Ad will apear here
Next
क्रांतिज्योत सावित्री!
महाराष्ट्रातील मुलींना शिक्षणाची दारे उघडून देणाऱ्या माता सावित्रीबाई फुले यांचा आज (तीन जानेवारी) जन्मदिन!

महात्मा फुले यांच्याशी विवाह केल्यानंतर सावित्रीबाईंनी जणू समाजातील तळागाळात अडकून पडलेल्या लोकांच्या हितासाठीच संसार मांडला. सावित्रीबाईंनी शिकावे म्हणून जोतिबांनी त्यांना शाळेत धाडले; पण मुलांच्या शाळेत शिकताना त्यांना खूप मानसिक त्रास सहन करावा लागला. 

मुलींनी शिकायचे तर त्यांच्यासाठी स्वतंत्र शाळा हव्यात हे जाणून त्यांनी एक जानेवारी १८४८ रोजी पुण्यात भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा काढली. तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली. सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही मुलींच्या दोन-तीन शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या.
या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्चवर्णीयांनी ‘धर्म बुडाला... जग बुडणार... कली आला’ असे सांगून केले. सनातन्यांनी विरोध केला. अनेक संघर्ष करत शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला.

शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढी परंपरांनाही त्यांनी आळा घातला.

लहानपणीच लग्न झालेल्या अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. पतीच्या निधनानंतर एकतर त्यांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून त्यांना कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणा तरी नराधमाच्या कामवासनेच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत.

जोतिबांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाईंनी आपलीच मुले मानले; त्यातील एकाला दत्तकही घेतले.

केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे.

महात्मा फुले यांच्या निधनानंतरही (१८९०) सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातूनही केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित झाली.

१८९६-१८९७मध्ये पुण्यात प्लेगची साथ आली. सावित्रीबाई रुग्णसेवेस पुढे आल्या. हा दैवी कोप नाही; एक संसर्गजन्य रोग आहे, हे लोकांना पटवू लागल्या. प्लेगच्या रुग्णांसाठी पुण्याजवळ ससाणे येथे दवाखाना काढला; पण प्लेगनेच घात केला व १० मार्च १८९७ला सावित्रीबाईंना देवाज्ञा झाली.

अखंड तेवत राहिलेली सामाजिक क्रांतिज्योत निमाली. त्यांना मन:पूर्वक आदरांजली! 

त्यांची एक कविता वाचनीय, मननीय आहे.

बारा बलुती बारा अलुती 
कितीक जाती जमाती
शिवारात या सुखे नांदती
पाऊसपाणी छान पडतसे 
येती पिके सारी
विहिरीवर फळेफुले गोजिरी
गुलजार पक्षी गाती मनोहर 
फिरती फुलपांखरे
ऐसा निसर्ग तिथे वावरे

- भारतकुमार राऊत


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GVGCCU
Similar Posts
निळा म्हणे...! महाराष्ट्राच्या संतपरंपरेने श्री ज्ञानेश्वरांपासून तुकडोजी व गाडगेबाबांपर्यंत अनेक अनमोल मणी जोडले; पण त्यातले काही विस्मृतीत गेले. संत निळोबाराय त्यापैकीच एक. त्यांची आज (चार मार्च) पुण्यतिथी.
राही मतवाले... तलत महमूद ‘इतना ना मुझ से तू प्यार बढा, की मैं एक बादल आवारा’ अशा गाण्यांनी लाखो प्रेमी जीवांच्या मनाची भावना स्वरबद्ध करणारे गायक तलत महमूद यांचा आज (२४ फेब्रुवारी) जन्मदिन. त्यांच्या तरल स्मृतींना सलाम!
एका जनार्दनी...! सोळाव्या शतकात मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील रंजल्या-गांजल्या व निरक्षरतेने पिडलेल्या जनतेला उपदेश करण्यासाठी संस्कृतप्रचुर व अलंकारिक भाषेचा त्याग करून सामान्यांच्या भाषेत गहन तत्त्वज्ञान सांगणारे विद्वान संत-कवी एकनाथ यांची आज (२५ फेब्रुवारी) पुण्यतिथी. त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण आदरांजली!
बाळासाहेब : एक लेणे...! शिवसेनेचे संस्थापक आणि प्रसिद्ध व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांचा २३ जानेवारी हा जन्मदिन. ज्येष्ठ संपादक भारतकुमार राऊत यांनी जागवलेल्या त्यांच्याबद्दलच्या या आठवणी...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language