ज्येष्ठ संगीतकार रवी दाते यांचं सात जुलै २०२० रोजी निधन झालं. त्यांचे शिष्य आणि संगीत दिग्दर्शक व प्रसिद्ध गझलगायक दत्तप्रसाद रानडे यांनी त्यांच्या आठवणींना दिलेला हा उजाळा... ......
ऐंशी वर्षांचा वृक्ष पडणं आणि ऐंशी वर्षांचं माणूस जाणं हे साधारण एकच आहे. त्याच्या जन्मापासूनच्या सगळ्या गोष्टी, किस्से, त्याचे पराक्रम, त्याने जिवंतपणी घेतलेले लाखो अनुभव... सगळं एका फटक्यात संपून जातं. आपण त्या झाडाजवळ रोज जरी जात नसलो तरी ते आहे, याची सवय झालेली असते. ते झाड पडलं, की त्याची जागा घ्यायला दुसऱ्या झाडाला परत तितकीच वर्षं जावी लागतात आणि परत ते झाड तितकं वाढलेलं बघायला आपणच नसतो.
१९९८मध्ये जेव्हा पहिल्यांदा रवीकाकांकडे गज़ल शिकायला गेलो, तेव्हा त्यांनी मला जी गज़ल शिकवायला सुरुवात केली, त्यात एक शेर होता...
शजर उदास है चिड़ियों के चहचहे गुमसुम
की तेरे बाद ये तनहा सी ज़िन्दगानी है
रवीकाका याची चाल सांगत होते. मधेच थांबून म्हणाले, ‘माहितीये का अर्थ याचा? शजर म्हणजे?’ मी लगेच - ‘झाड!’
‘अरे झाड म्हणजे तुझ्याएवढं झाड नव्हे वीस-बाव्वीस वर्षांचं! तर वयाने खूप मोठं झाड, अगदी नव्वद-शंभर वर्षांचं. ते झाड आणि त्याच्या शेजारीच दुसरं झाड असतं तितक्याच वयाचं. दोन्ही झाडांवर शेकडो घरटी असतात. आणि तेच त्या दोन वृक्षांचं कुटुंब असतं. खूप चिवचिवाट असतो तिथे. इतक्या वर्षांच्या सहवासाच्या त्या दोन वृक्षांच्या हजारो आठवणी असतात.
आणि त्यातलं एक झाड जेव्हा पडतं!... त्यावरचा हा शेर आहे.
तुम्हा पोरासोरांच्या वयाची ही प्रेमकहाणी नाहीये, खूप वर्षं चाललेल्या प्रेमाची ही गोष्ट आहे. आता शेजारच्या झाडाची ही अवस्था झाली आहे, की तेरे बाद तनहा सी ज़िन्दगानी है!’
परत आम्ही गाऊ लागलो. ती ओळ परत झाली आणि त्यांनी आपले डोळे पुसले. मी चकित! तेव्हा खरी मला गज़ल शिकतात कशी, याची पहिल्यांदा जाणीव झाली.
गज़लला काय सांगायचं आहे, किती सांगायचं आहे, कसं सांगायचं आहे, याचा नेमका आराखडा त्यांच्याकडे तयार असे.
‘रूह (आत्मा) कुणात fit नाही करता येत. तो गायकाकडे असावा लागतो. सर्जरी करून नाही बसवता येत; पण आहे त्या रूहला आपण साफ करू शकतो,’ असं म्हणायचे ते.
‘तू रोज ये, तुला मी रोज एक गज़ल शिकवेन, मग तुला एका वर्षात तीनशे पासष्ठ गझला येतील... पण ‘गज़ल’ नाही येणार!
त्यासाठी मात्र तुला अनेक वर्षं द्यावी लागतील. तुझ्या चांगल्या-वाईट अनुभवांचं गाठोडं जेवढं मोठं तेवढी गज़ल सांगण्याची तुझी ताकद अधिक!’
मी ज्या वयाचा होतो त्या वयात प्रेमात पडलो, त्यात आत्ताच्या जमान्यासारखं ब्रेकअप झालं. हे पण मी थेट रवीकाकांना जाऊन सांगितलं होतं. त्यावर ते म्हणाले, ‘मी भेटून बोलू का तिच्याशी?’ मी घाबरलो. मी म्हटलं नको नको. तशी ते म्हणाले, ‘अरे वाह! मग उत्तम झालं. आता गज़ल छान गायची सुरुवात होईल!!!!’ तिथे असलेल्या माझ्या मित्राच्या चेहऱ्यावर, ‘हा काय सांगतोय, त्याला हे काय सांगतायत’ असे भाव! पण त्यांचं बरोबर होतं, आणि हे मला तेव्हाही आवडलं होतं! कारण मला गज़लच गायची होती.
काकांच्या घरी थोरामोठ्यांचा कायम राबता असे.
एकदा म्हणाले, ‘उद्या संध्याकाळी ये. माझ्याकडे कुणी येणार आहेत. तर गज़ल गा थोडा वेळ.’ मी गेलो ठरल्याप्रमाणे. तिथे एक वृद्ध गृहस्थ बसले होते. मी कधी बघितलं नव्हतं त्यांना त्यापूर्वी. काका म्हणाले, ‘ओळखतोस का यांना? श्रीनिवास खळे!’
अरे बापरे! मग मी भीतभीत गायलो त्यांच्या समोर. त्यांनी ‘समजून’ माझं कौतुक वगैरे केलं.
एकदा म्हणाले, की ‘उद्या अजय पोहनकर येणारेत माझ्याकडे, तू पण ये. तू तुझ्या चाली गा. आणि पोहनकर त्यावर पोर्ट्रेट करतील.’ मला कळेच ना काय होणारे नेमकं! मी शेर गात होतो आणि पोहनकरसाहेब गाऊन त्याचा विस्तार करत होते! पहाटे तीन वाजेपर्यंत ही मैफल चालली होती. केवढा हा मोठा अनुभव माझ्यासाठी दिला रवीकाकांनी!
असाच एकदा त्यांच्याकडे गात बसलो असताना दाराची बेल वाजली, मी दार उघडायला गेलो आणि माझी बोलतीच बंद झाली. कारण दरवाजात साक्षात गानसरस्वती किशोरीताई आमोणकर उभ्या होत्या. ‘रवी आहे का?’ म्हणत त्या आत आल्या. ओळख वगैरे सगळी झाली. आणि मी चक्क एक गज़ल त्यांच्यासमोर गायलो. आणि सगळ्यात विशेष म्हणजे तिथे असलेली हार्मोनियम आपल्याकडे ओढून घेत किशोरीजींनी दोन-तीन गज़ल ऐकवल्या. हे म्हणजे साक्षात सरस्वतीदेवी गाताना पाहण्यासारखं होतं.
मी जेव्हा त्यांच्या घरी गात असे, तेव्हा त्यांच्या मनाप्रमाणे एखादी गज़ल जमते आहे असं दिसलं, की ते त्यांच्या विशिष्ट लकबीत ज्योतीकाकूंना हाक मारून बोलवून घ्यायचे, माझं कौतुक करायचे आणि त्यांनाही गज़ल ऐकायला बसवायचे. त्याही बिचाऱ्या हातातली सगळी कामं टाकून, आईच्या मायेने मला ऐकत बसायच्या!
असे अनेक किस्से सांगता येतील. खूप आठवणी आहेत माझ्याकडे.
अत्यंत रूहदार रसिक म्हणून अगदी सहा महिन्यांपूर्वीपर्यंत पुण्यातल्या गज़लच्या कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावणारे संगीतकार रवी दाते! सात जुलैला त्यांना देवाज्ञा झाली.
अलीकडे त्यांच्या-माझ्या भेटी कमी झाल्या होत्या; पण ते माझे गुरू आहेत, आपण दोघेही पुण्यातच असतो, याची एक जाणीव नकळत आनंद देऊन जात असे. आणि ते आता नाहीत यामुळे होणारी हानी कोणती, हे ती व्यक्ती गेल्याशिवाय नाही कळत हेच खरं आहे.
त्यांना माझे शतशः प्रणाम!
- दत्तप्रसाद रानडे