रत्नागिरी : नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संस्कृत संस्थान आणि रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात गेली चार वर्षे अनौपचारिक संस्कृत शिक्षण केंद्र सुरू आहे. यंदाच्या वर्गाचे उद्घाटन नऊ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात होणार आहे. जिल्हा परिषदेचे माध्यमिक उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे.
हा वर्ग ऑगस्ट २०१९ ते एप्रिल २०२० या काळात चालू राहील. संस्कृत भाषा प्रमाणपत्रीय पाठ्यक्रम व संस्कृत भाषा दक्षता पाठ्यक्रम असे दोन अभ्यासक्रम यात शिकविले जाणार आहेत. संस्कृत शिकण्याची इच्छा असलेले विद्यार्थी, नोकरदार, उद्योजक, डॉक्टर अशी कोणीही जिज्ञासू व्यक्ती या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकते.
यासाठी संस्कृतचे पूर्वज्ञान आवश्यक नाही. संस्कृत ही वैज्ञानिक भाषा आहे. संस्कृतमध्ये अनेक विषयांवर वैविध्यपूर्ण साहित्य आहे. संस्कृत भाषा हा आपला समृद्ध वारसा आहे. याकरिता संस्कृतचे ज्ञान सोप्या पद्धतीने शिकवण्यासाठी तयार केलेले हे अभ्यासक्रम आहेत.
या अभ्यासक्रमाची पुस्तके मोफत मिळतील. अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना प्रमाणपत्र मिळेल. संस्कृत श्रवण, संभाषण, वाचन, लेखन अशा भाषा कौशल्यांचे अध्यापन केले जाईल. अशी माहिती देण्यात आली.
अधिक माहितीसाठी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागप्रमुख तथा कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये (७७२०० ३२३०२) व हिरालाल शर्मा (८८९४६ ४९५१४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही जरूर वाचा :