Ad will apear here
Next
करोनानंतरचा चीन


जिथून करोना विषाणूचा प्रसार जगभर झाला, त्या विषाणूचा देशांतर्गत प्रसार रोखण्यासाठी चीनने नेमके काय केले, आत्ता चीनमधील परिस्थिती नेमकी कशी आहे, याचा वेध ‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’ या सदराच्या आजच्या, दुसऱ्या भागात घेण्यात आला आहे. 
..........
एक कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या वुहान शहरात वाढत असलेल्या करोना रुग्णांचा आकडा लक्षात घेऊन चीन सरकारने २३ जानेवारी २०२० रोजी लॉकडाउन जाहीर केला आणि संपूर्ण जगासमोर करोनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला - आपल्याही देशात करोनाचा संसर्ग झाला तर काय?

परंतु, वुहान शहरात जन्माला आलेल्या या विषाणूने बघता बघता वाटले होते त्यापेक्षा लवकरच युरोपला गिळंकृत केले, अमेरिकेला जेरीस आणले. जगभर करोना रुग्णांची संख्या आज जवळपास एक कोटी ३२ लाख इतकी आहे.

‘चिनी विषाणू’ असे नाव देऊन अवघ्या जगाने चीनला दोषी ठरवले. दुर्दैवाने, आजवर कोणीही किंवा कोणताही देश करोनाचा संसर्ग थोपवू शकलेला नाही. जगातील सर्वांत सक्षम औषधे आणि डॉक्टर उपलब्ध असणाऱ्या इटलीसारख्या देशानेही करोनापुढे हात टेकले. चीनने मात्र करोनाचे उगमस्थान असूनही, २३ जानेवारीला सुरू झालेला लॉकडाउन आठ एप्रिलला संपुष्टात आणला आणि आपण यशस्वीपणे करोनाला थोपवू शकलो, हे छातीठोकपणे जगाला सांगितले.



चीनने नक्की काय केले?
वुहानमध्ये येऊन ठेपलेल्या या संकटाचा आवाका लक्षात घेऊन चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी सर्वांत पहिल्यांदा देशातील सर्व शाळा-कॉलेजेस बंद केली. याचबरोबर, देशांतर्गत वाहतुकीस आळा घातला. करोनाचा केंद्रबिंदू असणाऱ्या वुहान शहरातील प्रत्येक माणसाची तपासणी केली. आरोग्य कर्मचारी घराघरात जाऊन प्रत्येक व्यक्तीची चाचणी करत असत. कितीही कमी लक्षणे दिसली (सर्दी, ताप, इत्यादी) तरी त्या सदस्याला परिवारापासून विलग केले जाई. कितीही अमानुष वाटले, तरी पालकांना लहान मुलांपासून वेगळे करण्यात आले. १२-१५ विशेष रुग्णालये उभारण्यात आली. त्यामध्ये फक्त करोना रुग्ण होते. लोकांना घरीच सर्व सामान आणि खाण्यापिण्याच्या वस्तू पुरवण्यात आल्या. त्याचबरोबर, आपले जसे ‘आरोग्य सेतू’अॅप आहे, तसेच प्रत्येक चिनी नागरिकाला एक अॅप डाउनलोड करण्यास सांगण्यात आले. त्याद्वारे लोकांच्या हालचालींवर नजर ठेवण्यात आली. तब्येतीनुसार प्रत्येकाला ‘लेबल’ देण्यात आले. लाल, हिरवा, पिवळा असे रंग देण्यात आले. आवश्यकतेनुसार सर्व उपाययोजना राबवूनच लोकांना मॉल, सबवे यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी जायची परवानगी देण्यात आली.

मुख्यतः वुहान शहरात काही ठराविक वेळेनंतर घरीच राहण्याचे आदेश लोकांना ड्रोनद्वारे देण्यात आले. गरज पडली तर हे ड्रोन लोकांना रागावून सांगायचे आणि त्यांना घराबाहेर न पडायला प्रवृत्त करायचे. परंतु, या सर्व उपायांपेक्षा एक अत्यंत किचकट, पण अतिशय उपयुक्त असा उपाय करण्यात आला. तो म्हणजे, करोना पॉझिटिव्ह असणाऱ्यांना मैदानांसारख्या मोठ्या जागांमध्ये हलवण्यात आले. यामुळे ‘कम्युनिटी ब्रेकथ्रू’चा धोका टळला आणि अवघ्या ७५ दिवसांत चीन करोनामुक्त झाला.

घरगुती औषधे
करोनावर मात करण्यासाठी जगभरातील अनेक कंपन्या औषध शोधण्यासाठी धडपडत आहेत; पण एकाही कंपनीला अजून यश मिळालेले नाही. असे असूनही चीनने यशस्वीपणे करोनाचा प्रादुर्भाव थांबवला आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे, त्यांनी योजलेले घरगुती उपाय. 

करोनाच्या सुरुवातीच्या काळापासूनच चिनी जनतेला मास्क अनिवार्य करण्यात आला. जागोजागी ड्रोन फिरवण्यात आले आणि मास्क नसल्यास कडक कारवाई करण्यात आली. ‘फेस रेकग्निशन टेक्नॉलॉजी’ या तंत्रज्ञानात चीन फार प्रगत आहे. लोकांवर लक्ष ठेवण्यात या तंत्रज्ञानाचा चीनला खूप उपयोग झाला. फेस रेकग्निशन हे एक जुने तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान सर्वप्रथम अॅपल कंपनीने बाजारात आणले. यामध्ये मशीनचा कॅमेरा तुमच्या चेहऱ्याची ठेवण लक्षात ठेवतो आणि पुढच्या वेळी तुमचा चेहरा स्क्रीनसमोर आला, की स्क्रीन अनलॉक करतो. परंतु, हे या तंत्रज्ञानाचे साधे उदाहरण झाले. करोनाच्या काळात चीन सरकारने या तंत्रज्ञानाचा वापर लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी केला, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ठिकठिकाणच्या रस्त्यांवरील कॅमेऱ्यांमधून, ड्रोनमधून या तंत्रज्ञानामार्फत लोकांवर लक्ष ठेवले गेले. विनाकारण बाहेर फिरणाऱ्या लोकांना दंड केला गेला. काही माध्यमांच्या मते, बीजिंग आणि शांघाय ही शहरे पूर्णपणे या तंत्रज्ञानाच्या आधारे स्कॅन केली जातात आणि येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक माणसावर चीन सरकार लक्ष ठेवून असते.

चीनने केलेला दुसरा उपाय म्हणजे, चिनी लोक चहा खूप पितात. त्यांचा चहा आपल्यापेक्षा थोडा वेगळा असतो. गरम पाणी आणि चहापत्ती एकत्र करून दिवसातून कमीत कमी चार-पाच वेळा चिनी माणूस चहा घेतो. याच गोष्टीचा फायदा तिथल्या लोकांना झाला. गरम पाणी प्या, असा सल्ला सर्व डॉक्टरांनी दिला. तिसरा उपाय म्हणजे वाफारा घेणे. 

चिनी जनतेने हे तीन उपाय काटेकोरपणे पाळले. त्याचे फळ त्यांना आज मिळते आहे. अवघे जग करोनाच्या दुष्टचक्रात अडकलेले असताना चीनची अर्थव्यवस्था मात्र उभारी घेत आहे. 

महत्त्वाचा फरक
चीन सरकारने सांगितलेल्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन तेथील जनतेने केले. त्याचबरोबर, लोकांच्या आरोग्याची, त्यांच्या आवश्यक गरजा पुरवण्याची संपूर्ण जबाबदारी सरकारने घेतली. जीवनावश्यक गोष्टी सरकारने घरोघरी पोहोचवल्या. घरात राहावे लागत असल्याबद्दल सरकारने दिलगिरी व्यक्त केली, तर घराबाहेर न पडून चिनी जनतेने कृतज्ञता व्यक्त केली. इतका कडक लॉकडाउन आपणही पाळला नाही. घराबाहेर पडू नका, असे वारंवार सांगूनही भारतात लोक सररास बाहेर पडताना दिसत होते. लग्नसमारंभ, अन्य कार्यक्रम साजरे करत होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लॉकडाउनचे सर्व अधिकार प्रत्येक राज्याला दिले. गरज पडल्यास स्वतःच्या राज्यात लॉकडाउन घोषित करा, असे सांगितले. अमेरिकी जनतेनेही हे संकट गांभीर्याने घेतले नाही. चार जुलैला मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन स्वातंत्र्यदिन साजरा केला. या सर्वाच्या परिणामी, जगातील सर्वांत महत्त्वपूर्ण आणि महासत्ता असणारा अमेरिका आज करोनाचा सर्वाधिक फटका बसलेला देश होऊन बसला आहे. 

करोनानंतर काय?
चीनमध्ये आता शाळा-कॉलेजेस पूर्वपदावर आली आहेत. देशांतर्गत वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. उत्पादन कंपन्या पुन्हा वेगाने कामाला लागल्या आहेत. मागील सहा महिन्यांतील जबरदस्त फटका सहन करूनसुद्धा चीन विकासाच्या मार्गाला धरून समर्थपणे उभा आहे. विकासदर गेल्या वर्षापेक्षा १.६ टक्के कमी झाला असला, तरीही तिसऱ्या तिमाहीमध्ये चीनने ३.६ टक्के इतका विकासदर साध्य केला आहे. चीनची अर्थव्यवस्था भक्कम उभी असल्याचे या आकडेवारीवरून लक्षात येते. चीन २८० अब्ज डॉलर खर्च करणार आहे, ९० लाख नवीन नोकऱ्या निर्माण करणार आहे, असे तिथल्या साम्यवादी सरकारने जाहीर केले आहे. एका अहवालानुसार, मागील तीन महिन्यांत चिनी उत्पादन ४.४ टक्के वाढले असून, मोबाइल, चप्पल, खेळणी या उत्पादनांचे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा जास्त झाले आहे.

दुकानातील खरेदी-विक्रीचे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा ४ टक्के कमी झाले आहे. परंतु, त्यामागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे, बराच काळ लोक घराबाहेर जाऊ शकत नव्हते. याउलट, ऑनलाइन विक्री १४.३ टक्के वाढली आहे. याचबरोबर, चिनी व्यापारयुद्ध असूनही अमेरिकेहून येणाऱ्या मालाची आयात मागील वर्षापेक्षा तीन टक्के वाढली आहे. करोना असूनही दक्षिण आशियायी देशांशी चीनचा व्यापार चालूच होता. त्यामुळे चीनच्या निर्यातीवर फारसा फरक पडला नाही.

चीनचे नागरिक आणि सरकार
चीन सरकारचे जाचक निर्बंध असूनही, चीनचे नागरिक सरकारच्या कामकाजावर खूष आहेत. तीन महिने व्यवसाय, कामे बंद असूनही सरकारमुळे आज जनता पूर्वीपेक्षा अधिक जोमाने कामास लागली आहे. गरज पडेल तिथे सरकारने स्वतः जातीने लक्ष देऊन जनतेचे प्रश्न सोडविलेले आहेत. करोनानंतरच्या या काळात प्रांतीय सरकारे वेगवेगळ्या सबसिडी देत आहेत. कमी व्याजदराने कर्ज देत आहेत. त्यामुळे उद्योगधंद्यांना चालना मिळत आहे. समाधानविषयक केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, ७५ टक्क्यांहून अधिक जनता सरकारवर खूष आहे.

- सोहम काकडे
ई-मेल : soham.kakade@ewan.co.in

(लेखक पुण्यातील इवान बिझनेस सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक आणि चिनी भाषेचे तज्ज्ञ आहेत.)

(‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’ या सदरातील सर्व लेख एकत्रितरीत्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. )

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MYADCO
Similar Posts
चिनी मालावर बहिष्कार शक्य; पण... इतर देशांशी फटकून राहणाऱ्या चीनबद्दल आधीच असलेली तिरस्काराची भावना करोना विषाणूचा प्रसार तिथून झाल्यामुळे जगभर पराकोटीला पोहोचली आहे. भारतीय सीमेवर जवानांवर विनाकारण चढवलेल्या हल्ल्यांमुळे चीनवर बहिष्कार घालण्याचे सूर भारतात अधिक तीव्र झाले आहेत; मात्र व्यापार, खाद्यपदार्थ, संस्कृती आदी माध्यमांतून जगभर
चीन-अमेरिकेच्या व्यापारयुद्धात भारतासाठी संधी अशी अनेक उत्पादने आहेत, ज्यामध्ये भारत आंतरराष्ट्रीय दर्जा साध्य करून, उत्पादनांच्या गुणवत्तेमध्ये वाढ करून निर्यातीमध्ये चांगलीच वाढ करू शकतो. चीन आणि अमेरिकेच्या व्यापारयुद्धामध्ये भारतासाठी निश्चितच संधी दडलेल्या आहेत. ‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’ या सदराचा १३वा भाग..
भारत-चीन संबंध : भावनिक नको, ‘प्रॅक्टिकल’ दृष्टिकोन हवा ‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’ या सदराचा २०वा म्हणजेच अंतिम भाग.....
लॉकडाउननंतर भारतापुढे असलेली आव्हाने आणि संधी : देवेंद्र फडणवीस यांचे भाषण (व्हिडिओ) करोनाच्या साथीमुळे सध्या लागू असलेल्या अभूतपूर्व लॉकडाउननंतर देशापुढे असलेली आव्हाने आणि संधी या विषयावर माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय शिक्षण मंडळाच्या फेसबुक पेजवरून आपले विचार व्यक्त केले. त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ येथे देत आहोत..

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language