पुणे : यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. अरुणा ढेरे यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे (मसाप) कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी सत्कार केला.
या वेळी परिषदेचे कार्यकारी विश्वस्त उल्हास पवार, कवयित्री नीलिमा गुंडी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, वर्षा गजेंद्रगडकर उपस्थित होते.
साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षाच्या पहिल्या सत्काराचा मान ‘मसाप’चा असल्याने डॉ. ढेरे यांच्या सत्कारासाठी परिषदेतर्फे जय्यत तयारी केली होती. फुलांच्या पायघड्या घालून आणि औक्षण करून डॉ. ढेरे यांचे स्वागत करण्यात आले. हा कौतुक सोहळा अनुभविण्यासाठी माधवराव पटवर्धन सभागृह गच्च भरले होते. पुण्याच्या साहित्य वर्तुळाच्या उपस्थितीत रंगलेल्या या सोहळ्याने डॉ. ढेरे अधिकच भारावून गेल्या. ‘पुरस्कार खूप मिळतात; पण असे प्रेम दुर्मिळ असते,’ अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.
या वेळी डॉ ढेरे म्हणाल्या, ‘वाङ्मयीन संस्कृतीची पडझड होत होती. साहित्य क्षेत्रात अपप्रवृत्ती शिरत होती. लोकांना बदल हवा होता; पण समाजाने चांगल्या माणसांना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापासून दूर ठेवले. महाराष्ट्रात महावृक्षांसारखी माणसे होती. तपस्वी, निरलस असलेल्या आणि साहित्य बाह्य नसलेल्या लोकांच्या कामामुळे साहित्य परंपरा व संस्कृती घडत गेली. लिहिणे आणि बोलणे हेच त्यांनी आपले काम मानले; पण आपण त्यांना या पदापासून दूर ठेवले. हा आपला करंटेपणा आहे.’
‘फुलांना प्रतिबिंब पाहता येत नाही, ते पाणी नाही विष आहे, असे दुर्गाबाई म्हणाल्या होत्या. आपण समूहजीवनाचे विष करून टाकले आहे. संस्कृतीकडे आणि समूहजीवनाकडे कसे पाहतो, हा विचार करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात मोठी माणसे होऊन गेली, पण आपण त्यांचे विचार पचवू शकलो नाही. पुरोगामी महाराष्ट्रासाठी मोठी वाटचाल करायची आहे,’ अशी टिप्पणी डॉ. ढेरे यांनी केली.
उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.