पुणे : ‘भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्यातर्फे हिंदी चित्रपटांच्या सुवर्ण काळातील महिला गायिकांनी गायलेल्या ड्युएट म्हणजे युगूलगीतांच्या ‘कजरा मोहोब्बतवाला’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक प्रसार योजनेंतर्गत हा सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम आहे,’ अशी माहिती भारतीय विद्या भवनचे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.
विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृह (सेनापती बापट रस्ता) येथे शुक्रवारी १३ जुलै रोजी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. सूर सखी संस्थेद्वारे हा कार्यक्रम सादर होणार आहे. ‘गाणी दोघींची-आवड सगळ्यांची’ अशी या कार्यक्रमाची मध्यवर्ती कल्पना आहे.
कार्यक्रमाची निर्मिती मानिनी गुर्जर यांची असून, संकल्पना, निवेदन रंजना काळे यांचे आहे. यात मानिनी गुर्जर, अनुराधा पटवर्धन, देवयानी सहस्रबुद्धे गीते सादर करणार आहेत. संपदा देशपांडे, उमा जटार, किमया काणे, उर्मिला भालेराव, भावना टिकले, शिल्पा आपटे साथसंगत करणार आहेत. या कार्यक्रमात अनेक संगीतकारांच्या रचना सादर करण्यात येणार आहेत. कार्यक्रमांतर्गत साधारण १८ गीतांचे सादरीकरण होणार आहे.
‘मनोरंजन आणि सामाजिक बांधिलकीचा संगम साधणारा संपूर्णपणे महिला कलाकारांचा ‘सूरसखी’ हा वृंद आहे. हिंदी सिनेमांच्या सुवर्ण काळातील स्त्री युगुल गीतांचा हा कार्यक्रम असून, स्त्रीच्या जीवनातील विविध टप्पे व त्यावेळच्या उत्कट भावना गीतप्रवाहातून उलगडणारा हा कार्यक्रम आहे,’ अशी माहिती गुर्जर यांनी दिली.
जून २०१६मध्ये भारतीय विद्या भवन व इन्फोसिस फाउंडेशन यांच्या वतीने हा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम सुरू झाले. लोककला, लोकसंगीत, आदिवासी नृत्य, जागरण गोंधळ, भक्ती रंग, कीर्तन जुगलबंदी, कलगी तुरा, भेदीक लावणी, अभंग, गवळण, नाट्यगीते, लोककलेतील तालरंग, शंख वादन, ‘ती’ची गाणी, वारकरी सांप्रदायिक कीर्तन, नांदी रंग, भरतनाट्यम असे विविध कार्यक्रम आजवर सादर करण्यात आले आहेत.
कार्यक्रमाविषयी :
दिवस : शुक्रवारी, १३ जुलै २०१८
वेळ : सायंकाळी सहा वाजता
स्थळ : विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता, पुणे.