Ad will apear here
Next
‘योजक’


अमंत्रमक्षरं नास्ति नास्ति मूलमनौषधम्‌ ।
अयोग्यः पुरुषः नास्ति योजकस्तत्र दुर्लभः।।

आमच्या इंजिनीअरिंग कॉलेजच्या प्रवेशद्वारावर असं एक सुभाषित लिहिलेली पाटी होती. त्याखाली त्याचा मराठी भावार्थ लिहिला होता,

असं कोणतंही अक्षर नाही, की ज्यापासून मंत्र सुरू होत नाही, असं कोणतंही वनस्पती मूळ नाही, की ज्यात औषधी गुणधर्म नाहीत, सर्वथा अयोग्य आहे असा कोणीही माणूस जगात नाही, दुर्लभता आहे ती फक्त योजकांची..

ही संस्था अभियांत्रिकी योजक घडवते...

ते सुभाषित माझ्या फार लक्षात राहिलं आणि जीवनात जसजसे अनुभवाचे धडे मिळत गेले, तसं त्यातलं नेमकेपणही कळत गेलं. मला वाटतं आजच्या काळात अशा प्रत्येक क्षेत्रातल्या योजकांची मोठी गरज आहे. सिंधुदुर्गासारख्या निसर्गसंपन्न आणि शेतीप्रधान जिल्ह्यात तर आता या विषयातल्या योजकांनी अंग भरलं पाहिजे. अगदी आपल्या मालवणीत सांगाचा तर ‘ढोलार काठी बसलली हा, आता आंग धरूक व्हया’

आपल्या जिल्ह्यातली ‘भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान’ ही ग्रामविकास चळवळीत अग्रस्थानी असणारी संस्था गेली १५-२० वर्षे अशा योजकाची भूमिका अत्यंत संयमाने, पण चोख बजावत आहे. करोना आपत्ती आता आली; पण पुढेमागे शेती आणि शेतीपूरक उपक्रमांची जिल्ह्याला मोठी गरज भासणार आहे आणि त्यात नवनवीन प्रयोग अपेक्षित आहेत हा विचार या संस्थेने त्या काळात सुरू केला. बायोगॅस, कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्धव्यवसाय, परसदारातली हळद, सुरण लागवड यात तर संस्थेने काम केलंच; पण ‘जल है तो कल है’ हा जागतिक विचार समोर ठेवून शेततळी बांधा, ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही चळवळ जिल्हाभर उभी केली.

परवा साळगावच्या अरुण हळदणकर या शेतकरी बंधूची भेट झाली. त्यांनी ‘भगीरथ’च्या अशाच एका उपक्रमाचे उदाहरण सांगितले. ते म्हणाले, आमच्या साळगाव गावातून वझर नावाचा एक ओढा जातो. त्याला १०-१२ वर्षांपूर्वी लाकडी फळ्या असलेला बंधारा होता. देखभाल-दुरुस्ती वेळेत न झाल्याने त्यात पाणी अडवणे शक्य होत नव्हते. ‘भगीरथ’चे डॉ. देवधर त्याच भागात असल्याने त्यांनी त्याची पाहणी केली. इथे जर पक्का बंधारा करता आला, तर आजूबाजूचे आठ-१० एकर क्षेत्र ओलिताखाली येईल आणि तिथल्या शेतकऱ्यांना बारमाही शेती करता येईल. सोबत उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य असणाऱ्या आजूबाजूच्या विहिरींच्या पाण्याची पातळीसुद्धा वाढेल.

त्यासाठी त्यांनी लगतच्या शेतकऱ्यांना जमवून लोकसहभागातून त्या बंधाऱ्याचे काम करण्याचा विचार मांडला. लोकांना तो विचार पटला, लोकवर्गणी जमा झाली, त्याच्या जोडीला भगीरथ संस्थेने सिमेंट खर्चाच्या रूपाने आपला आर्थिक सहभागसुद्धा दिला. अगदी सरकारी कामाच्या तुलनेत कमी खर्च आणि चांगल्या दर्जाचा बंधारा त्या जागी उभा राहिला. आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा उत्साह दुणावला. आता गरज होती ती पाणी प्रत्येकाच्या वावरात पोचण्याची. त्यासाठी पुन्हा संस्थेने पाइप खरेदीसाठी ५० टक्के रक्कम अनुदान रूपाने दिली आणि शेतकरी मंडळींनी पदरची ५० टक्के रक्कम वापरून पाणी आपापल्या शेतात खेळवलं. संस्थेचा असाच एक प्रयोग सध्या भरणी या गावी सुरू आहे.

गेल्या सात-आठ वर्षांत या बंधाऱ्यालगतचे शेतकरी भातशेतीनंतर अजून दोन-दोन पिके घेऊ लागले. नाचणी, कुळीथ, उडीद, भुईमूग, वाल, चवळी, फजाव आणि सर्व प्रकारचा भाजीपाला इथे पिकतो. त्यातून ही मंडळी स्वतःसाठीची बेगमी करून उरलेलं धान्य विकतात. त्यातून बऱ्यापैकी वरखर्च निघतो. हे एक रोल मॉडेल झालं. यानंतर लोकांच्या मागणीनुसार आता त्याच ओढ्यावर दुसरा शासकीय बंधारा बांधून पुरा झालेला आहे. त्याचा लाभ घेऊन अजून १०-१५ शेतकरी समृद्ध होतील.

इथले शेतकरी या शेतीसाठी आतापर्यंत भाड्याने पॉवर टिलर आणून नांगरणीचे काम करत होते. त्या भाड्यापोटी थोडा जास्त खर्च येत असल्याने अरुण हळदणकर यांनी स्वतःचा पॉवर टिलर खरेदी करण्याचे ठरविले.

८० हजार रुपये किमतीच्या टिलरसाठी त्यांनी कसेबसे ३० हजार उभे केले आणि मग ‘भगीरथ’ने परतफेडीच्या अटीवर त्यांना तात्काळ ५० हजार रुपये दिले. चार दिवसांत वीडर या प्रकारचे नांगरणी यंत्र घरघर असा आवाज करत शेतात रुजू झाले.

एखाद्या प्रामाणिक गरजूला समाजाकडून अशी तातडीने मदत मिळाली, की मग त्याचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोनसुद्धा बदलतो. हळदणकर म्हणतात, आता फक्त इंधन आणि देखभाल खर्च भागेल इतकंच भाडं आकारून हा टिलर मी इतरांना उपलब्ध करून देणार आहे.

भगीरथ संस्थेने अशा तातडीच्या मदतीसाठी आपली गंगाजळी निर्माण करून ठेवलेली आहे. कोणाला जोतासाठी बैल, कोणाला नांगरणीसाठी टिलर, कोणाला धंद्यासाठी हातगाडी, कोणाला पाण्यासाठी पाइपलाइन, कोणा महिलेला घरगुती उद्योगासाठी एखादं मशीन, तर कोणाचं शिक्षण... यासाठी ही गंगाजळी अनेक वर्षे वापरली जाते.

डॉ. देवधर म्हणतात, आजपर्यंत संस्थेने केलेली मदत अगदी ठरल्या वेळेत संस्थेच्या खाती जमा झालेली आहे. याचं कारण आम्ही ‘तारण नाही तर कारण’ पाहून मदत करतो, तीही अगदी दुसऱ्या भेटीत. त्यामुळे वसुली हा शब्द आमच्या वापरात नाही. ज्यांची गरज छोटी असते, अशा लोकांचा बँकेचा अनुभव सहसा चांगला नसतो. जाचक कागदपत्रांच्या जमवाजमवीत बँकेत येणारा माणूस दमतो आणि कर्जाचा नादच सोडून देतो. त्यातूनही एखाद्या बहाद्दराने हे दिव्य पार पाडलंच, तर पुढे वसुलीसाठी बँकेला तितक्या फेऱ्या मारायला लावून तो त्याचा बदला घेतो. यातला गमतीचा भाग सोडला तरी हे वास्तव नाकारता येत नाही.

आपण ‘अन्नदाता सुखी भव’ असं नेहमी म्हणतो; पण नेमकं करतो काय त्यांच्यासाठी, हा प्रश्न आहेच. लोकांना शेतीकडे, शेतीपूरक उद्योगाकडे वळायला सांगतो, तेव्हा अशा छोट्या स्वरूपाच्या तात्काळ मदतीची मोठी गरज आहे हे लक्षात येतं. एकट्या भगीरथ वा अन्य कुणा संस्थेच्या गंगाजळीला नक्कीच मर्यादा आहेत. त्यासाठी सामाजिक कामातल्या लोकांनी एकत्र येऊन गावागावातून अशी गंगाजळी निर्माण करण्याची गरज आहे. कोकणच्या उज्वल भाविष्यासाठीची ती एक सामाजिक गुंतवणूक असणार आहे. आणि सुदैवाने असं झालंच तर ती एक मोठी क्रांती ठरेल.

या करोनाच्या आपत्तीनंतर आलेल्या यंदाच्या शेती हंगामात जिल्ह्यात एक खूपच आश्वासक चित्र दिसून येत आहे. पहिली गोष्ट म्हणजे, पड असलेली भातशेती मोठ्या प्रमाणात लागवडीखाली आलीय. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, शेतात राबणाऱ्या लोकांत तरुणाईचा मोठा सहभाग दिसतोय.

काल-परवापर्यंत पल्सर किवा स्प्लेंडरच्या शोरूमसमोर दिसणारी तरुणाईची गर्दी आता पॉवर टिलरच्या एजन्सीत दिसून येतेय. वेगवेगळ्या प्रकारच्या नांगरणी/लावणी यंत्रांच्या विक्रीत यंदा प्रचंड वाढ झालेली दिसते. हा बदललेला ‘पॅटर्न’ आहे. शहराच्या ओढीने इथून गेलेल्या किंवा जाऊ इच्छिणाऱ्या युवकांचा बहुधा हा ‘यू टर्न’ आहे. याची दखल घ्यायलाच हवी.

या ठिकाणी एक मुद्दा थोडा वेगळा विचार करण्याजोगा आहे. आज मनुष्यबळाचा अभाव असल्याने त्यावर पर्याय म्हणून आपण यांत्रिकीकरणाकडे वळत आहोत. चार बैलजोडीचे काम एक टिलर करतो किंवा श्री पद्धतीची एक एकर क्षेत्रातली लावणी यंत्राने चार तासांत होते, हे जरी खरे असले तरी या डिझेल इकॉनॉमीला काही अंगभूत मर्यादा आहेत. यासोबत शेतीचा कस वाढविणारे पशुधन दुर्लक्षून चालणार नाही. यांत्रिक शेती आणि जनावरे यांचे स्वॉट अॅनालिसिस गरजेचे आहे.

भविष्यात नांगरणीसाठी टिलर आणि दुधासाठी गाय किवा म्हैस गोठ्यात असणे हे शाश्वत विकासाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे.

शेतकरी हा बियाणं पेरण्यापासून, त्याचं रुजणं, त्याचं वाढणं, त्याचं डोलणं, असं करत करत ते पीक हाती येईपर्यंतचा सगळा प्रवास स्वतः एन्जॉय करत असतो. तो फार संवेदनशील असतो. त्यामुळे नांगरणी यंत्रांकडून हाताला जाणवणाऱ्या कंपनापेक्षा बैलाच्या पाठीवर हात मारल्यानंतरचं बैलाचं शहारणारं अंग त्याला जास्त सुखावणारं असतं. म्हणूनच त्याचे पाय जमिनीवर असतात. यासाठीच या दोघांची योग्य सांगड घालायला हवी.

मी सुरुवातीला म्हणालो तसं, शेती आणि शेतीपूरक व्यवसायाला पूरक वातावरण निर्माण करण्यासाठी केवळ इच्छा असून भागणार नाही, तर त्यासाठी चांगल्या ‘योजकां’ची गरज आहे, आपल्या जिल्ह्यात ‘भगीरथ’सारख्या संस्था आणि अनेक व्यक्ती अशा योजकांच्या भूमिकेसाठी सक्षम आहेत. त्यांचं खरं काम आता सुरू झालंय.

सर्व ‘योजक’ मित्रांना नवीन शेतीपर्वाच्या खूप खूप शुभेच्छा..

- प्रभाकर सावंत
संपर्क : ९४२२३ ७३८५५
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LYJOCO
Similar Posts
कोकणातली आत्मनिर्भरता सुस्पष्ट दाखवणारी ‘झूम लेन्स’ शहराच्या दिशेने गेलेले अनेक तरुण आज पुन्हा कोकणात परतले आहेत. परतण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचं एक मन सांगतंय, की इथेच काही तरी केलं पाहिजे आणि दुसरं मन विचारतंय काही करणं मला जमेल का? अशा द्विधा मनस्थितीत असलेल्या या युवकांना प्रेरणा देणारी गोष्ट आज मी इथे सांगणार आहे. गोष्ट आहे आपल्याच सिंधुदुर्ग
‘पथदर्शी’ त्या काळच्या मागास मानल्या जाणाऱ्या अनेक जाती-जमातीतील समाज धुरिणांनी स्वतः शिक्षण घेतलं, वेगवेगळ्या विषयाचं ज्ञान मिळवलं, जगाचा अनुभव घेतला, आणि या सर्वांचं महत्त्व लक्षात आल्यावर आपल्या समाजातील लोकांना विद्या, मती, नीती, गती, वित्त अशा प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. याच संदर्भाने एका समाजातील
पारंपरिक भात वाणांचे जतन आणि संवर्धन : सिंधुदुर्गातील प्रयोग शेतीतल्या पारंपरिक बियाण्यांची देशभरातल्या सामान्य लोकांमध्ये चर्चा सुरू झाली ती अहमदनगर जिल्ह्यातल्या बीजमाता ‘राहीबाई पोपेरे’ यांना मिळालेल्या पद्मश्री पुरस्काराने. पारंपरिक बियाण्यांचे ३५०हून अधिक वाण या बीजमातेने अनोख्या रीतीने जतन केलेले आहेत. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातही असे काही प्रयोग सुरू असल्याचे समजले म्हणून हा लेखप्रपंच
‘दरवळ’ सोनचाफ्याच्या कलमांचा स्वतःच्या नावाचा ब्रँड तयार करणाऱ्या, अस्सल कोकणच्या लाल मातीतल्या सुगंधवेड्या ‘उदय गोपीनाथ वेलणकर’ यांची ही यशोगाथा...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language