचे धाकटे पुत्र योगेश सम्सी हे नामवंत तबलावादक असून, त्यांच्या कन्या आदिती कैकिणी उपाध्या या शास्त्रीय संगीत गायिका आहेत. योगेश सम्सी यांनी उस्ताद अल्लारखाँ यांच्याकडे २३ वर्षे तबल्याची तालीम घेतली आहे. आजवर अनेक ज्येष्ठ गायकांना यशस्वी साथसंगत केली आहे. तसेच अनेक वेळा स्वतंत्र तबलावादनाचे कार्यक्रमही केले आहेत.

पं. दिनकर कैकिणी यांचे २३ जानेवारी २०१० रोजी निधन झाले.

माहिती संकलन : संजीव वेलणकर
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PUXICU
Similar Posts
राम गणेश गडकरी, डी. एस. खटावकर, पं. दिनकर कैकिणी नामवंत लेखक, कवी, नाटककार राम गणेश गडकरी, ख्यातनाम शिल्पकार, चित्रकार, मूर्तिकार दत्तात्रेय श्रीधर खटावकर आणि आग्रा घराण्याचे गायक पं. दिनकर कैकिणी यांचा २३ जानेवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
अशोक समेळ, मिलिंद इंगळे, स्मिता सरवदे-देशपांडे, शेख मुख्तार ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ, प्रसिद्ध संगीतकार व गीतकार मिलिंद इंगळे, प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता सरवदे-देशपांडे यांचा १२ मे हा जन्मदिन. तसेच, बॉलीवूडचे पहिले ‘माचो मॅन’ अभिनेते शेख मुख्तार यांचा १२ मे हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
नंदू भेंडे, जेम्स पार्किन्सन, शुभांगी अत्रे-पुरी मराठीतील पहिले रॉकस्टार नंदू भेंडे यांचा ११ एप्रिल हा स्मृतिदिन. तसेच, पार्किन्सन्स डिसीजचा शोध लावणारे ब्रिटिश डॉक्टर जेम्स पार्किन्सन आणि अभिनेत्री शुभांगी अत्रे-पुरी यांचा ११ एप्रिल हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
बाबा आमटे, राजा परांजपे, शोभना समर्थ, मीना शौरी ख्यातनाम समाजसेवक बाबा आमटे, नामवंत अभिनेते-दिग्दर्शक राजा परांजपे, अभिनेत्री शोभना समर्थ आणि अभिनेत्री मीना शौरी यांचा नऊ फेब्रुवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language