नवी दिल्ली : शेतकऱ्यांना आपल्या शेतीमालाची ऑनलाइन विक्री करता यावी, यासाठी केंद्र सरकारने ‘एमएसटीसी’ या आपल्या उपक्रमांतर्गत ‘ई-रकम’ हे पोर्टल सुरू केले आहे. शेतीमालाच्या लिलावासाठी हे आधुनिक व्यासपीठ खुले झाल्याने शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. त्याच्या अंमलबजावणीत काही आव्हाने असली, तरी दीर्घकालीन विचार करता हे पोर्टल शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकेल.
भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतीसाठी आणि शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारावी याकरिता सरकार विविध पातळ्यांवर प्रयत्न करत आहे. शेतमाल शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. व्यापारी, दलालांची मधली फळी दूर करून शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची योग्य किंमत मिळवून देण्यासाठी उपाययोजना राबवण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून सरकारने हे ‘ई-रकम’ (ई-राष्ट्रीय किसान अॅग्री मंडी) पोर्टल सुरू केले आहे.
एमएसटीसी आणि सेंट्रल वेअरहाउस कार्पोरेशनची शाखा असलेली सीआरडब्ल्यूसी ही संस्था यांनी संयुक्तपणे या पोर्टलची निर्मिती केली आहे. केंद्रीय पोलादमंत्री वीरेंद्र सिंग, अन्न आणि सार्वजनिक वितरणमंत्री रामविलास पासवान यांच्या उपस्थितीत नुकतेच या पोर्टलचे उद्घाटन झाले. या वेळी बोलताना पासवान म्हणाले, ‘२० लाख टन डाळींचा लिलाव करण्याची सुविधा याद्वारे उपलब्ध करण्यात आली आहे. आता डाळींचा लिलाव करण्यास सुरुवात केली पाहिजे. २० लाख टन डाळ कोठारांमध्ये पडून आहे. तिला खरेदीदार नाहीत. त्याकरिता या पोर्टलचा वापर करण्याचा विचार आहे. शेतकऱ्यांनाही याचा चांगला उपयोग होईल. इंटरनेटच्या जाळ्याचा वापर करून खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांना जगभरातील बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. टप्प्याटप्प्याने देशातील शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाची ऑनलाइन विक्री करता येईल. त्याचे पैसे थेट त्यांच्या खात्यात जमा होतील.’
‘नैसर्गिक आपत्ती आणि प्रतिकूल हवामान यामुळे अनेक पिकांच्या किमतीत चढउतार होत असतात. ते नियंत्रणात ठेवून त्यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल,’ असेही पासवान यांनी म्हटले आहे. ‘अनेक शेतकरी अशिक्षित, अल्पशिक्षित असल्याने पोर्टलच्या वापरात आव्हानेही आहेत. मालाची वाहतूक हेदेखील मोठे आव्हान आहे; पण कालपरत्वे त्यावर प्रभावी उपाययोजना राबवल्या जातील,’ अशी ग्वाहीही पासवान यांनी दिली. ‘कृषीआधारित अर्थव्यवस्था मजबूत करणे आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे हे उद्दिष्ट आहे,’ असे पोलादमंत्री सिंग यांनी स्पष्ट केले.
ठळक मुद्दे- देशभरात ‘ई-रकम’ केंद्रे स्थापन करण्यात येणार असून, त्याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाच्या विक्रीसाठी मदत केली जाणार आहे.
- शेतकरी, कृषी माल उत्पादक तसेच आणि व्यापारी किंवा लिलावात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना पोर्टलवर आपली सर्व प्रकारची माहिती देऊन आधी नोंदणी करावी लागेल.
- त्यानंतर दर वेळी पोर्टलवर जाताना आपला लॉगिन आयडी वापरून लॉगिन करावे लागेल.
- लिलावांच्या वेळांचे कॅलेंडर पोर्टलवर दिले आहे. तसेच पोर्टलचा वापर कसा करायचा, याची माहितीही त्यावर दिली आहे.
पोर्टलची लिंक : https://www.mstcecommerce.com/auctionhome/erakam