Ad will apear here
Next
शिवाजी – द मॅनेजमेंट गुरू : भाग एक
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास युद्धकौशल्य, राजकारण अशा वेगवेगळ्या अंगांनी केला जातो. प्रा. नामदेवराव जाधव यांनी महाराजांचा अभ्यास ‘शिवाजी - द मॅनेजमेंट गुरू’ या पुस्तकातून वाचकांसमोर मांडला आहे. या पुस्तकात व्यवस्थापनाची मूळ तत्त्वे आणि शिवाजी महाराजांचे चरित्र यांची छान सांगड या पुस्तकात घातलेली आहे. शिवजयंतीचे औचित्य साधून या पुस्तकाच्या पहिल्या भागातील एक प्रकरण येथे प्रसिद्ध करत आहोत.
........
मेरी पारकर, फेलोंट, हेरॉल्ड, कुन्टझ आदि मान्यवरांनी व्यवस्थापनाची केलेली व्याख्या, व्यवस्थापन म्हणजे एक कला आहे असे स्पष्ट करणारी आहे.  ‘Management is art of getting things done through people.’ 

आता कला म्हणजे काय हे पाहू. नावीन्यपूर्ण कृती करण्याचे एखाद्याचे कौशल्य, ज्यामध्ये त्याची बुद्धिमत्ता वापरली जाऊन विशिष्ट कार्य पूर्ण करून एक निश्चित ध्येय पूर्ण केले जाते आणि ही कला काही सगळ्यांकडे नसते. ती जन्मजात तसेच अभिजात असते. परंतु एखाद्याला जन्मतःच ती कला जरी अवगत नसेल, तरी त्याला ती प्रयत्नातून, सरावातून शिकता येऊन उपयोगात आणता येऊ शकते. त्यामुळे व्यवस्थापन अमुक एकाचाच वारसा असू शकत नाही आणि मेहनती, प्रयत्नवादी, सराव करणारा या कलेपासून वंचित राहू शकत नाही. अशीच एक कला आणि ती कला जगाच्या पाठीवर अत्यंत उत्कृष्टपणे ज्यांना जमली ते म्हणजे शिवाजी महाराज आणि ज्यांनी महाराजांच्या नेतृत्वाखाली ती कला आत्मसात करून शिकून जगाला तोंडात बोटे घालायला लावले ते कलाकार, हरहुन्नरी माणसे म्हणजे महाराजांचे मावळे.
 
उदा. शिवा काशीदने महाराज असण्याचेच वठविलेले नाटक आणि पन्हाळ्यातून महाराजांची सुटका केली. मोठ्या कलेचे हे मोठे, नेमके उदाहरण, आपणा सर्वांच्या परिचयाचे, परंतु डोळस माणसाला आरसा दाखविण्यासारखे.

आता व्यवस्थापनाला कला का म्हणायचे, तर त्याची कारणे खालीलप्रमाणे -

Innovative (नावीन्यता) 
व्यवस्थापन करताना नेहमी काही तरी नावीन्यतेचा उपयोग केला जातो. व्यवस्थापन करणाऱ्याला नेहमी प्रश्न सोडविण्यासाठी नवीन नवीन क्लृप्त्या वापराव्या लागतात. नवीन प्रश्न, नवीन उत्तरे, नवीन अडचण, नवीन मार्ग, नवीन संकट तर नवीन समाधान. शिवाय एकच निर्णय प्रत्येक परिस्थितीला, प्रसंगाला जसाच्या तसा लागू पडत नसल्यामुळे नवीन नवीन पर्याय, उपाय, समाधान शोधावे लागत असल्यामुळे ही एक कलाच म्हटली पाहिजे.

आणखी दुसरे कारण म्हणजे एका विशिष्ट समस्येचे, प्रश्नाचे उत्तर वेगवेगळ्या माणसाकडे वेगवेगळे असू शकते. आपण म्हणतो ना, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. तसे ही वेगवेगळी उत्तरे म्हणजे प्रत्येकाची आपापल्या बुद्धिमत्तेनुसार योजलेली कलाच आहे. 

शिवाय तोच माणूस तोच निर्णय, प्रक्रिया पुन्हा तशीच परिस्थिती असताना घेईलच याचा काही नेम नाही. तो त्याच परिस्थितीत एखादा वेगळा निर्णयही घेऊ शकतो, म्हणजे आपली चलाखी दाखवू शकतो, ही एक कला नाही तर काय म्हणावी लागेल? म्हणजेच काय तर व्यवस्थापनात कॉपी करायला जागाच नाही. कारण ती एक कला असून, व्यक्ती ते व्यक्ती, स्थळ ते स्थळ आणि काळानुसार बदलत राहणारी अशीच आहे. महाराजांनी प्रत्येक वेळा नवीनच क्लृप्त्या वापरून यश मिळविलेले आहे आणि कोणताही निर्णय रिपीट केलेला नाही. अफजलखान वध, लाल महाल छापा, आग्रा सुटका, पन्हाळ्यातून सुटका, सुरत, कारवार बुऱ्हाणपूर मोहीम, इत्यादी

Individual Approach (व्यक्तिगत दृष्टिकोन)
व्यवस्थापन करणाऱ्या प्रत्येक माणसाचा स्वत:चा असा वेगळा दृष्टिकोन असू शकतो. प्रत्येकाची काम करण्याची स्टाइल वेगळी असू शकते. त्यामुळे प्रत्येकाने आपली स्वत:चीच स्टाइल वापरलेली बरी. दुसरा तसे करतो म्हणून मी तसे करायला गेलो, तर गुजराती म्हण येथे तंतोतंत लागू पडते ती अशी - ज्याने काम त्यानो करो दुजा करे सो गोता खाय. म्हणजे काय तर दुसऱ्याची पद्धत आपण वापरायला गेलो तर तोंडावर आपटण्याची किंवा बुडण्याची वेळ येणारच ना! त्यामुळे दिलेल्या परिस्थितीत हाताशी असलेल्या त्याच साधनसामग्री वातावरण एकच असताना काही लोक लवकर काम करतील, तर काही उशिरा काम करू शकतील. कारण तो प्रत्येकाच्या कौशल्याचा भाग असतो. 

Application and Dedication 
मन आणि मेंदू दोन्हीचा उपयोग करणे म्हणजे काय, तर Mind Application and Intelligenceचे हे दोन्ही घटक एकाच वेळी कामात आणणे. थोडक्यात काय, तर ज्याला कोणाला उत्तम व्यवस्थापक व्हायचे आहे, त्याच्याकडे फक्त कौशल्य आणि ज्ञान असून उपयोग नाही, तर त्याने Discipline (शिस्त), Dedication (समर्पण), Commitment (बांधिलकी ) हे गुणसुद्धा आत्मसात करून घेतले पाहिजेत. 

शिवाजी महाराजांवर आयुष्यात किती तरी जीवघेणी संकटे आली, तरी त्यांनी शिस्त, संयम सोडला नाही, की स्वराज्य निर्मितीबद्दलची आपली बांधिलकीही सोडली नाही. रयतेच्या कल्याणासाठी महाराज समर्पणाच्या भूमिकेतूनच आयुष्यभर कार्यरत राहिले आहेत. म्हणून शिवाजी महाराज म्हणजे निश्चय, बांधिलकी आणि समर्पण या व्यवस्थापनाच्या तीन तत्त्वांचा सुरेख संगम असून, ज्यामुळे रयत कल्याणकारी राज्य त्यांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही फक्त ३५ वर्षांत निर्माण करता आले. त्यामुळे महाराज किंवा एखाद्या व्यवस्थापकाचे यश म्हणजे काय तर Knowledge, Intelligence and dedication म्हणजेच समर्पण होय. वेगळ्या भाषेत सांगायचे झाले, तर जेव्हा आपण मन आणि मेंदू एकत्र करून काम करतो तेव्हाच यशस्वी होतो. टंगळमंगळ काम तर अघळपघळ निकाल लागणारच. काम जेवढे बिनचूक, निकाल तेवढा अचूक. त्यासाठी आपल्या भाषेत सांगायचे, तर तन-मनाने काम करणे होय. धन नंतर आपोआप येणारच. 

Result Oriented (निकालावर आधारित) 
प्रत्येक यशस्वी व्यवस्थापक हा निकालावर आधारित जी गुणवत्ता सिद्ध होते त्या मापदंडावरच मोजला जाऊ शकतो. त्यामुळे व्यवस्थापनाचे काम हे practical आणि Action based असेच आहे. बोलबच्चन लोकांचे हे कामच नव्हे. संत तुकाराम महाराज म्हणतात तसे, येथे पाहिजे जातीचे. जातीचे म्हणजेच काय तर रिझल्ट देऊ शकणारे, वांझोटे नकोत. आपण किती काम केले हे महत्त्वाचे नसून, निकाल, फलश्रुती काय दिली हेच महत्त्वाचे असते. फक्त मी एवढा अभ्यास केला, असा केला, तसा केला हे सांगून प्रश्न संपत नाही. फलश्रुती काय यावर सगळे कळतेच ना, की काय दिवे लागले आणि किती पणती विझल्या त्या. त्यामुळे कामाचा दिखावा व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाचा नसून, फलश्रुती महत्त्वाची आहे. महाराजांनी आग्र्यातून सुटका करून घेण्यासाठी काय काय केले, यापेक्षा त्यांनी यशस्वीपणे सुटका करून घेतली ही फलश्रुती महत्त्वाची आहे. 

हेच पन्हाळा किल्ला वेढला गेला तेव्हाही सिद्ध झाले. महाराजांनी नानाविध प्रयोग केले आणि अखेर वेढ्यातून सुटका करून घेतली. याला म्हणतात Result Oriented काम. महाराज सुरतेत जाऊन मोकळ्या हातांनी परत आले नाहीत किंवा बसरूर, कारंजा, बुऱ्हाणपूर येथूनही भरल्या हातांनी करोडो होनांची दौलत घेऊनच आले. हा झाला Result. त्यासाठी फौज किती, कशी, कोणत्या मार्गाने नेली हे एवढे महत्त्वाचे ठरत नाही. त्यांनी निकाल स्पष्ट लावलेला दिसताना बाकी मुघलांच्या मोहिमा म्हणजे जागोजागी आणि पावलोपावली नुकसानीचे नमुने.

आता एखाद्याची फलश्रुती कशात मोजायची हा प्रश्न तुम्हाला पडला, तर त्याचे उत्तर खालीप्रमाणे :

Higher Productivity वाढलेली उत्पादनक्षमता
Better Relation चांगले संबंध
Disciplined work force शिस्तबद्ध काम करणारी माणसे किंवा माणसांची काम करण्यातील शिस्तबद्धता 
good working condition काम करण्यासाठी चांगली वातावरणनिर्मिती 
Increase in profit आर्थिक लाभात वाढ 
Reduction in Absenteeism लोकांच्या गैरहजेरीचे प्रमाण कमी होणे 
Reduction in wastage वस्तूची नुकसानी कमी होणे. 

महाराजांच्या लोकांची वाढलेली उत्पादन क्षमता पाहा. ३०० लोकांनी ५००० शत्रूंना आठ तास घोडखिंडीत रोखून धरले. चांगले संबंध पाहा. एकाही माणसाने मरेपर्यंत खिंड सोडण्याची इच्छा प्रकट केली नाही. मरणापेक्षा स्वराज्याची बांधिलकी मोठी मानली. 

शिस्तबद्ध काम करण्याची पद्धत पाहायची तर पाहा. महाराज आग्र्यातून दोन लाख ६० हजार फौजेच्या गराड्यातून सुटले आणि औरंगजेबाला काहीच करता आले नाही. महाराजांचा एकही माणूस पकडण्यात यश आले नाही. ३००० लोक अचानक शत्रूच्या राजधानीतून काय रातोरात गायब होतात का? नाही तर मग काय, तर शिस्तबद्ध काम करण्याची महाराजांच्या माणसांची, महाराजांची कला. 

काम करण्यासाठी चांगली वातावरण निर्मिती पाहा. दोन स्वारांमागे तीन घोडी म्हणजे एक घोडे प्रवासाने थकले, तर दुसरे वापरता येईल किंवा छापा टाकण्याच्या वेळी माल वाहायच्या कामी येईल अशी व्यवस्था. मोहिमेला जातानाच सैनिकांना चार महिन्यांचा Advance पगार आणि एखादा मावळा शहीद झालाच, तर त्यांच्या कुटुंबाची कायमस्वरूपी केलेली व्यवस्था. स्वत:ची ऐपत नसलेल्या मावळ्यांना सरकारातून घोडा, कपडे, शस्त्र आणि धान्यसुद्धा देणे.

आर्थिक लाभात वाढ पाहा - जिवंत उदाहरणे. इ. स. १६५५ - जुन्नरवर छापा - तीन लाखांची कमाई, १६५६ - जावळी ताब्यात - सात लाखांची कमाई, १६५९ - प्रतापगडाची लढाई - १० लाखांची कमाई, १६६३ - सुरतेवर छापा - दोन कोटी रुपयांची कमाई, १६७६ - दक्षिण दिग्विजय चार कोटी रुपयांची कमाई.

गैरहजेरीचे प्रमाण कमी होणे बघा. महाराजांच्या व्यवस्थापनात गैरहजेरी, न सांगता विनाकारण दांडी हा प्रकारच नव्हता बरं. उत्तम व्यवस्थापनाचे आणखी काय ज्वलंत उदाहरण असावे. साधनसामग्रीचे नुकसान कमी होणे किंवा करणे. शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापनात साधनसामग्रीचे नुकसान हा प्रकारच पाहायला मिळत नसताना नुकसान कमी करण्याचा प्रश्नच येतो कुठे? 

Initiative (पुढाकार घेणे.)
नवीन गोष्ट करण्यासाठी नेहमी पुढाकार घेणे आवश्यक आहे आणि ते काम म्हणजे Doing the right things right at the right time and right place योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य काम करणे हे जसे स्वत:च्या बाबतीत महत्त्वाचे, तसेच उत्तम व्यवस्थापकाने आपल्या सहकाऱ्यांनाही या प्रक्रियेत येण्यासाठी Initiative घेण्यासाठी प्रवृत्त करणे फायदेशीर असते. त्यामुळे संस्थेची ध्येये आणि धोरणे प्रभावीपणे अंमलात आणता येतात. उदा. महाराजांनी पन्हाळ्यातून बाहेर पडताना शिवा काशीदच्या ऐवजी दुसरा माणूस निवडला असता तर काय झाले असते? प्रतापगडाच्या प्रसंगी जिवा महालेऐवजी दुसऱ्या माणसाला जबाबदारी दिली असती तर? आग्र्यातून सुटताना हिरोजी फर्जंदऐवजी दुसरा माणूस निवडला असता तर? या सर्व प्रश्नांचे उत्तर एकच येईल. महाराजांचे जीवन तेथेच संपले असते. परंतु तसे झाले नाही. कारण महाराजांनी येथे ही कला अंमलात आणली. योग्य कल्पना राबवली आणि ती म्हणजे योग्य ठिकाणी योग्य वेळी योग्य माणूस निवडला. 

महाराजांनी पुढाकार घ्यायला मावळ्यांना नेहमी संधी दिली त्यामुळे स्वराज्य एवढ्या कमी वेळेत एवढे पुढे आले, पाच प्रस्थापित शाह्यांना आव्हान देत उभे राहिले, स्थिर झाले.

(‘शिवाजी – द मॅनेजमेंट गुरू’ हे प्रा. नामदेवराव जाधव यांचे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी किंवा ई-बुक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZSACJ
Similar Posts
प्राणायाम शिकताय? मग हे नक्की वाचा! डॉ. गिरीधर करजगावकर यांनी ‘प्राणायाम – ज्ञान व विज्ञान’ हे प्राणायामाबद्दल सखोल माहिती देणारे पुस्तक लिहिले आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हा अष्टांग मार्ग आहे. प्राणायामाचे ज्ञान मिळवत असताना या अष्टांग मार्गाचे मूलभूत ज्ञान मिळविणे आवश्यक आहे. त्यापैकी ‘यम’ या मार्गाची
... अशा लागतात सवयी! आपण जे करतो, त्याचे सवयीत रूपांतर कसे होते, सवयीत चांगले बदल कसे घडवून आणायचे, यशस्वी होण्यासाठी चांगल्या सवयी कशा उपयुक्त ठरतात, आदींबद्दलचे मार्गदर्शन चार्ल्स डुहीग यांनी ‘द पॉवर ऑफ हॅबिट’ या पुस्तकातून केले आहे. मोहन गोखले यांनी त्या पुस्तकाचा मराठीत अनुवाद केला आहे. सवयी कशा लागतात आणि त्यांचे कार्य
अत्यंत उत्कंठावर्धक, कॉर्पोरेट जगातील शह-प्रतिशह ह्यांची थरारक कहाणी सांगणारे पुस्तक 'गोमूचा नाच' आपले काम पार पडत असताना कामगार आणि मॅनेजमेंट दोघांचा फायदा व्हावा, लोकांमधला आत्मविश्वास वाढून त्यांना त्यांच्यातील कौशल्यांची जाणीव व्हावी, एक उमदे व्यक्तिमत्त्व घडावे म्हणून सातत्याने केलेले प्रयत्न. हा सगळा प्रवास, ह्या घडामोडी वाचणे अत्यंत रंजक आहे, विचारप्रवृत्त करणारे आहे.
दासबोध : नेतृत्व आणि व्यक्तिविकास श्री संत रामदास स्वामी म्हणजे बलोपासनेचे महत्त्व पटविणारे आणि वेगळ्या विचारांची शिदोरी देणारे संत. त्यांनी लिहिलेला दासबोध हा ग्रंथ म्हणजे व्यक्तिमत्त्व विकास आणि व्यवस्थापन शास्त्राचे धडे असलेली गुरुकिल्लीच. आज (७ मार्च २०२१) दासनवमी आहे. त्या औचित्याने, ‘मॅनेजमेंट गुरू - दासबोध’ ही लेखमाला पुन्हा प्रसिद्ध करत आहोत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language