Ad will apear here
Next
यशवंत संस्कृती : यशवंतराव चव्हाणांच्या व्यक्तित्वाचा बहुआयामी वेध
‘हिमालयाच्या मदतीला धावलेला सह्याद्री’ असे ज्यांचे यथार्थ वर्णन केले जाते, ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा आज (१२ मार्च ) जन्मदिन. यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय करून देणारा ‘यशवंत संस्कृती : नेतृत्व आणि कर्तृत्व’ हा ग्रंथ विलास फुटाणे यांनी आदित्य प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित केला आहे. या ग्रंथात विविध क्षेत्रांतील २७ मान्यवर आणि दिग्गजांचे लेख आहेत. या ग्रंथाचा परिचय चव्हाण यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने प्रसिद्ध करत आहोत. 
..........
महाराष्ट्राच्या जडणघडणीत स्वत:च्या कर्तृत्वाने भर घालणाऱ्या अग्रगण्य व्यक्तींमध्ये यशवंतराव चव्हाण या दूरदृष्टीच्या नेत्याचा समावेश केला जातो. राजकारणाच्या क्षेत्रातील सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व म्हणून ते परिचित होतेच; तथापि स्वत:च्या कृती-उक्तीचा आदर्श त्यांनी उभा करून दिला. मूल्यांवर विश्वास ठेवणारा, जनतेची नस ओळखणारा, वैचारिक उंची असलेला, साहित्याविषयी आस्था बाळगणारा, राज्याच्या व देशाच्या कल्याणाची स्वप्ने बघणारा धुरंधर नेता अशी त्यांची प्रतिमा सर्वत्र उभी राहिली. महाराष्ट्राला लाभलेले आधुनिकतेचे रूप, कृषी संस्कृतीचा विकास, भेदभावरहित जनकल्याणाचा विचार, सहकार चळवळीचा पुरस्कार अशा दिशेने प्रयत्नशील राहिलेला लोकनेता म्हणून यशवंतरावांची प्रतिमा आजही महाराष्ट्राने जतन करून ठेवली आहे. अशा या यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय करून देणारा ‘यशवंत संस्कृती : नेतृत्व आणि कर्तृत्व’ हा ग्रंथ विलास फुटाणे यांनी आदित्य प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित केला आहे.

या ग्रंथाचे संपादन विलास फुटाणे यांनी विशिष्ट भूमिका ठेवून केले आहे. ‘राजकीय क्षेत्रात येणाऱ्या नव्या चेहऱ्यांना यशवंतरावांच्या कार्यचेहऱ्याची ओळख व्हावी, त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी,’ या हेतूने हे संपादन सिद्धीस नेले आहे. या दोनशे पानी ग्रंथात २७ मान्यवरांचे लेख असून, यशवंतराव चव्हाण यांच्या बहुमिती व्यक्तिमत्त्वाला प्रकट करणारे हे लेखन आहे. हे लेखन करणाऱ्यांमध्ये विचारवंत, लेखक, तत्त्वज्ञ, मुख्यमंत्री अशी बहुविध क्षेत्रांतील मंडळी आहेत. त्यामुळेच या हिऱ्याचे विविध पैलू एकत्रितपणे वाचण्याची संधी वाचकाला आपोआपच मिळते. महाराष्ट्र शासनाच्या लोकप्रिय असणाऱ्या ‘लोकराज्य’ मासिकातून हे सारे लेख यापूर्वीच प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे ते सुट्या सुट्या स्वरूपात आलेले होते. या सर्वांचे एकत्रीकरण करून ते या संपादित ग्रंथात एकत्रपणे वाचता येणार असल्याने यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रेम करणाऱ्या सर्वांनाच आनंददायी ठरेल अशी ही घटना आहे. यशवंतराव हे अवघ्या महाराष्ट्राचे नेते होते. त्यांचे राजकीय विरोधकही त्यांच्या वैचारिक दृष्टीची मुक्तकंठाने प्रशंसा करीत. महाराष्ट्राच्या खेड्यातल्या एका मुलाने महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावे किंवा देशाचे संरक्षणमंत्रिपद सांभाळावे ही निश्चितच सामान्य गोष्ट नाही. यशवंतरावांशी ज्यांचे अतिशय जवळून संबंध आले, अशा व्यक्तींनी त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा वेध या ग्रंथात घेतला असल्याने त्याचे वेगळेपण आपोआपच नजरेत भरते.

यशवंतराव चव्हाण यांच्या कौटुंबिक जीवनापासून ते त्यांच्या राजकीय क्षेत्रातील देदीप्यमान कारकीर्दीपर्यंतचा आलेख या ग्रंथात उमटलेला दिसतो. काही दाखले या संदर्भात देता येतील. डॉ. सरोजिनी बाबर यांनी यशवंतरावांच्या अनेक आठवणी जागवून साहेब म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता कशी आहे याची मांडणी केली आहे. गोविंद तळवलकर यांनी यशवंतरावांच्या स्वभावावर प्रकाश टाकून त्यांच्या मनाची मशागत कशी झाली होती आणि प्रशासक हा शिस्तीचा व हृदयशून्य कसा असतो याचे उदाहरण घालून दिल्याच्या आठवणी जागवल्या आहेत. शंकरराव साळवी यांनी कबड्डी, खो-खो या खेळांचे त्राता म्हणून यशवंतरावांनी केलेल्या कार्याची दखल घेतली आहे. यशवंतरावांचे असेच वेगळे रूप बाळ कोल्हटकरांच्या लेखात सापडते. नाटकांवर आणि कलावंतांवर जिवापाड प्रेम करणारा एक रसिक त्यातून उभा राहतो. रणजित देसाई यांनी साहित्यप्रेमी यशवंतरावांचे व्यक्तिमत्त्व आपल्या लेखनातून उलगडलेले आहे. साहित्यिक आणि त्यांचे साहित्य यावर मनापासून प्रेम करणाऱ्या यशवंतरावांचा एक पैलू त्यातून लक्षात येतो. कला-क्रीडा आणि साहित्य यांच्याशी निकटचा संबंध ठेवणारे एक सर्वस्पर्शी अष्टपैलू नेतृत्व या लेखांमधून प्रकट होते.

या संपादनातील पहिलाच लेख माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा असून, त्यात यशवंतरावांच्या नेतृत्वाचा वेध अनेकांगांनी घेतलेला आढळतो. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या सवलतींचा निर्णय याबाबत त्यांच्या नेतृत्वाची कसोटी लागली. जिल्हा परिषदांची निर्मिती, सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा विचार, लष्कराचे आधुनिकीकरण या संदर्भातल्या त्यांच्या कार्याची नोंद या लेखात आली आहे. शरदचंद्र पवार यांनी त्यांच्याशी आलेला संबंध, यशवंतरावांची एकजिनसी समाजाची कल्पना, लोकशाही समाजवादाची त्यांची संकल्पना, त्यांचे संसदपटुत्व यावर प्रकाश टाकला आहे. 

‘आदर्शाचा दीपस्तंभ’ या दृष्टीने त्यांनी केलेले हे भाषण या ग्रंथात लेखस्वरूपाने साकारले आहे. वसंतराव नाईक यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील यशवंतरावांची कामगिरी नोंदवून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण राष्ट्रीय व तात्त्विक विचारसरणीतून कशी झाली, मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचारांचा पगडा असलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रगत विचारांचे कसे आहे हे आपल्या लेखातून उलगडलेले आहे. मा. सो. कन्नमवार यांच्या लेखात सहप्रवासी या दृष्टीने आलेली अनेक निरीक्षणे पाहण्यास मिळतात. त्यात जसा वेणूताई चव्हाणांच्या आठवणींचा संदर्भ येतो, तसाच संघर्षाच्या प्रसंगी कठोर निर्णय घेऊन काँग्रेसच्या सच्च्या कार्यकर्त्याचेही दर्शन घडते. सर्वांना सांभाळून घेणारे, सर्वांना कामात स्वातंत्र्य देणारे, इतरांच्या पोटात शिरून त्यांचा विश्वास संपादणारे यशवंतराव हे विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र यांच्यात पूल उभारणारे ‘कल्पक इंजिनीअर’ कसे होते हे सोदाहरण मांडले आहे.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी यशवंतरावांच्या बालपणापासूनची जडणघडण आपल्या लेखात मांडली असून, भारतीय राष्ट्रवाद त्यांच्या जीवनाचा मार्गदर्शक बनला, विविध विचारवंतांचा व्यासंग त्यांनी कसा वाढवला, स्वातंत्र्यप्राप्तीच्या आंदोलनात सहभाग कसा घेतला याचे वर्णन केले आहे. यशवंतरावांच्या अनेकविध पैलूंवर या लेखातून प्रकाश पडतो. होमगार्ड संघटनेची निर्मिती, द्वैभाषिक राज्याचे मुख्यमंत्रिपद, स्वराज्य संस्थांच्या निर्मितीचा कायदा, कृषी औद्योगिक अर्थव्यवस्था, चीन आक्रमणाच्या वेळी सांभाळलेले संरक्षणमंत्रिपद या विषयीची बारीकसारीक माहिती त्यात मिळते; पण घरच्या पातळीवरील दु:खाचे क्षणही ते आपल्या लेखनातून जिवंत करताना आढळतात. अशाच प्रकारच्या आठवणी जागवून मोहन धारिया यांनीही त्यांच्यातील अष्टपैलुत्व मांडलेले आहे. 

एका बाजूला राजकीय वाटचाल, तर दुसऱ्या बाजूला व्यक्तिमत्त्वाचे विविधरंगी पैलू यामुळे यशवंतराव हे अनेकांचे स्नेही बनले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील ‘माणूस’ शोधण्याचा प्रयत्नही रामभाऊ जोशी, एस. एम. जोशी यांनी आपल्या लेखातून केला आहे. बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांनी ‘महाराष्ट्राचे शिल्पकार’ अशा अचूक शब्दांत त्यांचे वर्णन केले आहे. २७ लेखांमधून सत्तावीस नक्षत्रांसारखे अनेकविध चमचमणारे गुण या ग्रंथातून लक्षात येतात. यशवंतराव चव्हाण यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेण्याचा हा प्रयत्न आहे. गोविंद तळवलकर, आचार्य अत्रे, नरुभाऊ लिमये, य. दि. फडके यांसारख्या दिग्गजांच्या शब्दांमधूनही यशवंतरावांचे रूप साकारले जाते. प्रशासक आणि राज्यकर्ता म्हणून त्यांनी घेतलेले महत्त्वाचे निर्णय श्री. रा. सोहनी यांनी नोंदवलेले आहेत. आधुनिक महाराष्ट्राचे रूप अधिकाधिक मनोहार्य बनविण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांच्याशी निगडित असणाऱ्या सर्वांनीच आपली लेखणी झिजवली आहे. यातून यशवंतरावांची बहुआयामी व्यक्तिरेखा जिवंत होते. कुण्याही मराठी माणसाला अभिमान वाटावा असे यशवंतराव समजून घेण्यासाठी यशवंत संस्कृती हा संपादित ग्रंथ उपयुक्त ठरणार आहे. 
 
यशवंत संस्कृती : नेतृत्व आणि कर्तृत्व
संपादन/लेखन : विलास फुटाणे
पाने : १६८ 
किंमत : २०० रुपये
प्रकाशन : आदित्य प्रकाशन, अबोली अपार्टमेंट, ३२, तिसरा मजला, न्यू उस्मानपुरा, औरंगाबाद.
फोन : (०२४०) २३५४२४५.

(हा ग्रंथ ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZTZCK
Similar Posts
वास्तवाला भिडणारी कविता सनदी अधिकारी असलेल्या डॉ. पुरुषोत्तम भापकर यांचे ‘चांदणं उन्हातलं’ आणि ‘आकांत शांतीचा’ हे दोन काव्यसंग्रह अलीकडेच आदित्य प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आले आहेत. या काव्यसंग्रहांची ही ओळख...
श्री अक्कलकोट स्वामी समर्थ आज श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. त्या निमित्ताने, ‘श्री अक्कलकोट स्वामी समर्थ’ या पुस्तकाचा अल्प परिचय...
‘आकांत शांतीचा’... सामाजिक क्रांतीचा! प्रशासकीय अधिकारी डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी लिहिलेल्या कवितांचा ‘आकांत शांतीचा’ हा कवितासंग्रह अलीकडेच आदित्य प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. डॉ. भापकरांच्या या काव्यसंग्रहातून सौंदर्यपूर्ण काव्याने ओतप्रोत असलेल्या शब्दांची शृंखला उलगडत जाते. या काव्यसंग्रहाबद्दल...
बुकगंगा पब्लिकेशन्स पुणे प्रकाशित आणि पद्माकर पाठकजी लिखित ‘सुनहरे गीत’ या पुस्तकाचे प्रकाशन गाणी ऐकण्याच्या छंदाला अभ्यासाचे रूप देणे आणि त्यावर पुस्तक लिहिणे हे विशेष आहे...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language