पुणे : पुण्यातील मनाली शेळके या ‘कामायनी’ संस्थेतील विशेष मुलीने दुबईत होणार असलेल्या आंतरराष्ट्रीय विशेष ऑलिंपिक स्पर्धेत प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर स्थान मिळवले आहे. भारोत्तोलन (पॉवरलिफ्टिंग) या खेळात ती भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
पुण्यातील ‘कामायनी’ या संस्थेत शिकणारी मनाली मनोज शेळके हिच्यात खेळासाठी आवश्यक असणारे जिद्द, चिकाटी, चपळता यांसारखे गुण ओळखून आणि या खेळाला साजेशी असलेली शरीरयष्टी यांमुळे प्रशिक्षकांनी तिला भारोत्तोलनाचे प्रशिक्षण देण्याचे ठरवले. मनालीच्या आई-वडिलांनीही याबाबत पाठिंबा दिला. त्यामुळे मनालीचे पॉवरलिफ्टिंगचे प्रशिक्षण सुरू झाले.
आपल्यात असलेल्या चिकाटीच्या जोरावर मनालीने सुरुवातीला अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि चांगली कामगिरी केली. कोल्हापुरात झालेल्या राज्यस्तरीय भारोत्तोलन स्पर्धेत ४८ किलो गटात जर्क, स्काँड, बेंच या प्रकारांमध्ये तिने सुवर्णपदक पटकावले. पंजाब, झारखंड, दिल्ली येथील स्पर्धांमध्येही उत्कृष्ट कामगिरी करून तिने सुवर्णपदक मिळवले. वाढत्या गुणवत्तेबरोबरच मनालीचा आत्मविश्वासही वाढत गेला आणि अखेर तिला देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.
विशेष मुलांसाठीच्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आजवर महाराष्ट्रातून जाणारी मनाली ही एकमेव मुलगी असून, दुबईत १४ ते २१ मार्चदरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विशेष ऑलिंपिक स्पर्धेत ती भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
मनालीच्या या निवडीबद्दल सर्वांकडूनच आनंद व्यक्त होत असून, कामायनी संस्थेतर्फे मनाली शेळके आणि तिच्या आई-वडिलांचा नुकताच सत्कार करण्यात आला. मनालीचे वडील मनोज शेळके हे पुणे दूरदर्शनमध्ये अभियंता म्हणून कार्यरत आहेत.
(मनालीच्या, तिच्या प्रशिक्षकांच्या आणि वडिलांच्या मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)