Ad will apear here
Next
व्रतस्थ योग्याचं चटका लावणारं जाणं


रत्नागिरीतील वैद्यचूडामणी प्रमोद ऊर्फ रघुवीर पांडुरंग भिडे यांचे आज (२७ जुलै) करोनामुळे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहणारा हा लेख...

............
भिषजां साधुवृत्तानां भद्रमागमशालिनाम्।
अभ्यस्तकर्मणां भद्रं भद्रं भद्राभिलाषिणाम्।।

‘अष्टांगहृदय’ या ग्रंथातल्या या श्लोकाचा भावार्थ असा, की चांगल्या वैद्याला (धन किंवा अन्य कशाहीपेक्षा) नेहमी रुग्ण बरे होण्याचीच अभिलाषा असते. हे वर्णन ज्यांना तंतोतंत लागू पडेल, असे डॉक्टर सध्या दुर्मीळ होत चालले आहेत. त्या दुर्मीळांमध्ये ज्यांचा अग्रभागी समावेश होत होता, ते म्हणजे रत्नागिरीतले वैद्यचूडामणी प्रमोद ऊर्फ रघुवीर पांडुरंग भिडे. रुग्णसेवेचं घेतलेलं असिधारा व्रत निरलसपणे अखेरपर्यंत करणारं हे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व आज (२७ जुलै) पंचत्वात विलीन झालं. या व्रतस्थ योग्याचं असं अचानक जाणं चटका लावणारं आहे.

डॉक्टरांशी केवळ बोलल्यावर पेशंटला निम्मं बरं वाटणं, हा त्या डॉक्टरच्या चांगलं असण्याचा एक गुणधर्म रुग्णाला भावत असतो. वैद्य रघुवीर भिडे यांच्याबाबतीत हा अनुभव कायमच यायचा. कोणत्याही रुग्णाला आपल्या आजाराबद्दल जास्तीत जास्त माहिती डॉक्टरांना द्यायची असते. त्यात काही चूकही नाही; पण वैद्य रघुवीर भिडे यांचं वेगळेपण तिथपासूनच सुरू व्हायचं. कारण रुग्णाने जेमतेम दोन-तीन वाक्यं सांगितली पुरे, ते वेगळ्याच विषयावर गप्पा मारायला सुरुवात करायचे. हा अनुभव त्यांच्याकडे नेहमी जात असलेल्या रुग्णांसाठी नवा नाही. याचा अर्थ रुग्णाकडे त्यांचं लक्ष नसायचं असा अजिबात नाही. बोलता-बोलता जेमतेम मिनिटभर रुग्णाचा हात हातात घेऊन पटकन नाडीपरीक्षा करायचे आणि लगेच औषधांच्या पुड्या बांधायला सुरुवातही करायचे. राजकारण, साहित्य, संस्कृती अशा वेगवेगळ्या विषयांवरच्या गप्पांमध्ये गुंतून गेलेल्या पेशंटला तेवढा वेळ आपल्या आजाराचा विसरच पडायचा जणू. मी स्वतःही हा अनुभव अनेकदा घेतला आहे. सुरुवातीला असं वाटायचं, की असे कसे हे डॉक्टर. आपल्याला काय होतंय हे पूर्ण सांगूही देत नाहीत; पण नंतर जाणवत गेलं, की त्यांची नाडीपरीक्षाच एवढी नेमकी आहे, की रुग्णाची दोन-तीन वाक्यं त्यांना त्यांचं निदान पक्कं करायला पुरेशी व्हायची. शिवाय, आजारपण किरकोळ असो किंवा गंभीर, रुग्णाला मानसिकदृष्ट्या ताणातून बाहेर काढायचं मोठं काम व्हायचं यातून. ‘काही विशेष झालं नाहीये, होईल बरं’ असं त्यांना सांगायचं असायचं, ते त्यांच्या देहबोलीतून दिसायचं. समोरचा पेशंट कर्करोगाचा असो किंवा सर्दीचा, त्यांचा हाच आवेश कायम असायचा. कारण त्यांचं ज्ञानच त्या ताकदीचं होतं. रसौषधी या रुग्णांसाठी सोप्या, पण औषधनिर्मितीसाठी कठीण अशा पद्धतीवर त्यांचा दांडगा अभ्यास होता.

ज्या पेशंटना दवाखान्यात जाणं जमणार नसायचं, त्यांच्यासाठी डॉक्टर केव्हाही पेशंटच्या घरी व्हिजिटला जायचे. फोन गेला, की निघालेच ते लगेच. अगदी करोना काळातही त्यांचा हा शिरस्ता चुकलेला नाही. या काळात अनेक खासगी दवाखाने बंदच होते; पण वैद्य रघुवीर भिडे यांचा दवाखाना नेहमीच्या वेळेत सुरू होता. शिवाय गरज भासल्यास या काळातही ते पेशंटच्या घरी व्हिजिटला जात होते.

मरण कोणालाही चुकलं नाही; ज्याचे त्याचे या जगातले श्वास जन्माला येतानाच ठरलेले असतात, असं म्हटलं जातं; पण काही असाध्य किंवा गंभीर आजार होऊन मरण येणारच असेल, तर ते सुखानं येऊ देणं हे मात्र वैद्याच्या हातात असू शकतं. अन्य कोणत्या पॅथीत ही संकल्पना नसली, तरी आयुर्वेदात ती आहे. कारण आयुर्वेद ही औषधपद्धतीपेक्षाही जीवनपद्धती आहे. वैद्य रघुवीर भिडे यांच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी हे एक. असाध्य आजार झालेल्या (आणि विशेषतः अॅलोपॅथीने हात टेकलेल्या) रुग्णांना आराम पडेल अशी औषधयोजना करण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांच्या औषधांनी गंभीर आजाराच्या अनेक रुग्णांचं आयुष्य वाढल्याची आणि त्यांचं मरण सुखकर झाल्याची (म्हणजे एखाद्या गंभीर आजारात होत असलेल्या वेदनांची तीव्रता कमी होणं) अनेक उदाहरणं आमच्या कुटुंबाने जवळून अनुभवली आहेत. अगदी जवळचं उदाहरण म्हणजे माझ्या आजीचं. तिला तपासायला ते रत्नागिरीतून लांजा तालुक्यातल्या मठ या गावी जायचे. मृत्यू चुकणार नव्हताच; पण त्यांच्या औषधांनी तिला आराम पडला होता. एचआयव्हीच्या रुग्णांवरच्या उपचारांमध्ये सीडीफोर पेशींचं प्रमाण वाढवणं हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. वैद्य रघुवीर भिडे यांच्या औषधांनी तेही काम प्रभावीपणे केल्याचं उदाहरण माझ्या माहितीत आहे. 

साधारण महिनाभरापूर्वीच त्यांच्याकडे गेलो होतो. त्या वेळी अशीच वेगवेगळ्या विषयांवर चर्चा सुरू होती. करोना, क्वारंटाइन, उपचारपद्धती वगैरे वेगवेगळे विषय त्या चर्चेत होते. उपचारपद्धतींतल्या फरकाबद्दल त्यांना विचारलं होतं. तेव्हा ते म्हणाले होते - ‘आधुनिक औषधपद्धतीत बहुतेक वेळा उपचार कसे केले जातात, तर समजा रुग्णाच्या उजव्या हाताला काही झालंय, तर केवळ उजव्या हातावरच उपचार केले जातात; पण तो उजवा हात हा संपूर्ण शरीराचा भाग आहे, याचा विचार केला जात नाही. त्यामुळे त्यावर उपचार करताना शरीरात दुसऱ्या ठिकाणी काही तरी विपरीत परिणाम होतो. संपूर्ण शरीराचा विचार करूनच उपचार व्हायला हवेत ना!’ 

किती सोप्या शब्दांत त्यांनी आयुर्वेदाचं महत्त्व सांगितलं होतं, हे त्यावर विचार करताना माझ्या लक्षात आलं. कारण एकच औषध सरसकट सगळ्यांना देणं हे आयुर्वेदाच्या नियमांत बसत नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती हे निसर्गाचं मूळ तत्त्व लक्षात घेऊन प्रत्येक व्यक्तीनुसार उपचार करणं हे आयुर्वेदाचं वैशिष्ट्य आहे. एक वेळ औषध कदाचित सारखं असू शकेल; पण त्याचं अनुपान (म्हणजे औषध कशाबरोबर घ्यायचं) किंवा प्रमाण किंवा मिश्रण यात तरी काही तरी फरक नक्कीच असतो आणि तो अर्थातच त्या संबंधित व्यक्तीच्या प्रकृतीवर आधारित असतो. 

खरं तर करोनावर उपचार करतानाही या गोष्टींचा विचार केला जायला हवा. सरकारने जसं खासगी डॉक्टरांना चर्चेसाठी बोलावलं, तसंच आयुर्वेदतज्ज्ञांशीही त्यांनी चर्चा करायला हवी आणि आयुर्वेदीय उपचारही करायला हवेत, असं वाटतं. कारण ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ हे करोनाच्या वेगवेगळ्या लक्षणांनुसार सरळसरळ दिसतंच आहे आणि त्यांच्यावर उपचार मात्र ठरलेल्या त्याच त्या गोळ्यांचे केले जात आहेत. कोणतीही पॅथी वाईट नसते/नाही. रुग्णाला बरं करेल, ती पॅथी त्या वेळी चांगली; पण अॅलोपॅथिक औषधं चुकीची घेतली गेली किंवा त्यांचं प्रमाण कमी-जास्त झालं, तर त्यांचे साइड-इफेक्ट्स होतात हे वैश्विक सत्य आहे; असं असताना आयुर्वेदासारख्या पॅथीचा चांगला उपयोग करून घेण्यासाठी इतका उशीर का केला जात आहे, हे लक्षात येण्यापलीकडचं आहे. आयुष्यभर ज्यांनी रुग्णांना बरं करण्यासाठी आपलं ज्ञान पणाला लावलं, त्यांना स्वतःवरच्याच उपचारांसाठी स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग करता आला नाही, याला दैवदुर्विलास म्हणायचं नाही तर काय?

करोनावरच्या उपचारांसाठी आयुर्वेदाला मान्यता मिळवण्यासाठीही वैद्य रघुवीर भिडे यांची खटपट चालू होती. वैद्य परीक्षित शेवडे यांनीही त्यांच्या लेखात याचा उल्लेख केला आहे. तसंच, अवस्थानुरूप आत्ययिक चिकित्सेतील (इमर्जन्सी) काही कल्पही त्यांनी सुचविले होते, असं वैद्य शेवडे यांनी म्हटलं आहे. 

आपल्याकडे मुळात समस्या अशी आहे, की आयुर्वेदिक म्हटलं की त्याची खिल्ली उडवायची. सन्माननीय अपवाद वगळता, एमबीबीएस डॉक्टर स्वतः बीएएमएस डॉक्टरना कमी लेखतातच; शिवाय सरकारी वैद्यकीय अधिकारी म्हणूनही बीएएमएसना प्राधान्य मिळत नाही. ‘एमबीबीएस डॉक्टर मिळत नसला, तर बीएएमएस’ असाच प्राधान्यक्रम असतो. शिवाय, ‘बीएएमएस’ला प्रवेश घेणाऱ्यांमध्येही एमबीबीएसला प्रवेश मिळाला नाही, म्हणून बीएएमएसला प्रवेश घेतलेल्यांचं प्रमाण जास्त असतं. वास्तविक पाहता, बीएएमएस डॉक्टर होण्याचा जो अभ्यासक्रम आहे, त्यात आयुर्वेदातल्या सूत्रबद्ध ग्रंथांपासून मॉडर्न मेडिसीन आणि सर्जरीपर्यंत सगळ्या अभ्यासक्रमाचा समावेश आहे; पण एमबीबीएस होण्याच्या अभ्यासक्रमात मात्र आयुर्वेदाचा यत्किंचितही समावेश नाही. म्हणजे ज्ञानाचाच विचार करायचा झाला, तर बीएएमएस डॉक्टरचंच ज्ञान जास्त म्हणावं लागेल. कारण त्यांनी दोन्ही पॅथींचा अभ्यास केलेला असतो आणि दोन्हींपैकी कोणत्या एका किंवा दोन्हीही पॅथीची प्रॅक्टिस करायची हेही ठरवायची त्यांना परवानगी असते. वास्तविक सगळ्याच पॅथींच्या डॉक्टरांना एकमेकांच्या पॅथींच्या वैशिष्ट्यांचं ज्ञान द्यायला हवं आणि मुख्य म्हणजे दुसऱ्या पॅथीचा अनादर करू नये, हे तत्त्व. आयुर्वेदात आजच्या काळाला अनुसरून संशोधनही व्हायला हवं. त्यासाठी सामान्य जनतेपासून सरकारपर्यंत आणि वैद्यांपासून डॉक्टरांपर्यंत अशा सर्वच टप्प्यांत मानसिकता सुधारण्याची गरज आहे. रघुवीर भिडे यांच्यासारखं रत्न हरपल्यानंतर ही गरज अधिक अधोरेखित होते. 

आयुर्वेद किंवा औषधपद्धती यावर लिहिण्यासाठी मी अधिकारी व्यक्ती नाही, याची मला पूर्ण कल्पना आहे; मात्र आयुर्वेद या विषयात मूलभूत काम करणाऱ्या अनेक व्यक्तींचा स्नेह आमच्या कुटुंबाला लाभला आहे. शिवाय, माझी सख्खी बहीण, तिचं अख्खं कुटुंब हेही आयुर्वेदीय डॉक्टर आहेत आणि मुख्य म्हणजे ते सगळे आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतात. या सगळ्यांमुळे आयुर्वेद या विषयावरची चर्चा, बोलणं-चालणं कायम घडत असतं. आमच्या कुटुंबाचा भर शक्यतो आयुर्वेदीय उपचारांवरच असतो. त्यामुळेच आयुर्वेद हा जवळचा विषय वाटतो.

वैद्यराज नमस्तुभ्यं यमराजसहोदर। 
यमस्तु हरति प्राणान् वैद्यो प्राणान् धनानि च ॥ 
हे संस्कृत सुभाषित सर्वांना माहितीच आहे. ‘वैद्यराजा, तुला नमस्कार असो. कारण तू यमाचा भाऊ आहेस. यम केवळ प्राण हरण करतो, वैद्य मात्र प्राण आणि धन दोन्ही हरण करतो,’ असा त्याचा अर्थ. काही वर्षांपूर्वी वैद्यकीय क्षेत्रातील गैरव्यवहार दाखवणारा ‘डॉक्टर, तुम्हीसुद्धा’ हा चित्रपट आला होता, त्या वेळी सर्वसामान्यांना खूप धक्का बसला होता. आता मात्र वैद्यकीय क्षेत्रात गैरव्यवहार होण्यात काही नावीन्य राहिलेलं नाही. सगळेच डॉक्टर तसे असतात असं अजिबात नाही. कित्येक डॉक्टर या सगळ्या वाईट वातावरणातही उत्तम सेवा देत आहेत; पण एकंदर परिस्थिती चांगली नाही, याबद्दल दुमत नाही. या पार्श्वभूमीवर, रघुवीर भिडे यांच्यासारख्या निरलस वैद्यराजाचं जाणं चटका तर लावतंच, पण मोठी पोकळीही निर्माण करून जातं. 

- अनिकेत कोनकर
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BXVKCO
Similar Posts
१२ लाख सूर्यनमस्कार घातलेला माणूस रत्नागिरी : वय वाढत जाते, तसा बँकबॅलन्स वाढत जावा, अशी जवळपास प्रत्येकाचीच इच्छा असते. रत्नागिरीतील विश्वनाथ वासुदेव बापट यांची इच्छा मात्र थोडी वेगळी आहे... ती म्हणजे त्यांनी घातलेल्या सूर्यनमस्कारांची संख्या वाढण्याची आणि नियमितपणे सूर्यनमस्कार घालणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढण्याची... बापट यांनी आतापर्यंत
असामान्य व्यक्तिमत्त्वाचा साधा माणूस! मनोहर पर्रीकर यांचं वागणं-बोलणं अगदी तुमच्या-आमच्यासारखं, म्हणजे सामान्य माणसासारखं असलं, तरी त्यांचं व्यक्तिमत्त्व असामान्य होतं. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘जीएस’च्या निवडणुकीला उभं राहता येत नाही. तरीही मनोहर पर्रीकरांच्या वेळी तो नियम बदलून त्यांना निवडणुकीला उभं करण्यात आलं आणि ते निवडूनही आले
८७ वर्षांच्या मधुकर तळवलकरांकडून घ्या फिटनेसचा आदर्श (व्हिडिओ) देशभरात प्रसिद्ध असलेल्या तळवलकर व्यायामशाळेचे मधुकर तळवलकर यांचा ८७वा वाढदिवस नुकताच झाला. त्यांची प्रकृती एकदम ठणठणीत आहे. व्यायामाच्या अत्यंत काटेकोर सवयीमुळे त्यांनी ही आरोग्यसंपन्नता साध्य केली आहे. त्यांचा याबद्दलचा प्रेरणादायी व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. तो व्हिडिओ येथे देत आहोत
डॉ. ह. वि. सरदेसाई : ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व पुण्यातील नामवंत वैद्यकीय तज्ज्ञ आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व डॉ. ह. वि. सरदेसाई यांचे आज (१५ मार्च २०२०) निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. ‘घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती’सारख्या त्यांच्या अनेक पुस्तकांनी संपूर्ण महाराष्ट्रातच, नव्हे तर जगभरातील मराठी माणसांना सोप्या भाषेत वैद्यकीय ज्ञान देण्याचे मोठे काम केले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language