पुणे : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून भांडारकर प्राच्यविद्या संस्थेने यंदा त्यांच्या शतकपूर्तीनिमित्त एक आगळावेगळा उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे. आशिया खंडातील श्रीगणेशाची विविध रूपे दाखवणारे आगळेवेगळे प्रदर्शन यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केले आहे. यासाठी या विषयाचे अभ्यासक, प्रसिद्ध भारतीय विद्या संशोधक पद्मश्री डॉ. मधुकर ढवळीकर यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे.
डॉ. ढवळीकरांनी यापूर्वी ‘श्रीगणेश : आशियाचे आराध्य दैवत’ हे राजहंस प्रकाशनाचे मराठीतले, तर ‘गणेश : दी गॉड ऑफ एशिया’ हे इंग्रजीतले ‘आर्यन बुक्स इंटरनॅशनल’चे अशी दोन संशोधनात्मक पुस्तके लिहिली आहेत. भांडारकर संस्थेतील श्रीगणेशावरील छायाचित्र प्रदर्शन हा या संशोधन कामाचाच एक पुढचा टप्पा आहे. या प्रदर्शनासाठी डॉ. ढवळीकरांनी गणेशाची सुमारे साठ छायाचित्रे निवडली असून, ती सुमारे अडीच फूट बाय दोन फूट आकारात मोठी करण्यात आली आहेत. ही छायाचित्रे आणि त्याची ऐतिहासिक व पुरातत्त्व दृष्टीने उपयुक्त माहितीही सोबत देण्यात येणार असल्याचे डॉ. ढवळीकरांनी सांगितले.
यासंबंधीची अधिकृत घोषणा भांडारकर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या १०० वर्षांच्या पूर्तीनिमित्त नुकतीच केली होती. संस्थेचे मानद सचिव डॉ. श्रीकांत बहुलकर यांनी या संदर्भात सांगितले, ‘यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने हा आगळा वेगळा उपक्रम आम्ही राबवत आहोत. आशिया खंडातील विविध ठिकाणी असणाऱ्या गणेशाची रूपे या निमित्ताने पुणेकर भाविक आणि अभ्यासकांना छायाचित्रांच्या माध्यमातून पाहता येतील. भारतीय विद्या/इंडॉलॉजी या विषयाचे ज्येष्ठ तज्ज्ञ म्हणून डॉ. ढवळीकरांची या प्रकल्पासाठी मोठी मदत होत आहे.’
‘डॉ. ढवळीकर यांनी वयाच्या ८६व्या वर्षीही अत्यंत उत्साहाने व तितक्याच तळमळीने मांडलेली श्रीगणेशावरील प्रदर्शनाची कल्पना स्वागतार्ह आहे,’ असेही डॉ. बहुलकर यांनी स्पष्ट केले.
आशियातील गणेशाच्या विविध रूपांबद्दल अधिक तपशील सांगताना डॉ. ढवळीकर म्हणाले, ‘भारतीय संस्कृती आणि हिंदू देव केवळ भारतातीलच नव्हे, तर संपूर्ण आशिया खंडात पोहोचले आहेत. त्यातील श्रीगणेशाची अनेक रूपे या भागात मोठ्या प्रमाणावर विखुरलेली आढळतात. आधी फ्रेंच व नंतर ब्रिटिश पुरातत्त्व संशोधकांनी यावर गेल्या १५० ते २०० वर्षांमध्ये अभ्यास केला आहे. त्यातील जॉर्ज हिडेस या फ्रेंच संशोधकाचे कार्य विशेष महत्वाचे मानले जाते. आशिया खंडात विखुरलेल्या गणपतीच्या दुर्मीळ, देखण्या व कलात्मक मूर्ती, तसेच शिल्पे, शिलालेखांचाही या अभ्यासात समावेश आहे.’
‘दुर्दैवाने यापैकी आशियातील काही भागांत ही साधने आता नाहीशी होत आहेत. तसेच अफगाणिस्तानात सध्या अनेक प्राचीन वास्तूंची तोडफोड चालली आहे. तिथे गणपतीचीही दोन देवळे आहेत. तसेच पाचव्या शतकातील लेख आणि गणेशाच्या संगमरवरी मूर्तीही आहेत. या साऱ्याचाच वेळेवर अभ्यास व संशोधन झाले पाहिजे. तसेच वेळीच सावध होऊन भारतीय अभ्यासकांनी आपल्या संस्कृतीचे ते पुरावे जमवून त्यावर अधिक संशोधन करायची खरी गरज आहे. याची एक छोटीशी सुरुवात आम्ही भांडारकर संस्थेच्या दालनातील गणेश प्रदर्शनाच्या रूपाने करणार आहोत,’ असे डॉ. ढवळीकरांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, ‘आशियातील गणेशमूर्तींमध्ये चीन, जपान, अफगाणिस्तान अशा अनेक ठिकाणी असणारी गणेशाची विविध रूपे आणि आकार एकाच ठिकाणी प्रदर्शनाच्या रूपात पाहता येतील. बुद्ध व जैन धर्म व तत्त्वज्ञानाच्या स्वरूपात जगात अनेक ठिकाणी हिंदू दैवते यापूर्वीच पोहोचली आहेत. गणपती हा काही देशात हिंदू, तर काही देशांत बुद्धसंस्कृतीच्या स्वरूपात आढळतो. हिंदुस्थानातील व्यापारी इसवी सनाच्या पाचव्या शतकापासून जगात, आशियात ठिकठिकाणी व्यापाराच्या निमित्ताने गेले आणि त्यांनी तिथल्या कारागिरांच्या मदतीने गणेशाच्या मूर्ती असणाऱ्या देवळांचीही स्थापना केली. विशेष म्हणजे गणपतीच्या मूर्ती घडवणारे शिल्पकार केवळ हिंदू नसून, ते इतर धर्मांमधीलही आहेत. यातून श्रीगणेश हा केवळ हिंदूंपुरता मर्यादित न राहता, तो जिथे गेला तिथल्या संस्कृतीनुसार त्याची रूपे व आकार बदलत गेले. काही ठिकाणी तो घोड्यावरही स्वार झालेला दिसतो! आशिया खंडात कंबोडियामध्ये सुमारे १४०० कोरीव लेख आहेत, तीच गोष्ट ब्रह्मदेश व नेपाळचीही आहे. दक्षिण व मध्य अशिया ही भारतीय संस्कृती व दैवतांची महत्त्वाची ठिकाणे आहेत. कंबोडिया, पाकिस्तान, श्रीलंका आणि इंडोनेशिया ही त्यातली काही महत्त्वाची केंद्रे आहेत. इंडोनेशियात तर १२ फूट उंचीची एक गणेशमूर्ती आहे. हे सारेच अभ्यासण्याजोगे आहे.’
डॉ. ढवळीकर पुढे म्हणाले, ‘सर्वांत आधीचा गणपती पिळदार असून तो ग्रीकांच्या नाण्यात इसवी सनाच्या आधी ५० वर्षांपूर्वी कोरण्यात आला आहे. जगज्जेता अलेक्झांडर हाही पवित्र समजल्या जाणाऱ्या एका हत्तीची पूजा करत असे. पाचव्या शतकात व्यापाराच्या निमित्ताने भारतातून गणपती हे दैवत म्हणून जगाला माहीत झाले, तरी त्याचा प्रसार सहाव्या शतकापासून झाला असावा.’
श्री गणेशावरील या प्रदर्शनाच्या निमित्ताने भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत आशियातील दैवतांवर आधारित एक स्वतंत्र अभ्यासक्रम व त्यावरील पुढचे संशोधन असा प्रकल्पही उभारला जाण्याची शक्यता आहे. यातून तरुण संशोधक तयार होऊन त्यांना आशियातील ठिकठिकाणच्या भारतीय संस्कृतीच्या इतर अनेक खुणा असणाऱ्या ठिकाणांची माहिती गोळा करून त्यावर नवीन प्रकाश टाकता येईल, अशी अपेक्षा डॉ. ढवळीकरांनी व्यक्त केली. यापूर्वी कोलकाता येथील ग्रेटर इंडिया सोसायटी याबाबत अभ्यास व संशोधन करत होती. ते केंद्र बंद झाल्यामुळे यासंबंधीचा अभ्यास आता पुन्हा सुरू होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
डॉ. ढवळीकरांच्या मते चीनमधील टुंगवांग लेणी व त्यातील गणेशाचे दर्शन यावरही नवे संशोधन शक्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पूर्वेकडील देशांमध्ये दौरे करत असले, तरी या देशातील अस्तित्वात असणाऱ्या भारतीय संस्कृतीच्या पाऊलखुणांकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यावर या संशोधनातून काही नवीन व उपयुक्त माहिती हाती लागू शकेल.