आज मराठी राजभाषा दिन सर्वत्र उत्साहात साजरा होतो आहे. त्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छांचे संदेश पाठवले जात आहेत. फेसबुक, ट्विटरसारख्या समाजमाध्यमांवर तर अशा संदेशांना इतका ऊत आला आहे, की ते पाहिल्यावर मातृभाषेच्या प्रेमानं ऊर अगदी भरूनच यावा. भाषेच्या संवर्धनाच्या दृष्टीनं हा शुभसंकेतच म्हणायला हवा; मात्र भाषा टिकवायची आणि चांगल्या प्रकारे टिकवायची असेल, तर हा एका दिवसाचा उमाळा पुरेसा नाही.
समाजमाध्यमांचा फायदा असा, की असा काही मराठी राजभाषा दिन असतो आणि तो दर वर्षी साजरा केला जातो हे अधिकाधिक लोकांना त्यांच्यामुळे समजलं. नाही तर केवळ सरकारी कार्यक्रमांपुरतीच त्या दिनाची व्याप्ती मर्यादित होती. ती आता मोबाइलमुळे प्रत्येकाच्या हातापर्यंत पोहोचली आहे. ही बाब आनंददायी असली, तरी नुसती माहिती मिळणं किंवा कोरड्या शुभेच्छा देणं पुरेसं नाही, तर मराठी भाषेची जपणूक करण्यासाठी, तिचं सौंदर्य टिकवण्यासाठी प्रत्येकानं कृतिशील प्रयत्न करण्याची गरज आहे. म्हणजे नेमकं काय करायचं?
कम्प्युटर, मोबाइल, लॅपटॉप, टॅब अशा सगळ्या माध्यमांत आज आपल्याला मराठी लिहायला-वाचायला मिळतं, ही युनिकोड तंत्रज्ञानाची कमाल आहे. ही गोष्ट अनेकांना माहिती असेलच; पण ती माहिती नसलेल्यांची संख्याही बरीच आहे. तांत्रिक गोष्टीत आपल्याला शिरायचं नाही, पण ‘युनिकोड’मध्ये प्रत्येक अक्षरासाठी एकच ‘युनिक कोड’ असतो. त्यामुळे फाँट ओपनच झाला नाही, ही काही वर्षांपूर्वी मराठी किंवा कम्प्युटरवरच्या कोणत्याही प्रादेशिक भाषेच्या लेखनात जाणवणारी अडचण दूर झाली. त्यामुळेच युनिकोडमधला मजकूर सर्वत्र सहजपणे दिसतो. सध्या वेबसाइट्स, तसेच समाजमाध्यमांमध्ये सर्वत्र युनिकोडचा वापर केला जातो. त्यामुळे मोबाइल, लॅपटॉप, कम्प्युटर, टॅब अशा कोणत्याही साधनावर मराठी मजकूर वाचणं सहज शक्य होतं.
आता कृतिशील प्रयत्नांच्या मूळ मुद्द्याकडे वळू या. व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा ट्विटरवर मराठीतून लिहिताना किंवा मराठी संदेश फॉरवर्ड करताना प्रत्येकानं काळजी घ्यायला हवी. युनिकोडमध्ये मराठीत बिनचूकपणे टाइप करण्यासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड लेआउट वापरणं हा उत्तम पर्याय आहे. त्यात प्रत्येक मराठी स्वर आणि व्यंजन व्यवस्थितपणे टाइप करता येतं. इन्स्क्रिप्ट की-बोर्डचा पर्याय अलीकडच्या प्रत्येक मोबाइलमध्ये, तसेच कम्प्युटरमध्येही उपलब्ध असतो, फक्त तो निवडण्याची गरज असते. बऱ्याचदा अनेकांकडून गुगल ट्रान्स्लिटरेट किंवा फोनेटिक इंग्लिशचा पर्याय निवडला जातो. त्यात मराठी शब्दाचं इंग्रजी स्पेलिंग करून त्यापासून मराठी शब्द टाइप केला जातो. त्यामुळे ज्ञ, ञ, त्र, क्ष, अॅ, ऱ्या, ङ्म, क्लृ अशी अनेक अक्षरं आणि जोडाक्षरं योग्य प्रकारे टाइप होत नाहीत. केवळ टाइप करायला सोपे पडेल, या (गैर) समजामुळे हा पर्याय निवडला जातो आणि चुकीचं टाइप केलं जातं. तसंच ते शेकडो-हजारो वेळा फॉरवर्ड होतं. त्यामुळे साहजिकच चुकीचंच लोकांच्या दृष्टीस पडतं आणि एखादी गोष्ट वारंवार नजरेस पडली, की तीच बरोबर आहे, असा समज दृढ होतो. काही जणांना शंका येत असली, तरी योग्य पद्धतीनं कसं लिहिता येईल याचा विचार ते करत नसावेत. नाही तर चुकीच्या पद्धतीनं लिहिलेल्या शेकडो पोस्ट्सचा मारा झाला नसता. ‘ऱ्या’च्या ठिकाणी ‘र्या’, ‘त्र’च्या ठिकाणी ‘ञ’, ‘ङ्म’च्या ठिकाणी ‘डम’ अशा अनेक हास्यास्पद चुका लिहिताना केल्या जातात आणि कोणालाही ते खटकत नाही हे विशेष. कारण कोणताही विचार न करता त्या फॉरवर्ड केल्या जातात. इन्स्क्रिप्ट की-बोर्ड लेआउट वापरला, तर मराठीतली सगळी अक्षरं बिनचूक टाइप करता येतात. मग आपण ते का करत नाही बरं? देवनागरी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड लेआउट असा ‘सर्च’ गुगलवर दिला, तर त्या लेआउटबद्दलची माहिती येते. त्याची प्रिंट काढून घेऊन सराव केला, तर इन्स्क्रिप्ट की-बोर्ड व्यवस्थित शिकण्यासाठी जास्तीत जास्त एक आठवडा पुरेसा होतो. यात शब्दोच्चाराप्रमाणे टाइप करायचं असल्यामुळे त्यात जास्तीत जास्त अचूकता असते. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागाच्या वेबसाइटवर युनिकोडच्या वापरासंदर्भातली समग्र माहिती उपलब्ध आहे. तसंच, पूर्वी युनिकोडचा केवळ ‘मंगल’ फाँट उपलब्ध होता. त्याला काही पर्यायही आता उपलब्ध झाले आहेत. राज्य मराठी विकास संस्थेच्या वेबसाइटवर यशोमुद्रा आणि यशोवेणू हे दोन चांगले दिसणारे ‘ओपन सोर्स फाँट’ही मोफत डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.
आणखी एक प्रश्न आहे तो म्हणजे व्याकरण आणि शुद्धलेखनाचा...अलीकडे केवळ मराठीतच नव्हे, तर सर्वच भाषांमध्ये एक नवाच प्रवाह ठळकपणे दिसू लागला आहे, तो म्हणजे ‘शुद्धलेखन, व्याकरणाची काही गरज नाही, समोरच्यापर्यंत आपल्या भावना पोहोचल्या की झालं.’ शिवाय, ‘भाषेच्या राजकारणामुळे अभिजनांचं मराठी बहुजनांवर लादलं गेलं,’ असे युक्तिवादही केले जातात. वास्तविक, मराठीइतक्याच तिच्या बोलीभाषाही तितक्याच सुंदर, अर्थवाही आणि दर्जेदार आहेत. त्यांच्यामध्ये तुलना करण्याची किंवा त्याकडे राजकारणाच्या दृष्टीनं पाहण्याची गरज नाही. प्रत्येक भाषेची आणि बोलीची स्वतःची सौंदर्यस्थळं आहेत आणि ती टिकवली पाहिजेत; पण त्यासाठी प्रमाणलेखन आणि व्याकरणाची गरज आहे. त्याचा बाऊ करायला नको; पण एक प्रकारे भाषेचं सौंदर्य टिकवण्याचं कामच हे व्याकरण करत असतं. त्यामुळे प्रमाण मराठीत लिहायचं असलं, तर व्याकरण आणि शुद्धलेखनाचे किमान आवश्यक नियम तरी पाळले जायलाच हवेत. त्याला कोणी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचं बंधन समजू नये. (प्रादेशिक बोलीत लिहायचं असलं, तर त्यात प्रमाण मराठी शब्दांची सरमिसळ नको हेही ओघानं आलंच.) हे नियम पाळले नाहीत तर काय होणार? कदाचित आणखी दोन-तीन पिढ्यांनंतर मराठीचं मूळ सौंदर्यच नाहीसं होण्याची भीती आहे. भाषा प्रवाही असायला हवीच, तिच्यात वेगवेगळ्या भाषांतून नवनवे शब्द यायला हवेत, तंत्रज्ञानामुळे ते येत आहेतच; पण त्या सगळ्यात मराठीचं मराठीपण नाहीसं होता कामा नये. चांगलं लिहिण्यासाठी शुद्धलेखनाचे नियम पाठ करण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही जर चांगलं आणि बऱ्यापैकी वाचत असाल, तर तुमची ‘फोटोग्राफिक मेमरी’च तुम्हाला ऱ्हस्व काय आणि दीर्घ काय, हे क्षणार्धात सांगते. म्हणूनच समाजमाध्यमांवर लिहित असतानाही काळजीपूर्वक लिहिलं जायला हवं ते यासाठी. कारण अलीकडे आपण सर्वच जण समाजमाध्यमांना मोठ्या प्रमाणात सामोरे जातो. त्यामुळे आपल्यावर कळत-नकळत त्यातल्या भाषेचे संस्कार होतात. पुण्यात ‘महाराष्ट्र टाइम्स’नं आयोजित केलेल्या ‘मटा मैफल’ या कार्यक्रमात ‘माध्यमांची बदलती भाषा’ या विषयावर २६ फेब्रुवारीला तज्ज्ञांचा परिसंवाद झाला. त्यातही हाच मुद्दा मांडण्यात आला होता, की पूर्वी एखाद्या स्त्रीला एखादी वेगळी पाककृती समजून घ्यायची असेल, तर ती पुस्तक विकत आणायची. आज ती त्यासाठी यू-ट्यूबवर जाते किंवा वेबसाइटवर शोधते. परिसंवादात मांडण्यात आलेलं हे निरीक्षण बरोबरच आहे. त्यामुळे या समाजमाध्यमांवरील भाषाच जर योग्य नसली, तर साहजिकच ती वाचून होणारे संस्कारही अयोग्यच होणार, ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी.
इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये वापरली जाणारी भाषा हाही अलीकडे चिंतेचा विषय होऊ लागला आहे. त्या माध्यमांतल्या व्यक्तींवर असलेले ताण लक्षात घेतले, तरी त्यांनी अचूकतेसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करायला हवेत, हेही खरंच. मालिका किंवा चित्रपटांमध्ये अलीकडे सर्रास वापरलं जाणारं चुकीचं वाक्य म्हणजे ‘त्याने माझी मदत केली.’ हे साफ चूक आहे. हिंदीमध्ये ‘उसने मेरी मदद की’ असं होत असलं, तरी मराठीत ‘त्याने मला मदत केली,’ असंच वाक्य असायला हवं; पण हे वाक्य लिहिणाऱ्यांना खटकत नाही, ते सादर करणाऱ्यांनाही त्यात काही चूक वाटत नाही. प्रेक्षकांपैकी ज्यांना समजतं, त्यांची चिडचिड होते. जे त्यावर विचार करत नाहीत किंवा ज्यांना समजत नाही, ते स्वतः त्या वाक्याचा तसा वापर करायला मोकळे होतात. हे झालं एका वाक्याविषयी...असं अनेक वेळा, अनेक बाबतींत होतं. त्यात चांगला बदल होण्याची गरज आहे आणि त्याची सुरुवात प्रत्येकानं स्वतःपासूनच करायला हवी. वृत्तपत्रं, रेडिओ, टीव्हीवरच्या अनुवादित जाहिराती, काही वेळा बातम्यांमध्येही चुकीच्या शब्दांचा, खटकणाऱ्या भाषेचा वापर केलेला सर्रास दिसून येतो. चांगलं वाचन कमी झाल्यामुळे या अशा चुका खटकणाऱ्या लोकांचं प्रमाण कमी झालं आहे आणि ते बरोबर आहे असं समजून स्वतः त्याचा वापर करणाऱ्यांचं प्रमाण वाढतं आहे आणि ते धोकादायक आहे.
त्यामुळे मराठी भाषेच्या विकासासाठी राजभाषा दिन साजरा करतानाच आपण स्वतःला योग्य भाषावापराच्या कायमस्वरूपी चांगल्या सवयी लावून घेणार असलो, तरच मराठीची जपणूक आणि संवर्धन होऊ शकेल, नाही तर मराठी ‘दीन’ होण्याचीच शक्यता जास्त.
- अनिकेत कोनकर