Ad will apear here
Next
स्वतंत्रतेचं स्तोत्र...
...स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशालाच देव मानलं. देशभक्ती हाच देशरूपी देवाप्रत पोहोचण्याचा एकमेव मार्ग आहे हे जाणलं. म्हणून तर देशरूपी देवाची स्तुती गाण्यासाठी त्यांनी ‘स्वतंत्रतेचं स्तोत्र’ लिहिलं. आज स्वातंत्र्यदिन आहे. त्या निमित्ताने ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आस्वाद घेऊ या स्वतंत्रतेच्या स्तोत्राचा...
...........
ऑगस्ट महिना म्हणजे श्रावणानं या सृष्टीला बहाल केलेलं ‘पाचूचं माहेर,’ तसंच अवघ्या भारतवर्षाला देशभक्तीनं भारलेल्या रोमांचकारी क्षणांचा आहेर! बालकवींची ‘श्रावणमास’ कविता गुणगुणताना निरागस शालेय जीवन आठवतं आणि त्याबरोबरच १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी उंच स्वरात गायलेली समूहगीतंही आठवतात. किती गाणी आत्ता या क्षणी आठवताहेत...त्यातलं स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी लिहिलेलं ‘स्वतंत्रतेचं स्तोत्र’ आपल्या भारतमातेइतकंच प्रिय! शाळेमध्ये ‘प्राणाहून प्रिय’ या शब्दांचा वाक्यात उपयोग करा, असा प्रश्न यायचा तेव्हा बहुतेक सर्व जण ‘माझी भारतमाता मला प्राणाहून प्रिय आहे’ असंच उत्तर लिहायचे. आणि आत्ताही हीच भावना ‘स्वतंत्रतेचं स्तोत्र’ गाताना आपल्या मनात सदैव असते. शाळेत असताना १५ ऑगस्टला आम्हाला झोपेतून कधीच उठवावं लागलं नाही. ‘चल ऊठ लवकर, शाळेत जायचंय ना,’ असं आईनं म्हणायच्या आत जाग आलेली असायची. कारण झोपताना एकच विचार असे, तो म्हणजे झेंडावंदनाचा. नभांगणात डौलात फडकत असलेला तिरंगा आणि आपण त्याला ताठ मानेनं सलामी देतोय असं स्वप्न पाहतच आम्ही झोपी जायचो. कधी एकदा सकाळ होतेय आणि कधी एकदा शाळेत जातोय असं होऊन जायचं. शाळेत जाताना सर्वत्र देशभक्तिपर गाणी ऐकू यायची. ‘उठा राष्ट्रवीर हो’, ‘वंद्य वंदे मातरम्’, ‘जिंकू किंवा मरू’, ‘झंडा उँचा रहे हमारा’, ‘सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ता हमारा’, ‘ध्वज अशरण हा’, ‘बलसागर भारत होवो’ या सगळ्या देशभक्तिपर गीतांबरोबर काळजावर कोरलं गेलं ते ‘स्वतंत्रतेचं स्तोत्र.’ 

स्वतंत्रते भगवती । त्वामहं यशोयुतां वंदे...

या ओळी लिहिताना मीसुद्धा कधी गायला लागले ते मलाही कळलं नाही. भारताच्या नकाशात उभी असलेली, हातात तिरंगा घेतलेली भारतमाता मन:चक्षूंपुढे दिसू लागली...हात आपोआप जोडले गेले. वंदन माझ्या भारतमातेला, वंदन स्वातंत्र्यवीरांना...आपला जन्म स्वातंत्र्योत्तर काळातला; पण पारतंत्र्याचं दु:ख ज्यांनी झेललं, हालअपेष्टा सोसल्या, स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी जिवाची बाजी लावली त्या सर्वांना विनम्र अभिवादन केलं आणि पुन्हा लिहायला सज्ज झाले स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या अलौकिक लेखणीतून साकारलेल्या ‘स्वतंत्रतेचं स्तोत्र’ या कवितेविषयी!

स्तोत्र म्हणजे स्तुती. ‘स्तुतौ’ या धातुपासून हा शब्द तयार झाला. स्तुतीची पद्यमय रचना म्हणजे स्तोत्र. देवाची स्तुती, देवाची प्रार्थना भक्तांकडून केली जाते. देवाचं नाव, देवाची स्तुती भक्ताच्या मनातून स्फुरते, त्यालाच स्तोत्र म्हटलं जातं. ऋग्वेद या प्राचीन ग्रंथातील प्रत्येक सूक्त हे स्तोत्रच मानलं जातं. असं म्हणतात, की ज्ञाता आणि ज्ञेय, ध्याता आणि ध्येय, भक्त आणि देव यांच्यातला सुरेख संगम होण्यासाठी ‘स्तोत्र’ हा एक उत्तम मार्ग आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशालाच देव मानलं. देशभक्ती हाच देशरूपी देवाप्रत पोहोचण्याचा एकमेव मार्ग आहे हे जाणलं. म्हणून तर देशरूपी देवाची स्तुती गाण्यासाठी त्यांनी ‘स्वतंत्रतेचं स्तोत्र’ लिहिलं.

राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीति संपदांची 
स्वतंत्रते भगवती । श्रीमती राज्ञी तू त्यांची...

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतमातेला भगवती म्हटलंय. त्यांची अफाट शब्दसंपदा, कवित्व आणि उत्कट देशभक्ती या त्रिवेणी संगमावर स्फुरलेलं हे स्वतंत्रतेचं स्तोत्र वेदमंत्राहून वंदनीय. पारतंत्र्याच्या साखळदंडात बद्ध झालेल्या भारतमातेला मुक्त करण्यासाठी विनायक दामोदर सावरकर यांनी आपल्या बंधूंसह स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी गणेशोत्सवात त्यांनी प्रकट व्याख्यान दिलं आणि वक्तृत्वस्पर्धेत पहिल्या क्रमांकाचं बक्षीस म्हणून त्यांना प्रा. शिवरामपंत परांजपे यांचं ‘काळ’ हे पत्र मिळालं. त्यातील काव्यस्फूर्ती आणि देशभक्ती पाहून सावरकर प्रभावित झाले. अनेक कौटुंबिक संकटांना तोंड द्यावं लागलं; पण ते मागे हटले नाहीत. ‘अमर होय ती वंशलता। निर्वंश जिचा देशाकरिता।। दिगंती पसरे सुगंधता। लोकहित परिमलाची।।’ 

देशासाठी सर्वस्वाचा होम करण्यासाठी सिद्ध झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेल्या अनेक देशभक्तिपर रचनांपैकी एक हे स्वतंत्रतेचं स्तोत्र..

परवशतेच्या नभात तूचि आकाशी होशी
स्वतंत्रते भगवती। चांदणी चमचम लखलखशी...

पारतंत्र्याच्या काळोखानं भरलेल्या नभांगणात माझी स्वातंत्र्यदेवी भगवती म्हणजे लखलखती चांदणी, तिचं तेज काय वर्णावं! स्वातंत्र्यदेवीचं वर्णन करताना सावरकरांच्या काव्यप्रतिभेला बहर आला. किती सुंदर उपमा, प्रतिमांचा वापर केलाय पाहा.... 

गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली 
स्वतंत्रते भगवती। तूच जी विलसतसे लाली
तू सूर्याचे तेज उदधीचे गांभीर्यही तूचि
स्वतंत्रते भगवती। अन्यथा ग्रहण नष्ट तेचि...

कुसुमांची कोमलता, सूर्याची तेजस्विता, सागराची (उदधीची) गंभीरता हे भगवती तुझ्यातच आम्हाला पाहायला मिळते. हे भगवती तुझी रूपं तरी किती?

मोक्ष, मुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदान्ती
स्वतंत्रते भगवती । योगिजन परब्रह्म वदती...

हे भगवती! स्वतंत्रते देवी! जे जे उत्तम उदात्त, उन्नत, महन्मधुर ते ते सर्व तुझ्याच सान्निध्यात प्राप्त होतं आणि पुढे सावरकर म्हणतात ‘हे अधम रक्तरंजिते। सुजन पूजिते। श्री स्वतंत्रते’ स्वतंत्रतादेवीमध्ये साक्षात दुर्गेचंही रूप कवीला दिसतं. दुष्टांचं रक्त पिणारी आणि सज्जनांना, सुजनांना पूजणारी माझी स्वतंत्रतादेवी आहे. अन्याय, अत्याचार करणारी इंग्रजांची जुलमी सत्ता उखडून टाकायची, तर या स्वतंत्रतादेवीचं स्तोत्र अंत:करणापासून गाणाऱ्या स्वातंत्र्यवीरांच्या शब्दांना सुविचार वचनांचं मोल लाभलं. भारतीयांनी हे वचन मुखोद्गत केलं.

तुजसाठी मरण ते जनन
तुजवीण जनन ते मरण

हे भारतमाते तुझ्यासाठी मरण आलं तरी बेहत्तर! कारण तुझ्यासाठी मरण हेच आमचं जगणं आणि तुझ्याशिवाय जगणं हे कसलं आलंय जगणं? अहो हे तर साक्षात मरण! माझी मातृभूमी, माझी भारतमाता हेच माझं आयुष्य, हेच माझं जीवन, हेच माझं जगणं. माझ्या भारतमातेचं स्वातंत्र्य हेच माझ्या जीवनाचं ध्येय! हेच जीवनाचं इतिकर्तव्य!! विनायक दामोदर सावरकरांना ‘स्वातंत्र्यवीर’ असं अभिमानानं आपण म्हणतो ते याचसाठी. 

परवशतेच्या वेदना सोसणाऱ्या राष्ट्राला इंग्रजांकडून सोडवण्यासाठी अंदमानच्या नरकयातना भोगणाऱ्या सावरकरांना प्रणाम करताना त्याच्या काव्यफुलांचा दरवळ श्वासांमध्ये भरून घ्यावासा वाटतो. ‘मम मस्तिष्की शत गाणी। गुणगुणती मंजुळ वाणी। शत सनयांतुनि परि त्याही। शकूं सामावत ते नाही।।’ तुरुंगाच्या भयाण अंधारावर मात करणाऱ्या सावरकरांच्या काव्यशक्तीचं केवढं हे सामर्थ्य! दुर्दम्य इच्छाशक्ती, अफाट मनोधैर्य आणि जाज्वल्य देशाभिमान म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर.

आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये ‘महिन्याचं गीत’ (Song of the Month) प्रसारित होत असे. पुणे केंद्रात निर्माता म्हणून कार्यरत असलेले मधुकर गोळवलकर यांनी स्वतंत्रतेचं स्तोत्र ही कविता निवडली. समूहस्वरात हंसध्वनी रागात ती स्वरबद्ध केली आणि १९६३च्या नोव्हेंबर महिन्यात प्रसारित केली. ही रचना इतकी लोकप्रिय झाली, की महाराष्ट्रदिनानिमित्त शनिवारवाड्यावर त्यांना ते प्रत्यक्ष सादर करण्याची संधी मिळाली. त्यानंतर ते गाणं लतादीदी आणि सहकाऱ्यांच्या स्वरांत ध्वनिमुद्रिकेद्वारे आणि आकाशलहरींद्वारे केवळ घराघरांत नव्हे, तर प्रत्येक भारतीयाच्या मनामनात पोहोचलं. दिव्य शब्दांना अलौकिक स्वरांचं कोंदण लाभतं, तेव्हा असं एखादं लखलखतं देशभक्तिपर गीत जन्माला येतं...गीत नव्हे ते स्तोत्र...ज्या स्तोत्रामध्ये भरून राहिलेली आहे देशभक्तीची भावना, राष्ट्रप्रेम आणि स्वातंत्र्यदेवी भगवतीचा जयजयकार!

...नभांगणात आज तिरंगा डौलानं फडकतो आहे, तो स्वातंत्र्यसंग्रामात ज्यांनी प्राणाची आहुती दिली, स्वार्थाला तिलांजली देऊन तुरुंगवास भोगला, हालअपेष्टा, नरकयातना सोसल्या, त्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांमुळे! त्याला विनम्र अभिवादन करताना कृतज्ञता जपू या. ‘मी भारतीय आहे आणि म्हणूनच माझ्या राष्ट्राचा मला अभिमान आहे...माझ्या देशाचं स्वातंत्र्य हाच माझा सन्मान आहे...माझ्या राष्ट्राची प्रगती, एकात्मता आणि शांती महत्त्वाची,’ ही भावना मनात ठेवून आज गाऊ या स्वतंत्रता देवीचं स्तोत्र! राष्ट्रभक्तीनं भारलेलं नि अलौकिक स्वरांनी मोहरलेलं! 

स्वतंत्रते भगवती । त्वामहं यशोयुतां वंदे...यशोयुतां वंदे...

- डॉ. प्रतिमा जगताप
संपर्क : ९४२२२ ९२३८४

(लेखिका पुणे आकाशवाणी केंद्रातून वरिष्ठ उद्घोषिका म्हणून निवृत्त झाल्या आहेत.)

(कविता... स्वरांनी मोहरलेल्या या सदरातील लेखांचे पुस्तक आणि ई-बुक प्रसिद्ध करण्यात आले असून, ते बुकगंगा डॉट कॉमवर उपलब्ध आहे.)


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZNJBF
Similar Posts
तेरे बिना जिंदगी से कोई ‘अष्टपैलू’ हे विशेषणही कमी पडेल, इतके पैलू असलेला अभिनेता संजीव कुमार याचा सहा नोव्हेंबर हा स्मृतिदिन. त्यानिमित्त ‘सुनहरे गीत’मध्ये आज पाहू या त्याच्यावर चित्रित झालेले ‘तेरे बिना जिंदगी से कोई...’ हे गीत...
अजून त्या झुडुपांच्या मागे... कविवर्य वसंत बापट यांचा २५ जुलै हा जन्मदिन. त्या निमित्ताने ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज ‘अजून त्या झुडुपांच्या मागे...’ या त्यांच्या कवितेबद्दल...
चाफा बोलेना... संगीतकाराला काव्याची उत्तम जाण असेल, तर त्याने दिलेल्या चालीवर कविता कशी मोहरते आणि रसिकांच्या मनात सदैव रेंगाळते याचं उत्तम उदाहरण म्हणजे कवी ‘बीं’चं वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेलं ‘चाफा बोलेना’ हे गाणं. १९ जानेवारी हा वसंत प्रभूंचा जन्मदिन. त्या निमित्ताने ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज घेऊ या त्याच कवितेचा आस्वाद
घाल घाल पिंगा वाऱ्या... अत्यंत तरल भावकविता लिहिणारे कवी कृ. ब. निकुंब यांचा आज, नऊ ऑगस्ट रोजी जन्मदिन आहे. त्या निमित्ताने, ‘कविता स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज ‘घाल घाल पिंगा वाऱ्या...’ या त्यांनी लिहिलेल्या हृदयस्पर्शी कवितेबद्दल...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language