Ad will apear here
Next
पालेआसन - बिवळा


बिवळ्याचे वृक्ष कोकणात ‘पालेआसन’ (Pterocarpus marsupium) या नावाने प्रसिद्ध आहेत. प्रचंड होणारे हे वृक्ष पानझडी प्रकारातील असले, तरी आर्द्र सदाहरित जंगल प्रदेशांत अधिक आढळतात. भरपूर पाऊस आणि इतर झाडांच्या काहीशा सावलीत सूर्यप्रकाशासाठी सरळसोट धावत ९०-१०० फूट वर पळतात. जुन्या झाडांची वेढी १०-१२ फुटांपर्यंत असू शकते. 

दापोली कृषी विद्यापीठाच्या एकोणीस नंबर नर्सरीत तीन महाकाय पालेआसन काय राजेशाही थाटात उभे आहेत माहितीये! रस्त्यास लागून आहेत; पण कुणाचं लक्ष नाहीये त्यांच्याकडे. मी कॉलेजला असताना नेहमी काही सेकंद थांबायचो या झाडांकडे बघत. खूप कमी लोकांनी मान वर करून यांच्याकडे पाहिलं असेल. त्यापैकी एक वृक्ष तर नक्कीच ८० फूट उंच आणि १० फूट वेढीचा आहे. सिंधुदुर्गातदेखील बरीच झाडे आहेत पालेआसनाची. आमच्या बागेतदेखील काही मध्यम आकाराचे सात-आठ वृक्ष आहेत.

ऐन दिवाळीत हे वृक्ष फुलोऱ्यावर असताना असंख्य नाजूक सोनेरी पिवळ्या फुलांनी गच्च भरलेले झाडांचे शाकार सोन्याने मढवल्यासारखे दिसतात. असाच एखादा ऐंशी फूट उंच वृक्ष फुलोऱ्यावर असताना, धुक्यातील एखाद्या पहाटे डोंगरापलीकडून सूर्यमहाराजांचे दर्शन होण्याआधी त्यांची किरणे या झाडाच्या शाकारास भेदून अवकाशात जातानाचे दृश्य अंगावर शहारे आणते. त्याहून सुंदर नजारा संध्याकाळी दिसतो, जेव्हा सूर्य पश्चिमेस दिसेनासा होतो, आकाश लालसर झालेले असते आणि किरणे सकाळसारखीच त्याच्या उंच डेऱ्यात रुंजी घालत असतात. 

या फुलांना गोड वास असतो. मधमाश्यांसाठी, तसेच परागकणांवर ताव मारणाऱ्या अनेक कीटकांसाठी ही शाही मेजवानीच असते. एका झाडावर फुलोरा चार-पाच दिवसांपुरताच दिसतो; मात्र सगळी झाडे एकाच आठवड्यात फुलत नसल्याने महिनाभर त्या परिसरात कोणते ना कोणते झाड फुलोऱ्यावर दिसते. झाड अचानक सुवर्णपुष्पी होऊन जाते आणि अचानक ती सारी कधी गळून पडतात कळतपण नाही. 

या वृक्षाचा पाला गाई, गुरे, शेळ्या आवडीने खातात. झाडातून बाहेर पडणारा लालभडक डिंक ‘किनो गम’ म्हणून प्रसिद्ध आहे. हा डिंक सुकलेल्या रक्तासारखा दिसतो. या डिंकाचे औषधी गुणधर्म सर्वश्रुत आहेत. अतिसार आणि आवेत हा डिंक वापरतात. याचा अजिबात त्रास होत नाही. दाढदुखीत हा डिंक दातात भरतात. ब्रिटिश काळात हा डिंक युरोपमध्ये वाइन बनवताना वापरला जात असे, असेही वाचले.

मी काही फॉरेस्टर मंडळींसोबत या वृक्षावर चर्चा केली, काही आरागिरणी मालकांशी बोललो, काही सुतारांशीसुद्धा चर्चा केली; पण पालेआसनाच्या उत्कृष्ट लाकडाबद्दल कुणाला फारशी माहिती नाही. सुतार मंडळी या लाकडास दुसरा किंवा तिसरा नंबर देतात. कोकणात पूर्वी पालेआसनाचे लाकूड दरवाजा किंवा खिडक्यांच्या फ्रेम्स बनविण्यापुरते वापरत. आता नवीन पिढीत कुणाला तेही माहीत नाही. कुणी गरीब शेतकरी घराच्या वाशांसाठी वापरतो. त्यापुढे नाही. हे लाकूड जळाऊ म्हणूनच वापरत असल्याचे सर्रास कानावर आले. 

खरे तर मला मुद्दाम इथे लिहिणे आवश्यक आहे, की या वृक्षाचे लाकूड उत्कृष्ट प्रतीचे इमारती लाकूड आहे. अगदी सागवानाच्या जवळपास जाणारे. होय.

इंग्रजांच्या शासन काळात, म्हैसूर संस्थान असताना, सन १७०० ते १८०० यादरम्यान सह्याद्रीतील प्रमुख इमारती लाकडांच्या यादीत सागवान, शिसम यांसोबत पालेआसन होता. त्यांनी या लाकडाच्या यशस्वी चाचण्या घेऊन रेल्वे स्लीपर्सही बनवले होते. लाकूड अत्यंत टिकाऊ, मजबूत, मध्यम वजनाचे. केतीव भाग मातकट लाल-पिवळसर झाक असलेला, रंधा मारल्यावर सोनेरी छटा दाखवतो. गडद करड्या रंगाच्या सुंदर फिगर्स दिसतात. केतीव भागास अजिबात वाळवी लागत नाही. पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात प्रसरण आणि आकुंचन नगण्यच असते. ब्रिटिशांनी त्यास प्रथम श्रेणीतील इमारती लाकडाचा दर्जा दिला होता.  

IUCN Catagory नुसार सध्या मात्र पालेआसन संकटग्रस्त होण्याच्या मार्गावर आहे (Near Threatened C1). निसर्गप्रेमी मंडळींना थोडासा राग आला असेल माझा, की मी झाडाच्या लाकडाबद्दल बोललो. हो ना! वाचकांची माफी मागून सांगतो, की ‘लाकूड वापरूच नये’ अशा मताचा मी नाही. फक्त कोणते, किती आणि केव्हा, कसे हा प्रश्न आहे. प्लास्टिक आणि धातूपेक्षा मी लाकूड आणि बांबू यांचा वापर अधिक शाश्वत मानतो. आज स्थानिक झाडांच्या संवर्धनावर चर्चा करीत असताना त्यास अर्थकारणाची जोड द्यावीच लागेल. उत्तम प्रतीच्या लाकडाच्या निमित्ताने का होईना, पालेआसनसारखे वृक्ष मुद्दाम लावणे आवश्यक नाही काय? तसेही आज जळाऊ म्हणूनच चाललंय ना. दुसरीकडून केवळ सागवान-सागवान असा जप जरा कमी करायला हवा आता. स्थानिक, दुर्मीळ होत चालेल्या वृक्षांना मुख्य प्रवाहात आणण्याची वेळ आहे ही. 

- मिलिंद पाटील, सिंधुदुर्ग
संपर्क : ९१३०८ ३७६०२

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BUZDCU
Similar Posts
मुडी...! बियाण्यासाठीचं धान्य साठवण्याच्या घरगुती मुड्या आज कुठे औषधालाही दिसत नाहीत. आता धान्य साठवण करून ठेवण्याइतपत शेतीही कुणी करत नाही; मात्र बालपणी पाहिलेल्या वस्तू कालौघातही पटकन विसरता येत नाहीत. ‘मुडी’विषयी बाबू घाडीगावकर यांनी केलेलं हे स्मरणरंजन...
‘दरवळ’ सोनचाफ्याच्या कलमांचा स्वतःच्या नावाचा ब्रँड तयार करणाऱ्या, अस्सल कोकणच्या लाल मातीतल्या सुगंधवेड्या ‘उदय गोपीनाथ वेलणकर’ यांची ही यशोगाथा...
निसर्गाला आहे तसा ठेवण्याची ‘अभय’शपथ घ्यायलाच हवी! अधिक मासातल्या दानामागे वैज्ञानिक सूत्र, सामाजिक आशय आणि नैतिकता गुंफलेली आहे. दानामुळे संबंधित वस्तूवरील आपला हक्क समाप्त होऊन दुसऱ्याचा स्थापित होतो. घेणाऱ्यावर कोणत्याही प्रकारचे उपकार न राहता केलेलं दान सात्त्विक समजतात. याकारणे श्रद्धा, तुष्टि, भक्ती, ज्ञान, अलोभ, क्षमा आणि सत्य या सात गुणांची रुजवात आपल्या व्यक्तिमत्त्वात होत राहाते
आई! ‘शेतकऱ्याचा प्रश्न हा असाच प्रश्न आहे. ते आपलं बाळ आहे असं समजून, आईच्या मायेनं त्याला संकटातून जपत बाहेर काढलं पाहिजे. त्यात राजकारण झालं, तर अगोदरच समस्यांचे तडाखे सोसणारा शेतकरी अधिक घायाळ होईल...’

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language