Ad will apear here
Next
भारतात चीनची गुंतवणूक आहे तरी किती?


चीनवर बहिष्कार हा जिव्हाळ्याचा विषय झाला आणि सामान्य नागरिक भावनेच्या भरत वाहवत गेला. आणि त्याने सरकारला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. चीनवर बंदी कधी आणणार? चिनी मालावर बंदी कधी घालणार? पण वस्तुस्थिती काय आहे? चीनची भारतातील गुंतवणूक कशी आणि किती आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पाहू या ‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’ या सदराच्या चौथ्या भागात...
...
एप्रिल महिन्याच्या पूर्वार्धात एका गुंतवणुकीच्या बाबतीने देशभरात खळबळ उडवली ती म्हणजे चीनच्या एका बँकेने. एचडीएफसी सिक्युरिटीजचे कित्येक लाख शेअर्स विकत घेऊन स्वतःचा हिस्सा १.१ टक्के इतका वाढवला. वास्तविक पाहता, त्याआधीच ०.८ टक्के इतके शेअर्स चायना सेंट्रल बँकेने विकत घेतले होते; पण करोनामुळे तयार झालेल्या चीनविरोधी भावनेमुळे लोकांना फार मोठा धक्का बसला. त्यातच, गलवानवरील हल्ल्यामुळे चीनविरोधी वारे वाहू लागले. चीनवर बहिष्कार हा जिव्हाळ्याचा विषय झाला आणि सामान्य नागरिक भावनेच्या भरत वाहवत गेला. आणि त्याने सरकारला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. चीनवर बंदी कधी आणणार? चिनी मालावर बंदी कधी घालणार?

त्यानंतर भारताने ५९ अॅप्सवर बंदी आणली. चिनी माल बंदरावरच थांबवला; पण ते सर्व एक आभासी चित्र आहे. परिस्थितीचा खोलवर विचार केल्यास लक्षात येते, की कमी दर्जाचा माल भारतात विकून चीनला पैसा मिळाला नाही. ४०-५० वर्षांपूर्वी हा व्यापार नक्की मोठ्या प्रमाणात चालत होता. परंतु आता चीन सर्व अंगांनी भारतात पाळेमुळे रोवून उभा राहिला आहे. 

चिनी गुंतवणूक नेमकी होते कशी?
चिनी कंपन्या भारतात थेट गुंतवणूक करत नाहीत. या कंपन्या शक्यतो, सिंगापूर, मॉरिशस, हाँगकाँग येथील शाखांमधील पैसे गुंतवतात. उदाहरणार्थ, अलिबाबाने पेटीएममध्ये जी गुंतवणूक केली, ती सिंगापूरमधून केली होती. त्यामुळे भारत सरकारला चिनी गुंतवणुकीचा माग घेणे फर अवघड आहे. थोडक्यात सांगायचे, तर चिनी गुंतवणूक फक्त चीनमधून येत नाही आणि त्यामुळेच गुंतवणुकीचे हे सर्व पैलू विचारात घेतल्याशिवाय संपूर्ण चित्रही उभे राहणार नाही. 



गुंतवणुकीची सुरुवात
२०१५मध्ये अलिबाबा या चिनी कंपनीने पेटीएममध्ये गुंतवणूक केली. कंपनीतला ४० टक्के हिस्सा अलिबाबाने विकत घेतला आणि खऱ्या अर्थाने चिनी गुंतवणुकीचा भारतात श्रीगणेशा झाला. याचबरोबर, चीनमधल्या ऑटोमोबाइल क्षेत्रातल्या अनेक कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. मार्च २०२०पर्यंत चिनी ऑटोमोबाइल कंपन्यांनी भारतात ५५० दशलक्ष डॉलरहून अधिक गुंतवणूक केली आहे. 

तंत्रज्ञानातला पैसा
आज सर्वांत जास्त चिनी गुंतवणूक तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये झालेली आहे. जवळपास सहा अब्ज डॉलर रक्कम चीनने यामध्ये ओतली आहे. अलिबाबा टेन्सेंट, बाइटडान्स यांसारख्या बलाढ्य तंत्रज्ञान कंपन्यांनी जवळपास १०० स्टार्ट-अपमध्ये गुंतवणूक केली आहे. ओला, बायजूज, गाना डॉट कॉम, पेटीएम मॉल, ओयो यांसारख्या युनिकॉर्न स्टार्ट-अपमध्ये चीनने गुंतवणूक केली आहे. ही सगळी गुंतवणूक पुढील तक्त्यामध्ये दिली आहे –

भारतातील कंपनी

चीनची गुंतवणूक

(दशलक्ष डॉलर)

चिनी गुंतवणूकदार

बिग बास्केट

२५०

अलिबाबा

बायजूज

५०

टेन्सेंट

डेलिव्हरी

२५

फोसुन

ड्रीम 11

१५०

टेन्सेंट

फ्लिपकार्ट

३००

टेन्सेंट

हाइक मेसेंजर

१५०

टेन्सेंट, फॉक्सकॉन

मेक माय ट्रिप

-

सीट्रिप

ओला

५००

टेन्सेंट टेक्नालॉजिज

ओयो

१००

तिती, चायना लॉजिंग ग्रुप

पेटीएम मॉल

१५०

अलिबाबा

पेटीएम

४००

अलिबाबा

पॉलिसीबजार

-

स्टेडव्ह्यू कॅपिटल

क्विकर

-

-

रिव्हिगो

२५

सेफ पार्टनर्स

स्नॅपडील

७००

अलिबाबा, फॉक्सकॉन

स्विगी

५००

मेथुआन तिएनफिंग, टेन्सेंट

उडान

१००

टेन्सेंट

झोमॅटो

२००

अलिबाबा



*गुंतवणुकीची आकडेवारी ‘गेटवे हाउस’ या अहवालातून घेतली आहे

या सर्व कंपन्या वरकरणी भारतीय आहेत. परंतु चिनी गुंतवणूक हा त्यांचा एक अविभाज्य भाग आहे. 

अन्य क्षेत्रांतली चीनची गुंतवणूक
शेअरइट, टिकटॉक, पबजी, हॅलो, व्हिगो व्हिडिओ, व्हीसी ब्राउजर, गाना डॉट कॉम, एमएक्स प्लेअर, हंगामा डिजिटल मीडिया

दोन आठवड्यांपूर्वी भारताने ५९ अॅप्सवर बंदी आणली. त्यात वीचॅट हे महत्त्वाचे अॅप होते. टेन्सेंट या कंपनीचे हे अॅप चीनमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. चीनमध्ये या अॅपचे एक अब्जापेक्षा जास्त डाउनलोड आहेत. ३० जुलै २०२० रोजीच्या वृत्तानुसार, टेन्सेंट ही फेसबुकपेक्षाही श्रीमंत कंपनी आहे. भारतातली गुंतवणूक व त्यातून मिळणारे उत्पन्न हा या श्रीमंतीचा एक मोठा भाग आहे. 

विपरीत परिणाम
चीनमध्ये गुगल, फेसबुक, इन्स्टाग्राम हे सर्व वापरण्यावर बंदी आहे. त्याऐवजी तेथे बायतू, वीचॅट, योखू यांसारखे समांतर किंबहुना काकणभर सरस पर्याय चिनी सरकारने तंत्रज्ञानातील बलाढ्य कंपन्यांमार्फत दिले आहेत. असे करण्याचे मुख्य कारण म्हणजे ‘डाटा.’ आज १.४ अब्ज लोकसंख्या असूनही, चिनी लोकसंख्येचा डाटा चीनकडे सुरक्षित आहे. परंतु, भारताची परिस्थिती मात्र वेगळी आहे. भारत पूर्णतः गुगल, फेसबुक, ट्विटर, मायक्रोसॉफ्ट या अमेरिकी कंपन्यांवर अवलंबून आहे. त्यातच नवीन चिनी कंपन्या भारतात शड्डू ठोकून आहेत. त्यामुळे डाटाची सुरक्षितता हा एक गंभीर विषय आहे. त्यास समस्या असे म्हटले, तरी चुकीचे ठरणार नाही. २१व्या शतकात डाटाचा वापर करून कोणत्याही स्वरूपात दुसऱ्याला हानी पोहोचवता येऊ शकते. चिनी गुंतवणुकीला आळा घालायचा की आपला डाटा दुसऱ्याला द्यायचा, हा यक्षप्रश्न भारतासमोर आहे. तरीसुद्धा करोनाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने घेतलेला ५९ अॅप्सवर बंदी आणण्याचा निर्णय नक्कीच स्तुत्य आहे. 

भारताने चीनच्या ‘वन बेल्ट, वन रोड’ या विस्तारवादी स्वप्नाला पाठिंबा दिलेला नाही. भारत त्याचा सदस्यही नाही. परंतु, येथे होत असलेली चिनी गुंतवणूक पाहता, आपण अजून किती काळ अलिप्त राहू शकू, हे मोठे प्रश्नचिन्ह आहे. एक मात्र नक्की, आपल्याला वरवर वाटते तितका हा विषय नक्कीच साधा नाही. दिवाळीच्या माळा आणि कचकड्याच्या वस्तू बंद केल्या तर चीनच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसेल, हा काळही आता राहिलेला नाही. भारतीय स्टार्ट-अपमध्ये चीन पूर्णपणे मुरला आहे, हेच खरे.

- सोहम काकडे
ई-मेल : soham.kakade@ewan.co.in

(लेखक पुण्यातील इवान बिझनेस सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक आणि चिनी भाषेचे तज्ज्ञ आहेत.)

(‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’ या सदरातील सर्व लेख एकत्रितरीत्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. )
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FXRNCP
Similar Posts
चीन-अमेरिकेच्या व्यापारयुद्धात भारतासाठी संधी अशी अनेक उत्पादने आहेत, ज्यामध्ये भारत आंतरराष्ट्रीय दर्जा साध्य करून, उत्पादनांच्या गुणवत्तेमध्ये वाढ करून निर्यातीमध्ये चांगलीच वाढ करू शकतो. चीन आणि अमेरिकेच्या व्यापारयुद्धामध्ये भारतासाठी निश्चितच संधी दडलेल्या आहेत. ‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’ या सदराचा १३वा भाग..
भारत-चीन संबंध : भावनिक नको, ‘प्रॅक्टिकल’ दृष्टिकोन हवा ‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’ या सदराचा २०वा म्हणजेच अंतिम भाग.....
चीनचा नवा विस्तारवाद – वन बेल्ट वन रोड शी जिनपिंग नोव्हेंबर २०१२मध्ये कम्युनिस्ट पार्टीचे अध्यक्ष झाले आणि लगेचच मार्च २०१३मध्ये ते चीनचे अध्यक्ष झाले. चीन आधीपासूनच पाहत असलेले विस्तारवादाचे स्वप्न जिनपिंग अध्यक्ष झाल्यानंतर आणखी गडद झाले. त्याबरोबरच, आणखी महत्त्वाकांक्षी स्वप्ने व भौतिक विस्तारवाद साकारण्याचीही तयारी सुरू झाली. ही तयारी
करोनानंतरचा चीन जिथून करोना विषाणूचा प्रसार जगभर झाला, त्या विषाणूचा देशांतर्गत प्रसार रोखण्यासाठी चीनने नेमके काय केले, आत्ता चीनमधील परिस्थिती नेमकी कशी आहे, याचा वेध ‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’ या सदराच्या आजच्या दुसऱ्या भागात घेण्यात आला आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language