मराठी भाषक बांधवांच्या भारताबाहेरील नऊ देशांतील देदीप्यमान कर्तृत्वाची अनोखी गाथा दर्शविणारी व्हिडिओ मालिका नुकतीच विश्व मराठी परिषदेने आपल्या विश्व मराठी वाणी या यू-ट्यूब चॅनेलद्वारे प्रदर्शित केली. ही मालिका प्रत्येक मराठी माणसाला प्रेरणा देईल, त्याच्यासाठी नवनवीन संधीचे दालन त्यातून खुले होईल.. प्रा. क्षितिज पाटुकले यांच्या संकल्पनेतून ही मालिका सादर झाली.
इतिहासात ‘अटकेपार झेंडे’ ही मराठी माणसाच्या कर्तृत्वाची सीमा होती. आता मात्र त्या पलीकडे खूप दूर जाऊन मराठी भाषक बांधवांनी उत्तुंग कामगिरी केली आहे. गेल्या काही दशकांमध्ये जगाच्या कानाकोपऱ्यात विविध देशांमध्ये जाऊन उद्योग, व्यवसाय, साहित्य, संस्कृती, सेवा, वैद्यकीय, शैक्षणिक, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, आयटी, बौद्धिक, आदी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मराठी व्यक्तींनी अतुलनीय कामगिरी बजावली आहे. आपल्या कर्तृत्वाची पताका उंचावली आहे. भारताचा मान आणि सन्मान वाढविला आहे.
आपले हे बांधव किती कष्ट करीत आहेत आणि कोणता पराक्रम गाजवत आहेत हे जाणून घेण्याची महाराष्ट्रातील आणि भारतातील, तसेच विविध देशांमधील मराठी माणसाला उत्सुकता आहे. जगभर पसरलेल्या मराठी बांधवांच्या अनुभवांचे आदान-प्रदान व्हावे या उद्देशाने विश्व मराठी परिषदेने ‘झेंडे अटकेपार’ ही मालिका आयोजित केली. महत्त्वाचे म्हणजे यातून सामूहिक मराठी मनास आणि विशेषतः युवा पिढीला मोठ्या प्रमाणावर प्रेरणा मिळेल, उत्तेजन मिळेल. जगभरात कुठेही गेलो तरी आपली माणसे तेथे आहेत असा विश्वास निर्माण होईल.
या मालिकेमध्ये नऊ देशांतील मराठी मंडळी सहभागी झाली आहेत. स्वित्झर्लंडमधून अमोल सावरकर, फ्रान्समधून शशिकांत धर्माधिकारी, नेदरलँडमधून गिरीश ठाकूर, चीनमधून दीपक शिंदे, समीर डोरले, हाँगकाँगमधून मनोज कुलकर्णी, न्यूझीलंडमधून प्रशांत बेलवलकर, ऑस्ट्रेलियामधून रश्मी गोरे आणि रेश्मा परुळेकर, युनायटेड किंग्डममधून राजीव सुभेदार, अनिल नेने, श्यामल पितळे, तेजाली शेटे, केदार लेले, रवींद्र गाडगीळ, त्याचबरोबर जर्मनीमधून अजित रानडे आणि त्यांच्यासमवेत ‘कॉन्सुलेट जनरल ऑफ इंडिया, फ्रँकफर्ट-जर्मनी’चे डॉ. अमित तेलंग, तसेच शिरीष पंडित, मराठी मंडळ बर्लिन, सौ. मैत्रेयी मैराळ, मराठी मंडळ हॅम्बुर्ग, ओंकार इंदलकर, मराठी मंडळ वुल्फसबर्ग, अमोल भागवत, ब्रावो मित्रमंडळ, सौ. शर्वरी दीक्षित-भालेराव, मराठी मित्रमंडळ जर्मनी, वैभव डोलारे, मराठी मंडळ म्युनिक, रश्मी गावंडे, एर्लंगेन, साकेत काटकर आणि अंकिता काटकर मराठी कट्टा जर्मनी, आनंद भूषण देशपांडे, रमणबाग ढोलपथक, राकेश पाटील, मराठी अस्मिता जर्मनी, युरोपीय मराठी संमेलनाचे आयोजक - मा. श्री. रवीजी जठार हे सहभागी झाले होते. जर्मनीतील १२पैकी नऊ मराठी मंडळे यात सहभागी झाली आहेत.
‘झेंडे अटकेपार’ मालिकेच्या नऊ भागांचे व्हिडिओ येथे देत आहोत. विश्व मराठी परिषदेतर्फे ‘झेंडे अटकेपार’ची पुढील सीरिज लवकरच आयोजित केली जाणार आहे. अधिक माहिती
www.vishwamarathiparishad.org या वेबसाइटवर उपलब्ध आहे.