पालघर : समाजातील जातिभेद व असमानतेची दरी दूर करून समाज एकसंध व्हावा, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजनेंतर्गत ६३ जोडप्यांना ५० हजार रुपयांचा धनादेश पालघर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती सुरेखा थेतले, उपाध्यक्ष सचिन पाटील, समाजकल्याण सभापती धर्मा दावजी गोवारी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निधी चौधरी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एन. के. जेजुरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश देवऋषी, समाजकल्याण अधिकारी राजेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. पालघर जिल्हा परिषदेच्या जनसंपर्क अधिकारी मनीषा निरभवणे यांनी या कार्यक्रमाविषयीची माहिती दिली.

समाजात स्वातंत्र्य, समता व बंधुता ही मूल्ये रुजवून जातिभेद, अस्पृश्यता संपुष्टात यावी व समाजाच्या मानसिकतेमध्ये बदल होऊन, आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना समाजात प्रतिष्ठा मिळवून देण्याचा निर्धार श्रीमती थेतले यांनी या वेळी व्यक्त केला. ‘विवाह हा आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असतो. अशा महत्त्वाच्या क्षणी जाती-पातीच्या भिंती तोडून सामाजिक बंधन झुगारून काही वेळा आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना समाजात मानाचे स्थान मिळतेच असे नाही. अशा वेळी सरकार त्यांच्या पाठीशी उभे आहे,’ असे आश्वासन देऊन ‘एकमेकांवर असलेला विश्वास जपून आयुष्याची पुढील वाटचाल करा,’ अशा शुभेच्छा श्रीमती निधी चौधरी यांनी उपस्थित जोडप्यांना दिल्या.