पुणे : रोवेट मोबिलिटीतर्फे बॅटरी ऑपरेटेड इलेक्ट्रिक स्कूटर्स व बाईक्सची नवीन श्रेणी दाखल करण्यात आली आहे. प्रसिध्द उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल मुथा, विठ्ठल मणियार व भरत देसरडा यांच्या प्रमुख उपस्थितीत या नवीन श्रेणीचे नुकतेच पुण्यात एका शानदार समारंभात अनावरण करण्यात आले. या वेळी रोवेट मोबिलिटीचे संचालक राहुल नहाटा, विजय नहाटा, प्रतीकराज पवार, जितू लोढा व रोहन नहाटा उपस्थित होते. या नवीन इलेक्ट्रिक दुचाकींच्या श्रेणीमध्ये इलेक, वेगाट्रॉन, झिपॉप आणि रामे या स्कूटर्स व ट्रोनो या बाईकचा समावेश आहे.
रोवेट मोबिलिटीचे संचालक राहुल नहाटा म्हणाले, ‘ही एक स्टार्टअप कंपनी असून, भारतीय बाजारपेठेत विस्तार करण्यासाठी सज्ज आहे. स्थानिक व राज्य पातळीवरच्या नवीन पिढीच्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन तसेच वाहन उद्योगातील नवीन कल लक्षात घेऊन आम्ही ही नवीन श्रेणी सादर केली आहे.’
ते पुढे म्हणाले, ‘या दुचाकी एक जानेवारी २०२०पासून रस्त्यावर धावताना दिसतील. त्यांची किंमत ५१ हजार ते एक लाख ५५ हजार रुपयांदरम्यान आहे. लिथियम, अॅसिड आणि पेटंटेड अशा क्लिक प्रकाराच्या बॅटरींच्या पर्यायासह या दुचाकी उपलब्ध आहेत. एंट्री लेव्हल मॉडेल असलेल्या झिपॉकचा कमाल वेग हा २५ किमी असून, इतर स्कूटर्ससाठी ताशी ७५ किमी आहे. ट्रोनो या बाईकसाठी कमाल वेग हा ताशी १०० किमी आहे. या दुचाकी दोन वर्षांच्या वॉरंटीसह उपलब्ध आहेत. रामे या स्कूटरमध्ये असलेला क्रुझ कंट्रोल पर्याय व रिव्हर्स फंक्शन हे या श्रेणीतील खास वैशिष्ट्य आहे. आमची पहिली शोरूम कोरेगाव पार्क येथे सुरू होणार असून, भारतभर विस्तार करण्याआधी कोल्हापूर, अहमदनगर, सातारा, सांगली आणि औरंगाबाद येथे शोरूम्स सुरू करणार आहोत. पहिल्या वर्षात दहा हजार युनिटसची विक्री करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.
प्रतीकराज पवार म्हणाले, ‘या नव्या इलेक्ट्रिक दुचाकींचे बुकींग २८ ऑक्टोबरपासून म्हणजे पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरू झाले आहे. रोवेटतर्फे पुण्यात आणखी सात फ्रँचायझी आणि भारतभरात २०२१ पर्यंत २०० फ्रँचायझी शोरूम सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे.’
राहुल नहाटा यांनी या ब्रँडच्या कल्पनेमागचा हेतू स्पष्ट केला. ते म्हणाले, ‘प्रदूषणाविरूध्द लढयाचे पहिले पाऊल आहे. रोवेटची संकल्पना ही अभिनवता, अद्ययावत डिझाइन आणि उत्पादनाची गुणवत्ता यांचा मेळ आहे. संशोधन व विकासावरदेखील आम्ही लक्ष्य केंद्रित केले आहे.’
जितेंद्र लोढा म्हणाले, ‘आम्ही एक अद्ययावत उत्पादन प्रकल्प सुरू करण्याच्या प्रक्रियेत असून, त्याची क्षमता दरमहा एक हजार युनिट्सची असेल. २०२१पर्यंत ती दरमहा दहा हजार युनिटसपर्यंत वाढविण्याचा आमचा प्रयत्न असेल.’